३ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पृथ्वीराज कपूर, अमर्त्य सेन, लक्ष्मीकांत कुडाळकर, अडॉल्फ डॅस्लर आणि शेवरोलेट कंपनी यांच्याविषयीच्या.

पृथ्वीराज कपूर (जन्म १९०६)

पृथ्वीराज कपूर यांची आज ११२ वी जयंती. पृथ्वीराज कपूर हे सिनेसृष्टीत असलेल्या कपूर कुटुंबाचे प्रमुख. पृथ्वीराज कपूरांची चौथी पिढी सध्या बॉलिवूडमध्ये आहे. पृथ्वीराज कपूर इप्टा या सिनेमाशी संबधित असलेल्या संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. सिनेमाच्या आवडीने ते शिक्षण अर्धवट सोडून १९२८ ला मुंबईत आले. त्यांनी १९४४ ला पृथ्वी थिएटरची स्थापना केली.

१९६० ला मुगल-ए-आजम या ऐतिहासिक सिनेमात मुघल शासकाची भूमिका केली. चॅलेंज या मूकपटासाठी काम केलं. १९३१ ला पहिल्या बोलपटात पृथ्वीराज कपूर यांनी खलनायकाची भूमिका केली होती. विद्यापती, सिकंदर, दहेज, आवारा, मुगल-ए-आजम, आवारा, हीर रांझा, कल आज और कल या त्यांच्या सिनेमांना लोकप्रियता मिळाली. सिनेमातील कामगिरीसाठी त्यांना १९६९ मधे पद्मभूषण तर १९७२ ला दादासाहेब फाळके पुरस्कार (मरणोत्तर) देण्यात आला.

अमर्त्य सेन (जन्म १९३३)

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचा आज ८४ वा वाढदिवस. कोलकत्यात जन्मलेल्या सेन यांनी १९५१ मधे प्रेसेडिंसी कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर १९५६ ला केंब्रिज इथल्या ट्रिनिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. नंतर त्यांची कोलकात्यात नव्याने सुरु झालेल्या जादवपूर विद्यापीठात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवड झाली. आपल्या विद्वतेच्या बळावर त्यांनी जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांच्या अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण अशा कामगिरीमुळे त्यांना १९९८ ला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी १९९९ ला भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं.

अडॉल्फ डॅस्लर (जन्म १९००)

सध्या ब्रँडचा जमाना आहे. असाच एक जगप्रसिद्ध ब्रँड जन्माला घालणाऱ्या अडॉल्फ डॅस्लर यांचा आज जन्मदिवस. अडॉल्फचे वडिल एका बूटाच्या कंपनीत काम होते. वडिलांनी बनवलेले जोडे आवडत नसल्याने तो स्वत: जोडे बनवायला शिकला. याआधी अडॉल्फ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीकडून सहभागी झाला होता. त्यात पराभव झाल्याचा कलंक पुसून काढण्यासाठी त्याने आपल्या घरातच बूट बनवायला सुरवात केली. १ जुलै १९२३ ला आपल्या मोठ्या भावासोबत डॅस्लर शूज फॅक्टरीची सुरवात केली. त्यानंतर अडॉल्फने अनेक प्रयोग केले. १८ ऑगस्ट १९२३ ला आपल्या नावाच्या आणि आडनावाच्या पहिल्या अक्षरांचा वापर करत त्याने अॅडिडास या बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना केली. अॅडिडास कंपनीत बनवलेल्या बुटांचा वापर १९२८ च्या ऑलिंम्पिकमध्ये खेळाडूंनी केला होता. ६ सप्टेंबर १९७८ ला एडॉल्फ डॅस्लर यांचं निधन झालं.

लक्ष्मीकांत कुडाळकर (जन्म १९३७)

लक्ष्मीकांत कुडाळकर हे नाव आपल्या परिचयाचं नसेल. पण आपण लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीबद्दल ऐकलं असेलच. त्यातले लक्ष्मीकांत म्हणजे, लक्ष्मीकांत कुडाळकर. त्यांचा आज बड्डे. वडिलांच्या मित्राने दिलेल्या सल्ल्यावरून लक्ष्मीकांत संगीत शिकला. करियरची सुरवातच बालकलाकार म्हणून केली.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने अनेक सिनेमांना उत्तम संगीत दिलं. दोस्ती, मिलन, जीने की राह, अमर अकबर अँथोनी, सत्यम शिवम सुंदरम, सरगम आणि कर्ज या सिनेमांसाठी त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. लक्ष्मीकांत कुडाळकर यांचा २५ मे १९९८ ला मृत्यू झाला.

शेवरोलेटची सुसाट भरारी (स्थापना १९११)

आजच्या दिवशी एक शतकाआधी १९११ मधे बेल्जियमचे काररेसर लुईस शेवरोलेट आणि विलियम बेली या दोघांनी शेवरोलेट ऑटोमोबाईल कंपनीची सुरवात केली. १९१४ ला शेवरोलेट कंपनीची पहिली कार रॉयल मेल बाजारात आली. शेवरोलेटला भारतात आणण्याचं संपूर्ण श्रेय जनरल मोटर्सला जात. शेवरोलेटचे भारतातील १७८ शहरात २०५ डिलर्स आणि २०० पेक्षा जास्त सर्विस सेंटर आहेत. अनेक प्रतिस्पर्धी असताना देखील त्यांनी आपली वेगळी ओळख तैय्यार केलीय. शेवरोलेटच्या ताफ्यात एंट्री लेवल हेचबेक, प्रिमियम हेचबेक, सेडान आणि डच्टे सोबत ८ मॉडेलचा समावेश आहे.