बी जे खताळ पाटीलः एका शतायुषी तत्त्वनिष्ठ राजकारण्याची गोष्ट

१७ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत.

मी ज्या गावात जन्माला आलो, त्या गावाला बराच जुना इतिहास आहे. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही यांचा तो काळ. त्या काळात आमचे धांदरफळ हे गाव एका परगण्याचं ठिकाण होतं. आमचं घराणं त्यातील एक परगणदाराचं, पण सर्व वैभव गेलेलं. त्या घराण्यात २६ मार्च १९१९ रोजी माझा जन्म झाला. आई आणि वडील दोघेही शिकलेले होते.

माझा भाऊ माझ्यापेक्षा १६ वर्षांनी मोठा. मी सहा महिन्यांचा असतानाच आई गेली. त्यामुळे भावाचे लग्न करण्याचा प्रयत्न माझ्या वडिलांनी केला. भाऊ आंधळा. देवीच्या साथीत त्याचे डोळे गेले होते. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्या आईने माझा उत्तम सांभाळ केला.

आमच्या घराण्याकडे जवळपास शंभर एकर शेती होती. पण ती करण्यासाठी शेतीची अवजारे, गडीमाणसं, बैल जनावरं या सर्वांमुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. त्या काळातले मोठमोठे जमीनदारही कर्जबाजारीच असत. आमच्या गावात शाळा नव्हती. शेजारच्या गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं.

मार्क्स आवडायचा पण कम्युनिस्टांपासून दुरावलो

मी सातवीत असताना कुलकर्णी नावाचे एक सद्‌गृहस्थ मला पंढरपूरला घेऊन गेले. ते वारकरी होते. चार महिने आम्ही तिथे होतो. त्यांची माझ्याच वयाची मुलगी आणि मी दिवसभर मंदिरातून फिरायचो. तेव्हा मला कळलं की पुजारी जे काही करतात ते सर्व थोतांड आहे.

त्याच काळात एका मुलाबरोबर थिएटरमधे गेलो आणि नंतर एका रसवंतीगृहात गेलो. तेव्हा तो मुलगा हरिजन आहे, या कारणावरून त्याच्याबरोबर मलाही मारलं. त्यानंतर अस्पृश्यतेला माझा विरोध पक्का झाला आणि आता तर काय, आमच्या घरात हरिजनांची महिला स्वयंपाकाला आहे.

मी लॉ शिकत असताना देशाचं पारतंत्र्य, सामाजिक सुधारणा, समता या विषयांवर चर्चा व्हायच्या. मार्क्स आणि डार्विन अशाही चर्चा व्हायच्या. त्यावेळी आमची जी काही अर्धीकच्ची समजूत होती, तिच्या बळावर आम्ही वाद घालायचो. मला संघर्ष करायला सांगणारा मार्क्स आवडायचा. पण १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा कम्युनिस्ट म्हणू लागले हे खरं स्वातंत्र्यच नाही.

आम्ही गांधींबरोबर होतो आणि कम्युनिझमचं आकर्षण होतं. पण कम्युनिस्टांची ती भूमिका पाहून आम्ही चक्रावून गेलो होतो. त्यानंतर मी काँग्रेसबरोबर अधिक समरस झालो. त्यांनी १९४६ ची निवडणूक लढवलीच नव्हती. ज्या निवडणुकीनंतर नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झालं. आणि १९४२ च्या लढ्याला कम्युनिस्टांचा विरोधच होता. त्यामुळे मी कम्युनिस्टांपासून दूर गेलो.

व्हायचं होतं प्रोफेसर, शिकलो वकिली

माझी मॅट्रिक झाल्यावर मी पुढे शिकावं असं माझ्या वडिलांना वाटत नव्हतं. मी पाटीलकी करावी असा त्यांचा आग्रह होता, पण ते मला मान्य नव्हतं. मी चारपाच रुपये गोळा केले आणि पुढच्या शिक्षणासाठी बडोद्याला गेलो. बडोद्यातल्या मराठी माणसांनी बाहेरून येणाऱ्या मराठी मुलांसाठी एक बोर्डिंग चालवली होती.

तिथे गेल्यावर १९३८ मधे स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू होती. त्यावेळी माझ्याबरोबर बोर्डिंगमधे असलेले काही विद्यार्थी पुढे राजकारणातले मोठे पुढारी झाले. राजारामबापू पाटील, कृष्णराव धुळप, दादासाहेब जगताप, आण्णासाहेब शिंदे, उत्तमराव पाटील इत्यादी.
 
मला गणित घेऊन बी.ए. व्हायचं होतं. पण आजारी असल्याने टर्म भरल्या नाहीत. म्हणून मला लॉजिक घ्यावं लागलं. मला प्रोफेसर व्हायचं होतं. पण वडिलांना ते मान्य नव्हतं. त्या काळी वकिलीला जास्त किंमत होती आणि वडलांचा आग्रह होता की मी वकीलच व्हावे. आमचं वडलांपुढे काही चालत नव्हतं. म्हणून १९४२ साली पुणे शहरात आलो आणि आय.एल.एस. लॉ कॉलेजमधे प्रवेश घेतला.

कम्युनिस्टांच्या बाजुने फुकट केस लढवली

१९४५ मधे वकिलीची पदवी घेऊन मी संगमनेरला आलो. मला टायफॉइड झाला, उलटला. मग न्यूमोनिया झाला, उलटला. इतरही काही अडचणी येत राहिल्या, त्यामुळे माझी वकिली १९४७ साली सुरू झाली. मी पुणे कोर्टात वकिली केली. औरंगाबाद, सोलापूर, विजापूर अशा ठिकाणीही वकिली केली. त्याचा फायदा मला राजकारणात झाला. वकिलीत मला नाव मिळालं. 

त्यातली एक केस मोठी लक्षात राहण्यासारखी आहे. त्या काळात अकोले तालुक्यात कम्युनिस्टांनी चळवळ चालवली होती. नक्षलवाद्यांप्रमाणे तो प्रकार होता. ते पोलिस स्टेशनला बोर्ड लावायचे. अमुक दिवशी अमुक व्यक्तीचा आम्ही खून करणार आहोत. जो कोणी आमच्या विरोधात बातमी देईल, त्याचे हात पाय आम्ही तोडू. १९४७-४८ साली त्या तालुक्यात असे पाच खून झाले होते. एकाचा हात तर, एकाचा पाय तोडण्यात आला होता. एका सावकाराची इमारत जाळण्यात आली. दोन ठिकाणी गोळीबार झाला.

त्या प्रकरणातले आरोपींचे खटले माझ्याकडे सोपवण्यात यावेत अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाकडे झाली. तेव्हा कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर माझ्याकडे आले होते. मी त्यांना म्हणालो, ‘मी तर काँग्रेसवाला आहे. आणि तुमच्या आरोपींना फाशी झाली तर तुम्ही मला कुटुंबासह मारून टाकाल.’ ते म्हणाले, ‘तसं काही होणार नाही, वकीलपत्र घ्या.’

मी विचार केला, आपले मतभेद असले तरी ही माणसं काही लबाड नाहीत. मी त्यांना सांगितलं, मला फी नको. डांगेसाहेब म्हणाले, येणारा खर्च तरी घ्या. मी म्हणालो, हजारो रुपये फी नाकारतोय, मग हा खर्च तरी कशाला घेऊ? पुढे निकाल त्यांच्या बाजूने लागला.

पहिली निवडणूक हरलो, पण

या काळात मी अनेक सामाजिक कार्यातही स्वतःला वाहून घेतलं होतं. त्याविषयी बोलणं खरंतर आत्मप्रौढी वाटेल. अनेक प्राथमिक शाळा सुरू केल्या. म्युनिसिपालिटी युनियन आणि शेतकरी चळवळीत मी पुढाकार घेतला. संगमनेर साखर कारखान्याचा चीफ प्रमोटर होतो. मार्केट कमिटी, ऑईल कमिटी, खरेदी-विक्री संघ यांचा चेअरमन होतो. राहुरी कारखान्याचा प्रमुख होतो. प्रवरेच्या कारखान्याचा पहिला सभासद होतो.

त्यामुळेच १९६२ मधे मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर मला सहकार खात्याचा राज्यमंत्री केलं गेलं. आणि प्राग इथे सहकाराची मोठी जागतिक परिषद झाली, तेव्हा इंदिरा गांधींनी मला पाठवलं होतं, महिनाभर होतो तिकडे.

पाच-सहा वर्षांच्या वकिलीनंतर मी न्यायाधीशाची परीक्षा पास झालो होतो. पण तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी मला राजीनामा देऊन १९५२ ची विधानसभा निवडणूक लढवायला सांगितली. त्यावेळी या भागात कम्युनिस्टांचा प्रभाव होता आणि त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून माझं नाव पुढे आलं होतं. ही निवडणूक मी जिंकलो नाही. पण तेव्हा यशवंतरावांना कोणी तरी सांगितलं होतं की, खताळांना केवळ तालुक्यात ठेवू नका, त्यांचा उपयोग राज्य स्तरावर करून घ्या.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यावर काँग्रेस अप्रिय ठरत होती. तेव्हा यशवंतराव गावोगावच्या तरुण मुलांचा शोध घेत होते, त्यात माझा नंबर लागला. जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात आणण्यात मी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर यशवंतरावांचा माझ्यावर विश्वास बसला.

मला मंत्री बनायचंच नव्हतं

१९५७ च्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व माझ्याकडे आलं. ही निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरत होती. यात काँग्रेसने घेतलेली भूमिका मला मान्य नव्हती. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असं माझं मत होतं. ‘द्विभाषिक राज्याला माझा विरोध आहे. म्हणून मी प्रतिनिधित्व करणार नाही; पण पक्षाचा प्रचार करीन. तुम्ही कोणीही उमेदवार द्या’, असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र लिहिलं होतं.

त्यावर त्यांचं पत्र आलं होतं, ‘खताळ सांगतील त्या माणसाला उमेदवारी द्या, खताळांचा पाठिंबा घ्या.’ आम्ही नव्या उमेदवाराचा प्रचार केला. पण त्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार नगर जिल्ह्यात निवडून आला नाही.

त्यानंतर १९६० मधे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण होतं. १९६२ साली झालेल्या निवडणुकीत मी निवडून आलो. पण तेव्हा मला मंत्रिमंडळात जायचं नव्हतं, कारण मंत्र्याला साडेसातशे रुपये पगार होता. आणि मला पाच मुलगे आणि एक मुलगी. त्या सर्वांना मी कॉन्वेंटमधे घातलं होतं. त्यांचा खर्च  साडेसातशे रुपयांत भागणार नव्हता. तरीही यशवंतरावांच्या आग्रहास्तव गेलो. सहकार राज्यमंत्री हे पद सांभाळलं. त्यानंतर विधी आणि न्याय आणि मग अन्न आणि नागरी पुरवठा, पाठबंधारे, नियोजन ही खाती आली.

आणीबाणी जाहीर झाली तेव्हा त्या विरोधात पहिलं भाषण मी केलं. आणीबाणी लादण्याचा निर्णय झाला तेव्हा मी चितळी नावाच्या गावात भाषण करताना म्हणालो होतो, ‘हा निर्णय वाघावर बसण्यासारखा आहे, कधी उलटेल याचा नेम नाही’. मला वाटतं, कोणीही सत्तेवर आला तरी तो काही तराजू घेऊन सत्ता राबवू शकत नाही.

पण माझा स्वभाव होता, पक्षसंघटनेत रहायचं तर वरचा हुकूम मानायचा. त्या छोट्या गावातील भाषणाची कोणी नोंदही घेतली नाही. आजच्यासारखी तेव्हा प्रसारमाध्यमंही नव्हती. मला वाटतं, आणीबाणीचे महाराष्ट्रात काही परिणाम झाले नाहीत, नगर जिल्ह्यात तर नाहीतच, सर्वसामान्य लोकांना त्याचं काही वाटलं नाही.

म्हणून मी थांबलो

मी अद्यापही राजकारणात आहे. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. त्याचं काय झालं? खूप बेदिली माजली. कोणी पक्ष मानेना. पैशासाठी लोक काहीही करू लागले. राजकीय विचार दूर गेला. भ्रष्टाचार वाढीस लागला. त्याला आळा घालणं, हायकमांडला अशक्य होऊ लागलं. बजबजपुरी माजली. म्हणून ठरवलं बास झालं आता. 

नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया या सगळ्यांचा शेवट निराशाजनक झाला, असं रामचंद्र गुहा म्हणालेत. हे सगळे विशिष्ट टप्प्यावर थांबले असते, तर असं झालं नसतं, असंही ते म्हणतात. तो एक मुद्दा आहे. पण राजकारणात काही वेळा अशा असतात की, इच्छा असूनही सत्ता किंवा पद सोडता येत नाही.

रावणाचं राज्य जातं, तर मोदीचं काय?

सोनियांनी दोन वेळा पंतप्रधानपद नाकारलं. पण पक्ष सांभाळायला त्या ताकदीचं कोणी नसेल तर त्या बाईने तरी काय करायचं? त्या बाईने २८ पक्षांना घेऊन दहा वर्षे सत्ता चालवली, म्हणजे काय ताकद असली पाहिजे. लालूप्रसाद यादव, करुणानिधी यांच्यासारखे लोक सांभाळणं ही काय सोपी गोष्ट आहे? मी स्वत: ऑल इंडिया काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर होतो, आम्ही साक्षीदार आहोत. नेहरू घराण्यातील कोणीही स्वत:हून पुढे नाही आले. लोकांनी त्यांना आणलं. 

१९६७ पासून काँग्रेसला गळती लागलीय, पण काँग्रेस नामशेष झालेली नाही. पानिपतमधे विश्वासराव भाऊ गेल्यावर सगळे पळत सुटले. तानाजी धारातिर्थी पडल्यावर सगळे पळत सुटले, तसं आज काँग्रेसमधे चालू आहे. सैरावैरा धावत सुटलेत सगळे. पण काळ हाच कधीकधी औषध असतो. वाट पहा. मी निराशावादी नाही. रावणाचं राज्य जाणारच नाही, असं वाटलं होतं, राहिलं का? कौरवांचं राज्य जाणारच नाही असं वाटलं होतं, राहिलं का?

राम आणि कृष्ण यांचंही राज्य नंतर गेलंच ना. सत्ता येण्यासाठी असते तशी जाण्यासाठीही असते, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेसला भवितव्य नाही, असं मला वाटत नाही. मोदींची लाट आहे असं लोक म्हणतात. पण मग ती लाट केरळमधे का नाही आली? तमिळनाडूत का नाही चालली? बंगालमधे नाही, बिहारमधे नाही, पंजाबात नाही. मग ही राज्ये सोडून भारत आहे का? तेव्हा हा प्रश्न त्यांच्या लोकप्रियतेचा नाही, परिस्थितीचा आहे.

(२६ मार्च २०१८ला साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून संपादित. साभार साप्ताहिक साधना. )