६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त

०५ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : १३ मिनिटं


६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट.

देशभरातील कोटी-कोटी लोकांचे कान अयोध्येहून येणार्‍या बातमीसाठी अधीर झाले होते. तर अयोध्येत जमलेल्या लक्ष लक्ष कारसेवकांचे डोळे ‘त्या’ वादग्रस्त वास्तूकडे लागले होते. 

आदल्याच दिवशी मी फैजाबादेतला मुक्काम हलवला आणि बाबरी मशिदीच्या अगदी समोर म्हणजे दोनशे फुटांवरच्या राम चरित मानस भवनात ५ - ६ डिसेंबरची रात्र काढण्यासाठी आलो. या मानस भवनच्या गच्चीवर देशभरातून आलेल्या पत्रकार, छायाचित्रकारांना ‘आँखो देखा हाल’ टिपण्यासाठी विहिंपने जागा करून दिली होती. पण पुढे त्याचे अक्षरशः बारा वाजले!

यापूर्वी आठवडाभर फैजाबाद-अयोध्या अशी  जा ये  करीत होतो. त्यावेळी पाहिलेली उत्साहाने ओसंडून वाहणारी अयोध्या आणि आज दिसणारी अयोध्या यात जमीन अस्मानाचा फरक होता. यापूर्वी होणार्‍या ‘जय श्रीराम’च्या घोषणात श्रद्धेचा आणि ‘मंदिर वही बनाऐंगे’चा ठामपणा ओसंडून वाहत होता. आज त्या जयजयकारात आक्रमकतेचा फूत्कार स्पष्टपणे दिसत होता.

पाच डिसेंबरची रात्र महत्त्वाची होती. कुठे काय शिजतंय, त्याचा कानोसा घेण्यासाठी रात्री दहा वाजता अयोध्येचा फेरफटका सुरू केला. त्यात मध्य प्रदेशातले एक भाजप खासदार भेटले. त्यांनी ‘चंबळ खोर्‍यातून ५०० जणांचा एक बलिदान जत्था आला असून तो उद्या साडेतीन चार दरम्यान वादग्रस्त वास्तूवर चाल करून ती उद्ध्वस्त करतील,’ अशी अंदर की बात सांगितली. 

अफवांचा सुळसुळाट वाढत असला, तरी खासदारांच्या ‘बात’कडे दुर्लक्ष करावंसं वाटलं नाही. कारण अयोध्येचा रंग त्या रात्री झपाट्याने बदलत होता. त्या रात्री तास-दोन तास झोपलो असू, तेवढेच! कारण त्या खासदाराने दिलेली ‘टीप’ आणि लाऊडस्पीकरवरून भसाड्या आवाजात रात्रभर रेकत असलेली रामधून आमचा डोळाच लागू देईना.

त्याच रात्री वादग्रस्त वास्तूपुढच्या ‘नियोजित राम मंदिर’ परिसरात बांधकामाचं सामान येऊन पडलं. नगरपालिकेच्या गाड्या कचरा, घाण उचलून नेत होत्या, तर संघाचे काही स्वयंसेवक वादग्रस्त वास्तू परिसरातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याच्याच कामाला लागले होते. पण या घडामोडी दुसर्‍या दिवशी काय घडणार, याचा अंदाज घेण्यास पुरेशा नव्हत्या. 

सहा डिसेंबर उजाडला. शरयू काठी स्नान करणार्‍यांची आज नेहमीपेक्षा अधिक गर्दी जमली होती. त्यातले बरेचजण ओंजळीत शरयूचं पाणी घेऊन आणि सूर्याला साक्षी ठेवून मंदिर वही बनाएंगेची शपथ घेत होते. तशीच अयोध्येत आलेल्या प्रत्येक कारसेवकाची तीव्र इच्छा होती. परंतु वरिष्ठ नेत्यांनी आणि साधूमहंतांनी त्यांना अनुशासनात वचनबद्ध केलं होतं. ते त्यांनी पाळायचं ठरवलं होतं. ‘लोटाभर पाणी आणि मूठभर माती’ नियोजित राम मंदिराच्या जागी टाकायचं आणि आपल्या मुक्कामी परतायचं, ही कारसेवा कारसेवकांनी मान्य केली असली तरी, मंदिर वही बनाऐंगेची अंतरीची ऊर्मी त्यांना अवस्थ करीत होती.

बाबरी मशिदीत मूर्ती स्वरूपात असलेल्या ‘रामलल्ला’च्या म्हणजे बालरामाच्या दर्शनाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ अशी होती. गेला आठवडाभर त्याच्या दर्शनासाठी पहाटे पाचपासूनच रांग लागायची. सहा डिसेंबरला मात्र तशी गर्दी नव्हती. तुरळक लोकच दर्शनाला येत होते.त्यांनाही दर्शन झालं की, पोलिस त्वरित बाहेर पिटाळायचे.

सकाळचे आठ वाजले तशी बाबरीपासून तीनशे मीटरवर असलेल्या ‘रामकथा कुंज’ परिसरात कारसेवकांची गर्दी जमू लागली. कारसेवकांच्या व्यवस्थेचं मुख्य कार्यालय असलेल्या ‘राम कथा कुंज’ची गच्ची तीनचार दिवसांपासून सभेचं व्यासपीठ झाली होती. सहा डिसेंबरलाही आठ तासांच्या सभेचा कार्यक्रम होता. वक्त्यांचा क्रमही ठरला होता. अकराच्या दरम्यान तिथे लाखोंचा जमाव जमला. भाषणबाजी सुरू झाली, ती नेहमीसारखीच होती. पण जमलेले कारसेवक ही भाषणबाजी नेहमीसारखे कान देऊन ऐकत नव्हते. सार्‍यांचे डोळे त्या बाबरी मशिदीकडे लागले होते.

या दरम्यानच बाबरीच्या भोवतीचं वातावरण हळूहळू तापू लागलं. वादग्रस्त बाबरी मशिदीसमोरचा परिसर म्हणजे नियोजित राममंदिराचा अर्धा भाग. यात सिंहद्वार, सभामंडप, नृत्यमंडप असा भाग येतो, तर उर्वरित भाग बाबरी मशिदीत जिथे ‘रामलल्ला’च्या मूर्ती होत्या, तो होता. ते नियोजित मंदिराचं गर्भगृह!

सिंहद्वार, सभामंडप आणि नृत्यमंडपाच्या पायाभरणीचं काम गेल्या कारसेवेत जवळजवळ पूर्ण झालं होतं. सभामंडपाचा भाग उंच असल्याने त्याचा चौथरा झाला होता. तिथे दुपारी १२.१५ पासून सुरू होणार्‍या कारसेवेला शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी साधूमहंत जमत होते. या परिसरात फक्त पत्रकार आणि साधूमहंतांनाच प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. 

या परिसरात येण्यासाठी फक्त दोन मार्ग होते. एक, ‘राम कथा कुंज’कडून, तर दुसरा, हनुमान गढीतून येणारा ‘मानस भवना’च्या वळणावरचा! हे दोन्ही प्रवेश मार्ग जेमतेम दहा फुटांचे. ते ओलांडले, की मात्र पुढे मोकळा परिसर. काही पत्रकारांप्रमाणेच मी आणि चित्रलेखाचा फोटोग्राफर उभे होतो. 

या राखीव भागात ‘राम कथा कुंज’कडून येणारे कारसेवक त्या परिसरात दाटलेल्या गर्दीमुळे आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तसाच प्रयत्न हनुमान गढी मार्गाने येणारे कारसेवक दांडगाई करीत करत होते. या परिसराची सुरक्षाव्यवस्था जवानांकडे असली, तरी ‘गणवेषधारी’ संघाचे स्वयंसेवक कारसेवकांच्या रेट्याला थोपवत होते. हनुमान गढीच्या चिंचोळ्या रस्त्याने अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदिंच्या गाड्या आल्याने त्या प्रवेशद्वारावर आत घुसू पाहणार्‍या कारसेवकांचा रेट्याचा ताण अधिक होऊ लागला. 

या रेटारेटीत काही कारसेवक आत घुसण्यात यशस्वी होत होते. दोन-चार साधू त्यांना सारा काम तुम लोग बिघडाएंगे असं म्हणत हातातल्या दंडुक्याने चोप देत होते. काही कारसेवक मार टाळण्यासाठी साधूंना हात जोडून क्षमायाचना करीत होते. साधू त्यांना माफ करीत होते. 

सकाळी ११नंतर बाबरी पुढच्या राखीव भागात एकेक नेते येऊ लागले. तशी प्रवेशद्वाराच्या संरक्षणाची मानवी साखळी तुटायची. त्याचा फायदा घेऊन ५०-६० कारसेवकांची झुंड आत घुसायची. लालकृष्ण अडवाणी आणि अशोक सिंघलांना इथेच धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की गर्दीमुळे नव्हे, तर ती कारसेवा मंदिरासाठी आणलेल्या विटा रचण्याऐवजी ‘लोटाभर पाणी आणि मूठभर माती’ टाकण्यासाठी आणल्यामुळे कारसेवकात निर्माण झालेल्या रागाने झाली होती. साधू-महंतांना मात्र कमालीचा आदर लाभत होता. 

महंत परमहंस आणि अवैद्यनाथ हे साधूंचे बडे म्होरके त्या परिसरात आले आणि त्या चौथर्‍यावर विसावले. बाकी नेते भाषण देण्यासाठी ‘रामकथा कुंज’च्या दिशेने निघाले. शिवसेनेचे उपस्थित असलेले एकमेव खासदार मोरेश्वर सावे हे सुरक्षित राहण्यासाठी अशोक सिंघलांची सावली बनून त्या परिसरात फिरत होते. साडेअकरा वाजले. एव्हाना ‘मानस भवन’च्या गच्चीवरून पत्रकारांना पिटाळण्यात कारसेवक यशस्वी झाले होते. विहिंप मीडिया सेंटरचे प्रमुख रामशंकर अग्निहोत्री आम्हाला सांगत होते, ‘पत्रकारांना इथे चांगली वागणूक मिळाली नाही, असं खुशाल छापा. हा अन्याय तुम्ही अजिबात सहन करू नका.’ 

अग्निहोत्री पत्रकारांवरील अन्यायाबद्दल बोलत होते, पण पुढे कारसेवकांनी पत्रकारांवर अक्षरशः अत्याचार केला. मानस भवनच्या गच्चीचा ताबा घेतलेले कारसेवक आता बाबरीपुढील परिसरात घुसू पाहणार्‍या आणि घुसलेल्या कारसेवकांचा, घोषणा देत जोष वाढवण्याचं काम करू लागले. त्या प्रोत्साहनाने जोरदार मुसंडी मारून दोन अडीच हजार कारसेवक बाबरी मशिदीभोवतालच्या परिसरात घुसले. 

केंद्रीय जवान आणि संघ स्वयंसेवक त्यांना बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने ते हताश झाले होते. हा सारा प्रकार साडेदहापासून त्या परिसरात हजर असलेले उच्च न्यायालयाने निरीक्षक म्हणून नेमणूक केलेले तेजशंकर पंचवीस फुटांवर असलेल्या ‘सीता रसोई’च्या गच्चीवरून शांतपणे पाहात होते. त्यांच्या आजूबाजूला उत्तर प्रदेशचे पोलीस दलाचे प्रमुखही होते.

दरम्यान अकरा वाजल्यापासून फैझाबादमधून निवडून आलेले शिवसेनाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार पवनकुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली हजारभर शिवसैनिक शिस्तीने हनुमान गढीकडून जो रस्ता वादग्रस्त वास्तूच्या मागील बाजूस जातो, त्या रस्त्यावर फेर्‍या मारीत होते. त्यातील बर्‍याच जणांच्या हाती तलवारी, भाले होते. मध्येच छरे उडवणार्‍या बंदुकीचाही आवाज येत होता. या शिवसैनिकांनी प्रयत्न केला असता, तर त्यांना वादग्रस्त वास्तूपुढील परिसरात सहज प्रवेश मिळाला असता. परंतु ते कमालीच्या शिस्तीने त्या रस्त्याने मिरवणुकीचा आव आणून फेर्‍या मारत होते.

सव्वाअकराच्या दरम्यान साध्वी ॠतंभरांची बाबरी पुढच्या मंदिर चौथर्‍यावर भेट झाली. सोबत त्यांचे गुरूही सोबत होते. आज त्या भलत्याच खुषीत  होत्या. भाषा सौम्य होती, पण त्यात ठामपणा ठासून भरला होता. चित्रलेखाशी बोलताना त्या पुढच्या घटनेची जवळजवळ सूचनाच देत होत्या. त्या बोलत होत्या, ‘इथे जे लाखो कारसेवक जमले आहेत, ते मूठभर माती आणि लोटाभर पाणी टाकण्यासाठी नाहीत. जे काही करायचं ते आजच, असा त्यांचा ठाम निश्चय आहे.’

आपण भडकावू भाषणं करून लोकांना का चिथावता, या प्रश्नावर ॠतंभरा म्हणाल्या, ‘मी लोकांच्या भावना व्यक्त करते. मला त्या कळतात. तुम्हाला त्या कळत नाहीत म्हणून माझं बोलणं भडकावू वाटतं. थोडा वेळ इथंच थांबा, म्हणजे लोकभावना कशा असतात, त्या तुम्हालाही कळतील.’

ॠतंभरा सूचकपणे सारं बोलत होत्या म्हणून त्यांना विचारलं, ‘भगवी वस्त्र परिधान करून तुम्ही राजकारण्यांसारखी भाषा वापरता. तुम्ही थेट राजकारणातच का नाही जात?’ त्यावर त्या हसत हसत म्हणाल्या, ‘राजकारणात जाऊन काय करणार? भगवी वस्त्रं परिधान करून राजकारण्यांकडून बरंच काही करवून घेता येतं.’

ॠतंभरांशी बोलत असताना एक विचित्र प्रकार त्या परिसरात घडला. आत घुसलेल्या कारसेवकांना हुसकवण्याचं काम ५०-६० दणकट कारसेवक करीत होते. त्यांच्या डोक्याला पिवळ्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या. खरं तर तोपर्यंत आत घुसलेले कारसेवक शांतपणे ‘जय श्रीराम’चा जयजयकार करीत होते. काही फेर धरून नाचत होते. काही तिथे जमलेल्या साधूमहंतांना श्रद्धाभावाने निरखत होते. 

साधू मात्र छायाचित्रकारांना पाहिजे त्या पोझेस  देत होते. त्यातही चढाओढ सुरू होती. फोटोसाठी बहुतेक साधू हपापलेले होते. या गोंधळाने वैतागलेले अयोध्यावासी गोपाळदास चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, ‘एक तर, या साधूंना कळत नाही, तुमचे छायाचित्रकार कशाला त्यांच्यापुढे कॅमेरे नाचवतात? नेहमी अर्धा गोंधळ तुमचे कॅमेरेच उडवतात.’

एव्हाना पिवळे पट्टेवाल्या कारसेवकांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे भगवे पट्टेवाले कारसेवक बिथरले. पिवळे पट्टेवाले त्यांना अक्षरशः बुकलून काढत होते. उचलून फेकत होते. पण ‘मानस भवन’वरून मिळणार्‍या प्रोत्साहनाने आणि बाहेरील कारसेवकांच्या मिळालेल्या जोषामुळे आतले कारसेवकही सरसावले. कारसेवकांतच हाणामारी सुरू झाली. एका कारसेवकाने तर तिथे सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या संघ स्वयंसेवकांच्या ६०-६५ वयाच्या प्रमुखाच्या शर्टची कॉलरच पकडली. 

पिवळे पट्टेवाले कारसेवक माघारी फिरले, पण तोच मोका हनुमान गढीच्या बाजूने घुसू पाहणार्‍या कारसेवकांनी साधला. हजारो कारसेवक आत घुसले. संघाचे स्वयंसेवक दूर पळाले. जवान थंडपणे जे घडतंय ते पाहात होते. एकच गोंधळ उडाला. मंदिर चौथर्‍यावरचे साधू महंतही आपली भगवी वस्त्रं सावरत पळू लागले. कारसेवकांचा धावता लोंढा अजून त्या परिसरात येत होता. आता करायचं काय? कुणी तरी वादग्रस्त बाबरी मशिदीच्या दिशेने दगड भिरकावला. पाठोपाठ दगडफेक सुरू झाली.

कुंपणाआडच्या जवानांनी कुंपण ओलांडू पाहणार्‍यांना रोखण्याचा दुबळा प्रयत्न केला. पण तुफान दगडफेकीने त्यांनी पळ काढताच, एकाचवेळी शेकडो कारसेवक तारेचं कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले. पवनकुमार पांडेंचे शिवसैनिक बाबरी मशिदीबाहेर गस्त घालतच होते. त्यांना तर मोकळीच वाट मिळाली. कारण दगडफेकीतून बचाव करण्यासाठी जवानांनी बाबरीतून पळ काढून दरवाजा मोकळा केल्याने, ते मोकाटपणे आत शिरले. या अनपेक्षित घुसखोरीने आतील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीसही पळाले. त्यांना गोळीबाराचा आदेश नव्हता, तर बाहेरच्या केंद्रीय जवानांना लाठीमाराचा आदेश नव्हता. हे सारं जेव्हा घडलं, तेव्हा बरोबर ११ वाजून ५० मिनिटं झाली होती. जय श्रीरामच्या जयजयकाराबरोबर आता आकाश फाडणार्‍या घोषणा होऊ लागल्या.

`राम के काम में टांग जो अडाएगा,
कसम सीधा वो उपर चला जाएगा...`

`तेल लगावो डाबरका... नाम मिटावो बाबरका`

आता बाबरी मशिदीला चारही बाजूने हजारो कारसेवकांचा जमाव अनावरपणे धडका देऊ लागला. त्याने बाबरीभोवतीचं १० फूट उंचीचं आणि ४ फूट रुंदीचं दणकट लोखंडी तारेचं काटेरी कुंपण बघता बघता वाकवलं. ठीक ११.५५ला २५-३० कारसेवक वादग्रस्त वास्तूच्या तीनही घुमटावर चढून श्रीरामाचा जयजयकार करत नोव्हेंबर १९९०च्या कारसेवेत धारातीर्थी पडलेल्या ‘कोठारी बंधू अमर रहे’चा नारा देऊ लागले. याच वेळी ‘राम कथा कुंज’समोरील भाषणबाजी थांबली. त्या भोवतीच्या सार्‍या जमावाचे लाखो डोळे बाबरी मशिदीकडे लागले. एव्हाना मशिदीच्या घुमटावर भगवे झेंडे डौलाने फडकू लागले.

बरोबर बारा वाजले आणि वादग्रस्त बाबरीवर पहिला प्रहार पडताच हजारो कारसेवकांचे हात हाती मिळेल त्या वस्तूने त्या वास्तूला दणादण हादरे देऊ लागले. या हल्ल्याने सव्वाबाराला सुरू होणार्‍या विहिंपच्या कारसेवेचे पुरते बारा वाजले. ते त्यांच्या नेत्यांच्या लक्षात येताच ‘कारसेवा स्थगित करण्यात आलीय,’ अशी घोषणा लाउडस्पीकरवरून देण्यात आली आणि भसाड्या आवाजातली रामधून  सुरू झाली. आपण कारसेवा करण्यासाठी आलो आहोत. वरिष्ठ नेत्यांनी आणि संत-महंतांनी घोषित केलेल्या कारसेवेशी तुम्ही वचनबद्ध आहात, आपण इथं मंदिर बांधण्यासाठी आलो आहोत, याची आठवण ठेवा, अशा सूचना आवाहन मधेच ‘रामधून’ थांबवून लाउडस्पीकरवरून होऊ लागल्या. परंतु अनावर झालेले कारसेवक ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांचं लक्ष्य एकच होतं, मंदिर वही बनाऐंगे.

आता बाबरीपुढचा सारा ‘राखीव भाग’ कारसेवकांनी भरला होता. त्यांच्यात बाबरीत घुसण्यासाठी जोरदार धक्काबुक्की सुरू झाली. ती टिपण्यासाठी पत्रकार आणि फोटोग्राफर धावपळ करत होते. तेवढ्यात, ‘मानस भवन’वरून चेंदामेंदा झालेला कॅमेरे भिरभिरत खाली आले. बस, तितकंच पुरेसं होतं. त्या परिसरात आणि बाबरीच्या चहूबाजूला क्लिक-क्लिकणारे कॅमेरे आणि कॅमेरामन जीवघेण्या संकटात सापडले. ज्यांनी पळ काढला ते वाचले. 

ज्यांना धोक्याची कल्पना आली नाही, त्यांना मात्र जीवघेणा चोप मिळाला. काहींच्या गळ्यावरून चाकूचे वार झाले. पैसे हिसकावून घेतले गेले. गळ्यातल्या सोन्याच्या चेन-आंगठ्या खेचल्या गेल्या आणि त्यांच्या कॅमेर्‍याच्या तर पार चिंधड्या-चिंधड्या झाल्या. शंभराहून अधिक कॅमेरामनना या जीवघेण्या अनुभवातून जावं लागलं. ‘पेपरवाले खोटं लिहितात. वास्तूचा बाबराची मशीद असा उल्लेख करतात. आता तरी खरंखरं लिहितील.’ असं पत्रकार-छायाचित्रकारांना झोडणार्‍यांचं म्हणणं होतं. बीबीसीने ‘अयोध्येत लाठीमार झाल्याची’ चुकीची बातमी दिल्याने, पत्रकार-छायाचित्रकारांच्या या मारझोडीला खुनशी वळण आलं. 

बाबरी मशिदीवर चाल करून जाणार्‍या कारसेवकांचा तोडफोडीचा इरादा तेव्हा तरी नव्हता. गोळ्या खाण्याची तयारी करून ते बाबरीच्या माथ्यावर ठिय्या देऊन बसले होते. त्यांच्या हाती तोडफोडीची कोणतीही हत्यारं नव्हती. पोलिसही स्तब्ध होते. त्यांच्याकडून काहीतरी प्रतिकार होईल, अशी अपेक्षा होती. साधूमहंत अवाकपणे सारं पाहत होते. काही कारसेवकांनी लोखंडी कुंपणाचे फुटाफुटावर लावलेले पोल हाती घेतले. काही ते घेऊन वादग्रस्त वास्तूचं खालचं टेकाड खणू लागले, पण ते निरर्थक होतं. वादग्रस्त वास्तूच्या डोक्यावर बसलेले कारसेवक बसल्या जागी ठोकाठोक करीत होते. पण त्यामुळे शेकडो पावसाळे पचवलेल्या त्या वास्तूचे फक्त कोपरे-कपचे उडत होते.

आता कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी बाबरीत आत शिरण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यांच्यात आणि आत शिरून पराक्रमाच्या निशाण्या असलेल्या दगड-विटा घेऊन परतणार्‍यांत चेंगराचेंगरी होत होती. अजून तरी ती वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्याचा इरादा स्पष्टपणे दिसत नव्हता, पण घुमटावर चढून उतरताना जखमी झालेल्यांची आणि चेंगराचेंगरीत तुडवलेल्यांची संख्या सेकंदासेकंदाला वाढत होती.

आणि अयोध्येत? अवघा आनंदी आनंद पसरला होता. विहिंपवाले इतके दिवस शब्दांची रस्सीखेच करून, ते मंदिर आहे आणि आम्ही त्याचा जीर्णोद्धार करणार आहोत, असं सांगत होते. पण अयोध्येत जमलेले कारसेवक ‘आपण मशीद पाडली’ असं नाचत उड्या मारत सांगत होते. पण हे आपलंच मंदिर हल्लागुल्ला करून पाडणं, कुठल्या शास्त्रात बसणारं होतं? या प्रश्नांची त्यांना फिकीर नव्हती.

सार्‍या अयोध्याभर मशीद पाडण्याचं काम सुरू झाल्याची वार्ता पसरली. अवघी अयोध्या गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघाली. कोसळणार्‍या वास्तूतील दगड-विटा घेऊन माणसं रस्त्यावर नाचत  होती. कुणी त्या वास्तूची माती अंगाला चोपडली होती, तर कुणी लोखंडाचे पोल खांद्यावर घेऊन चालला होता. एकाला ‘हे कुठे घेऊन चाललास?’ असं विचारताच तो म्हणाला, ‘आम्ही अयोध्येतली दुसरी एक मशीद पाडण्यासाठी हे घेऊन जातोय !’

गुलालात न्हाऊन निघालेल्या अयोध्येत आता नाक्या-नाक्यावर साखर-मिठाई वाटपाबरोबर चर्चा ऐकायला मिळत होती, ‘आज का दिन अपना है, जो भी कर ले!’ आणि घडतही तसंच होतं.

इकडे वादग्रस्त वास्तूशी अजूनही कारसेवकांची झोंबाझोंबी सुरू होती. आतली ‘रामलल्ला’ची मूर्ती एव्हाना हलली होती. सोबत आत असलेली बाबरच्या कुकर्माची साक्ष देणारी शिलाही कुणीतरी लांबवली. आतील फोटो, अन्य मूर्तीही बाहेर आल्या. त्या विश्व हिंदू परिषदच्या अयोध्या कार्यालयात गेल्या. पण बाबराच्या नावाची शिला गेली ती गेलीच!

दुपारचा एक वाजला. वादग्रस्त वास्तू अजून कारसेवकांच्या हादर्‍यांना दाद देत नव्हती. जखमींची संख्या मात्र क्षणोक्षणी वाढत होती. कारसेवक कमालीचे अनावर झाले होते, तेवढ्यात डावा डोळा बाहेर लोंबकळणारा कारसेवक पाहून थरकाप उडाला. मानस भवनाच्या तळमजल्यावर हे जखमी कारसेवक उपचारासाठी आणले जात होते. तिथे त्यांची देखभाल करणारे अयोध्यावासी गोपाळदास भेटले. दीड तासापूर्वी ते भेटले होते. गेली चाळीस वर्षं ते अयोध्येत राहातात. ते मूळचे विदर्भातले मराठी. 

त्यांना प्रतिक्रिया विचारताच म्हणाले, ‘आम्ही खूष झालो आहोत. असे प्रश्‍न असेच मिटतात.’ तेवढ्यात कुणीतरी अंगभर माती माखलेल्या १४-१५ वर्षांच्या मुलीला तिथे घेऊन आला आणि त्यांना सांगू लागला. ‘ही अगदी वरपर्यंत चढली.’ गोपाळदासजींनी तिची पाट थोपटली. तेवढ्यात परभणीचा एक कारसेवक पुन्हा बाबरीवर चढण्यासाठी परवानगी मागू लागला. गोपालदासनी त्याला बजावलं, ‘एकदा जाऊन आलास ना, आता पुन्हा नाही.’ तो गयावया करू लागला, तेव्हा त्यांनी त्याला दटावलं आणि ते जखमींवर उपचार करण्याच्या कामाला लागले.

त्या वादग्रस्त बाबरी मशिदीवर चढणं तसं सोपं काम नव्हतं. ८० फूट लांब, ४० फूट रुंद आणि सुमारे ६० फूट उंचीची ती वास्तू. त्यावरचे तुळतुळीत पृष्ठभाग असलेले तीन घुमट अधिक धोकादायक होते. थोडा जरी तोल गेला, तर ६० फूट खाली आदळण्याशिवाय गत्यंतरच नाही. खाली पडलं की, तिथे असलेली कारसेवकांची गर्दी पडलेल्याला तुडवायची. यातच कारसेवक मोठ्या संख्येने जखमी झाले.

सव्वा दीडच्या दरम्यान रामधून  थांबली आणि लाऊडस्पीकरवरून घोषणा झाली. अब रामद्रोही आनेवाले है! गोली खाने के लिए तैयार रहो. जिथे आहात तिथेच बसा. रामद्रोहींना आत प्रवेश करू देऊ नका. अयोध्या प्रवेशाचे सारे मार्ग कारसेवकांनी अडवून ठेवावे.’

लाऊडस्पीकरवरची सूचना बरोबर होती. कारण रॅपिड ऍक्शन फोर्स अयोध्येच्या दिशेने कूच करीत होती. पण रस्त्यावर उभे केलेले अडथळे त्यांना पुढे जाऊ देत नव्हते. त्यांच्यावर तुफान दगडफेक होत होती. मागे हटण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. प्रचंड ताकदीने त्यांना विरोध होत होता. झटपट कारवाईची त्यांची बात आता कुचकामी ठरली होती. कारण चार दिवसांपूर्वीच्या ‘बाबरीला धोका झाल्यास आम्ही अवघ्या तीन मिनिटात ठीकठाक करू,’ या फोर्सच्या प्रमुखाच्या जबानीचे तीन तेरा झाले होते. 

रामकथा कुंजच्या गच्चीवरून आता बाबरीशी झोंबणार्‍या कारसेवकांना नेमक्या सूचना मिळू लागल्या. कारण एव्हाना जमलेल्या नेतेमंडळीत चर्चा होऊन नेमका निर्णय झाला असावा. तसा निर्णय झाला नसता, तर राम कथा कुंजच्या गच्चीवरच्या नेत्यांची आणि साधू महंतांचीही हालत बाबरीसारखीच झाली असती. कारसेवकांनीच त्यांना निर्णय घ्यायला लावला. साधू महंत हे कारसेवकांच्याच बाजूचे होते. गेली ४३ वर्षं या वादग्रस्त वास्तूसाठी लढा देणारे ‘रामजन्मभूमी न्यास’चे अध्यक्ष परमहंस महाराज चित्रलेखाशी बोलताना म्हणाले होते, ‘बाबराने ताकदीने ते मंदिर तोडून मशीद बांधली! आम्हीही मशीद तोडूनच मंदिर बांधू!’ त्यांचेच शब्द खरे ठरले. 

पोलिसांकडून कुठलाच प्रतिकार होत नाही आणि वेळ तर वाया जातोय, तेव्हा कारसेवकांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत होण्याशिवाय गत्यंतर नाही, हे रामकथा कुंजच्या गच्चीवरल्या नेत्यांच्या लक्षात आलं. दोन तासांपूर्वी अनुशासनाच्या घोषणा देणारे नेते आता सूचना देऊ लागले. ‘घुमटावर चढलेल्या कारसेवकांनी त्वरित खाली उतरा. आणि बाजूच्या भिंती फोडायला सुरुवात करा.’ या घोषणा ते हिंदी बरोबर विविध भारतीय भाषांत देत होते. 

सूचना नेमकी मिळाली, पण तापलेले कारसेवक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री माईकवरून बोलू लागले. ‘जे संघ स्वयंसेवक असतील त्यांनी त्वरित खाली उतरा,’ आणि त्या सूचनेला त्वरित प्रतिसाद मिळाला. कारसेवक पटापट खाली उतरू लागले. यावेळच्या कारसेवकात संघाच्या तालमीत तयार झालेल्या कारसेवकांचा भरणा अधिक असल्याने शेषाद्रींच्या सूचनेला त्वरित प्रतिसाद मिळाला.

आता सूचनेची अंमलबजावणी होऊ लागली. दरम्यान गावातून कुदळ, फावडी, पहार आदि तोडफोडीचं सामान आलं होतं. सोबत, कुंपणाचे दणकट लोखंडी पोल होतेच. भिंतीवर दणादण घाव बसू लागले. पंधरा वीसजण लोखंडी पोल खांद्यावर घेऊन बाबरीला जय श्रीराम करत दणके देऊ लागले. मातीविटांची ती भिंत या प्रचंड दणक्यांना किती सामना देणार? भिंतीला भगदाडं पडत होती. तीन घुमटांची ती वास्तू. दुपारी सव्वादोनच्या सुमारास दक्षिणेकडील घुमटाखालच्या भिंती कोलमडल्या आणि गेली ४५० वर्षं मिरवणारा एक घुमट जमीनदोस्त झाला. ‘जय श्रीराम’च्या घोषणेने आसमंत दुमदुमला. ‘कोठारी बंधू अमर रहे’चा नारा झाला.

उमा भारती आणि ऋतंभरा घणाघाती भाषण करत होत्या. धर्माचा अर्थ सांगत होत्या. कारसेवक तापत होते. बाबरीला धडका देत होते. और एक धक्का जोरसे दे दो असा आवाज ॠतंबरा देत होत्या आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणेत कारसेवकांच्या खांद्यावरचे लोखंडी पोल बाबरीवर आदळत होते. ॠतंभरा अधूनमधून ‘कॉमेंट्री’ सांगावी तशी चाललेल्या तोडाफोडीची आणि रामजन्मभूमी लढ्याची माहिती देत होत्या. एव्हाना बाबरी भोवतीच्या भागात लाखो बघ्यांची गदी जमली होती. ‘राम कथा कुंज’ समोरचे लाखो कारसेवक रामनामाचा गजर करीत इतिहास बदलवणारी ऐतिहासिक घडामोड आपल्या डोळ्यांत साठवत होते.

आणि ही वार्ता जगभर पोचवणारे पत्रकार छायाचित्रकार मात्र आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षेसाठी पोलीस कंट्रोल रूममधे जमले होते. वार्ता पोहोचवणार तरी कशी? अयोध्येची ‘सी.टी.ओ’ यंत्रणा ठप्प झाली होती. कारसेवकांनी टेलिफोन लायनी तोडल्या होत्या आाणि सहा किमीवर असलेल्या फैजाबादला जाणं, एव्हाना धोक्याचं झालं होतं. मी अजूनही नियोजित राममंदिराच्या चौथर्‍याच्या ‘राखीव’ भागात होतो. सारी तोडफोड डोळ्यांनी पाहात होतो. परंतु कॅमेर्‍याने ते टिपण्याची हिंमत होत नव्हती. आगाऊपणा करून तेवढी हिंमत केली असती तर, जे फोटो मिळाले तेही गेले असते आणि लिहिण्यासाठी हातही इतका चालला नसता.

तासाभराची तोडफोड पाहिल्यानंतर फोटोग्राफरसह ‘मानस भवन’मधील आमच्या रूमवर गेलो. कारण फोटो काढलेले रोल सुरक्षित ठेवायचे होते. दार ठोठावलं. उघडलं. तर आत दोन परदेशी तरुणी थरथरत असलेल्या दिसल्या. आम्हाला पाहून आणखीन घाबरल्या होत्या. त्यांच्याशी बोलल्यावर, आम्ही ज्या बिहारच्या पत्रकाराबरोबर तिथे राहात होतो, त्याने त्यांना आसरा दिल्याचं कळलं. 

दोघीही इटालीच्या पत्रकार होत्या. असली धाडसं त्यांना नेहमीची होती. पण कारसेवक छायाचित्रकारांची आणि त्यातही विदेशी पत्रकार छायाचित्रकारांची पिटाई करीत असल्यामुळे त्या कमालीच्या बिथरल्या होत्या. आम्ही धोका पत्करून त्यांना ‘इथे निवांत राहा’ म्हणून सांगितलं. डोक्यावर म्हणजे मानस भवनच्या गच्चीवर पेटलेले आणि समोर तोडफोड करणारे कारसेवक असूनही ‘आमचं निवांत राहा’ म्हणून सांगणं त्यांना पोकळ वाटत नव्हतं. कारण भारतीय संस्कृतीची त्यांना चांगली माहिती होती. 

आम्ही खाली उतरलो, तर आणखी एक अमेरिकन युवती पत्रकार घाबरलेल्या स्थितीत मानस भवनच्या कार्यालयात दिसली. आम्ही तिला ‘आमच्या रूमवर चल,’ म्हणून सांगितलं खरं, पण तिथपर्यंतची १०० पावलं चालणं अधिक धोकादायक वाटत होतं. ती सांगत होती, ‘मला लागलं तरी चालेल, पण सोबतच्या कॅमेर्‍याचं नुकसान होऊ देऊ नका.’ तो कॅमेरा आम्ही एकाच्या खांद्यावर दिला आणि चालू लागलो. दरम्यान, २०-२५ जणांच्या टोळक्याने आमचा पिच्छा केलाच. तिला रूममधे सोडून त्यांना आम्ही बजावलं आणि पुन्हा कोसळणार्‍या वास्तूपुढे आलो. 

दुपारचे साडेतीन वाजले होते. उत्तरेकडच्या घुमटाच्या खालच्या भिंतींनी माना टाकल्या आणि तोही घुमट कोसळला. या घुमटाखालच्या भागात कौसल्याची रसोई होती. कोसळणारा घुमट १००-१२५ जणांना घायाळ करून जाई. परंतु वाचलेले कारसेवक त्यांना श्रीरामाचा जयघोष करीत तातडीने उपचारासाठी धावत नेत.

अजून शेवटचा घुमट आणि त्याखालचा भाग शिल्लक होता. कोसळलेला ढिगारा बाकीचे कारसेवक जलदगतीने साफ करीत होते. तसं करणं कठीण नव्हतं. कारण त्या ढिगार्‍यातील दगड, माती, विटा केव्हाच पराक्रमाच्या निशाण्या झाल्या होत्या. त्या मिळवण्यासाठी कारसेवकात चढाओढ लागायची. त्या दगड विटा मिळणारे कारसेवक डोक्यावर हातात घेऊन बेहोष नाचत होते.

उरलेल्या शेवटच्या घुमटाखालचा भाग म्हणजे ‘गर्भगृह’. कारसेवकांची आणि त्यांच्या नेत्यांची ‘रामजन्मभूमी!’ हा घुमट इतर दोन घुमटांपेक्षा दीडपटीने मोठा होता. संध्याकाळी ४.५५ वाजता तोही कोसळला. श्रीरामचा गगनभेदी जयजयकार झाला. `सियावर रामचंद्र की जय`बरोबरच `अब काशी मथुरा बाकी है`चा नारा दुमदुमला.

साडेचारशे वर्षांची वास्तू गेली साडेचार दशकं वादग्रस्त झाली होती. गेली साडेचार वर्षं तिच्याभोवतीच्या मंदिर-मशीद वादाने सरकार, न्यायालय, प्रशासन यंत्रणा यांना पार खिळखिळं करून टाकलं होतं. रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरण हा राष्ट्रीय राजकारणाचा मुख्य प्रश्न झाला होता. त्याचा निकाल कारसेवकांनी अवघ्या साडेचार तासांत लावून टाकला! हा कुणाचा विजय? कुणाचा पराभव?

हे प्रश्न विचारायचे कुणाला? देशभर सध्या एक चर्चा आहे, एवढी टोलेजंग वास्तू इतक्या कमी वेळात भुईसपाट झाली कशी?  काहींना वाटतंय फक्त घुमटच पाडले! पण खरंच, सारी वास्तू रामनामाच्या गजरात भुईसपाट झाली. आम्ही डोळ्यांनी बघितली. लाखो डोळ्यांत ती साठवली. हे पाडणारे कोण होते? पाडणारे सारेच कारसेवक होते का? आता अयोध्येहून परतणारा प्रत्येकजण हाती पराक्रमाच्या दगड विटा नाचवीत वादग्रस्त वास्तू पाडण्यात आपण कसे आणि कुठे होतो, ते रंगवून रंगवून सांगतो. पुढेही सांगत राहातील.

जे सुरुवातीला बाबरीवर चढले, ते बाबरी भुईसपाट करण्याच्या इराद्याने चढले नव्हते. पोलिसांकडून काहीच प्रत्युत्तर मिळेना, तेव्हा तेही गोंधळून गेले होते. विहिंपने कारसेवेच्या सुjवातीसाठी ज्या कारसेवकांच्या तुकड्या घोषित केल्या होत्या. त्यात आघाडीवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान राज्यातील कारसेवक मोठ्या संख्येने  होते. महाराष्ट्राच्या तुकडीत परभणी, पुणे, सातारा, सांगली या भागातील कारसेवक अधिक संख्येने होते. घुसखोर कारसेवकांनी वादग्रस्त वास्तूवर चढाई केल्यावर त्यांना घोषणा टाळ्यांनी बळ देण्याचं काम या कारसेवकांनी केलं. आघाडीवर असल्याने त्यांनी पराक्रमाच्या दगड विटाही मिळवल्या.

डोक्यावरचा सूर्य पश्चिमेला झुकला. अयोध्येत या दिवसात संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार होता. वादग्रस्त वास्तूमधे जिथे ‘रामलल्ला’च्या मूर्ती होत्या, ती जागा झटपट साफ करण्यात आली. तोडाफोडीच्या वेळेस हलवलेल्या ‘रामलल्ला’च्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. ‘जय श्री राम’चा जयघोष होऊ लागला. रात्र झाली तरी कारसेवक हटेनात. कारण आता वादग्रस्त वास्तूचे भग्नावशेष हटवण्याचं आणि तिथे छोटंसं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं होतं. निर्णय पटापट घेतले जात होते.

वादग्रस्त वास्तू पाडणारे आपल्या कॅम्पसमधे परतत होते. बरेचसे कारसेवक आता काही घडणार नाही. अशी अपेक्षा बाळगून आपल्या निवासस्थानी विश्रांतीसाठी जात होते. सोमवार ७ डिसेंबरचा सूर्य उगवण्यापूर्वीच वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागेवर छोटंसं मंदिर उभारलेलं दिसत होतं. निश्चयी मनाचे हात किती जलदगतीने ध्येय पूर्ततेपर्यंत पोहोचतात, याचा तो साक्षात्कार होता.

अयोध्येतील काही भाग मात्र सहा डिसेंबरच्या रात्री आगीच्या विळख्यात होता. सोमवारी सकाळपासून गच्च भरलेली अयोध्या हळूहळू ओसरू लागली. अयोध्येसह आजूबाजूच्या फैजाबाद-लखनौ परिसरात कर्फ्यू होता, पण कारसेवकांसाठी तो माफ होता. कारसेवक परतीच्या प्रवासात घोषणा देण्याचे टाळत होते. फैझाबाद स्थानकावरून सुटणार्‍या रेल्वे गाड्या गच्च भरून निघत होत्या. टपावरही कारसेवक बसले होते. इंजिनात, इंजिनावर आणि इंजिनाच्या पुढेही कारसेवक लोंबकळत होते. इथवर त्यांचा विजयी उत्साह ओसंडून वाहत होता. 

लखनौ येताच मात्र त्याला ओहोटी लागायची. डोक्यावरच्या ‘गर्वसे कहो’च्या पट्ट्या आणि रामनामाचे दुपट्टे, शाल दिसू नयेत अशाप्रकारे बॅगबंद होत होत्या. बाबरीच्या दगड विटांची लपवाछपवी तशीच होती. कारण परतीचा प्रवास जरा धोक्याचाच होता. वाटेवर मोहल्ले होते. आपण केलेल्या पराक्रमाची प्रतिक्रिया देशभर काय उमटली असेल, याचा अंदाज अयोध्येत येत नव्हता. कारसेवकांप्रमाणे बरेच नेतेही एव्हाना अयोध्या सोडू लागले होते. कदाचित उद्याचा अंदाज त्यांना आजच आला असावा. 

अयोध्येत असलेल्या कारसेवकांनी मात्र नवीन मंदिराचं दर्शन घेण्यातच सोमवार घालवला. रामनामाचा जयघोष क्षीण होत चालला होता, पण अफवांना उधाण आलं होतं. विहिंप भाजपने त्यांच्या नेत्यांच्या अटकेपासून ते अगदी काँग्रेसच्या नरसिंह राव यांचं केंद्र सरकार कोसळण्यापर्यंतच्या अफवा पसरवल्या होत्या. दिल्ली, मुंबई, सुरत ही शहरं पेटल्याच्या आणि कापाकापीच्या बातम्यांना तर ऐकणारे कान हजार, अशी परिस्थिती होती. सोमवारपासूनच कारसेवकांनी आपला गाशा गुंडाळायला प्रारंभ केला होता. पण अजून वरिष्ठांकडून सूचना येत नव्हती. 

८ डिसेंबरच्या मंगळवारी पहाटे ‘रॅपिड ऍक्शन फोर्स’ने काही मिनिटांच्या कारवाईत ‘रामलल्ला’च्या नवीन मंदिराभोवती घेरा घातला आणि कारसेवकांना पिटाळलं. कारसेवकांनीही फारसा प्रतिकार केला नाही. उलट, उरलेल्या कारसेवकांनी झटपट अयोध्या सोडली. रेल्वेनेही त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी भरपूर गाड्या सज्ज ठेवल्या होत्या.

रॅपिड ऍक्शनची ही झटपट कारवाई अवाक करणारी होती. ही कारवाई बाबरीवर कारसेवकांनी चढाई केली, तेव्हा का नाही झाली? रॅपिड ऍक्शन फोर्स त्या दिवशी अयोध्येतच का नाही राहिलं? ते आदल्या दिवशी फैजाबादेत का परतलं? हे प्रश्न मला तरी पडले नाहीत. कारण सहा डिसेंबरच्या चार दिवस आधी बुधवारी रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडंट सारस्वत हे ‘दिगंबर आखाड्या’पुढे भर रस्त्यात परमहंसजीच्या आणि खासदार महंत अवैद्यनाथजींच्या पाया पडताना मी पाहिले होते. तेही वर्दीमधे! 

हेही वाचा : 

 

बदललेल्या दिवाळी फराळाची गोष्ट

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!

भानू अथैय्याः भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत.)