२६/११ मुंबई हल्ल्याच्या १० गोष्टी

२६ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी.

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन फाईव स्टार हॉटेल, रेल्वे स्टेशन, हॉस्पीटल, ज्यूंचं प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर लागोपाठ हल्ला चढवला. एकाच रात्री १० ठिकाणी हल्ला केला. सुरवातीला कुणाला हा हल्ला एवढा मोठा असेल असं वाटलं नाही. पण बघता बघता जगभरात या हल्ल्याचे कंप जाणवले.

जवळपास ६० तास हा हल्ला सुरू होता. मुंबई पोलिसांच्या मदतीला एनएसजी कमांडोही बोलवण्यात आले. दहशतवाद्यांसोबत सलग दोन रात्री सुरू असलेली चकमक तिसऱ्या दिवशी सकाळी थांबली. या हल्ल्यात जवळपास १७ पोलिस जवानांसह १७४ हून अधिक जण मारले गेले. यामधे २६ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

पोलिसांनीही ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकाला रंगेहात पकडलं. या हल्ल्यातले हे सगळे १० दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवादी दोन दोनच्या गटांमधे होते.

१) लिओपोल्ड कॅफे

सतत परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या लिओपोल्ड कॅफेवर दहशतवाद्यांनी पहिल्यांदा गोळाबार केला. लोकांनाही काही कळण्याच्या आधीच दहशतीचं थैमान घातल दहशतवादी तिथून पळून गेले. लिओपोल्ड कॅफेमधे झालेल्या गोळीबारात १० जण मारले गेले. परदेशी पर्यटकांमधे हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

२) छाबडा हाऊस

दोन दहशतवाद्यांनी नरीमन पॉइंट इथलं ज्यूंचं प्रार्थनास्थळ छाबडा हाऊस ताब्यात घेतलं. अनेकांना ओलिस ठेवलं. कित्येक तासांच्या चकमकीनंतर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांचा खात्मा केला.

पण तोपर्यंत दहशतवाद्यांनी छाबडा हाऊसचे चालक रब्बी गॅव्रिएल होल्टझबर्ग आणि त्यांचा सहा महिन्यांची गर्भार बायको रिवकाह यांची हत्या केली होती. पण त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे यातून बचावला. पोलिसांना इथं सहा ज्यूंचे मृतदेह सापडले. हल्ल्यानंतर छाबडा हाऊस ६ वर्षांनी २०१४ मधे सुरू झालं.

३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी)

लिओपोल्डवर हल्ला सुरू असतानाच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या एका गटाने सीएसटीतही  गोळीबार करत हैदोस घातला होता. मुंबईतलं हे सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्टेशन आहे. रात्रीच्या वेळी तर इथून मुंबई उपनगरासह देशभरात रेल्वेगाड्या सुटतात. त्या दिवशीही आपापल्या ठिकाणांवर जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीलाच लक्ष्य करत दोन दहशतवाद्यांनी मेन हॉलमधे गोळीबार सुरू केला. प्लॅटफॉर्मवर हातबॉम्ब फेकले.

अवघ्या अर्ध्या तासात ५८ जण मारले गेले. २६/११ च्या हल्ल्यात एकाच ठिकाणी मारले गेल्यांची ही संख्या सर्वाधिक होती. इथं पोलिसांनी अजमल कसाब या क्रुरकर्म्याला रंगेहात पकडलं. जगभरातल्या अशा हल्ल्यांत आतापर्यंत दहशतवादी रंगेहात सापडला नव्हता. पण पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून कसाबला पकडलं.

कसाबचा साथीदार इस्माल खान याला पोलिसांनी गोळ्या घालून मारलं. कसाब आणि त्याच्या साथीदाराकडे एके ४७ रायफल सापडली. या हल्ल्यात पुढे कसाबला फाशीची शिक्षा झाली.

४) कामा हॉस्पीटल

दहशतवाद्यांनी परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या ठिकाणांसोबतच या रस्त्यात येणाऱ्या ठिकाणांवरही गोळीबार केला. सीएसटी स्टेशनमधून बाहेर पडत असलेल्या दहशतवाद्यांनी कामा हॉस्पीटलजवळ एका पोलिस वॅनवर ताबा मिळवला. अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

दहशतवादी हॉस्पीटलमधे घुसले. इथंच दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमूख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांचे एसीपी अशोक कामटे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय साळसकर मारले गेले. ही या हल्ल्यातली पोलिसांची सगळ्यात मोठी मनुष्यबळ हानी ठरली.

५) हॉटेल ऑबेरॉय ट्रायडेंट

लिओपोल्ड कॅफे, सीएसटीवरच्या हल्ल्याची तीव्रता कळेपर्यंत दहशतवाद्यांनी ऑबेरॉय हॉटेलमधेही गोळीबार सुरू केला. दहशतवादी हातबॉम्बही फेकत होते. मुंबईतल्या व्यापाऱ्यांत प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमधे त्यादिवशी साडेतीनशेहून अधिक लोक हजर होते.

बंदुकीच्या धाकावर दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या लोकांना ओलिस ठेवलं होतं. नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीच्या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण तोपर्यंत ३२ लोकांना जीव गमवावा लागला होता. २८ तारखेला रात्री उशिरा इथलं पोलिस कारवाई थांबली.

६) हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर

गेट वे ऑफ इंडियाजवळच्या ताजमहल हॉटेललाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. समुद्राशेजारच्या या फाईव स्टार हॉटेलमधल्या घातपातानंतरच या हल्ल्याची जगाला तीव्रता कळाली. नंतर ताज हॉटेलच्या घुमटातून धुराच्या ज्वाळा निघत असलेला फोटोच २६/११ च्या हल्ल्याचं एक प्रतिक बनून राहिला.

ताज हॉटेलमधे डिनर करायला आलेल्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी अनेक परदेशी पर्यटक, अधिकारी हॉटेलात होते. दहशतवाद्यांशी अनेक तास चकमक सुरू होती. ताज हॉटेलमधल्या या हल्ल्यात ३१ जणांचा जीव गेला. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यावेळी ताजमधे जवळपास ४५० ग्राहक होते. २९ तारखेला सकाळी नऊ वाजता इथली कारवाई थांबली.

७) दक्षिण मुंबई टार्गेट

दहशतवाद्यांना समुद्रमार्गाने मुंबईत घुसणं सोपं होतं. त्यामुळे दहशतवाद्यांनी समुद्र किनारी असलेल्या दक्षिण मुंबईलाच लक्ष्य केलं. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेलसोबतच दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतल्या मेट्रो सिनेमा, टाईम्स ऑफ इंडियाजवळची गल्ली इथंही हल्ले केले.

दक्षिण मुंबईसोबतच माझगाव डॉक इथंही एक बॉम्बस्फोट झाला. विलेपार्ले इथं एका टॅक्सीत स्फोट झाला. 

८) कराचीमार्गे मुंबईत

मुंबई हल्ल्याच्या तपासात कराचीहून १० दहशतवादी स्पीड बोटीने मुंबईत आल्याचं सिद्ध झालंय. या बोटीवरच्या चार भारतीयांची दहशतवाद्यांनी मुंबईच्या किनाऱ्याला पोचेपर्यंत हत्या केली होती. रात्री आठच्या सुमारास हे सगळे दहशतवादी कुलाब्यातल्या कफ परेडच्या मासळी बाजारात आले. तिथूनच ते चार गटांमधे विभागले आणि टॅक्सीने हल्ल्याच्या ठिकाणी रवाना झाले.

९) लाईव मीडिया कवरेज

दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला हल्ल्याची तीव्रता खूप असल्याचं दिसताच जगभरातला मीडिया इथं दाखल झाला. जगात पहिल्यांदाच एखाद्या दहशतवादी हल्ल्याचं मीडियाने लाईव कवरेज केलं. पण हे कवरेज नंतर वादात सापडलं.

कारण दुसऱ्या दिवशी सकाळीचं ताजमधून सगळ्या लोकांची सुटका केल्याची बातमी आली. काहीवेळानंतर ही बातमी खोटी ठरली. काही परदेशी पर्यटक अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. बाहेर कुठं, काय सुरू आहे, हे दहशतवादी टीवीवरच कवरेज बघत असल्याचं नंतर समोर आलं.

१०) सुरक्षा यंत्रणा दाखल

सुरवातीला दहशतवाद्यांच्या विरोधात केवळ मुंबई पोलिस रस्त्यावर होते. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेऊन नंतर इतर सुरक्षा दलांचीही मदत घेण्यात आली. हल्ल्याच्या काळात सगळ्याच ठिकाणांना रॅपिड अक्शन फोर्स, मरीन कमांडो, नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांच्यासह मुंबई पोलिसांनी घेराव घातला होता.

सलग तीन दिवस पोलिसांचा दहशतवाद्यांशी मुकाबला सुरू होता. यात एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार चंदर आणि हवालदार गजेंदर सिंह बिष्ट हे जवान शहीद झाले. एकूण १७ जवानांना वीरमरण आलं. रेल्वेचेही तीन कर्मचारी मारले गेले.

२९ तारखेला रात्री बाराला पोलिसांनी ताज हॉटेलच्या लॉबीचा ताबा मिळवला. सकाळी नऊच्या सुमारास ताज हॉटेलमधे शेवटच्या दहशतवाद्याचा पोलिसांनी खात्मा केला आणि ही कारवाई थांबली.