आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

२२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : १७ मिनिटं


भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रवास 'लेनिन विरुद्ध गांधी' असा सुरू झाला. तो पुढे 'लेनिन आणि गांधी'पर्यंत गेला. आज त्यातला पर्याय शोधायची वेळ आहे. म्हणून आज लेनिन आणि महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी होत असताना भारत आणि जगावरचा लेनिनचा प्रभाव समजून घ्यावा लागेल. २२ एप्रिलला लेनिनच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साप्ताहिक साधनामधे लिहिलेल्या लेखात तो मांडलाय.

मार्क्स- एंगल्स- लेनिन- स्टालिन- माओ अशा मांदियाळीच्या ऐतिहासिक-प्रेरणादायी-आदर्शवादी संस्कारांत पहिली भारतीय (जागतिकसुद्धा) कम्युनिस्ट पिढी वाढली. व्लादिमीर इलिच उलायनॉव लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेल्या बोल्शेविक रशियन कामगारवर्गीय क्रांतीने ब्रिटिश साम्राज्यशाही मुळापासून हादरली होती. खुद्द इंग्लंडमधील प्रचंड मोठा कामगारवर्ग त्या साम्यवादी क्रांतीच्या प्रभावाखाली आला होता.

ब्रिटनमधे ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन’ स्थापन झाली होती. ‘सीपीजीबी’ अशा आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव इंग्लंडमधे कार्यरत असणाऱ्या भारतीयांवरही पडू लागला होता. खुद्द इंग्लंडमधे स्वत:चं सामर्थ्य उभं करण्यासाठी लेबर पार्टी ऊर्फ मजूर पक्षातही रशियन क्रांतीचे पडसाद उमटू लागले होते. ‘फेबियन सोशॅलिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारवंत-कार्यकर्त्यांमधे साक्षात जॉर्ज बर्नार्ड शॉसारखे प्रकांड नाटककारही होते.

हेही वाचा : डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

लोकमान्य टिळक तिथं कसे?

लोकमान्य टिळक १९१९ मधे इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेत शॉ स्वत: व्यासपीठावर होते. ती सभा ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देण्यासाठी’ ब्रिटिश कामगारवर्गाची होती! ‘लोकमान्य टिळक अशा सभेत कसे?’ हा प्रश्न तेव्हा, तसंच आजही अनेकांना पडलेला आहे. परंतु ते तितके आश्चर्यजनक नव्हते, कारण १९१७ मधे लेनिनप्रणीत रशियन क्रांतीला टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार समर्थन दिलं होतं. किंबहुना, म्हणूनच लेनिन यांनी ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या धुरिणांमार्फत ‘हे टिळक कोण?’ अशी विचारणा आत्मीयतेने केलेली होती.

ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षातले टिळक हे एक लोकप्रिय नेते होते. टिळकांना मुंबईच्या गिरणी कामगारांमधे मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. म्हणूनच १९०८ मधे टिळकांना सहा वर्षांची सजा होऊन मंडालेच्या तुरुंगात पाठवले गेले, तेव्हा मुंबईच्या कामगारांनी सहा दिवसांचा संप केला होता. अशा टिळकांचा ब्रिटिनमधील कामगारांनी स्वागत-सन्मान केल्यामुळे इंग्रज राज्यकर्ते सावध झाले होते. खुद्द लेनिनही टिळक या व्यक्तीबाबत इतक्या कुतूहलाने चौकशी करत आहेत, याचा धसका त्यांना वाटणं साहजिकच होतं.

वस्तुत: टिळकांनी मार्क्स-एंगल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला नव्हता. त्या वेळेस ते शक्यही नव्हते. लेनिनचे ‘मार्क्सवादी’ विचारही टिळकांनी अध्ययन केलेले नव्हते. पण लेनिन हे साम्राज्यशाहीच्या विरोधात लढून, क्रांती सिद्ध करू शकले होते. खरं म्हणजे, त्यांच्याच देशाच्या झारच्या साम्राज्यविस्तारशाहीच्या विरोधात कामगारांची बलाढ्य संघटना बांधून भांडवलशाहीला आव्हान देत होतं, इतकं आकलन टिळकांना पुरेसं होतं. त्या निमित्ताने टिळकही भांडवलशाहीच्या विरुद्ध आणि कामगारवर्गाच्या बाजूने उभे राहत होते.

पुढे १९२० मधे झालेल्या ‘आयटक’ ऊर्फ ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’चे उद्‌घाटक म्हणून टिळकांना पाचारण करण्याचेही ठरले होते. त्यांना त्या अधिवेशनाला बोलावण्यात पुढाकार होता तो कम्युनिस्ट कामगारनेत्यांचा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी टिळक आणि लेनिन या दोघांकडून प्रेरणा घेऊन कामगार चळवळीत जीवन झोकून दिले ते त्याच काळात-म्हणजे १९१९ ते १९२१ मधे.

रशियन क्रांतीने अवघ्या दोन वर्षांत इतका प्रचंड प्रभाव अवघ्या युरोपवर प्रस्थापित केला होता. याचं एक मुख्य कारण होतं ते म्हणजे- लेनिनला हे क्रांतीचं लोण प्रथम जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांत न्यायचं होतं. त्या देशांच्या जगभर जेथेजेथे वसाहती होत्या, त्या सर्व वसाहतींमधे तो क्रांतीचा तेजस्वी वणवा पसरवायचा होता. कार्ल मार्क्सच्या ‘जगातल्या तमाम कामगारांनो, एक व्हा- तुम्हाला तुमच्या पायांतील शृंखलांखेरीज गमावण्यासारखे काहीही नाही’, या विचाराला अनुसरून लेनिन यांनी क्रांतीचा तो अश्वमेध सोडायचा निर्धार केला होता. त्या क्रांतीचा आधार असणार होता- प्रत्येक देशातील औद्योगिक कामगारवर्ग. त्यांचं संघटन करण्याचं माध्यम असणार होतं- क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्ष आणि त्या संघटनेची विचारसरणी होती, कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान- त्याचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ उर्फ जाहीरनामा आणि वैचारिक आधार होता त्याच्या ‘द कॅपिटल’ या त्रिखंडी ग्रंथाचा!

गांधीजी आणि लेनिन यांची दीडशेवी जयंती

भारतात १९१५ मधे गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतून आगमन झाले होते. त्यांनी देशभर फिरून इंग्रज राजवटीने केलेल्या लूटमारीचा आणि अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यांचं चंपारण्य आंदोलन १९१७ चं म्हणजे ज्या वर्षी रशियात क्रांती झाली, त्याच वर्षीचं. गांधीजींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ विचाराला आणि संघर्षपद्धतीला त्यापासूनच आकार येऊ लागला होता. गांधीजीही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी लोकांना सिद्ध करत होते. पण त्यांचा विचार आणि मार्ग वेगळा होता.

गांधीजी लेनिनच्या बाजूने नव्हते आणि विरुद्धही नव्हते. त्यांचे मार्ग भिन्न होते. लोकमान्य टिळक आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कॉम्रेड डांगे यांनी त्या काळात ‘गांधी विरुद्ध लेनिन’ अशी पुस्तिका लिहिली. डांगे तेव्हा फक्त २१ वर्षांचे होते!

एका अर्थाने त्या दोघांची ही दीडशेवी जयंती आहे. गांधीजींचा जन्म १८६९ चा दोन ऑक्टोबर. लेनिनचा १८७० चा २२ एप्रिल. म्हणजे गांधीजी लेनिनपेक्षा सात महिन्यांनी वयस्कर. दोघांचा प्रवास म्हटला तर समांतर; पण वैचारिक, राजकीय प्रवास मात्र वेगवेगळा. त्याचं कारण अर्थातच त्यांना प्रत्यक्ष भेडसावणारी तत्कालीन परिस्थिती. गांधीजी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात ‘अहिंसा’ हे शस्त्र घेऊन उभे ठाकले होते. लेनिनचा संघर्ष त्यांच्याच देशातल्या झारशाहीविरुद्धचा होता.

झारशाही म्हणजे सरंजामशाही, रुजवणारी भांडवलशाही आणि विस्तारवादी साम्राज्यशाही. झारचा रशिया पहिल्या महायुद्धात लढत होता. झारशाहीचे सैन्य थेट युद्धात होते. रशियातील भल्या मोठ्या कारखान्यांमधील कामगार अतिशय कष्टाचे, अल्प वतनाचे उपेक्षित जीवन जगत होते. रशियाचा औद्योगिक पाया बऱ्यापैकी रुजला असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी होती, तरीही कृषिक्षेत्र मोठे होते आणि शेतकरी मोठ्या संख्येने होते.

