संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय.
‘भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. मी विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणून मी असं बोलत नाही. तर भारताचा नागरिक आणि अर्थशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने मी हे सांगतोय.’ हे शब्द आहेत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे. ‘द हिंदू’ या इंग्रजी पेपरमधे आज १८ नोव्हेंबरला त्यांचा 'भारताच्या आर्थिक कमकुवतपणाचं मूळ’ अशा शीर्षकासह लेख प्रसिद्ध झालाय. देशाची आर्थिक वाढ चिंताजनक असल्याचं त्यांनी या लेखात सांगितलंय.
या लेखात डॉ. सिंग म्हणतात, ‘एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ही तिथल्या समाजाच्या कार्यप्रणालीचा आरसा असते. सुरळीत चाललेली अर्थव्यवस्था हा त्या देशातले सामाजिक व्यवहार सुदृढ आहेत याचं प्रतिबिंब असते. अर्थव्यवस्थेशी संबंधित लोक आणि संस्था यांच्यात सुसंवाद होत असेल तरच अर्थव्यवस्था चालते. या दोन घटकांचा एकमेकांवर आणि स्वतःवर विश्वास असणं हे आर्थिक वाढीचं मूलभूत तत्त्व आहे. पण सध्या नेमक्या याच विश्वासाला संदिग्धपणाची झालर लागलीय.’
डॉ. मनमोहन सिंग यांचं अर्थशास्त्रातलं ज्ञान वादातीत आहे. अनेक मोठे विचारवंत, अभ्यासकही त्यांच्या अर्थशास्त्रातल्या ज्ञानाचं कौतूक करतात. अशात त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल अस्वस्थ होणं हे चिंताजनक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ‘सब चंगा सी!’ हा दृष्टिकोन ठेवणाऱ्या सगळ्यांनीच डॉ. सिंग यांचं म्हणणं गांभीर्यानं लक्षात घेण्यासारखं आहे. मनमोहन सिंग यांनी आपल्या लेखात अधोरेखित केले सहा मुद्दे.
हेही वाचाः महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत
सध्याचा आर्थिक वाढीचा दर गेल्या १५ वर्षात सगळ्यात खालच्या पातळीवर गेलाय. बेरोजगारी गेल्या ४५ वर्षांत सगळ्यात उच्चांकी पातळीवर आहे. तर खर्च करण्याची लोकांची क्षमता गेल्या ४० वर्षांत सगळ्यात खालच्या स्तरावर आलीय. बॅंकांचं बॅड लोन या काळात सगळ्यात जास्त आहे.
गेल्या १५ वर्षात सगळ्यात कमी वीज उत्पादन होतंय. वर खाली जाणारा हा आलेख असाच अनाहत सुरू राहील. ही स्थिती निराशाजनक असल्याचा इशारा डॉ. सिंग आपल्या लेखात देतात. पण डॉ. सिंग यांच्या मते खरा प्रश्न इथं नाहीय, तर ही आकडेवारी अशी कशामुळे झाली त्या दोन-तीन गोष्टी हाच खरा प्रश्न आहे.
पहिली गोष्ट म्हणजे लोकांमधे असणारं भीतीचं वातावरण. सरकारी अधिकारी आपल्याविरुद्ध छळाच्या कारवाया करण्याची भीती वाटते, असं अनेक उद्योगपती मला सांगतात. बॅंकांना नवीन कर्ज देण्याची भीती वाटते. उद्योजकांना नवा प्रोजेक्ट सुरू करण्याची भीती वाटते.
आर्थिक वाढीचा दर वाढवण्यासाठी आणि नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी टेक्नॉलॉजी स्टार्ट अप्स गरजेचे आहेत. पण इथंही निराशाच हाती पडते, असं डॉ. सिंग सांगतात. ‘पॉलिसीमेकर्स आणि संस्थांचे अधिकारी या सरकारच्या काळात खरं बोलायलाही घाबरत आहेत. असं अविश्वासाचं वातावरण असताना अर्थव्यवस्था प्रगती करू शकत नाही,’ असं मनमोहन सिंग यांनी आपल्या लेखात नमूद केलंय.
भीतीसोबतच एक अगतिकता, असहाय्यतेची भावना समाजात दिसते, असं डॉ. सिंग सांगतात. आपलं गाऱ्हाणं घेऊन नेमकं जायचं कुठं हे लोकांना कळत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केलीय.
ते लिहितात, ‘लोकांचा मीडिया, न्यायालय, तपास संस्था यासारख्या स्वतंत्र संस्थांवर विश्वास असतो. पण गेल्या काही काळात या संस्थांचंही स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातंय. अशा संस्थांचं स्वातंत्र्य संपतं तेव्हा लोकांना न्याय मिळत नाही. अशा वातावरणात उद्योगधंद्यात कुणालाही रिस्क घ्यायची नसते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो.’
हेही वाचाः कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मते, या सगळ्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे मोदी सरकारचं प्रत्येकाकडे शंका घेऊन पाहणं. शंकेखोरपणा हा मोदी सरकारसाठी एक सिद्धांतच होऊन बसलाय.
‘उद्योगपती, बॅंकर, पॉलिसीमेकर, नियंत्रक, छोटे मोठे उद्योजक आणि नागरिक या सगळ्यांकडे फसवणुकीच्या शंकेखोर नजरेनं बघण्यामुळे समाजातला विश्वास मोडीत काढलाय. यामुळे आर्थिक विकास थांबलाय,’ असं डॉ. सिंग यांनी म्हटलंय.
वाढत्या महागाईकडे लक्ष वेधत डॉ. सिंग यांनी महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केलीय. त्याचसोबत महागाई कमी करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, योजना राबवाव्यात असा सल्ला त्यांनी सरकारला दिलाय. भारतात ग्रामीण भागात गेल्या चार दशकांतली सगळ्यात मोठी घसरण सध्या चाललीय, असं मनमोहन सिंग म्हणाले.
ग्रामीण भागांतल्या घरगुती उत्पन्नात वाढ होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम खर्च करण्यावर होतो. खर्च सांभाळण्यासाठी लोक अडचणीच्या वेळेसाठी साठवून ठेवलेले पैसे वापरायला काढत आहेत. जीडीपीत वाढ झाल्याचा लाभ फक्त क्रिमी लेअरमधे येणाऱ्यांनाच मिळतोय.
भारत आज जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अशा अर्थव्यवस्थेशी मनाला येईल तसा खेळ करणं बरोबर नाही, अशी ताकीदच सिंग यांनी दिलीय. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याची नामी संधी हातात असतानाच सरकारकडून अर्थव्यवस्थेवर आघात होत असल्याचं मत डॉ. सिंग यांनी नोंदवलंय.
चिनी अर्थव्यवस्थेत मंदी चालू असल्यानं आतंरराष्ट्रीय स्तरावर विकास करायची आयती संधी भारताकडे चालून आलीय. भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती इतकी नाजूक असताना दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून ही स्थिती सुधारता येईल आणि अर्थव्यवस्थेचा विकासही होईल. त्या दोन गोष्टी म्हणजे – १) वित्तीय धोरण राबवून मागणी वाढवणं आणि २) गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवून खासगी गुंतवणूक वाढवणं.
हेही वाचाः
जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट
बाजार समित्या बरखास्ती ही तर दुसरी नोटाबंदीच
अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?
भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं
बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?