दीडशे वर्षानंतरही धावतेय भारतातली पहिली ट्राम

१६ मार्च २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय.

कधी बस तर कधी रेल्वे असा प्रवास करत आपण अत्याधुनिक मेट्रोपर्यंत येऊन पोचलो. आज भारतातल्या मोठमोठ्या शहरांमधे मेट्रो धावताना दिसतायत. नाही म्हटलं तरी मेट्रोनं आपला प्रवास अधिक सोप्पा केला. बस, रेल्वे आणि आता मेट्रो अशी सार्वजनिक वाहतुकीची ही बदललेली साधनं आज शहरी जीवनाचा अविभाज्य भाग बनलीत. पण या सगळ्या बदलांमधे ट्रामला विशेष महत्व आहे.

कोलकाता, मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या या ट्रामनं एकेकाळी या शहरांचं वैभव वाढवलं. मुंबईत १८७४ला पहिल्यांदा ट्राम धावली. लोकांसाठी त्यावेळी ही विशेष गोष्ट होती. 'जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा, खडखडते अन् ट्राम वाकडी, कंबर मोडुनी, चाटित तारा' अशा शब्दांमधे त्यावेळी बा. सी. मर्ढेकरांनी या ट्रामचं वर्णन केलं होतं. पण शहर बदललं, वाहतुकीची साधनं बदलली तशी मुंबईची ट्राम कायमची बंद झाली.

कोलकाताची ट्राम मात्र आजही दिमाखात धावतेय. २४ फेब्रुवारी २०२३ला या ट्रामला दीडशे वर्ष पूर्ण झाली. आपल्या सांस्कृतिक जाणिवा आणि राजकीय चळवळींमधलं वेगळेपण जपणा-या या शहरानं आपला दीडशे वर्षांचा वैभवशाली वारसा आजही जपून ठेवलाय. कोलकाताच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ट्राम त्याचंच द्योतक आहे.

घोड्यावर धावली देशातली पहिली ट्राम

भारतात आलेल्या इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीनं १६९०ला हुगळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कालीकत, सुतानुती, गोविंदपूर या तीन गावांचा 'प्रेसिडेन्सी सिटी' म्हणून विकास करायला सुरवात केली. प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयाला येऊ घातलेली ही तिन्ही गावं पुढं कोलकाता या नावाने ओळखली जाऊ लागली. याच शहराचं व्यापारी महत्व लक्षात घेऊन १७७२ ते १९१२ या दरम्यान कोलकाता ब्रिटिश भारताची राजधानी बनली.

या काळात वाहतुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात होते. त्याचं प्रमुख केंद्र युरोप होतं. अशातच १७६९ला वाफेच्या इंजिनावर धावणारं पहिलं वाहन आलं. पुढं वाफेवर चालणाऱ्या प्रवासी गाड्या ब्रिटनमधे बनवल्या जाऊ लागल्या. बघता बघता आगगाडीही आली. १८६०-७०चा काळ या सगळ्या बदलांच्या दृष्टीनं फार महत्वाचा होता. कारण याच काळात युरोपीय देश आणि अमेरिकेत विजेवर धावणाऱ्या आगगाड्या आणि ट्रामगाड्यांनी धावायला सुरवात केली होती.

१८५०पासूनच कोलकता शहराचा अधिक वेगानं विकास घडवण्यासाठी ब्रिटिश प्रयत्नशील असल्याचं दिसतं. अशातच २४ फेब्रुवारी १८७३ला कोलकाताच्या सियालदाह स्टेशन ते आर्मेनियन स्ट्रीट दरम्यान बोबाजार स्ट्रीट, स्ट्रॅंड रोड आणि डलहौसी स्क्वेअर या मार्गांवर देशातली पहिली ट्राम धावली. जवळपास ४ किलोमीटरचं अंतर घोडेस्वारीवरून पार करणारी ही पहिलीच ट्राम होती. पण या ट्रामचा आनंद फार काळ टिकला नाही. १८७३चा नोव्हेंबर उजाडेपर्यंत ही ट्राम बंद पडली.

हेही वाचा: पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

आणि ट्राम विजेवर चालली

पुढचे ४ वर्ष ही ट्राम बंद होती. मधल्या काळात वाफेच्या इंजिनावर ट्राम चालवायचा प्रयत्न झाला पण तोही अयशस्वी झाला. त्यातच १८८०चं साल उजाडलं. तोपर्यंत विजेवर धावणाऱ्या ट्राम युरोपियन देशांमधे आलेल्या होत्याच पण त्या भारतात यायला १९०२ उजडावं लागलं. आणि अखेर २७ मार्च १९०२ला भारतातली विजेवरची पहिली ट्राम एस्प्लेनेड ते किदरपूर दरम्यान धावली. ही ऐतिहासिक गोष्ट होती.

बघता बघता पूर्ण शहरभर ट्रामच्या रुळांचं जाळं पसरलं. हळूहळू विजेच्या तारा जोडल्या जाऊ लागल्या. दुसरीकडे या ट्रामचं नीट मॅनेजमेंट करता यावं म्हणून १८८०ला 'कलकता ट्रामवेज कंपनी'ची स्थापना करण्यात आली. रुळांचं कामही प्रगतीपथावर आलं. त्याचं उद्घाटन नव्यानंच वाइसरॉय म्हणून आलेल्या लॉर्ड रिपन यांच्या हस्ते करण्यात आलं. १९०२नंतर ट्राम जशा विजेवर चालू लागल्या तसे रुळांमधेही बदल होऊ लागले. प्रसंगी त्यातलं अंतरही वाढवलं गेलं.

कलकतासह १८७४मधे मुंबई, १८९५ दरम्यान चेन्नई, कानपूर, दिल्लीमधेही विजेवरच्या ट्राम धावू लागल्या. पण १९३३ ते १९६४च्या दरम्यान मात्र कोलकाता सोडून इतर शहरांमधल्या ट्राम बंद झाल्या. त्याही कायमच्याच! एकट्या 'कलकता ट्रामवेज कंपनी'कडे १९व्या शतकाच्या अखेरपर्यंत १६६ ट्राम, १ हजार घोडे, ७ वाफेचे इंजिन आणि जवळपास ३० किलोमीटर लांबीचे ट्रामचे ट्रॅक असल्याची नोंद मिळते.

असं होतं ट्रामचं रंगरूप

ही ट्राम प्रामुख्याने दोन डब्यांची होती. यातला पहिला डबा हा फस्ट क्लासचा ज्यात पंखे बसवलेले असायचे तर दुसरा पंखे नसलेले असायचा तो सेकंड क्लास. फस्ट क्लासमधून त्यावेळी ब्रिटिश अधिकारी प्रवास करायचे. अधिकाऱ्यांना किंवा इथं आलेल्या ब्रिटिश प्रवाशांनाच यातून प्रवास करता यायचा. २०१३पर्यंत फस्ट क्लास आणि सेकंड क्लासचे असे डबे कायम होते. रस्त्यावरून धावणारी ट्राम अगदी हात दाखवला तरीही हलकेच रस्त्यात थांबून प्रवाशांना आत घ्यायची. हीच ट्रामची खासियत होती.

ट्राममधल्या दोन्ही डब्यांसाठी खाकी वर्दीतले दोन कंडक्टर असायचे. म्हणजे तुम्ही मुंबईतली बेस्टची डबल डेकर बस बघितली असेल. त्यात कसे वरखाली दोन कंडक्टर असतात अगदी तसंच! ड्रायवरला सूचना देण्यासाठी रस्सीच्या मदतीने ट्राममधे एक बेलही बसवलेली असायची. एखादा स्टॉप आला की 'ट्रिंग ट्रिंग' वाजणारी ही बेल ड्रायवरला सूचना द्यायची की, ड्रायवर सावध व्हायचा.

आता ट्रामचं मॅनेजमेंट पश्चिम बंगालच्या राज्य परिवहन महामंडळाचा एक भाग असलेल्या 'कोलकता ट्राम कॉर्पोरेशन'कडे आलंय. 'हेरिटेज राइड'साठी म्हणूनही या ट्रामचा उपयोग केला जातोय. ट्राम ही कोलकाताच्या मागच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. इतक्या वर्षात शहराचं बदललेलं रंगरूप या ट्रामनं पाहिलंय.

हेही वाचा: रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

म्युझियम असलेलं 'स्मरणिका'

कोलकाताचा हावडा ब्रिज असुदे की ट्राम पर्यटकांसाठी हे शहर कायमच आकर्षणाचं केंद्र आहे. बाहेरच्या पर्यटकांसाठी ट्राममधून हे शहर फिरणं कायमच उत्सुकतेचं असेल. त्यासाठी सरकारनंही मध्यंतरी एका डब्याची अत्याधुनिक एसी ट्राम आणलेली होती. खरंतर आजच्या बदललेल्या काळात पर्यटक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं काळाप्रमाणे या ट्रामचं रुपडं बदलणं गरजेचं आहे.

कोलकाता हे शहर सिने क्षेत्रालाही कायमच खुणावत आलंय. २०१३ला सोनाक्षी सिन्हा आणि सैफ अली खान यांचा 'बुलेट राजा' हा सिनेमा आला होता. त्यातले अनेक सिन ट्राममधे चित्रित करण्यात आले होते. तसंच मनिरत्नमचा 'युवा', बंगाली सिनेदिग्दर्शक आदित्य विक्रम सेनगुप्ता यांच्या 'लेबर ऑफ लव', सुजॉय घोष यांचा 'कहाणी' अशा सिनेमांमधेही ट्राम वेगळ्या अंदाजात आपल्याला दिसते.

१९ सप्टेंबर २०१४ला कोलकताच्या धर्मतला इथं ट्रामचं देखणं म्युझियमही उभं करण्यात आलंय. 'स्मरणिका' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या म्युझियममधे १९३८मधली एक खरोखरची ट्राम तर आहेच शिवाय त्यावेळच्या रस्त्यांचे जुने फोटो, ट्रामचे पास, तिकिटं, त्या काळातली नाणी अशा ट्रामच्या आजपर्यंतच्या प्रवासातल्या अनेक गोष्टीही इथं पाहता येतात. केवळ भारतातल्या ट्रामबद्दलच नाही तर जगभरातल्या ट्रामच्या इतिहासाबद्दलची माहितीही इथं वाचायला मिळते.

ट्राम बंद होण्याच्या मार्गावर

आज जगातल्या जवळपास ५० देशांमधे ट्राम सेवा उपलब्ध आहे. ३०० शहरांमधे त्याचं जाळं पसरलेलं दिसतं. इतर भागांमधे ही ट्राम 'स्ट्रीटकार्स' किंवा 'लाइट रेल ट्रान्झिट' या नावाने ओळखली जाते. तिथली तिथली सरकारं या ट्रामला अत्याधुनिक रूप देण्यासाठी धडपडत असताना आपल्याकडे दीडशे वर्षांपासून कार्यरत असलेली ट्राम शेवटची घटका मोजताना दिसतेय.

आज कोलकताच्या रस्त्यावर पिवळ्या टॅक्सी धावतायत. आता मेट्रोही आलीय. त्यात ट्रामची घुसमट होतेय. हळूहळू ट्रामचा लोकांना विसर पडू लागलाय. या मेट्रोमुळे ट्रामचे अनेक ठिकाणचे मार्गही आता बंद करण्यात आलेत. आपल्याकडे एसटीचं होतंय तेच तिकडे ट्रामचं. आर्थिक कारणं देत ही ऐतिहासिक ट्राम बंद करायचा घाटही घातला जातोय.

कधीकाळी या ट्रामनी शहराचं पूर्ण जाळं विणलेलं होतं. सार्वजनिक वाहतूक ही प्रामुख्याने ट्रामच्या माध्यमातून केली जायची. पण २०११मधे जिथं १८० ट्राम होत्या तिथं २०१८ उजाडेपर्यंत केवळ ४० ट्राम रस्त्यांवर चालत असल्याचं बीबीसीचा एक रिपोर्ट सांगतो. आता ट्रामच्या केवळ दोन मार्गिका शिल्लक असल्यामुळे मध्यंतरी कोलकतामधे ट्राम सेवा बंद करायची घोषणा करण्यात आली होती. पण लोकांच्या दबावापोटी हा निर्णय माघारी घेण्यात आला.

पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री रॉबिन मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळात ट्रामला उजाळी द्यायचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. खरंतर ट्राम हा कोलकताचा ऐतिहासिक वारसा आहे. नुकताच आपला दीडशे वर्षांचा प्रवास या ट्रामनं पूर्ण केलाय. अशावेळी त्याचं ऐतिहासिक महत्व ओळखून या ट्रामला नव्यानं झळाळी देण्यासाठी पश्चिम बंगालच्या सरकारनं अधिकचे प्रयत्न करायला हवेत. 

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा ९० वा वाढदिवस

एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स