५ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०६ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. विल डुरांट, मारुती चितमपल्ली, बी. आर. चोपडा, चित्तरंजन दास आणि अँड्राईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम यांच्याविषयीच्या.

देशबंधू चित्तरंजन दास (जन्म १८७०)

पत्रकार, वकील, स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास यांची आज जयंती. पदवीनंतर ते वकिली शिकण्यासाठी लंडनला गेले. १८९२ ला परतल्यावर अरविंद घोष यांच्यावर असलेला राजद्रोहाचा खटला त्यांनी लढवला. १९०६ ला ते काँग्रेसमधे सहभागी झाले. १९१४ ला त्यांनी बंगाली भाषेतील नारायण साप्ताहिकाची सुरवात केली. तसचं फॉरवर्ड दैनिकासाठी ते लिखाण करत. काँग्रेस पक्षाच्या प्रसारासाठी त्यांनी भारत भ्रमण केलं. १९२१ च्या असहकार आंदोलनात ते सहभागी होते. १९२२ ला त्यांची भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. चित्तरंजन दास यांनी मोतीलाल नेहरु आणि मदन मोहन मालवीय यांच्यासोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. १६ जून १९२५ ला त्यांचा मृत्यू झाला.

तत्वज्ञ विल डुरांट (जन्म १८८५)

प्रसिद्ध अमेरिकी लेखक, इतिहासकार आणि तत्वज्ञ विलियम जेम्स उर्फ विल डुरांट यांची आज जयंती. न्यूयॉर्क इथल्या फेरर मॉर्डन स्कूलचा मुख्याध्यापक म्हणून २ वर्ष काम केल्यावर त्यांनी १९१३ ला पदाचा राजीनामा दिला. १९१७ ला कोलंबिया विद्यापीठात तत्वज्ञानाविषयावरील डॉक्टरेटसाठी संशोधन करताना त्यांनी आपलं पहिलं पुस्तक लिहिलं. ‘द स्टोरी ऑफ सिव्हीलायझेशन’ ही त्यांची अकरा पुस्तकांची मालिका लोकप्रिय आहे. या आधी त्यांनी ‘द स्टोरी ऑफ फिलोसऑफी’ हे १९२६ ला लिहिलेलं पुस्तकही लोकप्रिय ठरलं. त्यांच्या महत्तवपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना १९६८ ला पुल्तिझर आणि १९७७ ला राष्ट्राध्यक्ष पदकाने गौरवण्यात आलं. ७ नोव्हेंबर १९८१ ला त्यांचा मृत्यू झाला.

मारुती चितमपल्ली (जन्म १९३२)

लेखक आणि वन्यजीवअभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा आज ८६ वा जन्मदिवस. वनखात्यात १५ वर्षे नोकरी केलेल्या चितमपल्ली यांनी वनं, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी अनेक उल्लेखनीय संशोधनं केली. वनाशी संबंधित असलेल्या गोष्टींना मारुती चितमपल्ली यांनी मराठीत नावं दिली. निसर्गक्षेत्रातील दांडगी माहिती आणि अनुभवामुळे त्यांना निसर्गलेखक आणि पक्षीतज्ज्ञ अशी ओळख मिळाली. आपल्या भारतातील साप, जंगलातील देणं, रातवा, रानवाटा, शब्दाच धन यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. चकवा चांदणं नावानं त्यांनी आत्मचरित्र लिहलं. २००६ ला सोलापूरात झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागातर्फे २०१७ मधे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बी. आर. चोपडा (मृत्यू २००८)

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बलदेव राज चोपडा म्हणजेच बी.आर. चोपडा यांचा आज १० वा स्मृतिदिन. २२ एप्रिल १९१४ ला लाहोरला जन्मलेल्या चोपडा यांनी सिनेपत्रकार म्हणून मासिक आणि नियतकालिकासाठी काम केलं. महाभारत या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती चोपडा यांनी केली. १९५१ ला त्यांनी ‘अफसाना’ सिनेमाच्या माध्यातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. १९५६ ला त्यांनी बी. आर. फिल्म्स प्रोडक्शन हाउस सुरू करून ‘एकी ही रास्ता’ या सिनेमाची निर्मिती केली.

चांदणी चौक, साधना, धुंद, पती पत्नी ओर वो, इंसाफ का तराजू, निकाह, सौदा यासारख्या प्रसिद्ध सिनेमांच दिग्दर्शन केलं. त्यांना दोनवेळा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. २००१ मधे पद्मश्री आणि २००८ ला दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्यात आला.

अँड्राईडचं अनावरण (२००७)

मोबाईल ज्या सिस्टीमनुसार काम करतो, ती सिस्टीम म्हणजे अँड्राईड. या अँड्राईड सिस्टमच गुगलने २००७ ला अनावरण केलं होतं. विंडोज मोबाईल, अँड्राईड आणि आयओएस या तीन प्रमुख ऑपरेटींग सिस्टम आहेत. अँडी रुबिन यांनी अँड्राईडची निर्मिती केली होती. गुगलने त्यांच्याकडून २००५ ला ते खरेदी केलं. अँड्राईडचे आतापर्यंत २१ व्हर्जन आलेत. या व्हर्जनची नावं खाद्यपदार्थांवरुन ठेवली आहेत.