पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

०२ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही.

आजही आराधना अनेकांच्या आठवणीत आहे. त्याची कथा, त्यातली गाणी आणि कलाकारांचा अभिनय सारंच मनाला भिडणारं होतं. आराधनासूनच हिंदी सिनेसृष्टीत राजेश खन्ना नामक झंझावात सुरु झाला. ओळीने १७ यशस्वी सिनेमा देऊन हा मनस्वी कलाकार सुपरस्टार पदावर पोचला.

किशोरकुमार पार्श्वगायक म्हणून सर्वांच्या मनात रुजला तो कायमचा. त्याचं युग त्याच्या मृत्यूपर्यंत सुरु राहिलं तर शर्मिला टागोर एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून सर्वांच्या मनात भरली. डायरेक्टर शक्ती सामंताने दर्जेदार आणि भावोत्कट सिनेमा देणारा डायरेक्टर या नात्याने जम बसवला.

आराधनाच्या स्टोरीत नेमकी जादू काय?

खरं तर आराधनामधे विवाहपूर्व संबंधातून आई झालेल्या युवतीची होरपळ दाखवण्यात आली. हा विषय तेव्हा वेगळा आणि आव्हानाचा होता. वंदना त्रिपाठी या मुलीची भूमिका शर्मिलाने लाजवाब वठवली. उत्तरार्धात तिला वृद्ध आईची भूमिकाही निभवावी लागली आणि हे आव्हान तिने लीलया पेललं. अनेक तऱ्हेच्या भावभावना व्यक्त करणारे प्रसंग होते. तिने या संधीचं सोनं केलं आणि त्यावेळच्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार तिलाच लाभला. हा सर्वांगसुंदर सिनेमा अर्थातच सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मानकरी ठरला.

विशेष म्हणजे आराधना तसा नायिकाप्रधान सिनेमा असूनही नवागत राजेश खन्ना भाव खाऊन गेला. त्याचे याआधी तीन-चारच सिनेमे येऊन गेले. शक्ती सामंताने त्याला हा सिनेमा दिला. याचं कारण होतं ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या अभिनय स्पर्धेत राजेश खन्ना विजयी ठरला होता त्याचे ते एक परीक्षक होते आणि विजेत्याला आपल्या सिनेमातून संधी देण्याचं परीक्षकांनी आधीच मान्य केलं होतं.

यातूनच हा सिनेमा जतीन उर्फ राजेश खन्नाकडे आला होता. यात तो सुंदर तर दिसलाच होता. त्याने आपल्यात राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद या अस्ताला आलेल्या त्रिमूर्तीकडून थोडं थोडं घेऊन आपला अभिनय पेश केला. त्याची ही नवी स्टाईल प्रेक्षकांना खूपच पसंत पडली.

हेही वाचा : पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट

किशोरचा आवाजही झाला लोकप्रिय

भरीला यातली सगळी गाणी सुमधूर आणि सहज ओठावर राहतील अशी होती. संगीतकार होते सचिनदेव बर्मन. पण त्यांनी आपल्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपला मुलगा पंचम म्हणजे राहुलदेवला सोबत घेतलं होतं. त्याने पार्श्वसंगीत सांभाळताना चक्क काही गाणीच तयार करून दिली. सचिनदेवनी मोहम्मद रफीवर भरवसा ठेवला. पण पंचमने किशोरकुमारला संधी द्यायचं मनावर घेतलं.

किशोरकुमारनेही गंभीरपणे ही ऑफर घेत राजेश खन्नाशी मुद्दाम बोलून, गप्पा मारून त्याचा आवाज, त्याची ढब, त्याच्या सवयी समजून घेतल्या. त्याने गायलेली गाणी खरंच राजेश खन्नाच गातोय असं वाटलं पाहिजे. एवढी मेहनत किशोरने घेतली होती आणि पुढे राजेश खन्ना यशोशिखरावर गेल्यावर साहजिकच किशोरचा आवाजसुद्धा लोकप्रिय झाला आणि पुढे या जोडीने भरपूर हिट गाणी दिली.

रिटेक न घेता गाण्याचं चित्रीकरण

किशोर अन्य अभिनेत्यांसारखा आवाजात गाण्यात माहीर असल्याने तो सर्वच संगीतकारांसाठी आवश्यक बनला. तो मूळात कलाकार असल्याने आणि त्याचा आवाज सहज फिरता असल्याने त्याचंही युग सुरु झालं. रूप तेरा मस्ताना या गाण्याची चाल किशोरकुमारनेच एका बंगाली गाण्यावरून सुचवली, हे विशेष. हे गाणं चित्रित होताना साडेतीन मिनिटात एकही रिटेक न घेता चित्रित झालं.

ही राजेश खन्ना आणि शर्मिलाची कमाल होती. तर मेरे सपनों की रानी गाण्याने धूम माजवली. त्याचे चित्रीकरण टॉय गाडीचा वापर करत झालं होतं. शर्मिला या गाडीतल्या खिडकीत बसलेली असते आणि बाजूच्या रस्त्यावरून उघड्या जीपमधून नायक राजेश खन्ना हे गाणं आपल्या स्टाईलने गाताना दाखवला होता. या गाण्यासाठी किशोर कुमारलाही फिल्मफेअर पुरस्कार लाभला.

हेही वाचा : नवाब मलिक यांच्यासारखा सेनापती राष्ट्रवादीनं डावलायला नको

पन्नास वर्षांपूर्वी १८ कोटींचा गल्ला

सिनेमाची कथा हिमालयाच्या पार्श्वभूमीवर घडताना दाखवल्याने छायाचित्रणही देखणं झालं होतं. ही कथा होती सचिन भौमिक यांची. १९४६ च्या ‘टू इच हिज ओन’ या इंग्रजी सिनेमावरून त्यांनी ही कल्पना सुचली. पण त्यांनीच एक श्रीमान एक श्रीमती या सिनेमाचा अखेरही असाच केल्याचे तो पाहताना शक्ती सामंताना जाणवलं आणि त्यांनी आराधना न करायचं ठरवलं होतं. त्याचवेळी लोकप्रिय हिंदी लेखक गुलशन नंदा आणि मराठी नाटककार मधुसूदन कालेकर त्यांना भेटायला आले होते.

नंदा सामंतांना कटी पतंगची कथा सांगायला आले होते. ती कथा सामंता यांना खूपच आवडली. पण नंदा यांनी सामंतांना त्यांच्या अडचणीतून सोडवायचं ठरवलं आणि त्यांनी आराधना जरूर करायला सांगताना यातील नायक आणि पुढे त्याचा मुलगा मोठा होतो, या दोन्ही भूमिका एकाच कलाकारला म्हणजे राजेश खन्नाला द्यायचं सुचवलं आणि मग पुन्हा कथा लिहून घेत शक्ती सामंतांनी उत्साहात हा सिनेमा तयार केला.

याचं तुफान स्वागत झालं. आज म्हटलं जातं या सिनेमाचा धंदा १८ कोटींच्या आसपास झाला. ही गोष्ट ५० वर्षांपूर्वीची आहे. यावरून सिनेमा किती चालला याची कल्पना यावी. अनेकांनी आपल्या नुकत्याच जन्मलेल्या कन्येचे नाव आराधना ठेवलं. काही दुकानं, फोटो स्टुडिओ यांचीही नवं आराधना ठेवली गेली.

सुफल संपूर्ण कलाकृती

टॉम आल्टर हा ब्रिटीश युवक केवळ आराधना बघून पुण्याला अभिनय शिकायला पोचला आणि पुढे मोठा अभिनेताही झाला. या सिनेमाचे गीतकार आनंद बक्षी हेसुद्धा यानंतर फॉर्मात आले. या सिनेमात एका छोट्या भूमिकेत सुभाष घईही होता. तेव्हा तो अभिनेता होण्यासाठी धडपडत होता. पुढे मोठा डायरेक्टर झाला.

राजेश खन्नाचा सुपरस्टार हा प्रवास या सिनेमापासून सुरू झाला. तो सांगायचा, आराधना हिरोईनचा सिनेमा होता. पण मी पतली गलीसे निघालो. भाव खाऊन गेलो. ‘आराधना’ म्हटलं की, लगेच राजेश खन्नाची आठवण येते हे बाकी खरंय. शर्मिलाचं तर कौतुक आहेच. तिने तरुण असून तेव्हा वृद्ध दिसायला नकार दिला नव्हता. हा तेव्हा साहसी निर्णय होता. आराधना अनेकांसाठी सुफल संपूर्ण अशी कलाकृती ठरली, यात वाद नाही.

हेही वाचा : 

इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं

महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अक्किथम नेमके आहेत कोण?

संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच