आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. गांधीजींच्या नेतृत्वातल्या स्वातंत्र्ययुद्धाने नवा भारत घडवला. पण आज गांधीजींची आयडिया ऑफ इंडिया नाकारून देशाचे नवे फादर घोषित करायची स्पर्धा सुरू झालीय. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटचा अर्थ काय?
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या भक्तांनी सोशल मीडियावर धो धो शुभेच्छा दिल्या. सगळ्यात गाजलं ते मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं ट्विट. ते ट्विट असं होतं,
`विशिंग द फादर ऑफ अवर कंट्री, नरेंद्र मोदीजी, ए वेरी हॅपी बर्थडे, व्हू इन्स्पायर्स अस टू वर्क रिलंटलेसली टूवर्ड द बेटरमेंट ऑफ सोसायटी!`
अमृता फडणवीसांनी नेशन असा शब्द न वापरता कंट्री असा शब्द वापरलाय. त्यामुळे फादर ऑफ द कंट्रीचा मराठी तर्जुमा राष्ट्रपिता असं न करता देशपिता असा होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण ट्विटचा मराठी अनुवाद असा होईल, `आपले देशपिता नरेंद्र मोदीजींना, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. ते आम्हाला समाजाचं भलं करण्यासाठी अविरत काम करण्याची प्रेरणा देतात.`
विशेष म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला दुपारचे दोन उजाडावे लागले होते. तरीही तो चांगला शेअर झाला. विशेषतः त्यावरचे रिप्लाय फारच अफलातून होते. त्यात अनेकांनी हे ट्विट हटवण्यासाठी आग्रह केला होता. ते त्यांचे हितचिंकतच होते. त्यांना कोणतीही कंट्रोवर्सी नको होती. रायस्टर नावाच्या एका यूजरने लिहिलंय, `भाजपा को अगर महाराष्ट्र में किसी से खतरा है तो इनसे ही है.`
ट्विटवर टीका करणाऱ्या पोस्ट फारच जास्त आहेत. नितीन गुंजाळ म्हणतात, `अमृताजी फिकर नॉट, आपके पती को वो सीएम बना देंगे, उसके लिए देश का बाप बनाना ठीक नहीं.` गुंजाळ यांच्यासह अनेकांनी कन्हैया कुमार यांचं भाषणातलं वाक्य सांगितलंय, `आपका बाप होगा, हमारा नहीं.` तुलिका यांनी तर प्रश्न विचारलाय, `तो गोडसे कौन हैं?`
हेही वाचाः अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
खरंतर सोशल मीडियावर महात्मा गांधींविषयी अत्यंत वाह्यात भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांची संख्या डोळ्यात भरण्याजोगी आहे. असं असतानाही अमृता फडणवीसांसारख्या सत्तेचं प्रतीक बनलेल्या बाईंनी सभ्य भाषेत लिहिलेलं ट्विट आवडणाऱ्यांपेक्षा न आवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे `गांधीमुक्त भारत` बनवण्यासाठी पडद्याआड आकाश पाताळ एक करणाऱ्यांसाठी धक्कादायक असू शकेल.
अमृता फडणवीस यांचा एकूणच मिरवण्याचा इतिहास पाहता, त्यांच्या या ट्विटला फारशा गांभीर्याने घेण्याची गरज कुणाला वाटली नसावी. तो फार चर्चेचाही विषय बनला नाही. नरेंद्र मोदींना देशपिता म्हणायची कल्पना अमृता फडणवीसांच्या सुपीक डोक्यातून आली असेल फार लक्ष देण्याची गरजही नाही. पण आज सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. गांधीजींच्या ऐवजी मोदींनी राष्ट्रपिता म्हटलं तर काय प्रतिक्रिया येतात, असा खडा तर या ट्विटच्या नथीतून मारला नाही ना, अशी शंका येणंही तितकंच स्वाभाविक आहे.
कारण काही जणांनी गांधीजींना डोक्यावर घ्यायचं, काही जणांनी त्यांना लाथाडायचं. कुणी जगभर त्यांच्या पुतळ्यांचं उद्घाटन करायचं, कुणी त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घालून विकृत आनंद व्यक्त करायचा. शिवाय पुतळे पाडायचेही. कुणी गांधीजींचे सोहळे साजरे करायचे, कुणी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणत त्याच्या जयंत्या साजऱ्या करायच्या. कुठे गांधीजींच्या नावाने योजना घोषित करायच्या आणि कुठे नथुरामची देवळं उभारायची.
कुणीतरी लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर देशभर वेगवेगळी पात्रं भारत गांधीमुक्त करण्याच्या नाटकात आपल्याला नेमून दिलेल्या भूमिका ठरलेल्या वेळेला पार पाडत असावेत, असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे. अमृता फडवणीस यांचं ट्विट दुर्लक्षित झाल्यामुळे साक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना `फादर ऑफ इंडियासारखं` असं उल्लेखून आणखी एक मोठ्ठा खडा टाकून बघितलाय.
या खेळातली ही पात्रं कितीही ट्विटली तरी राष्ट्रपिता बदलणं इतकं सोपं नाही. कारण `फादर ऑफ द नेशन` हे बिरुद गांधीजींना कुणी ऐरागैऱ्याने दिलेलं नाही. आज वॉट्सअप युनिवर्सिटीवर पोसलेल्या पिढीला आश्चर्य वाटेल, पण गांधीजींना सर्वात आधी राष्ट्रपिता असं म्हणण्याचं श्रेय जातं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना.
तेव्हा नेताजी देशाबाहेर आग्नेय आशियात जपान्यांच्या मदतीने आझाद हिंद फौजेची उभारणी करत होते. ४ जुलै १९४४ला आझाद हिंद फौजेसमोर ब्रह्मदेशातल्या रंगून इथे नेताजींचं भाषण झालं. `तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा`, या घोषणेमुळे ते अजरामर झालं. तेच भाषण दोन दिवसांनी सिंगापूरहून आझाद हिंद रेडियोवर प्रसारित झालं आणि जगभर पोचलं.
हेही वाचाः अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी
हिंदीतून दिलेल्या या भाषणात ते म्हणतात, `आपल्या देशात असलेल्या देशबांधवांच्या प्रयत्नांनी देश स्वतंत्र झाला किंवा ब्रिटिश सरकारने छोडो भारतचा ठराव मान्य करत तो अमलात आणला, तर आमच्यापेक्षा आनंदी दुसरं कुणीही नसेल. पण या दोन्ही शक्यतांपैकी कोणतीही प्रत्यक्षात येणार नाही असं गृहित धरून आम्ही अटळ संघर्षासाठी सज्ज आहोत… हे राष्ट्रपित्या, भारतीय स्वातंत्र्याच्या या पवित्र युद्धात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहोत.`
बेचाळीसच्या लढ्याने देशभरात वणवा पेटवला होताच. `गांधीबाबा की जय` म्हणत साधा माणूस रस्त्यावर उतरला होता. त्यात नेताजींनी सर्वस्व पणाला लावून देशाच्या सीमेवर स्वातंत्र्याचं अग्निकुंड पेटवलं होतं. अशा धगधगत्या वातावरणात नेताजींचा `फादर ऑफ द नेशन` हा पहिला उद्गार देशाने आपल्या भाळी अभिमानाने धारण केला. तो भारतीयाच्या मनामनात पोचला.
हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
राष्ट्रपिता या शब्दाला घटनात्मक किंवा प्रशासकीय अर्थ नसल्याचं सरकारी उत्तर आताच २०१५ला कुणीतरी माहितीच्या अधिकारातून मिळवलं होतं. राष्ट्रपिता शब्दाला असा सरकारी अर्थ नसणारच. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याला राज्याभिषेक करावा लागत नाही. इतकं गांधीजींना राष्ट्रपिता म्हणणं स्वाभाविक होतं आणि आहे.
नेताजींना गांधीजींविषयी असणारा अपार आदर आणि आस्था या शब्दातून दिसून येते. दोघांचाही पत्रव्यवहार सहज उपलब्ध आहे. त्यातूनही सख्ख्या बापलेकापेक्षाही अधिक जिव्हाळा अनुभवता येतो. कुणालाही असं वाटू शकतं की हे भाषण गांधीजी आणि नेताजींमधल्या मतभेदांच्या आधीचे असतील. पण असं नाहीय. दोघांमधले वाद आणि मतभेद १९३०च्या दशकातले आहेत.
आज नेताजींनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हटलेल्याला बरोबर ७५ वर्षं झालेली असताना, अमृता फडणवीस नरेंद्र मोदींना `फादर ऑफ द कंट्री` म्हणत आहेत. पण बाप एकच असतो आणि या देशाचा बाप एकच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी. अमृता फडणवीसांनी देशाचा नवा बाप शोधला म्हणून नेताजींची पुण्याई इतकी पातळ झालेली नाही की लोक मोदींना राष्ट्रपिता म्हणू लागतील.
हेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी
गांधीजींना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी तितकेच मोठे होते. म्हणून त्या शब्दाला किंमत होते. आज मोदींना देशपिता म्हणणाऱ्या अमृता फडणवीस आहेत. नेताजींशी अमृता फडणवीस यांची तुलना करायची असेल तर त्यांचे ट्विटरवरचे लाळघोटे फॉलोअर करू शकतात.
राष्ट्र हे स्वयंभू असतं. त्याला कुणी पिता नसतो, पती नसतो. असं रकानेच्या रकाने भरून वर्षानुवर्षं लिहिणाऱ्यांचे वारसदार आता स्वतःच ते विसरून गेलेत. स्वातंत्र्याच्या चळवळीत हे राष्ट्र नव्याने घडलंय, हे ते जणू मान्य करत आहेत. आता तर त्यांनाही त्यांचा `घर में घुस के मारनेवाला` नवा इंडिया घडवायचाय. पण ते करताना त्यांना गांधीजींनी घडवलेला भारत संपवावा लागेल. त्यात सगळ्यात मोठा अडथळा खऱ्याखुऱ्या `फादर ऑफ द नेशन` आहे. जगाला पुरून उरलेला हा बाप आपल्या पोराला सहजासहजी मरू देईल, असं वाटतंय?
हेही वाचाः
कस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही
७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?
खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी
(औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनकडून प्रकाशित होणाऱ्या गांधी: माणूस ते महात्मा या पुस्तकातल्या लेखाचा संपादित अंश.)