टी२० महिला क्रिकेट वर्ल्डकपमधे भारताची सारी भिस्त या पाच जणींवर

२१ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय.

क्रिकेट म्हटलं की आपल्याला काय आठवतं? बॅट, बॉल, स्टंप, मैदान आणि मॅच खेळणारे खेळाडू. यातले आपले आवडते खेळाडू कोणते असतात? राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, महेंद्र सिंग धोनी की विराट कोहली? यापैकी कुणीही कुणालाही आवडत असो. सगळ्यांचा आवडता एक खेळाडू असतोच आणि तो म्हणजे सचिन तेंडुलकर. अनेकदा तर क्रिकेट म्हटल्यावर त्याचंच नाव तोंडात येतं. काहींसाठी तो क्रिकेटचा देवही आहे.

सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगला तोड नाही हे खरंच आहे. पण सचिनचाही रेकॉर्ड तोडणारा एक खेळाडू भारतात आहे आणि ही खेळाडू म्हणजे भारताच्या महिला क्रिकेट टीममधली शेफाली शर्मा. आजपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपमधे तिच्यासकट अजून ४ खेळाडूंकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय.

हेही वाचा : शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

१६ वर्षांची शेफाली करणार ओपनिंग

वुमन क्रिकेटमधे विशेष लक्ष वेधून घेणारी खेळाडू म्हणजे शैफाली शर्मा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे कमी वयातच अर्धशतक झळकवण्याचा माग सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आता ही जागा शैफालीनं पटकावलीय. अवघी १६ वर्षांची शैफाली यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधे स्मृती मंधाना हिच्यासोबत ओपनिंग बॅट्समन म्हणून पिचवर उतरेल.

गेल्या तीन वर्षांपासून स्मृती मंधाना वूमन्स टीममधली महत्त्वाची खेळाडू आहे. टीमची ओपनिंग बॅट्समन म्हणून ती दमदार खेळते. २०१६ आणि २०१८ च्या टीट्वेंटी वर्ल्डकपमधे तिने तिचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. सध्या स्मृती वुमन्स टीमची उपकर्णधारही आहे.

पण तिच्यासोबत ओपनिंगला खेळण्यासाठी एका चांगल्या खेळाडूचा शोध सुरू होता. हा शोध शैफाली शर्मामुळे संपला. अगदी सहजपणे मोठे शॉट्स मारण्याच्या शैफालीच्या स्किलमुळे फार थोड्याच काळात तिनं स्वतःचं स्थान टीममधे पक्क केलंय. शैफाली आणि स्मृती दोघींमुळे भारताची ओपनिंग बॅटिंग दमदार होईल यात शंका नाही.

ऑलराऊंडर दिप्तीही सज्ज

शैफाली आणि स्मृती एक आणि दोन नंबरच्या बॅट्समन म्हणून. याला क्रिकेटच्या भाषेत टॉप ऑर्डर बॅट्समन असं म्हणतात. ही टॉप ऑर्डर जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची मिडल ऑर्डर म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला येणारे प्लेअर. टीममधे ही महत्त्वाची जबाबदारी यावेळी जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या खांद्यावर आहे. टी२० वर्ल्डकपमधे जेमिमा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

जेमिमानं आत्तापर्यंत ३९ टी ट्वेंटी मॅचेसमधे ११४ स्ट्राइक रेटसोबत ८४५ रन्स काढलेत. या ३९ मॅचमधे तिने चक्क ६ वेळा हाफ सेंच्युरी मारलीय. पण अलीकडेच्या काही सिरिजमधे तिचा खेळ तितकासा चांगला नव्हता. असं असलं तरी मोठ्या आणि महत्त्वाच्या टूर्नामेंटमधे ती नेहमीच चांगली खेळलीय.

भारतीय टीमची बॅटिंग सेफ झालीय हे तर आता स्पष्टच आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंग आणि फिल्डिंगमधेही तरबेज असलेली दिप्ती शर्मा टीम इंडियामधे आहे. तिच्या स्पिनवर टीम इंडियाची खूप सारी भिस्त आहे. एका वन डे मॅचमधे तिने सेंच्युरीही ठोकलीय. रन्सबरोबरच विकेट काढत भारतीय टीमला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणं तिला चांगलंच जमतं.

या सगळ्यांना लीड करणारी कॅप्टन हरमनप्रीत कौर ही भारतीय टीममधली सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. हरमनप्रीत मिडल ऑर्डरवर खेळायला येते. टीमला गरज पडेल तसा ती आपला खेळ बदलू शकते. त्यामुळेच तिच्याकडे फक्त कॅप्टन म्हणून पाहिलं जात नाही. तर टीमला सावरणारी खेळाडू म्हणूनही टीमला तिचा आधार वाटतो.

हेही वाचा : महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

पहिलीच मॅच ऑस्ट्रेलियासोबत

२००९ मधे वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरवात झाली. इंग्लडने पहिला विश्वविजेता म्हणून बाजी मारली. नंतर २०१०, २०१२ आणि २०१४ अशी सलग तीन वर्ष ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला. २०१६ मधे मात्र वेस्ट इंडिजच्या वुमन्स टीमनं वर्ल्ड कप खेचून घेतला. त्यानंतर पुन्हा २०१८ मधे ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियातली वुमन क्रिकेट टीम आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपची चॅम्पियन मानली जाते.

अशा मजबूत टीमबरोबरच आज भारताची पहिली मॅच होणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियासोबत टीम ए मधे भारत, न्युझीलंड, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांचा समावेश असेल. टीम बीमधे इंग्लड आणि वेस्ट इंडिज अशा दोन वर्ल्ड कप विजेत्या टीम आहेत. त्यासोबत साऊथ आफ्रिका, पाकिस्तान आणि थायलंडही टीम बी मधे आहेत.

महिला दिनाला होणार फायनल

एकूण १० टीम या वर्ल्ड कपमधे सामील आहेत. टीम ए मधल्या उरलेल्या ४ टीमबरोबर भारताला मॅच खेळावी लागेल. यापैकी निदान तीन मॅच भारतला जिंकाव्या लागतील. तरच भारत सेमीफायनलमधे एन्ट्री मारू शकेल. टीम ए मधले दोन देश आणि टीम बी मधले दोन देश यांच्यात सेमीफायनल होईल आणि मग सेमीफायनल मधे जिंकलेल्या टीमची फायनल मॅच महिला दिनाच्या दिवशी म्हणजे ८ मार्चला होईल.

भारत पहिल्यांदाच या वर्ल्ड कपमधे फायनलला जाण्याच्या आणि जिंकण्याच्या तयारीनं उतरलाय. याचं कारण असं की यंदा भारताच्या टीममधे २ दमदार बॉलर आणि ३ स्पिनर आहेत. टीट्वेंटीत सर्वाधिक विकेट घेणारे पुनम यादव सारखे खास खेळाडू आहेत. त्यामुळे यावेळंच्या वर्ल्ड कपकडे आणि शैफाली शर्मा, स्मृती मंधाना, दिप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज या पाच खेळाडूकडे लक्ष लागून राहिलंय.

हेही वाचा : 

भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर