जगाक मालवनीची गोडी लावल्यानं ती आमच्या मालवनीच्या बापाशीन. मालवनीचो ह्यो बापूस म्हणजे आमचो तात्या सरपंच. म्हणजेच नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. कारण त्यांनी 'वस्त्रहरण' करूक घेतल्यानी आणि सगळा जग मालवनीच्या प्रेमात पडला! म्हणूनच मच्छिंद्र कांबळींचो वाढदिवस म्हणजे 'इंटरनॅशनल मालवनी दिवस' करायचो सोशल मीडियावरील पोराबाळांनी ठरवल्यानी त्याची ही गोष्ट.
जागतिकीकरणाने आणि भांडवलशाहीने व्यापून टाकलेल्या आजच्या जगात शांती, समाधान याच्या शोधात प्रत्येक जण फिरताना दिसतोय. दुसरीकडे पुन्हा कर्मकांडे आणि धर्माचा बाजार तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांनी मांडलेल्या सत्य, अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह तत्त्वांनी कार्यरत राहण्याची सध्या गरज आहे. आज महावीर जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याची ओळख करून घ्यायला हवी.
गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं.
आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातूनच संत तुकाराम महाराज खऱ्याअर्थानं मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘संत तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिलाय. त्याला १९९८ला भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोरे यांनी केलेलं हे भाषण तुकारामांशी गाठभेट करून देतं.
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो.
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद.
रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.