कार्ल मार्क्सच्या सिद्धान्तानुसार भविष्यकालीन समाज हा औद्योगिक कामगारांच्या राजकीय-आर्थिक नेतृत्वाखाली उभा राहणार होता. म्हणून बलाढ्य आणि द्रष्टा असा संघटित कामगारवर्ग आणि त्यांचा नेता असणं आवश्यक होतं. लेनिनने स्वत:ला त्या भूमिकेत पाहिलं होतं. रशियन सैन्य मोठे होते, बऱ्यापैकी शस्त्रास्त्रसज्ज होते. ते सैन्य मुख्यत: शेतकरी आणि कामगारवर्गातून आलेले होते. त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, सशस्त्र संघटनांचं जाळं विणणं आणि त्यांना मार्क्स-लेनिनवादी चौकटीत आणणं शक्य होतं.

हेही वाचा : सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला

 

‘वॉट इज टू बी डन’

गांधीजींभोवती अगदी वेगळी स्थिती होती. त्यांनी भारतभर दौरा केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सुमारे ८०-८५ टक्के समाज ग्रामीण होता. शेतीवर अवलंबून होता. कमालीचा दरिद्री होता. दोन वेळा जेवायची भ्रांत होती. कारखाने आणि त्या अनुषंगाने येणारे व्यवसाय नव्हते. ‘कामगारवर्ग’ म्हणून संबोधता येईल अशांची संख्या अत्यल्प आणि तीही मुख्यत: मुंबई, कलकत्तासारख्या शहरांमधे.

म्हणजेच सामाजिक दृष्टिकोनातून रशिया आणि भारत यांची तुलना अशक्यच होती. गांधीजींसमोर अतिशय बलाढ्य असे शस्त्रसुसज्ज ब्रिटिश साम्राज्य होते आणि भारतातील बहुतेक लोक नि:शस्त्र आणि दरिद्री. वर म्हटल्याप्रमाणे पहिलं महायुद्ध सुरू असतानाच लेनिन क्रांती करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे समाजात शस्त्रं उपलब्ध होती.

लेनिन आणि गांधीजींच्या राजकीय प्रवासातही बराच फरक आहे. लेनिन विद्यार्थी चळवळीपासूनच राजकारणात होते. त्यांचे भाऊ तर क्रांतिकारकांच्या गटात होते. झारच्या पोलिसांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून पकडलं होतं आणि १८८७ मधे फासावर चढवलं होतं. लेनिन तेव्हा सतरा वर्षांचे होते. एका अर्थाने असंही म्हणता येईल की, लेनिन यांनी ती जुलमी राजवट उलथवून टाकण्याचा विडाच तेव्हा उचलला.

परंतु नुसती जिद्द, विचारसरणी आणि लढाऊपणा असून चालत नाही; तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटनाही असावी लागते, हे ओळखून लेनिन यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यातूनच मार्क्सवादी विचारावर आधारित ‘रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी’चा (आरएसडीएलपी) जन्म झाला. पुढे या पक्षातही मवाळ आणि जहाल गट तयार झाले. मवाळ म्हणजे मेन्शेविक आणि जहाल म्हणजे बोल्शेविक. लेनिन अर्थातच बोल्शेविक क्रांतिकारक संघटनेचे. क्रांतीच्या आधीच्या वर्षी १९१६ मधे लेनिन यांनी ‘वॉट इज टू बी डन’ ही छोटेखानी पुस्तिका लिहिली होती. ती पुढे कित्येक वर्षे जगभतल्या कम्युनिस्ट तरुणांची मार्गदर्शक पुस्तिका झाली.

भारत आणि रशियातली परिस्थिती वेगळी तरीही

विद्यार्थी चळवळ, युवा चळवळ, कामगार चळवळ अशा कोणत्याच प्रकारच्या सामाजिक-राजकीय प्रक्रियेत गांधीजी नव्हते. ते वकिली करू लागल्यावर लंडनमधेही थेट राजकारणात नव्हते. खरं म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतर त्यांना जेव्हा वांशिक विद्वेषाचा पहिला अनुभव आला आणि जेव्हा त्यांनी तेथील भारतीयांना मिळणारी ‘दुय्यम’ आणि ‘अपमानकारक’ वागणूक पाहिली; तेव्हा ते गौरवर्णीयांच्या वांशिक राजवटीविरुद्ध लढायला सिद्ध होऊ लागले.

म्हणजे, गांधीजींचा राजकारणप्रवेश १८९३ नंतरचा आणि तोही दक्षिण आफ्रिकेत. याउलट, लेनिनने १८८७ नंतरच क्रांतिकारक राजकारणात उडी मारली होती. शिवाय झारशाहीचा रशियन लोकांवर होणारा जुलूम आणि ब्रिटिशांनी भारताची बनवलेली वसाहत आणि त्यामार्फत तिची होणारी लूट या वास्तव परिस्थितीतही खूप फरक होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातही भिन्नता होतीच.

लेनिन यांच्या राजकारणाचा परिसरच अतिशय हिंसक आणि स्फोटक होता. त्यांना १८९५ मधेच झारशाहीने ‘तडीपार’ करून सैबेरियाला पाठवले होते. रशियाचे सैबेरिया म्हणजे आपले अंदमान. पण फरक हा की, सैबेरियात उणे ४० ते उणे ६० इतकी उग्र आणि भीषण बर्फाळ थंडी; याउलट अंदमान हा उष्ण प्रदेश! समान धागा इतकाच की, कैद्याला ‘काळ्या पाण्या’ची वा ‘पांढऱ्या बर्फा’ची शिक्षा’!

या काळातच लेनिन यांना त्यांची मैत्रीण आणि पुढे झालेली सहचारिणी भेटली- क्रुपस्काया. क्रुपस्कायांनी लेनिनची अखेरपर्यंत म्हणजे अगदी १९२४ पर्यंत साथ दिली. म्हणजे संघटना बांधण्यात, क्रांतीमधे, सत्ता स्थापन केल्यानंतर सत्ताव्यवहारात वगैरे.

गांधीजींबरोबर कस्तुरबाही दीर्घ काळ होत्या; पण त्या गांधीजींच्या अनुयायी, स्वयंसेवक आणि पतिव्रता पत्नी होत्या. याउलट, क्रुपस्काया या लेनिन यांच्या कॉम्रेड होत्या. कस्तुरबा गांधींचा मृत्यू १९४४ मधे झाला. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर तीन वर्षे आणि गांधी हत्येपूर्वी चार वर्षे! क्रुपस्काया मात्र लेनिनच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी म्हणजे १९३९ मधे मरण पावल्या.

तर दोन्ही देशांच्या इतिहासाला वेगळं वळण

मृत्यूसमयी लेनिन फक्त ५४ वर्षांचे होते. गांधीजींची हत्या झाली, तेव्हा त्यांचं वय ७९ वर्षांचे होतं. लेनिन यांना क्रांती यशस्वी झाल्याचं आणि बोल्शेविक सत्ता प्रस्थापित झाल्याचं पाहता आलं. क्रांतीनंतर सात वर्षांनी, १९२४ मधे त्यांचे देहावसान झाले. गांधीजींना स्वातंत्र्य मिळाल्याचे पाहायला मिळाले, पण देशाची फाळणीही आणि प्रचंड हिंसाचार पाहावा लागला. स्वातंत्र्यानंतर साडेपाच महिन्यांनी, ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या झाली.

लेनिन यांना सत्तेची घडी बऱ्याच अंशी बसवता आली. कारण १९१७ ते १९२४ अशी सात वर्षे त्यांना मिळाली. केवळ सत्ताच नाही तर पक्षबांधणीही करून सत्तेला पक्षाची घट्ट चौकटही देता आली. गांधीजी मात्र स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक झाल्याचंही पाहू शकले नाहीत. फक्त त्यांच्या स्पष्ट आणि आग्रही सूचनेमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्याने ते नवभारताचे घटना शिल्पकार झाले.

लेनिन यांना तसं अल्प आयुष्यच लाभले, असे म्हणावे लागेल. वय फक्त ५४ वर्षे. जर त्यांनाही किमान १५-२० वर्षे अधिक मिळाली असती, तर कदाचित रशियाचा क्रांतीनंतरचा इतिहास बराच वेगळा झाला असता. त्याचप्रमाणे गांधीजींची हत्या झाली नसती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सव्वाशे वर्षे जगले असते, तर भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासालाही वेगळे वळण मिळालं असतं.

वारसदाराची गोष्ट

गांधीजींनी आपणहून पंडित जवाहरलाल नेहरूंना आपला वारस केलं होतं. लेनिन यांनी तितक्या स्पष्टपणे स्टालिन यांना सत्तेचे वाटप केलं नसलं, तरी लेनिन यांच्यापुढे मुख्यत: स्टालिन आणि ट्रॉट्‌स्की ही दोनच नावं होती.

स्टालिन पुढे रशियाचा जवळजवळ तीस वर्षे सर्वेसर्वा होता. हिटलरच्या नाझी भस्मासुराला खरोखरच भस्मवत्‌ केलं गेलं ते स्टालिनच्या नेतृत्वाखालीच. तुलनेने इंग्लंड-जर्मनी-फ्रान्सच्या तुलनेत एक अप्रगत देश औद्योगिक दृष्ट्या आणि समर्थ अमेरिकेला आव्हान देऊ शकला, ती सिद्धता स्टालिनच्या काळातच झाली.

पण बहुतेक इतिहासकारांना (रशियातल्यासुद्धा) वाटतं की, लेनिन यांनी घालून दिलेली अनेक सूत्रं आणि मूल्यं पायदळी तुडवली गेली आणि स्टालिनला जगाने एक खलनायक ठरवलं. स्टालिनच्या काळात क्रौर्याने परिसीमा गाठली. विज्ञान-तंत्रज्ञान-सामर्थ्य यात देश पुढे गेला. पण मानवी मूल्यं आणि लोकशाही तत्त्वं पायदळी तुडवली गेली.

काही इतिहासकारांच्या मते, लेनिन दीर्घ काळ हयात असते, तर असं झालं नसतं. कुणी सांगावं, मग हिटलरचाही जर्मनीत उदय झाला नसता. स्टालिनने १९२४ मधे रशियाची सूत्रे हाती घेऊन ज्या झपाट्याने औद्योगिक आणि वैज्ञानिक विकास सुरू केला, त्याला आव्हान देण्यासाठीच जर्मनीत हिटलरला पाठिंबा मिळाला, असं मानणारा एक पंथ आहे. अनेक जण तर स्टालिन आणि हिटलर या दोघांना एकाच मापाने मोजतात. अर्थातच हे त्यांचे माप बऱ्याच अंशी अनैतिहासिक आहे.असो. मुद्दा हा की, लेनिन यांच्या निधनाने रशिया वेगळ्या वळणावर आला.

लेनिन यांना त्यांचे टीकाकारही विसाव्या शतकाचे एक शिल्पकार किंवा सर्जनशील क्रांतिकारक किंवा एक युगपुरुष मानतात. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाला आकार, रूप आणि एक प्रभावी साधन बनवणारा शिल्पकार मानतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

मार्क्सिझम-लेनिनिझम असा जोड उल्लेख का करतात?

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे १९१७ ते १९५७ ही पहिली सुमारे चाळीस वर्षे जगातले सर्व कम्युनिस्ट ‘मार्क्सिझम-लेनिनिझम’ असा जोड उल्लेख करीत असत. आपल्याकडचे काही नक्षलवादी त्यांची ओळख सीआयपी-एमएल ऊर्फ कम्युनिस्ट पक्ष-मार्क्स-लेनिनवादी असाच करतात. असा जोडउल्लेख करण्याचं काय कारण असावं?

कार्ल मार्क्सचं निधन १८८३ मधे झालं, तेव्हा लेनिनचं वय तेरा वर्षांचं होतं. त्यांची भेट होण्याचा प्रश्नच नव्हता. मार्क्सचं सर्व लेखन जर्मन भाषेत होते. लेनिन यांना जर्मन भाषा अवगत होती. पण मार्क्सचं सर्व साहित्य तेव्हा सहज उपलब्धही नव्हतं. लेनिन भाषाप्रभू होतेच, महाविद्यालयात नेहमी प्रथम वर्गात प्रथम स्थानी असत.

जगाचा इतिहास-विशेषत: अर्वाचीन जगाचा- हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. जग जरी अनेक राष्ट्रांमधे विभागलं गेलं असलं, तरी देशा-देशांत तणाव-संघर्ष-युद्ध होत असलं तरी वस्तुत: अवघ्या जगाला जोडलं ते श्रमाच्या म्हणजेच श्रमिकांच्या माध्यमातून! संपत्ती निर्माण करून संस्कृती आणि सभ्यतेचा इतिहास निर्माण होतो, तो या कामगार कष्टकऱ्यांनी दिलेल्या अन्यायाच्या, विषमतेच्या, पिळवणुकीच्या विरोधातील वर्गसंघर्षातून. उद्याचं समाजवादी जग निर्माण करण्याची; अवघ्या मानवाला मुक्त, सुखी आणि सुसंस्कृत करण्याची जबाबदारी त्यामुळे या कामगारवर्गावर आहे, अशी सूत्ररूपी मांडणी मार्क्सने केली असली, तरी प्रत्यक्ष क्रांती करून त्या कामगारवर्गाला सत्ता प्राप्त करून कशी द्यायची आणि ती सत्ता आल्यावर प्रत्यक्षात अंमल कसा करायचा, याबद्दल मार्क्सचे मार्गदर्शन नव्हते.

