‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असणारा ‘थप्पड’ गेल्या आठवड्यात रिलिज झाला. महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेल्या बंधनात अडकलेल्या भारतीय बाईची घुसमट आणि त्यातून बाहेर पडण्याचा तिचा संघर्ष अशा मुद्द्यांना या सिनेमानं पुन्हा एकदा चर्चेत आणलंय.
स्त्री-पुरुष समानतेची, महिला सक्षमीकरणाची वकिली करणाऱ्या, या मूल्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहणाऱ्या वर्गातच ‘थप्पड’विषयी दोन वेगवेगळे मतप्रवाह पहायला मिळताहेत. एका वर्गानं या सिनेमाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय. तर दुसऱ्या बाजूला या मुद्द्यांसाठी आग्रही असणाऱ्या काही जणांचा हा पिक्चर आदर्शवादी, वास्तवापासून कोसो दूर असल्याचा आक्षेप आहे. एका ‘थप्पड’मुळे कुणी कोर्टाची पायरी चढतं का? इथपासून ते ही परिस्थिती हेच आपलं सामाजिक वास्तव आहे, याकडे डोळेझाक करून आदर्शवादी मांडणीने समस्येला भिडण्यातून काय मिळणार? असा खडा सवालही अनेक जण उपस्थित करतायत.
हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
मुळात ‘थप्पड’ आदर्शवादी असल्याचं मान्य केलं तरी तो स्वीकारायला काय हरकत आहे? आदर्शवादी असण्यात गैर काय? किंवा आदर्शवाद हा आपल्याला कथा-कादंबऱ्यापुरताच हवा असतो का? त्याचं आपल्या रोजच्या जगण्या-वागण्यातलं अॅप्लिकेशन नाकारताना प्रगल्भ समाज म्हणून घडण्या-बिघडण्यातल्या आपल्या मर्यादाच आपण स्पष्ट करत नसतो का? आदर्शवादी असणं आपण अॅफॉर्डच नाही करू शकत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत.
महिला सक्षमीकरणाची मांडणी करताना ‘थप्पड’ पुरुषप्रधान संस्कृतीतच घडल्या-बिघडलेल्या पुरुषांचे वेगवेगळे लेयर उलगडवून दाखवतो. एकीकडे या संस्कृतीचा पाईक असणारा पुरुषही आपल्याला यात बघायला मिळतो. त्याचवेळी या व्यवस्थेला नाकारताना न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा पुरुषही दिसतो. स्वतः या व्यवस्थेचा प्रतिनिधी नसलेला पण व्यवस्थेच्या बंधनापासून स्वतःला मुक्त करू न शकलेल्या, त्या वाटेवर चालू बघणाऱ्या पुरुषांचा तोंडवळादेखील ‘थप्पड’च्या माध्यमातून आपल्यासमोर येतो.
साधारणतः भारतीय पुरुष हे पुरुषप्रधान व्यवस्थेचं प्रतिनिधीत्व करणारं प्रकरण आहे. कारण तो या व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभार्थी असतो. ही व्यवस्था त्याला महिलांना उपभोग्य वस्तू मानण्याची, त्यांना स्वतःची खासगी मालमत्ता समजून आपल्या सोईसाठी कशाही पद्धतीने राबवण्याची मुभा देते. थप्पडमधे अमृता म्हणजे तापसी पन्नू हिच्या नवऱ्याच्या रुपात येणारं विक्रम अर्थात पावेल गुलाटी हे पात्र म्हणजे या व्यवस्थेचा पाईक म्हणून मिरवणाऱ्या पुरुषाचं टिपिकल उदाहरणच म्हणावं लागेल.
घरगुती कामात मदत करणं तर दूरच, विक्रम स्वतःची कामंदेखील स्वतः करू शकत नाही. आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी गिझरचं बटन ऑन करायलासुद्धा त्याला बायको आणि बायकोच्या अनुपस्थितीत मोलकरीण हवी असते. ऑफिसला निघण्यापूर्वी वॉलेटपासून ते पाण्याच्या बॉटलपर्यंत एकुण एक गोष्ट त्याला हातात आयती हवी असते.
हाच विक्रम ज्यावेळी भर पार्टीत बायकोच्या कानाखाली वाजवतो, त्यानंतर रागाच्या भरात का होईना पण आपण काहीतरी चुकीचं वागून बसलोय याची पुसटशी जाणीवदेखील त्याला होत नाही. त्यामुळे आपण चुकलोय हे मान्य करून बायकोची समजूत घालणं तर दूरच उलट तो तिलाच ‘लोग मेरे बारे में क्या सोच रहे होंगे?’ असा प्रतिप्रश्न करत स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेसमोर तिचं दुखणं किती गौण आहे, याची जाणीव करून देतो.
विक्रम हा पुरुषप्रधान संस्कृतीतील भारतीय पुरुषाचं आदर्श उदाहरण अशासाठीही ठरतो कारण त्याचं कॅरेक्टर कुठेच डार्क दिसत नाही. ते अतिशय ग्रे स्वरूपाचं आहे. विक्रम जे काही वागला ते त्याच्याकडून घडून गेलं. अमृताने त्याचा उगाच बाऊ करायचं काहीच कारण नाही, असं सिनेमातल्या पात्रांनाही वाटत असतं. सिनेमा बघून बाहेर पडलेल्या आपल्यापैकी अनेकांनाही प्रेक्षक म्हणून ते तसंच वाटत राहतं. कुटुंब टिकवायचं तर बाईनं थोडीफार तडजोड केली पाहिजे असंच आपल्याला वाट राहतं.
समाज म्हणून तुम्ही आणि आम्ही ‘विक्रम’शी व्यवस्थितपणे ‘रिलेट’ करू शकतो. आपल्या रोजच्या जगण्यात आपण बऱ्यापैकी विक्रमसारखेच असतो. आपल्या नातेसंबंधांतल्या बायकांशी आपण विक्रमसारखंच वागत असतो किंवा भविष्यात तसं वागण्यासाठीची आपली ‘स्पेस’ आपण ‘सुरक्षित’ राखून ठेवतो.
हेही वाचा : पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट
अमृताच्या भावाच्या रुपात आपल्याला करण म्हणजे अंकुर राठी भेटतो. हा करण पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रतिनिधी नाही. पण या व्यवस्थेचा दबाव झिडकारणं त्याला जमलेलं नाही. आजूबाजूच्या समाजाचा, व्यवस्थेचा त्याच्यावरचा दबावच एवढा आहे की आपली बहीण चुकीचं वागत नाही, हे माहीत असतानादेखील तो ठामपणे तिच्या पाठीशी उभा राहू शकत नाही. व्यवस्थेच्या याच दबावाला बळी पडून एका वेळी तर तो अमृताच्या न्यायालयीन लढ्यात तिला मदत करणाऱ्या आपल्या होणाऱ्या बायकोवरच हात उगारतो.
पण सिनेमाच्या शेवटापर्यंत आपण चुकलोय याची जाणीव करणला झालेली असते. व्यवस्थेचं खांद्यावरचं लोढणं भिरकावून देण्याची मानसिक तयारी त्याने केलेली असते. करणच्या मनोवस्थेत अडकलेला मोठा पुरुषवर्ग देखील आपल्या समाजात अस्तिवात आहे. तो पहिल्या प्रकारापेक्षा बराच कमी असला तरी, तसा तो आहे. आणि हे निश्चितच एक आश्वासक चित्र आहे.
अमृताचा नवरा, अमृताचा भाऊ यांच्यापेक्षा वेगळा म्हणजे अमृताचा बाप! कुमुद मिश्रा यांनी साकारलेलं हे पात्र म्हणजे भारतीय पुरुषाचं सर्वात सुंदर, सर्वात लोभसवाणं रुप आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने आपला कुठलाही निर्णय बायकोवरती, मुलांवरती न लादणारा, त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य देणारा आणि एकदा का एखाद्याने सारासार विचार करून निर्णय घेतला की त्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा नवरा आणि बाप आपल्याला हवाहवासा वाटतो.
हा ‘बाप’ फक्त आपल्या बायको आणि मुलांप्रतीच इतका उदार आहे, असंही नाही. आपला पोरगा होणाऱ्या सुनेवरती हात उगारतो त्यावेळी त्याला तिथेच थांबवून तो पोराला समज देतो. सुनेची माफी मागायला लावतो. अमृताच्या व्यवस्थेविरोधातल्या लढ्यातली सर्वात मोठी एनर्जी तिला या ‘बाप’माणसाकडून मिळते.
जगाच्या नजरेत सोन्याचा संसार सुरु असलेली त्याची दोन महिन्यांची गरोदर मुलगी जगाच्याच नजरेतून शुल्लक वाटणाऱ्या एका कारणामुळे डिवोर्सच्या निर्णयापर्यंत पोचते. त्यावेळी ‘जग काय म्हणेल’ हा भंपक विचार तो मनाला शिवू देत नाही. एवढंच नाही, तर आपल्या मुलीलाही हा बाप ‘मन की बात’ ऐकण्याचा सल्ला देतो.
आपल्या मुलीने निर्णय घेतलाय म्हणजे नक्कीच त्यामागचं कारण जगाला वाटतंय तितकं शुल्लक नसणार, याची या बापाला खात्री असते. त्यामुळेच तिच्या कुठल्याही निर्णयात आपण तिच्या पाठीशी असल्याचं हा बाप सांगतो. त्यावेळी आपणदेखील कुमुद मिश्रांनी पडद्यावर साकारलेल्या अमृताच्या बापाच्या प्रेमात पडलेलो असतो.
हेही वाचा : आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
अर्थात पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रतिनिधी असणारा सामान्य भारतीय पुरुष ते व्यवस्थेला फाट्यावर मारत, व्यवस्थेची सगळी बंधनं झुगारत वेगळ्याच ध्रुवावर पोचलेला भारतीय पुरुष हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक आहे. प्रत्येकाला त्या वाटेवर चालणं जमेलच असंही नाही.
हा प्रवास पूर्ण केलेला पुरुष आपल्या वाट्याला येणं हे आज जरी प्रिविलेज असलं तरी पुढच्या काही दिवसांमधे ही गोष्ट सर्वसामान्य असायला हवी. इथल्या हरेक बाईच्या वाट्याला असा पुरुष बाप, भाऊ, मित्र, प्रियकर, नवरा अशा कुठल्या ना कुठल्या रुपात येत राहील. त्या दृष्टीने समाज म्हणून आपली वाटचाल सुरू झाली तर ते स्त्री-पुरुष समतेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं पाऊल ठरेल, एवढं नक्की! ‘थप्पड’च्या निमित्ताने ही सुरवात व्हावी, हीच अपेक्षा!
हेही वाचा :
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?