मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?

१० जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाला. आणि त्या दिवसापासून ५ ट्रिलियन हा शब्द सोशल मीडिया, बातम्या सगळीकडे वाचायला मिळाला. पण एवढी अर्थव्यवस्था कशी बनवणार यावर अनेक चर्चा न्यूज चॅनलवर बघितल्या. आपल्याला माहितीय का, भारताची अर्थव्यवस्था २००७ मधे १ ट्रिलियन डॉलरची झाली होती. त्यावर्षी आपण जगातल्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशांच्या क्लबमधे सामील झालो.

सध्या मिलियन आणि बिलियनपेक्षा सगळ्यांच्या तोंडावर ट्रिलियन हाच शब्द आहे. हा शब्द सध्या ट्रेंड होतोय. का? कारण तर एकच आहे ना भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करायची आहे. खरंतर सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा शिमगा सुरु आहे. त्यात हे स्वप्न म्हणजे निव्वळ बोल बच्चनच वाटतंय. पण म्हणतात ना, आपलं लक्ष्य मोठं असलं पाहिजे. मग त्या दिशेने काम केलं तर काहीतरी परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. आता सुधारणा होते की नाही, हे येत्या काळात समजेलच.

१९७५ पासून १ ट्रिलियन वापरात आलं

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातल्या आकडेवारीनुसार आपल्या देशाचा जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न २.७ लाख कोटी डॉलर्सच्या घरात आहे. या सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा ते १.८५ लाख कोटी डॉलर होतं जे आता दुप्पटीने वाढलंय. त्यामुळे ५ ट्रिलियन काही कठीण नाही असं सीतारमन म्हणाल्या. याचा अर्थ कंबर कसून काम करावं लागणार.

आता आपली अर्थव्यवस्था कदाचित ५ ट्रिलियन डॉलरची होईलही, पण ५ ट्रिलियन म्हणजे किती समजून घ्यायला हवं. ट्रिलियन या शब्जाचा अर्थ एक मोठा आकडा किंवा रक्कम असा होतो. ५ ट्रिलियन म्हणजे ५ लाख कोटी डॉलर्स होतात. आता १ मिलियन म्हणजे १० लाख तर १ बिलियन म्हणजे १ अब्ज. आणि सांगायची गोष्ट अशी की काही वर्षांपूर्वीपर्यंत बिलियन हे सर्वोच्च एकक मानलं जातं होतं. पण १९७५ ला पहिल्यांदा युनायटेड किंगडमच्या अर्थविभागाचे प्रमुख डेनिस हेली यांनी ट्रिलियन शब्द वापरात आणण्याची घोषणा केली.

हेही वाचा: मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स

ट्रिलियन हा फ्रेंच गणितातला शब्द

खरंतर बिलियनला शॉर्ट केल्यामुळे ट्रिलियन आलं. म्हणजे काय? या घोषणेनंतर द गार्डियन वर्तमानपत्राने बऱ्याच अर्थतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात इडनबर्गच्या गोर्डन रुटर यांनी म्हटलं होतं की, पूर्वी एक बिलियन लिहिताना एकावर १२ शून्य दिले जात होते. याला शॉर्ट करून बिलियन म्हणजे एकावर ९ शून्य देण्यास सुरवात झाली. आणि एकावर १२ म्हणजे ट्रिलियन असं करण्यात आलं. याचा अर्थ १ ट्रिलियन म्हणजे १ हजार अब्ज.

पण याआधीच १९५० पासून हा शॉर्टफॉर्म वापरण्यात येत होता. तांत्रिक गोष्टी लिहिताना, बातम्यांमधे हा शॉर्ट फॉर्म वापरत होते. मग शेवटी त्याला ऑफिशिअल म्हणून घोषित केलं. ट्रिलियन आणि बिलियन हे दोन्ही शब्द १५ व्या शतकात फ्रेंच गणितात लिहिलेले आढळतात, असं २०११ च्या बीबीसीच्या न्यूज मॅगझिनमधे लिहिलं होतं.

हेही वाचा: पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

२००७ पासून भारत ट्रिलियन क्लब मेंम्बर

जसा बॉलिवुडमधे १०० कोटींचा क्लब आहे. म्हणजे सिनेमाने १०० कोटी आणि त्यापेक्षा जास्त कमाई केली तर तो सिनेमा १०० कोटी कमावणाऱ्या सिनेमांच्या यादीत येतो म्हणजेच क्लबमधे सामील होतो. तसंच ज्या ज्या देशांची अर्थव्यवथा १ ट्रिलियन आणि त्याच्यावर आहे त्यांचाही क्लब आहे. या क्लबची सुरवात अमेरिकेने १९६९ ला केली. या क्लबमधे भारताचा २००७ मधे समावेश झाला.

द गार्डियन वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, युकेने ट्रिलियनच्या घोषणा पत्रात म्हटले होते की भविष्यात गरज पडल्यास आपण क्वार्ड्रिलियनही आणू. म्हणजे एकावर १५ शून्य. बघू क्वार्ड्रिलियन येतं का? सध्या तर आपल्या देशाचं टार्गेट ५ ट्रिलियन म्हणजेच ५ लाख कोटी आहे.

हेही वाचा: 

मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?

निकोल टेस्ला: मानसिक आजारावर मात करून बनले वैज्ञानिक

लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण कोणती काळजी घ्यावी?