केशवराव जेधे: शेतकरी-कामगारांचा बुलंद आवाज

२२ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.

मूठभर पुढारलेले लोक सोडले तर बाकीचा बहुजन समाज हा जातीने ब्राह्मणेतर आणि पेशाने शेतकरी किंवा कामगार होता. हा श्रमजीवी समाज अडाणी, अशिक्षित, असंघटित, जीर्ण रूढींच्या आहारी गेलेला आणि खुळ्या कल्पनांचा गुलाम बनला होता. पुढारलेल्या जाती आणि मागासलेल्या जाती यात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विषमतेचं एक अफाट सहारा वाळवंट पसरलेलं होतं.

'ज्या देशात सुख, संपत्ती आणि श्रेष्ठत्व ही मूठभर लोकांच्याच वाट्याला गेलीत आणि दुःख, दारिद्य्र आणि दीनपण अफाट समाजाच्या वाट्याला आलं. ही वाटणी गुणांवर न राहता ती जन्मावर केलेली आहे, तो देश पारतंत्र्याच्या चिखलात रूतला तर कसलं  आश्चर्य?' हे विचार आहेत केशवराव जेधे यांचे.

नाशिक जिल्ह्यात दाभाडी इथं १९५० ला झालेल्या शेकापच्या दुसर्‍या अधिवेशनात ते बोलत होते. त्यांचं हे भाषण शेतकरी आंदोलनातल्या प्रत्येक नेत्या-कार्यकर्त्याने किंबहुना प्रत्येक सजग भारतीयाने अभ्यासावं असंच आहे. या भाषणातून त्यांच्यातल्या एका कळकळीच्या अभ्यासू नेत्याचं दर्शन घडतं.

हेही वाचा: राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

चाळीस वर्षांची कारकीर्द

शेतकरी-कष्टकरी वर्गाच्या शोषणावरच आधारलेल्या व्यवस्थेला आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या नेतृत्वाला खडे बोल सुनावण्याचं धारिष्ट्य केशवरावांनी या अधिवेशनात दाखवलं. पण केवळ या भाषणातूनच नाही, तर चाळीस वर्षांच्या आपल्या संपूर्ण राजकीय-सामाजिक कारकिर्दीत केशवराव जेधेंनी शेतकरी-कामगारांच्या प्रश्नाला प्राधान्यक्रम दिला.

पक्षश्रेष्ठींना धारेवर धरायला त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. पक्षाला अनुकूल भूमिका घेत वैयक्तिक फायद्याचं राजकारण केशवराव जेधेंनी केलं असतं, तर मंत्रिपदाची ऑफर त्यांच्या गळ्यात कधीच पडली असती; पण जेधे आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले.

बहुजन वर्गाचा राजकीय प्रवाह

ब्राह्मणेतर चळवळ ही बहुसंख्य लोकांना वरकरणी जातीय चळवळ वाटत असली, तरी ती वास्तविक वर्गीय चळवळ होती. तो शोषक-शोषित, सावकार-पीडित, पिळणारे-पिचलेले यांच्यातला आर्थिक विषमतेचा आणि सामाजिक असमानतेचा संघर्ष होता.

बहुसंख्य ब्राह्मणेतर जनता ही शेतकरी, कष्टकरी होती. भिक्षुकशाही, सावकारशाही यात ती पुरती भरडली होती. शिक्षणाचा नाकारलेला अधिकार, मंदिरप्रवेश मनाई आणि मिळणारी हीन वागणूक यामुळे बहुजन हे सातत्याने दबावाखाली होते.

केशवराव जेधेंनी जरी महात्मा फुलेंच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा कित्ता गिरवला असला, तरी शेतकरी-कामगार या बहुजनवर्गाला मुख्य राजकीय प्रवाहात सामावून घेण्याचं महत्त्व त्यांना लवकरच समजलं.

हेही वाचा: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर

छत्रपती शाहूंच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने पुण्यातली पुरोगामी चळवळ वेग धरू लागली आणि शाहूंच्या निधनानंतर ती राजकीय चळवळ झाली. १९२५ ला केशवराव जेधे पुणे म्युनिसिपालटीत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी ब्राह्मण्यवाद्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा ठराव, शिवस्मारक, मुलींच्या शिक्षणाचा ठराव, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार, सार्वजनिक पाणवठ्यांवर सर्वांना प्रवेश अशा कळीच्या मुद्द्यांना हात घालत बहुजनांचा आवाज बुलंद केला.

त्यांच्या संघर्षात्मक भूमिकेमुळे ते लवकरच लोकप्रिय आणि परिणामकारक नेते ठरले. १९२७ ला मुंबईचे गृहमंत्री सर चुनीलाल मेहता यांनी कायदेमंडळात तुकडेबंदी विधेयक मांडलं. या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती करता येईल आणि शेतकर्‍यांचा फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं होतं; तर बहुसंख्य शेतकर्‍यांना आपल्या जमिनी गमावण्याची आणि शेतमालक न राहता, शेतमजूर होण्याची भीती सतावत होती. या विधेयकामागोमाग शेतसारावाढीचा प्रस्तावही मांडण्यात आला.

सरकारच्या या अन्यायकारी प्रस्ताव आणि विधेयकांचा जाहीर निषेध करण्यात पुढे होते केशवराव जेधे. १ जुलै १९२८ ला बारामतीला भरलेल्या सभेत पुढील महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी भाषणं केली आणि या शेतसारावाढीच्या प्रस्तावाला आणि तुकडेबंदी विधेयकाला जोरदार विरोध करून निषेध व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बार्डोली सत्याग्रहाला पूर्णतः पाठिंबा दिला.

मुंबई इलाखा शेतकरी परिषद

२५ जुलै १९२८ ला केशवराव आणि बाबूराव जेधे यांनी पुण्यात मुंबई इलाखा परिषद आयोजित केली. परिषदेचे अध्यक्ष होते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, तर स्वागताध्यक्ष होते बाबूराव जेधे. या परिषदेनंतर जवळपास पाच हजार शेतकर्‍यांचा लोंढा कौन्सिल हॉलच्या दिशेने गेला. ४४ गावांतल्या ६० हजार शेतकर्‍यांच्या सह्यांनिशी एक अर्ज लालजी नारायण यांना देण्यात आला.

केशवराव जेधेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळीमुळे सरकारवर दबाव आला आणि त्यांनी दोन्ही विधेयकांवरच्या चर्चा पुढे ढकलल्या. केशवराव एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शेतकर्‍यांमधली जनजागृती सुरूच ठेवली. सारावाढ विधेयकाविरुद्ध पुणे जिल्ह्यात केशवरावांनी ठिकठिकाणी सभांचा धडाका लावला.

केशवराव जेधेंनी सर्वसामान्य शेतकरी-कष्टकर्‍यांच्या हितार्थ घेतलेली संघर्षात्मक भूमिका आजच्या शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

हेही वाचा: महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

ब्राह्मणेतर चळवळ ते स्वातंत्र्य चळवळ

१९२४ ला सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा स्वागत-कार्यक्रम जेधे मॅन्शनमधेच आयोजित केला होता. भारताचं स्वातंत्र्य हेच आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे, ब्रिटीश हाच आपला मुख्य शत्रू आहे, त्यामुळे या बलाढ्य शत्रूला नामोहरम केल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद सोडवला जाऊ शकतो, असं आवाहन महात्मा गांधींनी जेधे मॅन्शनमधल्या सभेत केलं.

केशवरावांच्या मनात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविषयी संताप आधीपासूनच होता; त्यात आता महात्मा गांधींसारखं विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळेच केशवरावांनी आपला मोर्चा ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला. असहकार आणि मिठाचा सत्याग्रह यांच्या निमित्ताने केशवरावांचा शेतकरी-कष्टकर्‍यांशी अगदी जवळून संपर्क आला.

फैजपूर अधिवेशनाची जबाबदारी

काँग्रेसच्या माध्यमातून आपण एकाच वेळी ब्रिटिशांविरोधात लढावं आणि शेतकर्‍यांच्या, कामगारांच्या समस्याही सोडवण्याचा प्रयत्न करावा, हाच केशवरावांचा मानस होता. म्हणूनच १९३६ ला काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूर इथं घेण्याचं निश्चित झालं, तेव्हा या अधिवेशनाची जबाबदारी घेण्यासाठी केशवराव जेधे पुढे आले.

त्या काळी संपर्क आणि वाहतुकीची साधनं आजच्या इतकी प्रभावी नक्कीच नव्हती. अशा प्रतिकूलतेतही केशवराव जेधेंनी मे ते डिसेंबर १९३६ या काळात महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. जास्तीत जास्त शेतकरी, कष्टकरी या अधिवेशनासाठी यावेत यासाठी केशवरावांनी त्यांचे सहकारी काकासाहेब गाडगीळ यांच्यासह जीवाचं रान केलं.

अखेर केशवरावांच्या कष्टाचं चीज झालंच. डिसेंबर महिन्यात भरलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्यासमोर जवळपास साठ हजारांचा विराट जनसमुदाय होता. शेतकरी, कष्टकरीवर्ग काँग्रेसशी जोडला जावा, त्याचा थेट काँग्रेसशी संबंध यावा, हाच केशवराव जेधेंचा प्रामाणिक प्रयत्न होता. आणि झालंही तसंच!

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

जेधेंमुळे बहुजन समाज काँग्रेसकडे

केशवराव जेधे नावाचा झंझावात अख्ख्या मराठी मुलखाच्या कानाकोपर्‍यात जाऊन धडकत होता. शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत होता. न्यूजपेपरसमोर आपली भूमिका प्रांजळपणे मांडत होता. सत्तेचा सारीपाट हा वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच मांडायचा नसतो; तर शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या उत्थानासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठीच हा सारीपाट मांडायचा असतो, हेच केशवरावांचं तत्त्व होतं.

त्यांच्या पारदर्शी, स्पष्टवक्त्या आणि प्रांजळ भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या खेड्यांतला सामान्यातला सामान्य शेतकरी-कष्टकरी काँग्रेसशी जोडला जाऊ लागला. मुख्य म्हणजे, केशवराव जेधे स्वतः मराठा असले तरी बहुजनांना आपल्यात सामील करून घेण्याचं आणि एकसंध ठेवण्याचं कौशल्य त्यांना चांगलंच माहीत झालं होतं. १९३८ ला महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद केशवरावांना मिळालं आणि खर्‍या अर्थाने काँग्रेस बहुजनांचा, शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा आवाज बनली.

माझा समाज खेड्यात आहे आणि तोच माझ्या राष्ट्राचा पाया आहे, असं ठामपणे मांडणारे केशवराव जेधे म्हणूनच बहुजनांना काँग्रेसकडे खेचू शकले. स्वातंत्र्यानंतर सत्ता ही प्रामुख्याने शेतकरी-कष्टकरीवर्गाच्या हाती यावी, हेच त्यांचं ध्येय होतं. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत बहुसंख्य शेतकरी-कष्टकरी सहभागी होण्यामागे नेमकं हेच तर कारण होतं.

काँग्रेसमधल्या भांडवलवाद्यांशी संघर्ष

ब्रिटीशांचं राज्य जाणार आणि आपल्यासारख्या कष्टकर्‍यांचं राज्य येणार, या आशेने खेड्यापाड्यातला शेतकरी आंदोलनात सहभागी होत होता; पण गांधीवादी गटाने मात्र शेतकर्‍यांच्या हिताचे कुठलेच निर्णय घेतले नाहीत. मोरारजी देसाई धार्जिणा बाळासाहेब खेर मंत्रिगट हा मूठभर मारवाडी-गुजराती भांडवलवाद्यांना अनुकूल भूमिका घेत कष्टकरीवर्गाचं हित बाजूला करत होता.

मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस यातले मतभेद तीव्र होत गेले. केशवराव जेधे यांनी कूळकायदा, तुकडेबिल या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या; पण त्यांच्या सूचनांना मोरारजी देसाई आणि खेर गटाने केराची टोपली दाखवली. शेतसारा रद्द करा, शेतकी कर्ज माफ करा अशा मागण्या जेधे करतच राहिले. त्यामुळे मंत्रिगट आणि जेधेगट यांच्यातला संघर्ष तीव्र होत गेला आणि त्यातूनच ११ सप्टेंबर १९४६ ला काँग्रेस शेतकरी कामगार संघाची स्थापना झाली.

काँग्रेसमधेच राहून सामाजिक, राजकीय, आर्थिक कार्यक्रम बहुजनांच्या म्हणजेच शेतकरी-कामगारवर्गाच्या दृष्टीने अधिक प्रभावी करण्यासाठी आणि शेतकरी-कष्टकरी वर्गाचे राज्य स्थापण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ध्येय या संघाचं होतं.

हेही वाचा: समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

थेट शेतकऱ्यांच्या नावानं पक्ष

या माध्यमातून केशवराव आणि शंकरराव मोरे यांनी मराठी प्रांतातल्या शेतकर्‍यांची मोट बांधली. केशवरावांनी झंझावाती प्रचारदौर्‍यांनी जनसामान्यांशी संपर्क घट्ट केला. या प्रचारामुळे काँग्रेसचं भांडवलधार्जिण धोरण उघडं पडू लागलं आणि पक्षात कमालीचा ताण वाढला. केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांनी वैयक्तिक फायद्याचा आणि राजकीय करिअरचा विचार न करता, शेतकरी कामगार पक्ष काढला आणि त्या माध्यमातून आपला संघर्ष पुढे सुरू ठेवला.

शेकाप एक राजकीय पक्ष म्हणून किती यशस्वी ठरला, हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण एक मात्र नक्की- शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना जागे करण्याचे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षात्मक भूमिका घेण्याचे केशवराव जेधेंचं कर्तृत्व सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरक आहे.

आयुष्याच्या उत्तरार्धात राज्यपालपदाची ऑफर नाकारणारे केशवराव जेधे आजही तितकेच संस्मरणीय आणि अनुकरणीय आहेत, ते त्यांनी केलेल्या शेतकरी-कष्टकरीभिमुख राजकारणामुळेच!

हेही वाचा: 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

(लेखक जेधे यांचे पणतू आणि देशभक्त केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत)