जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या उजव्या राजकारणाला अनुकूल होत्या. राजकारणाचं काँग्रेसीकरणं आणि काँग्रेस विरोध हा त्यातला एक महत्वाचा भागही होता. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकारणाला विशिष्ट परिघातून पाहता येत नाही. पण त्यांनी बीजेपीसोबत जाणं ही ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं जातं. त्याबाबतचं विश्लेषण अनेकजण करताहेत. याचं सगळ्या कारणांचा शोध घेणारा रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनामधला हा लेख.
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका स्तंभलेखकाप्रमाणे, टॅक्सी चालकांशी झालेल्या संवादाविषयी मी सहसा लिहित नाही. किंवा त्या संभाषणावरून कोणतेही मोठे निष्कर्षदेखील काढत नाही. प्रस्तुत लेखासाठी मात्र हा नियम मोडणार आहे. काही वर्षांपूर्वी एका मित्राला भेटण्यासाठी मी कॅनडाच्या टोरांटो शहरातल्या मुख्य भागापासून उपनगराकडे जाणारी टॅक्सी पकडली. मला पाहताच टॅक्सी ड्रायवरने ‘तुम्ही भारतीय आहात का?’ असा प्रश्न केला. मी होकार दिल्यावर अतिशय भावनिक होत तो उदगारला, ‘जॉर्ज फर्नांडिस माझा बाप आहे! जॉर्ज फर्नांडिस माझा बाप आहे!’
हा टॅक्सीचालक इराणी होता, तो सत्तरीच्या दशकात विद्यार्थी म्हणून भारतात आला होता. या तरुण विद्यार्थ्याला अभ्यासापेक्षा राजकारणातच जास्त रस होता. इराणमधली राजेशाही उलथवून लावून तिथल्या जनतेला समाजवादी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी लढा देणार्या फिदायी गुरिला या संघटनेचा तो सक्रिय सदस्य होता.
सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धात जॉर्ज फर्नांडिस दिल्लीत केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी ल्युटेन्स दिल्लीतला त्यांचा बंगला जहाल परिवर्तनवादी मंडळींचं आश्रयस्थान असायचा. चिनी साम्राज्यवादाचा विरोध करणारे तिबेटी विद्यार्थी तिथे असत. शिवाय बर्मातल्या लष्करी हुकूमशाहीमुळे हद्दपारी भोगणारे शान आणि कारेन बंडखोरही तिथेच वास्तव्याला होते. मला टोरांटोची सैर करवणारा हा इराणी फिदायीन तेव्हा जॉर्ज यांच्या बंगल्यावर मोफत अन्न खाऊन श्रमिक क्रांतीची स्वप्ने बघत होता.
१९७९ च्या फेब्रुवारी महिन्यात इराणमधे क्रांती झाली खरी. मात्र ही सनातनी उजव्यांनी घडवून आणलेली धार्मिक क्रांती होती. पदच्युत शाह रेझा पेहलवीपेक्षा क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या धर्मगुरू आयातुल्ला खोमेनींविषयी, समाजवादी विचारांच्या या तरुणाला जास्त तिरस्कार होता. त्याचवर्षी तेहरानमधल्या नवनियुक्त इराणी सरकारचं एक शिष्टमंडळ नवी दिल्ली इथे आलं होतं. पालम विमानतळावर या शिष्टमंडळाला गाठून त्यांच्याविरोधात डाव्या विचारांच्या इराणी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांना निषेधाचे फलक दाखवले. यामुळे व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
अटक केल्यानंतर या इराणी फिदायीनांना अतिशय घाणेरड्या आणि काळोख्या कोठडीत ठेवण्यात आलं. तिथे दिलं जाणारं अन्न निकृष्ट दर्जाचं होतं, त्याचबरोबर तिथे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं होतं. मात्र या मंडळींच्या सुदैवाने त्यांचे मित्र असलेल्या समाजवादी विचारांच्या केंद्रीय मंत्र्याला या परिस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर एका सकाळी जॉर्ज फर्नांडिस तुरुंगात आले. या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वत:वर घेऊन त्यांनी या मंडळींना ल्युटन्समधील आपल्या बंगल्याच्या पडघरात हलवलं.
हेही वाचाः बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी
१९७९ चं वर्ष संपलं आणि नवीन वर्षासोबतच दिल्लीत नवं सरकार सत्तेवर आलं. सत्ता जाताच जॉर्ज फर्नांडिस यांचा अधिकारी आणि प्रशासनावर पूर्वी असणारा प्रभाव ओसरला. त्यामुळे त्यांच्या आश्रयाला असणार्या या मित्रांचं संरक्षण भारतात अशक्य बनलं. मग त्यांनी या विद्यार्थ्यांना भारताबाहेर निघून जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतरच्या घडामोडी सांगण्यास साहजिकच इच्छुक नसणारा तो माजी फिदायीन नंतर कॅनडाला आला, जिथे तो आता टॅक्सी चालवतो. कुठेही का असेना किंवा काही का करत असेना, जॉर्ज फर्नांडिस कायम त्याचा बापच राहणार होता. कारण जॉर्जने दिल्लीत या इराणी विद्यार्थ्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय केली होती. याहीपेक्षा महत्त्वाचं या विद्यार्थ्यांसाठी जॉर्जने काही केलं असेल तर ते म्हणजे, या मंडळींना अनिश्चित काळापर्यंत भारतीय तुरुंगात खितपत पडण्यापासून वाचवलं होतं.
विविध देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा बाप बनलेल्या जॉर्जला एके काळी कॅथलिक चर्चचा फादर बनून लोकांना आत्मिक समाधान देण्याची इच्छा होती. १९३० मधे कर्नाटकातल्या मंगलोर इथे जन्मलेला जॉर्ज आपल्या सहा भावंडांमधे सर्वांत मोठा होता. धर्मभोळ्या पालकांनी त्याला बंगलोरमधे कॅथॉलिक धर्माचं शिक्षण देणार्या सेमिनरीमधे दाखल केलं. पुढील वर्षभर तो तिथे लॅटिन शिकला आणि मग मात्र ते सोडून आपल्या गावी पळून आला. त्यानंतर जॉर्जने तिथल्या हॉटेल कामगारांना संघटित करण्यास सुरवात केली. मात्र थोड्याच काळात त्याने आपला मुक्काम मुंबईला हलवला. मुंबईत आल्यावर तो फूटपाथवर झोपला किंवा तसं नसेलही, उडपी हॉटेल मालकांशी कोकणी भाषेत बोलून त्याने जेवणही मिळवलं किंवा तसेही नसेल कदाचित, मात्र अशा अनेक आख्यायिका मुंबईतल्या त्याच्या सुरवातीच्या वास्तव्याबद्दल निर्माण झाल्या.
मुंबईत आल्यानंतर काही काळातच जॉर्जने प्लेसिड डी’मेलो या प्रसिद्ध कामगार संघटनेच्या नेत्याशी स्वतःला जोडून घेतलं. मुंबईतल्या कामगार चळवळीवर एकेकाळी कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. समाजवादी असणार्या डी’मेलो आणि जॉर्ज यांचा या मंडळींशी सक्रीय संघर्ष सुरू झाला होता. मंगलोरमधे वाढलेल्या जॉर्जला कोकणी, तुलू आणि कानडी भाषा येत होत्या. भाषाप्रभुत्वाची नैसर्गिक देणगी लाभलेला जॉर्ज थोड्याच अवधीत हिंदी आणि मराठीदेखील अस्खलितपणे बोलू लागला होता. ज्यामुळे इथल्या कष्टकर्यांमधे जॉर्जला चांगला जनाधार मिळवता आला.
मला आठवणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६७ मधली. त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो. याच निवडणुकीने जॉर्ज फर्नांडिस यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांनी स.का. पाटलांना हरवल्याची बातमी जशी डेहराडूनसारख्या दूरच्या भागात राहणार्या माझ्यापर्यंत पोचली, तशीच धनबाद आणि धेनकनाल इथे राहणार्या मुला-मुलींपर्यंतही पोचली असेल. नेहरू, शास्त्री यांच्यापासून ते इंदिरा गांधीपर्यंत काँग्रेस पक्षासाठी निधी उभारण्याचं काम स.का.पाटील यांच्याकडेच असायचं. भारताच्या सर्वांत श्रीमंत शहरातल्या धनाढ्य उद्योगपतींपर्यंत पोचवण्याचा दुवा स. का. पाटील होते. आणि त्यामुळेच ते काँग्रेस पक्षासाठी जणू जीवनवाहिनी होते.
आता वयाने लहान असणार्यांना त्यावेळेच्या या राजकीय लढतीविषयी सांगायचं झाल्यास, १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी स.का. पाटलांना हरवणं म्हणजे आजच्या घडीला जिग्नेश मेवाणी किंवा कन्हैया कुमार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अमित शाह यांना हरवण्यासारखं आहे.
हेही वाचाः जयंतराव साळगावकरः स्वप्नं पाहणारा आणि प्रत्यक्षात आणणारा बापमाणूस
जॉर्ज फर्नांडीस यांच्या विविधरंगी कारकिर्दीतले नंतरच्या काळातील मैलाचे दगड तसे सर्वज्ञातच आहेत. १९७४ साली झालेल्या रेल्वे संपाचं नेतृत्व असो की, आणीबाणीमधे दाखवलेलं धैर्य; १९७७ मधे तुरुंगात असताना बिहारमधल्या मुजफ्फरपूर इथून त्यांनी लढवलेली निवडणूक असो की, जनता सरकारमधे उद्योगमंत्री असताना आयबीएम आणि कोका-कोला या कंपन्यांची त्यांनी केलेली हकालपट्टी असो यातून त्यांचं विविधरंगी व्यक्तिमत्त्व दिसतं. दिनेश सी.शर्मा यांनी आपल्या ‘द लाँग रेवोल्यूशन’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, नकळत का होईना आयबीएम कंपनीच्या हकालपट्टीने भारतात स्वदेशी संगणक हार्डवेअर उद्योग विकासाला चालना मिळाली.
आदल्याच दिवशी पंतप्रधान मोरारजी देसाईंचे कौतुक करून दुसर्या दिवशी त्यांना दगा देणं असो की, थोड्या कालावधीसाठी वी.पी. सिंहांच्या सरकारमधे मिळालेलं रेल्वे मंत्रीपद असो कोकण रेल्वेला दिलेली चालना याच काळातली, जनता परिवाराशी फारकत घेऊन आपल्या एका गटासह जातीयवादी भाजपला आलिंगन देणं असो की, वाजपेयी सरकारमधे संरक्षणमंत्री म्हणून केलेलं कार्य, आपल्या नि:स्वार्थी जीवनशैलीमुळे सीमेवरील सैन्यामधे ते लोकप्रिय झाले होते; किंवा गुजरातमधे २००२ मधे झालेल्या नरसंहारानंतर गुजरात सरकारची पाठराखण करत जॉर्ज आणि त्यांच्या सहकारी जया जेटली यांनी निर्लज्जपणे घेतलेली बोटचेपी भूमिका असो; सांगण्याजोगा अनुभवाचा प्रचंड खजिना असणार्या व्यक्तीला अशा दीर्घ आजारामुळे कायमचं मौनात जावं लागणे तसं त्रासदायकच.
आणीबाणीविरोधात दिलेला लढा हा जॉर्ज फर्नांडिस यांच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू होता. तर अडवाणी आणि मोदी यांच्याशी किंवा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या जातीयवादी राजकारणाशी केलेलं सख्य हे त्यांचं नैतिक अधःपतन दर्शविणारं होतं. त्यांच्या कारकिर्दीतले हे दोन टोकाचे बिंदू एक-दुसर्याशी जोडले गेले असतीलही कदाचित, पण सत्तेवरच्या प्रेमापोटीच जॉर्ज एनडीएमधे राहिले, असं काही मंडळींना वाटतं. ते सुलभीकरण झालं. पण त्याचबरोबर इंदिरा गांधींच्या काँग्रेसशी असलेलं त्यांचे हाडवैर हेसुद्धा त्यामागचं महत्त्वाचं कारण असू शकतं.
आणीबाणी लादल्यानंतर लागलीच बेंगलोरमधे कामगार संघटनेचा नेता असणार्या जॉर्जच्या भावाला म्हणजेच मायकलला अटक करण्यात आली. जॉर्ज मात्र शिताफीने निसटला आणि पारंपरिक शीख वेश परिधान करून पोलिसांच्या हातावर तुरी देत सुटला. तिथून तो रिचर्ड फर्नांडिस या भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या आपल्या सर्वांत लहान भावाला भेटायला बंगळूरू इथे आला, तेव्हा संभाषणासाठी तोंड उघडेपर्यंत रिचर्डही त्याला ओळखू शकला नाही.
जॉर्ज फर्नांडिस यांना पकडण्यात अपयश आल्यामुळे इंदिरा गांधी चांगल्याच संतापल्या होत्या. त्यांच्याच निर्देशानुसार कर्नाटक सरकारने छापखाना चालवणार्या आणि राजकारणाशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या लॉरेन्स या जॉर्जच्या भावाला अटक केली. तुरुंगात झालेल्या अतोनात छळामुळे त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. अभिनेत्री स्नेहलता रेड्डी या जॉर्जच्या मैत्रिणीलाही तुरुंगात टाकण्यात आले. तिथे जडलेला आजार बळावत जाऊन त्यातच पुढे स्नेहलता यांचा मृत्यू झाला.
हेही वाचाः विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग ३)
आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अगदी सुरवातीलाच फर्नांडिस यांनी आपले राजकीय गुरु राम मनोहर लोहिया यांच्या काँग्रेसविरोधी राजकारणाच्या विचारधारेचा स्वीकार केला. आणीबाणीच्या काळात घरातल्या व्यक्ती आणि मित्रांच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे इंदिरा गांधी आणि त्यांच्या पक्षावर जॉर्ज यांचा राग अधिकच तीव्र झाला. इंदिरेच्या परिवाराला कसंही करून सत्तेबाहेर ठेवणं हेच जणू त्यांचं ध्येय झालं. यासाठी प्रसंगी हिंदू राष्ट्राच्या नावाखाली मुसलमान आणि ख्रिश्चनांच्या कत्तली करणार्या मंडळींनाही समर्थन देण्यास त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही.
जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा नेता राजकीय पटलावर पुन्हा निर्माण होणार नाही. तो एकमेवाद्वितीय होता. जातधर्म-प्रदेश-भाषा इत्यादी अस्मितांमधे विभागलं गेलेल्या आजच्या राजकारणात मंगलोरमधला कुणी एक कोकणी भाषिक कॅथॅलिक व्यक्ती मुंबई आणि बिहारमधून लोकसभेच्या निवडणुका जिंकू शकतो, यावर आज विश्वास ठेवणं कठीण जाईल.
आपल्या पदाचा गर्व नसलेल्या या राजकारणी व्यक्तीशी बस ड्रायवर आणि रेल्वेचे सिग्नलमॅनदेखील अत्यंत आपुलकीने आणि भावाप्रमाणे समान व्यवहार करू शकत होते; तर तिबेटी आणि इराणी विद्यार्थ्यांना ते पित्यासमान होते. त्यांच्या याच समतावादी आणि जातीवादविरोधी गुणवैशिष्ट्यांमुळे सक्रीय राजकारणाच्या अंतिम काळात त्यांनी ज्या दुर्दैवी नैतिक तडजोडी केल्या त्यासाठी त्यांना माफ करणं खूपच अवघड जातं.
हेही वाचाः
(लेखक प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत आहेत. साप्ताहिक साधनामधे आलेल्या या लेखाचा अनुवाद समीर दि. शेख यांनी केला.)