विवेकानंदांचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो ‘अनप्लॅन्ड’ प्रवास

१२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट.

First Published : 11 September 2018

 

‘ही अमेरिकेची यात्रा म्हणजे विवेकानंदांचे एक विलक्षण साहसच होते. या तरुण स्वामींनी या प्रवासाला जी सुरवात केलीय, ती डोळे झाकूनच. अमेरिकेत कुठेतरी, केव्हातरी एक सर्वधर्मपरिषद होणार आहे, एवढंच त्यांनी अस्पष्टपणे ऐकलेलं होतं. या परिषदेबद्दलची निश्चित आणि तपशीलवार माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी, त्यांचे शिष्य, भारतीय मित्र, विद्यार्थी, पंडित, मंत्री किंवा महाराजांनी कुणीही केली नव्हता. तरीही हा तरुण स्वामी त्या परिषदेस जाण्यास निघाला होता.’ हे शब्द आहेत नोबेल पुरस्कार विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांचे. रोलां यांनी लिहिलेल्या विवेकानंदांच्या चरित्राचा साहित्य अकादमीनं मराठीत अनुवाद प्रसिद्ध केलाय.

हेही वाचाः वाचा स्वामी विवेकानंदांचं जग जिंकणारं भाषण

आत्मविश्वासाचा धडा

विवेकानंदांना संन्यासाश्रमात येऊन पाचेक वर्षच झाली होती. नव्या आयुष्याची घडी बसत असतानाच त्यांनी शिकागोला धर्मपरिषद होणार असल्याचं कुठंतरी ऐकलं होतं. तिथं जायचं कसं, एक संन्याशी पैशाची जुळवाजुळव कशी करणार, परिषद कधी आहे, प्रवेश मिळणार का, हवामान कसं असेल, अशा कुठल्याही किंतु-परंतुचा विचार न करता विवेकानंदांनी शिकागो परिषदेला जायचा आत्मविश्वासानं निर्णय घेतला.

बरं या परिषदेत काय होणार, काय बोलणार, भारतातून कोण येणारंय, हेही विवेकानंदांना माहीत नव्हतं. राजस्थानातल्या खेत्रीच्या अजितसिंह महाराजांनी त्यासाठी बोटीचं तिकीट काढलं होतं. सोबत लाल रंगाची रेशमी कफनीही दिली होती. पुढं अमेरिकेत त्यांच्या भाषणाएवढंच या कफनीचीही चर्चा झाली. विशेष म्हणजे खत्रीच्या महाराजांनीच नरेंद्र दत्तचं विवेकानंद असं नाव ठेवलं होतं.

मुंबईहून बोटीनं रवाना

विवेकानंद ३१ मे १८९३ रोजी मुंबईहून बोटीनं रवाना झाले. सिलोन, पेनांग, सिंगापूर, हाँगकाँग मार्गे ते जपानमधील नागासाकी शहरात पोचले. जपानमधील काही शहरांत फिरले. योकोहामाहून रेल्वेनं शिकागोला पोचेपर्यंत जुलैची ३० तारीख उजाडली होती. शिकागोला पोचले तेव्हा ते तुमच्या-आमच्यासारखेच पुरते गांगरून गेले होते. तत्पुर्वी, बोटीनं कॅनडात पोचल्यावर भारतीय पोषाखामुळे ते थंडीनं पार गारठून गेले होते.

फिरताना कळाली परिषदेची वेळ

कोलंबस अमेरिकेत उतरला त्या घटनेला चारशे वर्षे झाली होती. यानिमित्त अमेरिकेत वर्षभर आनंदोत्सव साजरा केला जात होता. त्या महोत्सवाचा भाग म्हणून शिकागो इथं एक भव्य औद्योगिक प्रदर्शन भरलं होतं. शिकागोत आल्यावर स्वामीजींनी पहिली गोष्ट काय केली असंल, तर या प्रदर्शनाला भेट दिली.

कधी कल्पनाही केली नव्हती, अशा पाश्चात्य जगाची शक्ती, संपत्ती आणि प्रतिभा यांचं दर्शन त्यांना इथं झालं. एकावेळी तर नव्या जगाचा संपूर्ण स्वीकार करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. एवढं ते अमेरिकेतील वातावरणानं प्रभावित झाले होते. स्वामीजीही तुमच्या-आमच्यासारखेच असल्याचे प्रसंग वेळोवेळी येतात. म्हणजे कसं सर्व धर्म परिषदेची कोणतीच माहिती न घेता स्वामीजी शिकागोला आले. बरं आता इथं आल्यावर तरी त्या दिशेनं काम करायला पाहिजे ना! बाराएक दिवसांनी धर्म परिषदेची माहिती जुळवण्याच्या दिशेनं पाऊल पडलं. स्वामीजी पुन्हा प्रदर्शनात गेले. माहिती केंद्रात जाऊन सर्वधर्म परिषदेबद्दल विचारणा केली. जे कळलं, त्याने धक्काच बसायची वेळ आली.

अमेरिकी वातावरणानं विवेकानंद प्रभावित होण्याची ही गोष्ट काही अचानक घडली नाही. विवेकानंदांना असलेल्या अमेरिकेच्या ओढीमागं त्याचं कारण दडल्याच्या नोंदी सापडतात. ‘अमेरिकेत जाण्याचा विचार त्यांच्या मनात कधीतरी रुजला होता. ते योग्य संधीची वाट पाहत होते आणि त्यांच्या मनासमोर या भारत भ्रमंतीत अचानकपणे अमेरिकेत भरणारी सर्व धर्म परिषद आली,’ असं डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ या पुस्तकात नमूद केलंय. एका अर्थानं, विवेकानंदांच्या या अनप्लॅन्ड प्रवासामागंचं गुपितच दाभोलकरांनी नोंदवलंय.

हेही वाचाः विवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली  नव्हती

एकामागून एक संकटं

सर्वधर्म परिषद सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असून प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणीची तारीख निघून गेल्याचं त्यांना कळालं. मान्यताप्राप्त धार्मिक संस्थेचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिनिधी म्हणून कोणाचंही नाव स्वीकारलं जाणार नसल्याचंही माहीत झालं. एकीकडं हे धक्के बसत असतानाच पैसेही संपत आले होते. ऑगस्ट महिन्यातच सवय नसलेली अमेरिकेतील थंडी गरम कपड्यांची मागणी करत होती. काय करावं हे कळत नव्हतं. सर्व धर्म परिषदेची वाट बघत बसणंही शक्य नव्हतं. विवेकानंद भांबावले. खचले आणि मद्रासच्या एका दोस्ताला तार केली. ‘सगळे पैसे संपलेत... परतण्यापुरते तरी पैसे पाठव.’ बरं ही तार पाठवल्याचा विवेकानंदांना नंतर पश्चाताप झाला.

दोस्ताकडून मदत मिळायला उशीर होईल म्हणून त्यांनी अमेरिकेतील एका धार्मिक संस्थेकडं अनुदानासाठी अर्ज केला. त्यावर संस्थेच्या प्रमुखानं ‘सैतानाला खुशाल थंडीने मरू द्या,’ अशा शब्दांत सुनावलं.

विवेकानंदांना अमेरिकेत एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय, याची त्यांच्या शिष्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. एकदा पैसे गोळा करून स्वामीजींना शिकागोला पाठवलं म्हणजे सर्वकाही आपोआप होणार, असं समजून शिष्यगण आनंदात होता. स्वामीजींच्या या अनप्लॅन्ड प्रवासाविषयी तर भगिनी निवेदिता यांनी ‘मला आश्चर्य वाटतं, आमचे स्वामीजी पण त्यावेळी इतके अज्ञानी कसं होते?’ अशी भावना व्यक्त केली होती.

‘हार्वर्ड’ कलाटणी

उरलेले काही डॉलर एका जागी बसून खर्च करण्यापेक्षा स्वामीजींनी बोस्टनला जायचा निर्णय घेतला. आकर्षक देहयष्टीमुळं विवेकानंद कुठंही जात असले, तरी लोकांच्या नजरेतून सुटत नसत. बोस्टनच्या गाडीतच मॅसेच्युसेट्स इथल्या एका श्रीमंत महिलेशी त्यांचा संवाद सुरू होता. महिलेनं विवेकानंदांना आपल्या घरी राहण्यास बोलावलं. इथंच विवेकानंदांची हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जे. एच. राइट यांच्याशी ओळख झाली. विवेकानंदांनी परिषदेत सर्व धर्माचे प्रतिनिधीत्व करावं, असा आग्रह राइट यांनी केला. शिकागोचं तिकीटही काढून दिलं. राहण्याची सोयही केली. संकटांची मालिका आणि उत्तरांचा उतारा अशा दोन टोकांच्या बिंदूंवर विवेकानंदांचा हा शिकागो दौरा सुरू होता.

हेही वाचाः परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

भिक्षा मागण्याची वेळ

विवेकानंद शिकागोला पोचले. गाडी उशिरा पोचली आणि मुक्कामाचा पत्ता चुकल्यानं ते नव्या संकटात सापडले. पत्ता सापडत नसल्यानं स्टेशनच्या आवाराच्या कोपऱ्यातील एका मोठ्या रिकाम्या पेटीत रात्रभर निजले. सकाळी दारोदार भिक्षा मागत पत्ता शोधायच्या कामाला लागले. आता अमेरिकेत भिक्षा मागायची पद्धती कुणाला माहीत असणार? दारावर गेलं की लोक प्रचंड अपमान करायचे, दारातून हाकलून द्यायचे, हा सर्व अपमान विवेकानंदांनी सहन केला. तेव्हा एका खिडकीतून तुम्ही सर्व धर्म परिषदेचे प्रतिनिधी आहात का, अशी विचारणा झाली आणि मार्ग मोकळा झाला.

आणि टाळ्यांचा एकच कडकडाट

११ सप्टेंबरचा तो दिवस उजाडला. सर्वधर्म परिषदेच्या अधिवेशनास प्रारंभ झाला. मंचावर आपला जुना मित्र ब्राम्हो समाजाचा प्रमुख प्रतापचंद्र मुजुमदार हाही असल्याचं विवेकानंदांना इथंच कळालं. मुजुमदार हे सर्व भारतीय ईश्वरवादी गटांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. बोलण्यासाठी एकएकाचे नंबर येत होते. यात मोठा वेळ गेला. अखेर विवेकानंदांची पाळी आली. आणि ‘अमेरिकन बहिणींनो आणि भावांनो’ या भाषणाच्या सुरवातीच्या वाक्यांनीच संपूर्ण सभागृहानं विवेकानंदांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरशः डोक्यावर घेतलं.

हेही वाचाः 

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज