कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

१३ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत.

कोरोना वायरस पुण्यानंतर आता मुंबईत पाऊल टाकल्यानं महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलंय. दुसरीकडे राज्य सरकारनंही कोरोनाला वेळीच पायबंद घालण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरवात केलीय. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोचलीय.

कोरोनाचं संकट गडद होत चाललंय. विविध कार्यक्रमांवर कोरोनाची अघोषित बंदीच आता येऊ घातलीय. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला मोकळीक मिळावी म्हणून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शनिवारीच आटोपतं घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं घेण्यात आला.

देशोदेशीचं सरकारं, वेगवेगळ्या आरोग्य संस्था कोरोनाशी लढत आहेत. पण सगळ्यात मोठा लढा हा फेकन्यूजविरोधात आहेत. अशाच काही फेकन्यूज, अफवांना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तर आपण बघूत.

प्रश्नः मास्क घातल्याने माझा कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

वास्तव : पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकानं मास्क वापरायची गरज नाही. कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणार असेल तर धडधाकट व्यक्तीने मास्क वापरावा. तसंच सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणं असतील तर मास्क वापरा.

आणि मास्क वापरत असाल तर तुम्हाला तो लावायचा कसा आणि काढायचा कसा याबद्दल माहिती हवी. एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नका. तोंडाला मास्क लावताना, काढताना काळजी घ्यायला हवी. तोंडाला मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. मास्क काढताना त्याच्या समोरच्या भागाला हात लावू नका. मागच्या दोऱ्यांना पकडून मास्क काढा. काढल्यावर लगेच तो कचरापेटी टाका. नंतर हँडवॉश किंवा साबण हाताला नीट चोळा आणि मग हात पाण्याने नीट धुवा.

हेही वाचा : कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

प्रश्नः कोरोना विषाणू माणसानं बनवलाय का?

वास्तव: गेल्या तीन दशकांत तीन नवे वायरस आढळलेत. सार्स, मार्स आणि आत्ताचा कोविड-१९ म्हणजेच आपल्या परिचयाचं नाव म्हणजे कोरोना या तिन्हींचं एकच जैविक कुटुंब आहे. दिसायला कोवीड-१९ हा सार्ससारखाच आहे.

कोरोना वायरसची निर्मिती मानवनं केली नाही. हा वायरस कुठून जन्माला आलाय हे सध्या वैज्ञानिक शोधत आहेत. पण या वायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचा दाट संशय आहे. कोरोना वायरसपासून बचावासाठी अद्याप कोणतंही ठोस औषध उपलब्ध नाही. तसंच लसही नाही.

प्रश्नः कोरोनाची लागण झाल्यानं माणूस मरतो?

वास्तव: कोरोना विषाणूची लागण होणं हा इतर आजारांच्या तुलनेत बराच सौम्य असा आजार आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचं प्रमाण आणि यातील मृतांचं प्रमाण बघितलं तर कोरोनाचा मृत्यूदर केवळ २ टक्के आहे. हे दोन टक्के मृतही १८ ते २० टक्के गुंतागुंतीच्या स्थितीत दाखल झालेल्या रुग्णांपैकी आहेत. आधीच अन्य आजारांनी ग्रस्त असलेले आहेत.

कोरोनापेक्षा काही वर्षांपूर्वी आलेल्या इबोलाचा मृत्यूदर हा अधिक म्हणजे १० टक्के होता. कोरोना लागण झालेल्या रुग्णांचा रिकवरी रेट म्हणजे प्रकृती सुधारण्याचं प्रमाण ९८ टक्के आहे. कोरोना इतर संक्रमित आजारांच्या तुलनेत वेगाने फैलावत असल्याने अर्थातच मृतांची संख्या अधिक दिसते. यंदा ऑक्टोबरमधे सिजनल फ्लू आला आणि वीसेक लाख अमेरिकन नागरिकांना त्याची लागण झाली. त्यात १० हजार जणांचा जीव गेला. पण त्याची इतकी चर्चा झाली नाही. कारण, या आजारात नावीन्य नव्हतं.

प्रश्नः चीनहून आलेल्या चिनी वस्तूंमुळे कोरोना होतो?

वास्तव: बाह्य वातावरणात कोरोनाचा विषाणू फार काळ तग धरू शकत नाही. चीनहून वस्तू पॅक होऊन भारतात ती किती दिवसांनी दाखल झाली, यावर बरंच काही अवलंबून आहे.

हेही वाचा : माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

प्रश्नः मांसाहाराने कोरोनाची लागण होते?

वास्तव: कोरोनाचा उद्भव ज्या वुहान शहरातून झाला तिथे विविध प्राण्यांचं मांस उपलब्ध करून देणारा मोठा बाजार आहे. या बाजारातूनच वटवाघळाचे किंवा सापाचे मांस खाल्ल्याने कोरोनाचा उद्भव झाला, अशी एक थिअरी मांडण्यात आली. पुढे मांस आणि चिकन खाण्यापर्यंत ती ताणली गेली. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. पण मटण, चिकन खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही. आपल्या पशुपालन मंत्रालयानंही चिकन, मटन किंवा अंडी खाल्ल्यानं कोरोनाची लागन होत नसल्याचं स्पष्ट केलंय.

प्रश्नः औषधोपचारात अँटिबायोटिक्सचा वापर करावा?

वास्तव : अँटिबायोटिक्स वापरून आपण कोरोनावर उपचार करू शकत नाही. वायरस आणि बॅक्टेरिया हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव आहेत. बॅक्टेरियासाठी अँटिबायोटिक्स ट्रिटमेंट योग्य ठरते, तर वायरससाठी अँटिवायरल मेडिकेशन उपयुक्तब ठरते.

उदाहरणार्थ सिजनल फ्लू व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला टॅमी फ्लू औषध दिले जाते. पण आजाराचा दुसरा टप्पा बॅक्टेरियल असेल, तर अँटिबायोटिक्स उपयुक्ते ठरते. म्हणजेच कोरोना रुग्णावर अशा स्वरूपाचा दुसरा टप्पा ओढवला, तर अँटिबायोटिक्स उपयुक्त  ठरू शकतात.

प्रश्नः तिळाचं तेल लावल्यानं कोरोना वायरस शरीरात जात नाही?

वास्तवः ही साफ खोटी गोष्ट आहे. तिळाचं तेल कोरोना वायरसला मारत नाही. कारण कोरोना वायरसवर अजून कुठलंच ठोस औषध सापडलं नाही.

हेही वाचा : एका वायरसने जग कसं हादरवलं?

प्रश्नः फक्त वयोवृद्धांनाच कोरोनाची लागण होते.

वास्तव : कोरोना वायरस काही आपलं वय बघत नाही. कोरोनाची लागण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीकला होते. वृद्ध आणि बालकांना त्याचा धोका अधिक असतो, एवढंच.  

प्रश्नः जनावरांपासून या आजाराची लागण होते.

वास्तव: पाळीव प्राणी असोत, की भटकी जनावरं. त्यांची काळजी घेणं हे माणसाचं काम आहे. कोरोनाची लागण जनावरांपासून होते, याला अद्याप काही आधार नाही. सध्यातरी माणसांपासून माणसांनाच त्याची लागण होतेय.

प्रश्नः कोरोना मेड इन चायना आहे म्हणून तो फक्त  चिन्यांना होतो.

वास्तव : कोरोनाची लागण कुणालाही होऊ शकते. चीनमधे त्याचा पहिला उद्भव झाला, एवढाच त्याचा आता चीनशी संबंध आहे. चिनी वस्तुंचा आणि कोरोनाचा काहीएक संबंध नाही.

हेही वाचा : 

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!