स्टीव जॉब्ज आणि त्याच्या अॅपलने खूप लहानमोठ्या क्रांत्या केल्या. त्यातली एक होती आयपॉड. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबर २००१ ला आयपॉडचं पहिलं वर्जन लाँच झालं. त्यानंतर या आयपॉडने फक्त टेक्नॉलॉजीच नाही तर संगीत इंडस्ट्रीचंही व्याकरण बदलून टाकलं.
आजपासून बरोबर १७ वर्षांपूर्वी अॅपलने आयपॉड लाँच केलं. तंत्रज्ञान आणि संगीत क्षेत्राच्या इतिहासातला हा एक मैलाचा दगड अन या दोन्हींमधे क्रांतिकारक बदल घडवून आणणारा हा अत्यंत महत्वाचा शोध.
अॅपलने लाँच केलेलं पहिलं आयपॉड, आयपॉड क्लासिक जेमतेम ४x२ इंच आकाराचं होतं अन या चपट्या उपकरणामधे तब्बल १००० गाणी साठवता यायची. सर्वसामान्य माणसाला त्याचा जवळपास सर्व संगीतसंग्रह आयपॉड नावाच्या चपट्या डबीत ठेवून सतत सोबत बाळगणं आणि कुठेही कधीही कोणतंही गाणं किंवा संगीत ऐकू शकणं हे आयपॉडमुळे शक्य झालं.
अर्थात आयपॉड हा काही जगातला पहिला खिशात मावणारा डिजिटल म्युझिक प्लेयर नव्हता. इतर काही कंपन्यांनी छोटे डिजिटल म्युझिक प्लेयर बाजारात आणले होते. पण त्यांची गाणी साठवण्याची क्षमता खूप मर्यादित होती. त्यांच्यावर गाणी ट्रान्सफर करण्याची पद्धत फारच किचकट होती. त्यामुळे ते फारसे लोकप्रिय झाले नव्हते. स्टीव जॉब्ज याची कल्पना आणि व्यक्तिगत नेतृत्वामुळे अॅपलने आहे त्या तंत्रज्ञानाच्या डिझाइन आणि युझेबिलिटी मधे आमूलाग्र बदल करून आयपॉडची निर्मिती केली.
चपटं, खिशात मावू शकेल असं देखणं उपकरण. त्यावर अनेक वेगवेगळी बटणं न देता एक छोटीशी गोल तबकडी. त्यावर असलेली फक्त चार बटणं. हे पहिल्या आयपॉड चं स्वरुप होतं. शिवाय अॅपलने आपल्याच आयट्यून्स ह्या सॉफ्टवेअरमधली गाणी ऑटोमॅटिकली सिंक करण्याची सोय आयपॉडमधे दिली होती. ह्या दोन गोष्टींमुळे कोणतीही तांत्रिक माहिती नसलेल्या सर्वसामान्य ग्राहकाला डिजिटल म्युझिक वापरणं आणि ते सतत आपल्यासोबत ठेवणं सहज शक्य होऊ लागलं आणि अर्थातच त्यामुळे आयपॉड अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं!
आयपॉड चा सगळ्यांत मोठा आणि थेट परिणाम हा संगीतक्षेत्राच्या बाजारपेठेवर झाला. आयपॉड येण्याआधी गाण्यांचे अल्बम्स हे सीडी आणि त्याआधी कॅसेटच्या स्वरुपात असायचे. लोकप्रिय अल्बमच्या लाखो सीडी आणि कॅसेट जगभरात विकल्या जायच्या. आयपॉड आणि त्यानंतर आलेल्या डिजिटल म्युझिक प्लेयरमुळे जगभरातली संगीताची अब्जावधींची बाजारपेठ साफ कोसळली. काहीच वर्षांमधे जवळपास बंद पडली.
सीडीना पर्याय म्हणून अॅपल ने स्वतःची आयट्यून्सची बाजारपेठ सुरू केली. त्या बाजारपेठेतून आख्खा अल्बम विकत घेण्याऐवजी फक्त एक सुटं गाणं विकत घेता येणं शक्य होऊ लागलं. याचा एक परिणाम म्हणजे फक्त मोठे ब्रँड आणि मोठ्या कंपन्यांनीच आपले अल्बम काढण्याऐवजी जगातल्या कोणालाही आपली गाणी, आपलं संगीत तयार करून ते आयट्यून्स वर विकता येणं शक्य झालं. संगीत निर्माण करणं आणि ते जगभरात वितरित करणं हा खूप मोठ्या गुंतवणुकीचा खेळ न रहाता त्याचं लोकशाहीकरण झालं. अर्थात यामधे आयपॉड इतकाच त्याच सुमारास सुरु झालेल्या यूट्यूबचंही मोठं योगदान आहे.
पॉडकास्टिंग आणि पुढे ऑडियो बूक हा आयपॉडमुळे आलेला एक महत्वाचा बदल. जगातल्या कोणालाही कोणत्याही विषयावरची व्याख्यानं ही आपल्या आवाजात रेकॉर्डकरून इतरांपर्यंत पोचवणं हे पॉडकास्टिंगमुळे शक्य झालं. याचा परिणाम अर्थातच शिक्षणाच्या आणि ज्ञानप्रसाराच्या लोकशाहीकरणामधे झाला.
इतर जगभरात आयपॉडने जो धुमाकुळ घातला त्या मानानं भारतात मात्र त्याला फार लोकप्रियता मिळाली नाही. अमेरिकेत तीनचारशे डॉलर्सना मिळणारा आयपॉड भारतात पंचवीस तीस हजार रुपयांना मिळायचा. तो स्मार्टफोनच्या आधीच्या जमान्यात अत्यंत महागडा प्रकार होता. शिवाय काही कायदेशीर बाबींमुळे आयट्यून्स वरचं संपूर्ण संगीत भारतात उपलब्ध नसायचं. भारतीय संगीत विशेषतः बॉलीवूडची गाणी त्यावर मिळायची नाहीत. या कारणांमुळे कदाचित आयपॉड भारतात फार लोकप्रिय होऊ शकलं नाही. पुढे स्मार्टफोन आणि टॅब्लेट आलानंतर आणि सर्व प्रकारचं डिजिटल म्युझिक त्यावर सहज उपलब्ध झाल्यावर तर भारतीयांनी आयपॉडकडे जवळपास दुर्लक्षच केलं.
अॅपलने २००७ मधे आयफोन आणि २०१० मधे आयपॅड लाँच केले. दोन्हीच्या डिझाईन आणि नावाचीही प्रेरणा त्यांनी आयपॉड पासून घेतली होती. ह्याच सुमारास बाजारात अँड्रॉइडचे फोन आणि टॅब्लेटही यायला लागले. सर्व स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधे अर्थातच डिजिटल म्युझिक साठवण्याची आणि ऐकण्याची क्षमताही होती. स्मार्टफोन आणि टॅब्लेट अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झाले आणि त्यांचा वापर चढत्या भाजणीनं वाढायला लागला. ह्या वाढत्या वापराबरोबर आयपॉडसारख्या डिजिटल म्युझिक प्लेयरच्या वापराला आणि विक्रीला घरघर लागली. इतकी की गेल्याच वर्षी अॅपलने आयपॉड टच हा टॅब्लेटसदृश आयपॉड सोडून बाकी सर्व मॉडेलची निर्मिती आणि विक्री बंद केली.
आपल्या जन्मापासून ते आजवरच्या अठरा वर्षांच्या कारकिर्दीत तंत्रज्ञान आणि संगीतक्षेत्राच्या बाजारपेठेवर प्रचंड मोठा परिणाम करणारं आयपॉड आज शेवटचा श्वास घेतं आहे. एक दोन वर्षांत आयपॉड ची निर्मिती पूर्णपणे बंद होईल कदाचित. पण अल्पावधीत जगामधे क्रांतिकारक बदल घडवणारं किंवा बदलांना कारणीभूत ठरलेलं उपकरण म्हणून त्याची इतिहासात कायमची नोंद होईल!
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामधे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)