जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’.
२००७ला रिलीज झालेल्या ‘अवतार’ सिनेमाने भारतीय सिनेरसिकांवर पाडलेला प्रभाव किती मोठा आहे, याचं उत्तर आज थियेटरमधले हाऊसफुल शोच देऊ शकतील. कारण या सिनेमाचा ‘अवतार २’ हा सिक्वेल अवघ्या तीनच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जेम्स कॅमरून दिग्दर्शित या दोन्ही सिनेमांना भारतीय प्रेक्षकांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय, त्याचं कारण २५ वर्षं जुन्या इतिहासात दडलंय.
वर्षाला खंडीभर सिनेमांची निर्मिती करणाऱ्या सिनेजगतासाठी २५ वर्षांपूर्वीचा काळही कित्येक शतक जुन्या असलेल्या इतिहासासारखा निश्चितच वाटू शकतो. याच इतिहासातला एक महत्त्वाचा धडा म्हणजे १९९७ला आलेला कॅमरून दिग्दर्शित ‘टायटॅनिक’! या सिनेमाने अनेक विक्रम रचले आणि मोडले. हा सिनेमा, त्याची कथा, त्यातली गाणी या सगळ्याचा प्रभाव आजतागायत टिकून आहे.
टायटॅनिक हे जहाज ‘अनसिंकेबल’ म्हणजेच न बुडणारं जहाज म्हणून प्रसिद्ध झालं होतं. पण शेवटी ते बुडालंच. या दुःखद घटनेचे पडसाद पुढे साहित्य आणि सिनेमावरही उमटले. त्यातल्या त्यात ‘टायटॅनिक’ हा सिनेमा कालातीत ठरला. ‘टायटॅनिक’चं लोणचं मुरण्यासाठी त्याची निर्मितीप्रक्रिया, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेतच, पण त्याहून महत्त्वाचा घटक आहे, सिनेमातली काल्पनिक प्रेमकथा!
‘टायटॅनिक’च्या निर्मितीसंस्थांपैकी एक असलेल्या ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ला ‘टायटॅनिक’ची कथा ऐकवताना कॅमरूनने फक्त एकच ओळ ऐकवली होती. ‘टायटॅनिकवर रोमियो आणि ज्युलिएट!’ सुरवातीला प्रेमकथेची ही संकल्पना निर्मात्यांना आर्थिकदृष्ट्या फारशी रुचली नव्हती. त्यांना कॅमरूनकडून त्याच्या आधीच्या ‘टर्मिनेटर’सारखा धांगडधिंगा अपेक्षित होता. पण कॅमरूनचा हट्ट प्रेमकथेचाच होता. कॅमरूनला हातचं जाऊ द्यायचं नसल्याने निर्मात्यांनीही त्याच्या हट्टापुढे नमतं घेतलं.
सत्य घटना पडद्यावर आणताना अनेक दिग्दर्शकांकडून सिनेमॅटीक लिबर्टी घेतली जाते. मग कधीकधी त्याचा विपर्यासही होतो. पण कॅमरूनने ‘टायटॅनिक’मधे साकारलेली काल्पनिक प्रेमकथा ही सिनेमॅटीक लिबर्टी कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण आहे. टायटॅनिकचं बुडणं हा फक्त पुस्तकी चर्चांचा, डॉक्युमेंटरीचा विषय ठरला असता, पण कॅमरूनच्या सिनेमॅटीक लिबर्टीने टायटॅनिकला भावनिक झालर लावून खऱ्या अर्थाने ‘अनसिंकेबल’ बनवलं.
हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
दोन घराण्यांच्या भांडणांनी रोमियो-ज्युलिएटच्या प्रेमकथेला शोकांतिका बनवलं. टायटॅनिकही एक गाजलेली शोकांतिकाच होती. या दोन्हींचा अशक्य वाटणारा मिलाफ कॅमरूनने ‘जॅक’ आणि ‘रोझ’ या दोन पात्रांच्या मदतीने ‘टायटॅनिक’मधे घडवून आणला. या सिनेमात जॅक डॉसनची भूमिका लियोनार्डो डिकॅप्रियोने साकारली होती, तर रोझच्या भूमिकेत केट विन्स्लेटने रंग भरले होते.
सदानकदा फिरस्तीवर असलेला अनाथ जॅक जुगारात टायटॅनिकच्या तिसऱ्या वर्गाची दोन तिकिटं जिंकतो आणि आपल्या मित्रासोबत जहाजावर येतो. इथं आल्यावर त्याची आत्महत्या करायला जाणाऱ्या रोझशी भेट होते. कर्जबाजारी असूनही सरंजामी थाट जपू पाहणाऱ्या विधवा आईच्या जबरदस्तीमुळे रोझचं एका व्यापाऱ्याशी लग्न ठरलंय. त्यामुळे रोझच्या मनमोकळ्या वागण्याबोलण्यावर एक प्रकारचं टाळं लागलंय.
पण जॅकच्या येण्याने तिला मोकळं अवकाश मिळालंय. त्याच्या कुशीत शिरून आपले हात पसरवून सभोवती पसरलेल्या विस्तीर्ण समुद्रावरून झेप घ्यायचं स्वप्न ती पाहते. तो तिला स्वातंत्र्याची, आनंदाची, मनस्वी जगण्याची जाणीव करून देतो. ती जॅककडून स्वतःचं न्यूड पेंटींग काढून घेत तिच्यातल्या आजवर बंदिस्त असलेल्या अवखळ, अल्लड रोझला मुक्त करू पाहते.
पहिल्याच भेटीत तिला आत्महत्या करण्यापासून वाचवणारा जॅक तिला शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन स्वतःलाच देऊन बसलेला असतो आणि जहाज बुडताना ते तो पाळतोही. तो रोझकडून कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहण्याचं वचन घेतो. गारठल्याने जॅकचा मृत्यू होतो पण रोझ त्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी आपला जीव वाचवते. अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याकडे पाहत ती बोटवरच्या अधिकाऱ्यांना आपली ओळख रोझ डॉसन अशी सांगते!
‘टायटॅनिक’मधे प्रेमकथा हा निर्मात्यांसाठी एक जुगारच होता. पण हा जुगार भारतात तुफान यशस्वी ठरला. याआधीही १९९४मधे ज्युरासिक पार्क भारतात हिट झाला होता. पण ‘टायटॅनिक’ने खऱ्या अर्थाने भारतीय प्रेक्षकांना हॉलीवूडकडे वळवलं, असं म्हणता येईल. भारतीयांनी ‘टायटॅनिक’ का पाहिला, याची कारणं वेगवेगळी नक्कीच असू शकतील, पण त्यात केट विन्स्लेटच्या न्यूड पेंटींगचा प्रसंग बऱ्याच अंशी कारणीभूत आहे, हे नाकारून चालणार नाही.
डिझास्टर सिनेमा हा जॉनर भारतीयांना नवा नव्हता. १९८०ला आलेला रवी चोप्रा दिग्दर्शित ‘द बर्निंग ट्रेन’ हा गाजलेला सिनेमा भारतातला पहिला डिझास्टर सिनेमा होता. टायटॅनिकची शोकांतिका इथल्या लोकांना आधीपासूनच माहीत होती. रोमियो-ज्युलिएटच्या धर्तीवर इकडं अनेक सिनेमे आधीही बनवले गेले होते. पण हे सगळं एकत्रितपणे पडद्यावर बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
‘टायटॅनिक’ आला तेव्हा जागतिकीकरणाची घुटी पिलेली मल्टीप्लेक्स संस्कृती भारतात बाळसं धरू पाहत होती. त्यामुळे ‘टायटॅनिक’ सिंगलस्क्रीन पडद्यावरचा शेवटचा मोठा सिनेमा ठरला असं म्हणावं लागेल. हैदराबादच्या संगीत सिनेमा थियेटरमधे तर तो जवळपास वर्षभर चालला होता. २०१२मधे जेव्हा ‘टायटॅनिक’ पुन्हा एकदा थ्रीडी स्वरुपात भारतातल्या थियेटरमधे आला, तेव्हाही प्रेक्षकांनी अशीच गर्दी केली होती.
जॅकच्या कुशीत हात पसरवून उभी राहिलेली रोझ ही फोटोसाठीची पोज प्रचंड लोकप्रिय झाली. रत्नागिरीच्या कोहिनूर रिसॉर्टने तर अशा फोटोंसाठी खास ‘टायटॅनिक पॉईन्ट’ बनवून घेतलाय. अगदी ज्यांनी ‘टायटॅनिक’ बघितलेला नाही, त्यांनाही ही पोज ‘टायटॅनिक पोज’ म्हणूनच माहित आहे. जोवर फोटो काढताना प्रेमी जोडप्यांच्या मनात ‘टायटॅनिक’मधे गाजलेली पोज येत राहील, तोवर तरी ‘टायटॅनिक’ला मरण नाही!
हेही वाचा:
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा