प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
‘देवाला रिटायर करा’ अशी ठाम भूमिका घेणारे भारतीय रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचा आज बड्डे. वयाची नव्वदी पार केलेल्या लागूंनी‘नटसम्राट’ नाटकातली अप्पा बेलवलकरांची भूमिका अजरामकर केली. ‘कुणी घर देता का घर’हा लागूंच्या थरथरत्या आवाजातला संवाद मराठी मनात कायमचा कोरला गेलाय. मराठी, हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे लागू रमले मात्र नाटकामधेच.
मेडिकलचं शिक्षण घेतलेल्या लागूंनी डॉक्टरकीत चांगला जम बसत असतानाच केवळ नाटकाच्या नादापायी रंगकर्मी म्हणून पेशा निवडला. वसंत कानेटकरांच्या इथे ओशाळला मृत्यूने त्यांनी आपली नाट्य कारकीर्द सुरू केली. चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आर्थिक तंगीमुळं होणारी सहेसोलपट दूर व्हावी म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीसारखा उपक्रम राबवण्यासाठी डॉ. लागूंनी पुढाकार घेतला. ‘सामना’, ‘सिंहासन’ सिनेमातली त्यांची भूमिका चांगलीच गाजली. ‘लमाण’ हे डॉ. लागूंचं आत्मचरित्र मराठीतलं मस्ट रीड पुस्तक म्हणून ओळखलं जातं. रोजच्या जगण्यात खटकणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर थेट, परखड भूमिका मांडणारा लेख म्हणून त्यांची ओळख आहे.
लेखक, समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक, प्राध्यापक आणि लोकप्रिय वक्ते म्हणून महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा भक्कमपणे पुढे नेणारे निर्मलकुमार फडकुले यांचा आज ९०वा जन्मदिन. त्यांचे वडील जिनदासशास्त्री हे जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक होते. निर्मलकुमारांनी तो व्यासंगाचा वारसा अधिक व्यापक केला. लोकहितवादीवरचा त्यांचा डॉक्टरेट प्रबंध गाजला. संतसाहित्याच्या अभ्यासाच्या नव्या वाटा त्यांनी तयार केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी शेकडो व्याख्यानं दिली. आधुनिक साहित्याचीही त्यांनी आस्वादक समीक्षा केली. सोलापूर साहित्य संमेलनात त्यांना अध्यक्ष होता आलं नाही. पण सोलापुरातलं नाट्यगृह आणि पुण्यातलं प्रतिष्ठान त्यांचा परिचय नव्या पिढीला करून देत आहेत.
मीनाक्षी शेषाद्री पन्नाशीतही कशी स्लीम आणि सुंदर आहे, याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतातच. आज तिच्या ५५व्या वाढदिवशी त्या फॉरवर्ड झाल्या तर आश्चर्य नाही. तिच्या या सौंदर्याच्या चर्चा ती सतराव्या वर्षी मिस इंडिया बनली तेव्हापासूनच आहेत. ती तामिळ असली तरी तिचा जन्म झारखंडचा. त्यामुळे ती इतर तामिळ हिरॉइनींसारखी साऊथच्या सिनेमांमधून हिंदीत आली नाही. सुभाष घईंचा हिरो या तिच्या दुसऱ्याच सिनेमाने तिला रातोरात स्टार बनवलं. ती उत्तम डान्सर होती. अभिनयही चांगला करायची. दिसायचीही नाजूक छान. त्यामुळे ती तिच्या काळातली एक हायेस्ट पेड हिरोईन होती. राजेश खन्ना ते गोविंदा अशा तीन पिढ्यांच्या हिरोची ती हिरोईन होती. बेवफाई, मेरी जंग, शहेनशाह, घायल, घातक असे तिचे सिनेमे सुपरहिट झाले. पण तिचा अभिनय चमकला तो स्वाती, आवारगी, दहलीज या सिनेमांतून. दामिनी ही तिची ओळख बनली. यश मिळत असतानाच ती लग्न करून अमेरिकेला गेली. तिथे तिने शास्त्रीय नृत्यासाठी स्वतःला वाहून घेतलंय.
शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींच्या माध्यमातून जगामधे शांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं आजच्या दिवशीच संयुक्त राष्ट्रानं युनेस्कोची स्थापना केली. पॅरिसमधे मुख्यालय असलेल्या युनेस्कोची जगभरात ५० हून अधिक कार्यालयं आहेत. सध्या भारतात युनेस्कोचं नाव एका भलत्याच कारणासाठी चर्चेत येतंय. युनेस्कोनं‘जन गण मन’ला जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत, नरेंद्र मोदींना जगातले सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून जाहीर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून फिरवल्या जातात. परंतु युनेस्कोची स्थापना जगातल्या सर्वोत्तम संस्था निवडण्यासाठी नाही तर जागतिक वारसास्थळं जाहीर करून त्यांचं जपणुकीसाठी झालीय. युनेस्को ही संयुक्त राष्ट्राची सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून काम करते.
नव्वदच्या दशकाच्या सुरवातीलाच जगातला सगळा संघर्ष हा दोन सभ्यता, संस्कृतींमधला संघर्ष असल्याची मांडणी केली जाऊ लागली. दहशतवाद, कट्टरतावाद, टोकाचा राष्ट्रवाद यातून सुटका होत नाहीत तोवर ही नवीच मांडणी समोर आल्यानं अख्ख्या जगात खळबळ उडाली. मग हा सगळा संघर्ष मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू झाले. या सगळ्यांचा एक भाग म्हणून आजच्याच दिवशी १९९५ मधे पहिल्यांदा जागतिक सहनशीलता दिवस साजरा करण्यात आला.
संस्कृती आणि लोकांमधली परस्पर समंजपणा वाढवून सहिष्णुतेला बळ देण्याच्या उद्देशानं युनेस्कोतर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. हा हेतूच संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातही मांडण्यात आलाय. गेल्या काही वर्षांत भारतामधे असहिष्णुतेचा मुद्दा नव्यानं चर्चेत आलाय. मानवी जीवनमुल्यांनाच आव्हान निर्माण झालंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सहनशीलता दिवसाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय.