मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतले सहा मुद्दे

०४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला तासाभराची मुलाखत दिलीय. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी काँग्रेससोबत गेलो म्हणजे काँग्रेस सोडलं असं नसल्याचा दावा केला. तसंच सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण विधान परिषद लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. या मुलाखतीतले सहा ठळक मुद्दे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचं मुखपत्र सामनाला तासाभराची सविस्तर मुलाखत दिलीय. कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय. ३ आणि ४ फेब्रुवारी २०२० च्या सामनामधे सलग दोन दिवस पहिल्या पानावर ही मुलाखत छापून आलीय. उद्या ५ फेब्रुवारीला तिसरा भाग येणार आहे.

हिंदुत्वाचं काय झालं, बुलेट ट्रेनचं काय करणार, काँग्रेससोबत हातमिळवणी का केली यासारख्या प्रश्नांवर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. ‘सामना’त या मुलाखतीला जोरदार धमाका करणारी मुलाखत असं संबोधण्यात आलंय. या मुलाखतीतले सहा महत्त्वाचे मुद्दे.

हेही वाचाः मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?

१) वचनपूर्तीसाठी कोणतंही थर गाठणार

शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी तत्त्वाला आणि ठाकरे कुटुंबाच्या परंपरांना मुरड घालावी लागलेलं चालेल का असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘त्या वचनपूर्तीसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट स्पष्ट करतो, माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. ते पाऊल त्या दिशेने टाकताना मी मनाशी ठरवलंय की कोणत्याही थराला जायचं पण मी माझ्या वडलांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय आणि ते मी करणारच.’

‘शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात कधी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारलेलं नाही. माझीही तशी इच्छा नव्हती, अजिबात नव्हती. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की, ज्यांच्यासोबत आपण आहोत, किंवा होतो त्यांच्यासोबत राहून मी माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने जाऊ शकत नाही आणि त्या वचनपूर्तीसाठी वेगळी दिशा मला स्वीकारायची असेल तर तशी तयारी असायला हवी. त्यासाठी मला ही मोठी जबाबदारी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसेल तर माझा नाइलाज होता. ती जबाबदारी स्वीकारावीच लागेल.’

२) ही नाती अशी का तुटली?

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आपला छोटामोठा भाऊ असा करायचे. पण हे नातं टिकलं नाही. याबद्दल ठाकरे म्हणाले, 'हे नातं टिकवण्याचा प्रयत्न दोन्हींकडून व्हायला हवा होता. माझ्याकडून तरी ते नातं टिकवण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला.' या दोन भावांच्यामधे कात्रीत मी पकडलो गेलो.'

‘माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं. असं काय मी मोठं मागितलं होतं. आकाशातले चांदतारे मागितले होते की काय मागितलं होतं. मी तर लोकसभा निवडणुकीआधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरलं होतं तेवढंच मागितलं होतं.’

हेही वाचाः युरोपियन युनियनशी फारकतीनंतर ब्रिटनमधे होणारे हे बदल माहीत आहेत?

३) हिंदुत्वाशी तडजोड नाही

‘मी आजही सांगतो, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याकरता जन्माला आली. मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर देशातल्या हिंदूंवर गंडांतर येतंय असं शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आलं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला. १९८७ ची पोटनिवडणूक ही कदाचित पहिली निवडणूक असेल, जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केवळ लढलीच नाही तर जिंकलीही असेल.’

‘मग भाजप सोबत आला. त्यानंतर जे काय घडलं, मग रथयात्रा असेल वगैरे वगैरे करत दोन समविचारी पक्ष एकत्र आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही. आजही आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही.’

भाजपकडून शिवसेनेने सत्तेसाठी आपली तत्त्वं सोडलीत आणि मुख्य म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केलीय, असा आरोप होतो. याविषयी ठाकरे म्हणाले, 'मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रम्ह वाक्य आहे की काय?  की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.'

४) काँग्रेसशी हातमिळवणी का केली?

शरद पवार आणि सोनिया गांधी हे दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. कालपर्यंत तुम्ही सगळे एकमेकांवर टीका करत होतात. आज आपण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आहात. याच्यावर भारतीय जनता पक्ष सातत्याने टीका करतोय, असं सांगितल्यावर ठाकरे म्हणाले, 'ठीक आहे ना. करू द्या त्यांनी टीका. पण मग माझा प्रश्न असा आहे, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबत हात मिळवता तर काय फरक पडतो. त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवर होते ना?' 

५) विधानसभा की विधानपरिषद?

‘तुम्हाला विधानसभेत जायला आवडेल की विधानपरिषदेत या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, तुम्हाला सांगू का. मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोनचार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून.’

‘मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन. ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घ्याव्या लागतील. जबाबदारी पार पाडण्यासाठी विधानसभेतल्या कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं. मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलोय.’

हेही वाचाः आता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का?

६) बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही?

‘सरकारचं काम विकास करणं आहे. बरोबर आहे. अलीकडेच मी मंत्रालयातून विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. कामं सुरू आहेत हेही खरं आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिलीय. जरूर दिलीय. मला नेहमी असं वाटतं की, आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे.’ 

‘आताच्या आता काय ताबडतोबीने गरजेचं आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या. पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही.’

‘बुलेट ट्रेनबद्दल सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला हवं. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचं ते.’

हेही वाचाः 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

शेतकऱ्यांच्या पदरात सरसकट कर्जमाफी की सरसकट फसवणूक?

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती