१७ डिसेंबर: आजचा इतिहास

१७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

राष्ट्रपती झालेले सरन्यायधीश मोहम्मद हिदायतुल्ला (जन्म १९०५)

पहिले मुस्लिम सरन्यायाधीश असलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड आहे, अजून मोडला गेला नाही. हिदायतुल्ला हे देशाचे एकमेव कार्यवाहक राष्ट्रपती आहेत. देशाचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांच्या अकाली मृत्यूने तत्कालीन उपराष्ट्रपती वी. वी. गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाली. पण त्यांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. त्यामुळे घटनेनुसार, सरन्यायाधीश यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची सुत्रं जातात. २० जुलै ते २४ ऑगस्ट १९६९ या काळात हिदायतुल्ला कार्यवाहक राष्ट्रपती होते. नंतर कधी अशी परिस्थिती उद्भवली नाही.

हिदायतुल्ला १९७९ ते १९८४ या काळात ते भारताचे सहावे उपराष्ट्रपतीही होते. ग्यानी झैलसिंग यांनी आजारपणाची सुट्टी घेतल्याने ६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर १९८२ या काळातही हिदायतुल्ला यांनी उपराष्ट्रपती म्हणून कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची सुत्रं सांभाळली. नागपूरमधे वकिलीचं शिक्षण घेतलेल्या हिदायतुल्ला यांनी तिथल्या हायकोर्टातचं काम सुरू केलं. १८ सप्टेंबर १९९२ ला त्यांचं निधन झालं.

शोलेतला कालिया विजू खोटे (जन्म १९४१)

हिंदी, मराठी सिनेमातले नावाजलेले अॅक्टर विजू खोटे यांचा आज जन्मदिवस आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात त्यांनी केलेली खलनायक बालीची अॅक्टिंग गाजली. पण त्यांना नाव मिळालं ते ‘शोले’ने. या सिनेमातला खलनायक कालियाचे डायलॉग आजही लोकांच्या ध्यानात आहेत. ‘सरकार, मैंने आपका नमक खाया है’ हा डायलॉग तर अनेकजण चान्स मिळाला की मारतात.

विजू खोटे यांनी शंभरेक सिनेमात साइड रोल केला. ‘अंदाज अपना अपना’ सिनेमातली खलनायक रॉबर्टची भूमिकाही त्यांनी खूप चपखलपणे निभावली. रॉबर्टचा ‘गलती से मिस्टेक हो गया’ हा डायलॉग त्यावेळी सिनेमाच्या चाहत्यांच्या तोंडावर होता. स्टेज अॅक्टर असलेले वडील नंदू खोटे यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. वाढत्या वयानुसार त्यांनी आता सिनेमातलं काम कमी केलंय. गेल्यावर्षी ‘जीने भी दो यारों’ या वेबसीरिजमधे त्यांचा रोल आहे.

लयभारी रितेश देशमुख (जन्म १९७८)

सुरवातीला बॉलीवूडमधे आपली कलाकारी सादर करणारा रितेश देशमुख आता ‘लयभारी’ मार्गाने आपल्या माय मराठीकडे वळलाय. अॅक्टर, प्रोड्यूसर असलेला रितेश देशमूख आज चाळीशीत पोचलाय. २००३ मधे 'तुझे मेरी कसम' या पहिल्याच सिनेमाने तो तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला. या सिनेमातले ‘पलपल सोचमें आना ना’सारखे गाणे खूप गाजले. या सिनेमातच जेनेलिया डिसुझा आणि रितेश ही जोडी फेमस झाली. पुढे या दोघांनी लग्नही केलं.

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. रितेशसोबत प्रोड्यूसर प्रकाश झा यांना हल्ला स्थळाचा दर्शन घडवणं विलासरावांना महागात पडलं. 'मस्ती', 'क्या कूल हैं हम', 'मालामाल वीकली', 'डरना जरूरी है', 'अपना सपना मनी मनी', 'धमाल', 'हे बेबी', 'हाउसफुल', 'ग्रेड ग्रांड मस्ती' यासारख्या हिट सिनेमात रितेशने काम केलं. जवळपास चार वर्षानंतर जेनेलिया, रितेश ही जोडी ‘माऊली’ या मराठमोठ्या सिनेमात ऑनस्क्रीन येतेय. २१ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

नाटककार मधुसूदन कालेलकर (निधन १९८५)

नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा आज स्मृतीदिवस आहे. वेंगुर्ल्यात जन्मलेल्या कालेलकरांना साहित्य आणि नाटकात रस होता. सुरवातीच्या काळातच कालेलकरांनी ‘अखेर जमलं’ या विनोदी सिनेमाची पटकथा लिहिली. हा सिनेमा त्यावेळी खूपच गाजला. त्यानंतर जवळपास ७५ सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला हे त्यांचे सिनेमे गाजले.

सिनेमासोबत त्यांची नाटकातली कारकीर्दही गाजली. स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ’उद्याचे जग’ हे त्यांचं पहिलं नाटक. १९६३ साली आलेलं त्यांचं ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ नाटकही खूप गाजलं. साध्या, सोप्या भाषेमुळे त्यांची नाटकं रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. 

राईट बंधूंची ‘द फ्लायर’ झेप (उड्डान १९०३)

इतिहासात आजच्या दिवशी मानवाने आणखी एक गगनभरारी घेतली. मनातल्या मनातच आकाशात उडण्याऱ्या माणसाचं स्वप्न राईट बंधूंनी साकारलं होतं. 'द फ्लायर' नावाचं विमान आकाशात झेपावलं होतं. ऑर्विल आणि विल्बर राईट बंधुंमुळे १२ सेकंदच आकाशात झेपावलेल्या या विमानोड्डानाने आज मानवी दळणवळणात मोठी क्रांती केलीय. माणूस टप्प्याटप्प्याने आता चंद्र, मंगळावर जाऊन पोचलाय. विमान उड्डाणामधे आज रोज नवं काहीतरी घडत आहे. असं असताना कुठल्याही कॉलेजात न गेलेल्या राईट बंधुंना मात्र कठोर मेहनतीनंतर पहिली झेप घ्यायला चार वर्ष लागली होती.

लहानपणापासूनच ‘नको ते उद्योग करणाऱ्या’ या बंधुंना वडिलांनी एक हेलिकॉप्टरसारखं खेळणं आणून दिलं होतं. या खेळण्यातूनच दोघांना आकाशात झेपावणारं यंत्र बनवण्याची प्रेरणा मिळाली. विमान बनवताना मशीन टेक्नॉलॉजीची चांगली समज असणं त्यांच्यासाठी जमेचं ठरलं. २०० पौंड वजन आणि १२ एचपी एवढी इंजिन क्षमता असलेलं विमान त्यांनी बनवलं. आजच्याच दिवशी या विमानाने १२ सेकंदात १२० फूट उंचीवर झेप घेतली आणि क्रांती घडली.