पॅरिसमधे १८७१ मधे झालेल्या कामगारांच्या उठावात जरी तेथे शासनसत्ता प्रस्थापित करता आली, तरी त्या पॅरिस कम्युनला पूर्णत: कत्तलीच्या आधारे नामोहरम केलं गेलं होतं. म्हणजेच क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिक्रांती दबा धरून बसलेली असते. तो वर्गसंघर्षाचाच एक अपरिहार्य भाग आहे.

लेनिनचं श्रेष्ठत्व त्यातच आहे की, १९०५ नंतर लेनिन या प्रतिक्रांतिकारक शक्तींशी सतत बारा वर्षे संघर्ष करीत राहिले. कधी ज्ञानाच्या आधारे तर कधी संघटनेच्या मदतीने, कधी गनिमीकाव्याने तर कधी थेट भांडवली सत्तेच्या गंडस्थळावर हल्ला करून.

भांडवली झारशाहीला संसदीय आणि सशस्त्र आव्हान देताना, लेनिन यांना स्वयंघोषित बुद्धिवाद्यांशी, विद्वानांशी आणि तत्त्वचिंतकांशीही लढावं लागलं. ती लढाई झाल्यामुळेच मार्क्सवादी चिंतनात आणि व्यवहारात मोलाची भर पडली. सुमारे साठ खंडांमधे लेनिन यांची भाषणं, लेख, ग्रंथ संग्रहित केले आहेत. त्यातील मूलभूत चिंतन पाहून आजही अनेक स्वयंभू बुद्धिवाद्यांची प्रज्ञा पणाला लागते.

हत्या करणाऱ्याचा भारतातच होतो गौरव

लेनिनची क्रांती सशस्त्र होती, हिंसक होती. मार्क्सच्या सिद्धान्तांचा धसका घेतलेल्या भांडवलदारांनी आणि त्यांच्या सत्ताधीश प्रतिनिधींनी क्रांतीच्या अगोदर काही वर्षे लेनिनच्या मागे गुप्तहेरांचा ससेमिरा लावला होता. ‘व्हाईट रशियन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही हिंसक गटांनी बोल्शेविक क्रांतिकारकांवर घोर हल्ले केले होते.

अशाच एका हल्ल्यात लेनिन जखमी झाले होते. जखम जिव्हारी होती. लेनिन वाचले, पण ती जखम पूर्णत: कधीच बरी झाली नाही. अखेरीस त्यांचा प्राण गेला, तेव्हा तेथील डॉक्टरांच्या मते ती पूर्ण न भरलेली जखमच निमित्त झाली होती.

गांधीजींना मात्र थेट गोळ्या मारून नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. आज रशियात लेनिनप्रणीत कम्युनिस्ट राजवट नाही. सुमारे तीस वर्षांपूर्वी सोविएट युनियनचं विघटनही झालं. परंतु रशियात कुणीही लेनिनवर हल्ला करणाऱ्यांचा गौरव करत नाही. अमेरिकेतही अब्राहम लिंकनची हत्या करणाऱ्याला कुणी देशभक्त म्हणून संबोधत नाही, की त्याची जयंती-पुण्यतिथी करत नाही. भारतात मात्र नथुरामचे पुतळे उभारले जात आहेत आणि त्याला राष्ट्रभक्त म्हणूनही संघपरिवार संबोधतो आहे.

हेही वाचा : आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये

झारच्या अस्ताची सुरवात

रशियन क्रांतीचा इतिहास आणि त्यातील लेनिन या महानायकाच्या नेतृत्वाची विलक्षण सर्जनशील भूमिका एका लेखात सांगणं केवळ अशक्य आहे. प्रचंड खळबळ, अफाट असंतोष, सतत उलथापालथींच्या येत असलेल्या लाटा असं दीर्घ काळ सुरू होतं. झारशाही दोलायमान अवस्थेत होती. विशेषत: १९०५ मधे जपानने रशियाचा नाविक युद्धातही पराभव केला, तेव्हापासून झारशाही डळमळायला लागली होती. झारच्या सैन्यातही असंतोेष दिसू लागला होता.

काही सैनिक बंडखोरीच्या विचारात होते आणि मेन्शेविक वा बोल्शेविक हे समाजवाद्यांशी संपर्क साधू लागले होते. युद्धामुळे महागाई, टंचाई, अर्थव्यवस्थेची एकूण दुर्दशा हे सर्व अराजकी स्थितीला उत्तेजन देत होते. या पार्श्वभूमीवर १९०५ चे बंड झाले, पण ते फसले. एका अर्थाने ती रंगीत तालीम होती- भविष्यात होणाऱ्या क्रांतीची. या सर्व काळात लेनिन मुख्यत: स्वित्झर्लंडमधे असे. जर्मनी आणि एकूण युरोपातही तो संपर्क प्रस्थापित करीत असे. ठिकठिकाणचे बंडखोर विचारवंत, मार्क्सवादी तरुण आणि लढाऊ कामगार संघटना यांना एका साखळीत आणण्याचे लेनिनचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीतच युरोपवर पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते.

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले १९१४ मधे. अगोदरच क्षीण आणि उद्‌ध्वस्त स्थिती आणि त्यात आलेले युद्धाचे ओझे, यामुळे परिस्थिती झारच्या नियंत्रणाबाहेर जात होती. त्यातून रशियन सैन्याला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागत होतं. सैन्याला युद्ध नको होते; पण आज्ञेचे गुलाम असल्याने निरिच्छेने का होईना, पण युद्धात सामील होत होते.

हा असंतोष आणि अराजक उफाळून आले जानेवारी-फेब्रुवारी १९१७ मधे. पहिले महायुद्ध मध्यावर आले असताना. सैन्यामधील अस्वस्थता आणि समाजातील असंतोष एकत्र येऊन एक ठिणगी पडली आणि रशियाच्या त्या वेळच्या झारप्रणीत राजधानीत म्हणजे पेट्रोग्राडमधे लोक उठाव करून राजवाड्यावर गेले. तसा हा उठाय निर्नायकी होता. निकोलस झारचे धाबे दणाणले. त्याला राजवाडा सोडावा लागला.

बंडखोरांनी त्याच्या कुटुंबाचा पाठलाग केला. ही फेब्रुवारीत झालेली ‘पहिली क्रांती’. त्या क्रांतीतून एक ‘हंगामी’ सरकार पुढे आले. महिन्या-दोन महिन्यांत ते हंगामी सरकारही गडगडले आणि दुसरी फेब्रुवारी क्रांती झाली. या क्रांतीला मेन्शेविकांनी पाठिंबा दिला. पण बोल्शेविकांच्या मते, हे मेन्शेविकपुरस्कृत सरकार म्हणजे निम्न-भांडवली सरकार होते.

लेनिनला अभिप्रेत होती कामगारवर्गीय क्रांती आणि भांडवली व्यवस्थेचे पूर्ण निर्मूलन!लेनिन या वेळीही पेट्रोग्राडमधे नव्हते. पहिली महायुद्ध सुरूच होते. बहुसंख्य सैनिकांना केव्हा एकदा युद्ध संपते, असे झाले होते. लेनिन तेव्हा फिनलँडमधून जर्मनीच्या मदतीने पेट्रोग्राडला गुप्तपणे पोचले. म्हणजेच, रशियन क्रांतीच्या महानायकाला जर्मनीची मदत होत होती. लेनिन पेट्रोग्राडला पोचल्यानंतर त्यांनी बोल्शेविक कम्युनिस्ट पार्टीच्या, मुख्य कार्यकारिणीची बैठक बोलावली.

क्रांतीची हीच ती वेळ

हीच वेळ आहे ‘हंगामी’ सरकार उलथवून टाकून क्रांती यशस्वी करण्याची, असे लेनिनचे मत होते. केरेन्स्की या मध्यममार्गी व्यक्तीकडे त्या सरकारची सूत्रे होती. असे बंडाचे (क्रांतीचे) प्रयत्न सुरू आहेत, याची कल्पना केरेन्स्की यांना होती. त्यांनीही बंड मोडून काढण्याची जय्यत तयारी केली होती. त्या यादवीत मोठ्या हत्याकांडाची शक्यता होती.

त्यामुळे लेनिनच्या पक्षातही आताच हे क्रांतीचे निशाण फडकवावे का, याबद्दल तीव्र मतभेद होते; पण लेनिन यांनी मतभेद व्यक्त करणाऱ्यांना धुडकावून लावून २५ ऑक्टोबर ही तारीख सर्वंकष बंडासाठी मुक्रर केली. युरोपियन कॅलेंडरनुसार ७ नोव्हेंबर. लेनिन यांच्या मते, सर्व ‘ऑब्जेक्टिव कंडिशन्स’ क्रांतीला पूरक होत्या.

कम्युनिस्ट मंडळींमधे ‘ऑब्जेक्टिव कंडिशन्स’ या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे, म्हणजे वास्तवाचे अचूक भान. लेनिन यांना ते होतं. पक्षाच्या कार्यकारिणीत बहुतेकांना नव्हते. लेनिन यांनी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २५ ऑक्टोबरच्या पहाटे ठिकठिकाणी सज्ज केलेल्या क्रांतिकारकांना आदेश दिला की, आता हल्ला करा; विजय आपलाच आहे. काही तासांतच प्रस्थापित केरेन्स्की सरकार आणि सर्व मेन्शेविक नामोहरम झाले. क्रांती यशस्वी झाली आणि जगाच्या इतिहासातलं नवं पर्व सुरू झालं.

जगातली पहिलीवहिली कामगारवर्गाची क्रांती आणि सत्तास्थापना आणि लेनिनच अभूतपूर्व नेतृत्व आणि विचार यांचं वर्णन एखाद्या लेखात करणं शक्य नाही. इतिहासकारांनी त्यावर खंडच्या खंड लिहिले आहेत आणि अजूनही त्याबद्दलची चर्चा सुरूच आहे!

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की,

लेनिन या ऐतिहासिक युगपुरुषाचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा ज्यांना मिळाली, त्यांनाच गांधीजींबद्दलही तितकंच खरं म्हणजे अधिक आकर्षण आणि आदरभावना वाटत आलीय. त्यापैकी एक महत्त्वाचे प्रकांड लेखक, पत्रकार म्हणजे लुई फिशर. फिशर यांनी लेनिनचं चरित्र लिहिलं आणि महात्मा गांधींचंही! त्यांच्या गांधीचरित्राचं अप्रतिम भाषांतर नुकतंच ‘साधना’तर्फे प्रसिद्ध झालंय. भाषांतरकार वि. रा. जोगळेकर हे स्वत: ज्येष्ठ गांधीवादी आहेत.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी कॉम्रेड डांगेंनी ‘गांधी विरुद्ध लेनिन’ ही वैचारिक पुस्तिका लिहिली होती; परंतु प्रत्यक्षात कॉम्रेड डांगे यांनी त्यांच्या उर्वरित जीवनात जे राजकारण केलं, ते मात्र गांधी आणि लेनिन यांच्यात समन्वय प्रस्थापित करणारं होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट कॉम्रेड बी. टी. रणदिवे हे १९३० नंतर दीर्घ काळ गांधीजींच्या विरोधात होते. पण अखेरीस त्यांनी आपण गांधीजींचं चुकीचं मापन केलं, असं स्पष्टपणे सांगून गांधीजींना ‘नैतिकतेचा सेनानी आणि क्रांतिकारक’ म्हणजेच मॉरल रिव्होल्युशनरी-क्रुसेडर असं म्हटलं. कॉम्रेड डांगेंनी तर मार्क्स-लेनिन आणि महात्मा गांधी-पंडित नेहरू यांना सर्जनशील आणि प्रगत राजकारणाच्या मांदियाळीत जोडून घेतलं.

ही मांदियाळी म्हणजे मानवी इतिहासाचा मानदंड

या लेखाच्या सुरुवातीस मार्क्स-एंगल्स-लेनिन-स्टालिन-माओ अशी कम्युनिस्ट परंपरेतली मांदियाळी दिलेली आहे, परंतु आता त्यात खूपच बदल झालाय. बहुतेक नक्षलवादी गट आता स्वत:ला माओवादी मानतात. (मार्क्स-लेनिनवादासोबत) दोन्ही अधिकृत भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी माओंचा हात सोडलाय.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्टालिनला पूर्ण सोडलंय. स्पेनमधल्या एका कम्युनिस्ट पक्षाने लेनिनलाही सोडून स्वतःला फक्त ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ म्हटलंय. खुद्द रशियात आज लेनिन आणि स्टॅलिन दोघांना बऱ्याच अंशी ‘इतिहासजमा’ केलंय- कम्युनिस्ट पक्षासकट! पूर्व युरोपातील जवळजवळ सर्व कम्युनिस्ट पक्ष आता तेथील प्रस्थापित राजकारणाबाहेर फेकले गेले आहेत.

चीनमधे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे, पण माओंचे महत्त्व आता केवळ माओंचा मृतदेह स्मारक म्हणून जपला आहे, इतकंच उरलंय. जसं रशियात लेनिनही तशाच शवपेटीत स्मारक म्हणून जपलाय. क्युबात मात्र अजून मार्क्स-लेनिन तळपत आहेत. ज्या मांदियाळीने केवळ एकोणिसावं शतकच नव्हे तर विसावं आणि एकविसावं शतक घडवलं, ती मांदियाळी अशी सहज पुसली जाणार नाही. प्रदीर्घ मानवी इतिहासाचे ते मानदंड आणि दीपस्तंभ आहेत!

हेही वाचा :

 

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री