तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असं म्हणत प्रेम हाच खरा धर्म ही शिकवण साने गुरुजींनी दिली. याच शिकवणीचा बट्ट्याबोळ करणाऱ्या घटना समाजात आज सर्रास होताना दिसतात. प्रणयकुमार या तरुणाचा त्याच्या पाच महिन्यांची गरोदर बायको अमृतासमोरच निघृण खून होतो. बीडमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधे शिकणाऱ्या सुनील वाघमारेची हत्या होते.
अशावेळी प्रेम हाच धर्म राहत नाही. त्यात जातभेद, धर्मभेद आडवा येतो. प्रेमापेक्षा समाजातली प्रतिष्ठा मोठी वाटू लागते. ऑनर किलिंगच्या घटना कमी होण्याऐवजी त्यात वाढच होत जातेय. अशावेळी जात आणि धर्माची सीमा तोडण्याची तयारी दाखवत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी पुढाकार घेण्याची कोणत्याही तरुण मुलामुलींची हिंमत होईल?
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांचा नवा संकल्प यासाठीच महत्वाचाय. लग्नाचा निर्णय घेताना जात किंवा धर्म याचा किंचितही विचार करणार नाहीत, अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. त्यासाठी २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात तरुणांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन देवींनी केलंय.
या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी त्यांच्या आवाहनाला १०० मुलामुलींचा प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. ज्या दिवशी तरुणांचा प्रतिसाद हा आकडा पार करू शकणार नाही त्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपोषण करण्याचा निर्णय देवींनी केलाय. या संकल्पाला कोणताही राजकीय रंग नाही. कोणत्याही राजकारणाशी हे सगळं जोडलेलं नाही. सध्या राज्यात निवडणूक आहे, याचाही काहीही संबंध नाही. फक्त दोन ऑक्टोबरला गांधीजींची जयंती आहे म्हणून हा दिवस निवडलाय, असं देवी सांगतात.
गणेश देवी यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं, ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी माझा जन्म झाला. मी तरुण होतो तेव्हा माझ्या पिढीला असं वाटतं होतं की हे जातीचं भान काळानुसार बोथट होत जाईल. जातीजातींमधला द्वेष कमी होईल. आंतरजातीय लग्नं होतील. जातींची एकमेकांत मिसळणं होईल. आपली जात विसरून दुसऱ्या जातीत, दुसऱ्या धर्मातल्या माणसांशी सहज नातं जोडता येईल.’
पण आताची परिस्थिती नेमकी याच्या विरूद्ध आहे. लोक त्यांची जात विसरलेले नाहीच. उलट जातीच्या अस्मिता जास्त टोकदार झाल्यात. यात आपलं सरकारसुद्धा धर्मावरून समाजाची होणारी विभागणी थांबवण्यासाठी काहीच करत नाहीत. उलट ती वाढवण्याचीच कामं करतात, असं देवी म्हणतात.
हेही वाचाः मुलामुलींना 'लिव इन रिलेशनशीप'मधे राहावंसं का वाटतं?
आंबेडकरांनी ‘द अनहिलेशन ऑफ कास्ट’ म्हणजेच जातीचं निर्मूलन हे पुस्तक लिहिलं. भारताची राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेतही धर्मनिरपेक्ष आणि जातनिरपेक्ष समाज तयार करण्याचा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. आपल्या देशाची रचनाही त्यांनी त्या पद्धतीनंच केली.
असं असतानाही सगळीकडे धर्मावरून, जातीवरून भांडण, सामजिक उलथापालथ करणं सर्रास सुरू आहे. खालच्या जातीच्या आणि वेगळ्या धर्माच्या माणसांना झुंडीनं मारण्याच्या घटनांमधे वाढ झालेलीच आपल्याला दिसते. छोट्या मुलांपासून, म्हाताऱ्या लोकांपर्यंत कुणालाही जातधर्माच्या नावाखाली मारून टाकण्याची घटना रोज कुठल्या ना कुठल्या राज्यात घडतायत याची गणेश देवींना चिंता वाटते.
‘हे सगळं फार हिंसक आहे. हे प्रकार उद्विग्न करणारे आहेत. एकविसाव्या शतकातल्या आधुनिक समाजाची ही लक्षणं नाहीत. मध्ययुगीन रानटी समाजाची ही लक्षणं आहेत,’ असं देवी कोलाजशी बोलताना म्हणतात.
हेही वाचाः डॉ. पायल तडवीमुळे आपल्या समाजातलं जातींचं विष पुन्हा दिसलंय
अशा परिस्थितीतही जोडीदाराची निवड करताना धर्म आणि जात ही जाचक बंधन नकोत असं वाटणारी आत्ताच्या तरुणांमधे शेकडो, हजारो तरुण मुलंमुली असतील अशी आशा गणेश देवींना वाटते. आणि म्हणूनच नव्या तरुण पिढीला त्यांनी हे आवाहन केलंय.
जात आणि धर्माचा विचार न करता लग्न करण्याची तयारी असलेल्या तरुण मुलामुलींनी देवींना २ ते १० ऑक्टोबर या काळात ईमेल द्वारे संपर्क करावा, असं हे आवाहन. हे ईमेल्स देवी स्वतः बघतील. त्यात तरुण जे सांगतायत ते खरंच आहे का याची पडताळणीही ते स्वतः करतील. त्यासाठी गरज पडली तर ते तरुण मुलामुलींना फोनही करतील.
हेही वाचाः नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?
दिवस संपल्यानंतर देवींना असं वाटलं की आजच्या दिवसांत निदान १०० मुलामुलींनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे तरच ते त्या दिवशी रात्री जेवण करतील. असं झालं नाही तर संपूर्ण दिवस नुसता पाण्यावर काढणार आहेत. `मी फार महान त्याग करतोय असं काहीही नाही. त्यात काही फार मोठी गोष्ट नाही. मला फक्त तरुणांच्या सदसदविवेकाला साद घालायचीय,’ असं देवी म्हणाले.
जात आणि धर्म व्यवस्थेच्या पिंजऱ्यात मी सापडलो किंवा सापडलेय आणि मला त्यातून सुटायचंय असं कुणालाही वाटत असेल तर त्याला मदतीचा हात पुढे करायची तयारी देवींनी दर्शवलीय. त्यांना प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांना व्यक्तिशः भेटायचं गणेश देवींनी ठरवलंय. त्यासाठी एका गावात जाऊन त्या गावातल्या प्रतिसाद देणाऱ्या सगळ्या तरुण मुला मुलींशी स्वतः देवी संवाद साधतील.
‘मी त्यांच्यासोबत बसून त्यांच्याशी बोलेन. सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण करेन. त्यांना इतिहासाची जाणीव करून देईन. कशामुळे जात, धर्म व्यवस्था निर्माण झाली या गोष्टीची चर्चा करेन,’ असं देवी म्हणाले.
हेही वाचाः आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाला प्रोत्साहन देण्याचा हा देवींचा प्रयत्न म्हणजे कोणताही मीडिया इवेंट नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून, भजनं लावून गादीवर वगैरे बसून उपोषण करायचं हे त्यांना बिलकूल पटत नाही. तो त्यांना बुवाबाजीचा प्रकार वाटतो. हा संकल्प प्रत्यक्षात राबवत असताना त्यांची रोजची कामं, त्यांचा दिनक्रम देवी चालूच ठेवणार आहेत.
ज्या तरुण मुला-मुलींना गणेश देवी यांच्यापर्यंत पोचायचंय त्यांना त्याचं नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर आणि ते कोणत्या गावातून आलेत अशी माहिती त्यांच्या rsd@beyondcaste.com या ई-मेल आयडीवर पाठवावी लागेल. तरुणांची ही आणि आणखी थोडी माहिती घेण्यासाठी एक गुगल फॉर्मही केलाय. ही त्याची लिंक - https://forms.gle/U25bdt4uysMYMDoj7 याशिवाय ७८२०९४०५१९ या फोन नंबरवर संपर्कही करता येईल.
हेही वाचाः जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल
कितीही दिवस लागले तरी प्रत्येक ई-मेल लिहिणाऱ्या मुलाची आणि मुलीची दखल घेऊन त्या मेलला देवी उत्तर देतील. या माध्यमातून तरुणांची एक फळी उभी करण्याची गणेश देवी यांची इच्छा आहे. हेच तरुण उद्या जात-धर्मनिरपेक्षाचं काम पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांना वाटतो. देवी म्हणतात, जोपर्यंत समाजात धर्मावरून, जातीपातीतून निर्माण होणारी असहिष्णुता आणि हिंसा यांचा शेवट होत नाही तोपर्यंत मानवतावाद खऱ्या अर्थाने स्वीकारणारा आधुनिक भारत निर्माण होऊ शकणार नाही.
जातधर्माच्या पलीकडे विचार करणारा समाज निर्माण होईल असं स्वप्न देवी पाहतात. १३० कोटी नागरिकांपैकी निदान १००० तरुण मुलंमुली लग्न करताना जोडीदाराच्या जातधर्माचा विचार करणार नाहीत, अशी आशा गणेश देवींना वाटते. एका सुदृढ समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या, मागच्या पिढीतल्या गणेश देवींना माझ्या नव्या जनरेशनचे तरुण नक्कीच निराश करणार नाहीत.
हेही वाचाः बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक