वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

१४ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे.

आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी परंपरेचा चैतन्यदायी उत्सव. वारी म्हणजे विठ्ठलभक्तीचा अपूर्व सोहळा. गेल्या आठशे वर्षांची ही वैभवशाली परंपरा महाराष्ट्राच्या भूमीला विठ्ठलभक्तीने न्हाऊ घालतेय. भागवत धर्माची पताका उंचावत चंद्रभागेच्या वाळवंटात संतांनी समतेचा पुकारा करीत विठ्ठलभक्तीत स्वत:ला आकंठ बुडवलं. आध्यात्मिक मुक्तीची ही आस व्यक्तीगत न राहता समुहाची भान बनली.

कोकणात विठ्ठल भक्ती नांदते, पण

वारीने आध्यात्मिक समतेचं भान महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रूजवलं. जातीपातीची विषवल्ली भिनलेल्या या मातीत वारकरी संप्रदायाने साधलेली ही एकजूट तशी सोपी नव्हती. पण संतांनी विठ्ठलभक्तीच्या बळावर ते शक्य करत वारीला सामुहिक एकरूपतेचं अजोड प्रतीक बनवलं. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखामेळा पासून ते तुकोबांपर्यंतच्या सर्व संतांनी या वारीला आपल्या अभंगातून जीवनरस दिला. हा जीवनरस आज इतक्या वर्षांनीसुद्धा आषाढी एकादशीच्या वारीतून मराठी मनाला लढण्याचं आणि जगण्याचं बळ देतंय.

जुलै महिना सुरू झाला की वारीच्या चाहुलीने मराठी मनावर रोमांच उभे राहतात. गावाकडे विठ्ठलाच्या भेटीची लगबग सुरू होते. मी तसा तळकोकणातला. वारीबद्दल उत्सूकता असली तरी वारी कधी अनुभवता आली नाही. तळकोकणात विठ्ठलभक्ती नांदत असली तरी बाकी महाराष्ट्राप्रमाणे वारीला जाणाऱ्यांची परंपरा नजरेत भरणारी नाही. त्यामुळे आषाढी एकादशीला कोकणातलं वातावरण यथातथाच असतं. अशा वातावरणात कोकणातली तरूण पिढी वारीच्या वाटेला कितपत जात असेल हा प्रश्नच आहे.

आताच्या वारीत समतेची आस कमी जाणवत असली तरी समाजमनाची शहाणीव घडवण्यात तिचं महत्व आजही आहे. वारीसारख्या परंपरेचं वहन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्हायला हवं. अन्यथा वारकरी संप्रदायबाह्य शक्ती जनमानसाचा ताबा घेवू शकतात ही भीती आहेच.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

शाळकरी मुलांची मिनी वारी

या संभ्रमाच्या काळात वारीचा सुखद अनुभव काल एका दिंडीने दिला. या दिंडीने तब्बल सहा तास टाळ आणि मृदुंगाच्या तालावर बेधुंद नाचत विठूनामाचा गजर आसमंतात घुमवला. संतांचे अभंग गाणारे ओठ आणि टाळांच्या नादात तालबद्ध झालेली पावलं कोणा वयस्क किंवा तरूण वारकऱ्यांची नव्हती. ती होती शाळकरी मुलांची. सिंधुदुर्गातल्या शाळकरी मुलांची ही एकमेव वारकरी आणि वृक्षदिंडी. कुडाळ तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाने ही दिंडी काढली. लक्ष्मी-नारायण विद्यालय बिबवणे शाळा सावंतवाडीला जाताना कुडाळपासून ४ किलोमीटरवर हायवेलगत आहे. गेल्यावर्षी पटसंख्या कमी झाल्याने सरप्लस झालो आणि जानेवारीपासून या शाळेत दाखल झालो.

गेली १५ वर्षं या शाळेची आषाढी एकादशीला वारकरी आणि वृक्षदिंडीचं आयोजन केलं जातं. बाकी शाळांप्रमाणे घोषणा देत मिरवणूक न काढता विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचा अस्सल अनुभव घेता यावा यासाठी पावसाची तमा न बाळगता वारीच्या तल्लीनतेचा खराखुरा आनंद मिळेल अशी दिंडी आयोजित केली जाते. एका अर्थाने पंढरपूरच्या वारीची मिनी आवृत्ती म्हणता येईल, इतकं अस्सल रूप या वारीचं होतं. बिबवणेतल्या गणेश मंदिराकडून सुरू होणारी ही वारकरी दिंडी विठ्ठलमंदिरात जावून विसावते.

दोन मंदिरांमधील अंतर केवळ सव्वा किलोमीटरचं आहे. पण हे अंतर पार करायला वारीला तब्बल सहा तास लागतात. साडेसात वाजता गणेश मंदिरातून निधालेल्या वारीचा पहिला विसावा बिबवणे ग्रामपंचायतीच्या आवारात असतो. इथे वारी रिंगण करते. रिंगण झाल्यावर फुगडीच्या दणकेबाज स्पर्धा होतात. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो. एका अर्थाने परंपरा आणि पर्यावरणाचा जागरच म्हणता येईल.

हेही वाचा: विठुराय भक्तांना स्वत:च म्हणतात आषाढी कार्तिकी माझ्याकडे यायला विसरू नका

वारी पुढच्या पिढीचं भान जपणारी

ग्रामपंचायतीचा अल्पोपहार घेवून पुन्हा वारकरी दिंडी विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होते. साधारणत: साडेबाराच्या सुमारास वारी विठ्ठल मंदिरात दाखल होते. आजच्या काळातला पंचतारांकीत अवतार या मंदिराला अजून तरी लाभलेला नाही. चौसोफी असलेलं कौलारू छपरांचं हे ग्रामीण बाज असलेलं टुमदार मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी विजय सामंत. सामंतांच्या मालकीचं असलेलं हे मंदिर. याचा वारसा सध्या पाचवी पिढी सांभाळतेय.

विजय सामंत आता थकलेत. पण विठ्ठल भक्तीचा अनुबंधच असा की काल मुलांना अभंग ऐकवताना साधलेली तल्लीनता अचंबित करणारी होती. तुमच्यानंतर कोण या प्रश्नाने मात्र त्यांच्या डोळ्यांत काळजी भरून आली. त्यावर सावरत त्यांनीच उत्तर दिलं कर्ता करविता विठोबा. तोच करील सोय. एका विठ्ठलभक्ताची नितळ भक्ती विद्यार्थ्यांनी साक्षात अनुभवली. पाच तासांची वारी विठू नामाचा गजर करीत नाचत नाचत विठ्ठलाच्या दारी आल्यावर थकवा सोडाच, जोश आणखी दुणावला. पुढचा दीड तास विठुरायांचा जयघोष टीपेला पोचला. काही मुलांनी सुमधुर अभंग गायन करून वारीसारखं सांस्कृतिक संचित येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवा असल्याचं अधोरेखित केलं.

बरोबर दोन वाजता सामंत काकांनी दिलेला अल्पोपहार घेवून मुलं घरच्या रस्त्याला लागली. वारी आणखी काही काळ चालावी असं क्षणभर वाटलं. ज्या वाटेला कधी जावंसं वाटलं नाही त्याचा नितांत सुंदर अनुभव या मिनी वारीने दिला होता. शाळेचा हा उपक्रम एका अर्थाने संत परंपरेचा आजच्या पिढीशी असलेला भावबंध मजबूत करणारा आहे. विशेष म्हणजे संस्थेला कोणतीही आर्थिक तोशीस न देता मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हा उपक्रम गेली १५ वर्षं यशस्वीरीत्या करतायत.

आषाढी एकादशीच्या आधी एक आठवडा शाळेत वारीची लगबग सुरू होते. वारीसाठी लागणारं सामान गोळा करण्यापासून ते संतांचे अभंग गायनाच्या तयारीपर्यंत ही लगबग असते. ही सगळी तयारी अभ्यासाची वेळ सांभाळत केली जाते. आदल्यादिवशी अभंग गायनाच्या स्पर्धा घेवून अख्खी शाळा वारकरी दिंडीसाठी सज्ज होते. गेली पंधरा वर्षे वारीच्या दरम्यानची लगबग अखंडपणे सुरू आहे.

हेही वाचा: वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

प्रेम आणि भक्तीचा अजोड संबंध

वारकरी परंपरेचा भावी पिढीला परिचय करून देणारी बिबवणे हायस्कूलचा हा मिनी वारीचा उपक्रम जिल्ह्यातील एकमेव उपक्रम म्हणून जसा दखलपात्र आहे तसा आजच्या काळाच्या संदर्भातही सर्वदूर दखल घेण्याजोगाही आहे. संतांना जातीपातीच्या भिंती उध्वस्त करता आल्या नसल्या तरी ‘भेदाभेद अमंगळ’ असल्याचा उपदेश करत आध्यात्मिक समतेचा पुकारा केला. वारीच्या माध्यमातून अवघा रंग एकचि करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंपरेने संतांना नि संतांनी परंपरेला असं घडवतच वारकरी परंपरा आकारास आली.

या परंपरेला मर्यादा जरूर होत्या पण या मर्यादेतही संतांनी उघड बंडखोरी करून एकमय समाजभान घडवण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. पण ही वीण विसविशीत झाल्याचे चित्र अवतीभवती दिसतंय. सामाजिक बधिरता वेगाने वाढत आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत उदयाला येऊन भारतभर पसरलेली भक्तीचळवळ. जिने प्रेम आणि भक्तीचा याचा अजोड संबंध उलगडत माणूसपणाला समृद्ध केलं.

आजकाल प्रेम आणि भक्ती एकमेकांचे शत्रू बनून संतांनी जागा केलेला माणूसच निकालात काढला जातोय. वारकरी परंपरेने वारीत एकवटलेला माणूस कळपाकळपाने अध्यात्मिक सुखाच्या शोधात भटकतोय. ही वीण आणखी उसवायची नसेल तर वारकरी परंपरेला अधिक मजबूतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवावी लागेल. मात्र संतांसहीत वारकरी परंपरा समजून घेण्याची दृष्टी ठेवावी लागेल.

हेही वाचा: 

कोणते आहेत गुड फॅट आणि बॅड फॅट्स?

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला