मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

०६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना मानवंदना द्यायला मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. खेड्यापाड्यातून एक दोन दिवस आधीपासूनच आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर यायला लागते. ६ डिसेंबरच्या पूर्वरात्री चैत्यभूमीवर जागवलेली एक रात्र.

‘कशासाठी आलोय विचारताय? साजरं वाटतंय न इथं आल्यावर’

हे साजरं वाटणं सिंधूताई आणि तिच्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. सगळ्या जणी हिंगोली जिल्ह्यातल्या एका लहान गावातून इथं आल्यात. दरवर्षी येतोत म्हणाल्या. रापलेला चेहरा, कपाळभर कुंकवाचा बंदा, नऊवारी साड्या. सिंधूताईसोबत पार्वतीबाई जाधव, अरुणाबाई वाकळे, शकुंतला जाधव, वैशाली जाधव अशा सगळ्या झोपायला निघाल्या होत्या. सगळ्या जणींच्या हातामधे जाडजूड पुस्तकं बघून त्यांच्याशी बोलायचा मोह आवरेना.

‘थोडं बोलायचंय’ म्हणत त्यांना थांबवलं. जरा कोड्यात पडल्यागत चेहरा झाला त्यांचा. मी विचारलं, ‘वामनदादांची गाणी आवडतात काय तुम्हाला?’ वैशालीताई खुशीत येत म्हणाल्या, ‘आम्ही म्हणतो की पुस्तकातली गाणी.’ मी लगेच म्हणालो, ‘मग म्हणा की एखादं.’ तशा तोंडाला पदर लावत कावऱ्याबावऱ्या झाल्या. सगळ्या जणी एकमेकीला आग्रह करू लागल्या. मी सगळ्या जणींकडे लकडा लावल्यावर सिंधूताईंचा गाता गळा मोकळा झाला. गाऊ लागल्या, 

‘नव्हताच थारा नी नव्हता निवारा 
जीवनोद्धारी दाविला किनारा 
होऊनी उजाळा चमकला तो तारा 
हिरा कोहिनुरी क्रांतीचा अंगारा 
ज्योत जळे अंधारी ज्ञानप्रकाशाची 
गाऊ थोरवी थोर बुद्धदैवताची’

सिंधूताई खड्या आवाजात स्वरचित गाणं गाऊ लागतात. मैत्रिणी त्यांच्या सुरात सूर मिसळतात. आसपासचे येणारे जाणारे लोकही ऐकण्यासाठी गर्दी करतात. सिंधूताईंच्या हातात ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हे बाबासाहेबांचं पुस्तक होतं. हे कुणासाठी आणलं विचारल्यावर म्हणाल्या, ‘घरी जाऊन लेकाला आणि सुनंला वाचायला देणार. दोघबी बारावी झाल्यात.’ वैशालीताईनी भीमगीतांचं पुस्तक घेतलंय. ‘माझी मुलगी नेहा पाचवीत आहे. गळा खूप गोड आहे तिचा,’ म्हणाल्या. 

महामानवाला खूप थँक्स

शिवाजी पार्क मैदानावर उजाडलेली महापरिनिर्वाणदिनाची आदली रात्र मध्यरात्रीनंतरही गजबजलेलीय. गर्दीचा अखंड ओघ सुरू आहे. पण ही गर्दी बिनचेहऱ्याची नाही. धुळीतून उचलत माणूसपण मिळवून देणाऱ्या महामानवाला ‘थँक्स’ म्हणण्यासाठी आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर आलीय. वेळातला वेळ काढून, पैशाला पैसा लावून, कुठल्याही आमंत्रणाविना देशभरातून लोक येतायंत.

या सगळ्यांना जेवन, पाणी आणि आरोग्यसुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांची मोठी लगबग सुरू आहे. ठिकठिकाणी मैदानावर वेगवेगळ्या संस्था संघटनांनी छोटे मोठे स्टॉल टाकलेत. अशा वेगवेगळ्या मंडळांनी तीस चाळीस वर्षं पूर्ण केलीत. या मंडळांसोबतच तरुणांचे लहान लहान ग्रुप मैदानात फिरून पाण्याचं वाटप करत आहेत.

एका ग्रुपकडे आम्हीही पाणी पिण्यासाठी गेलो. पोरं भेटेल त्याला आग्रह करून पाणी देत होती. ग्रुपचं नाव विचारल्यावर म्हणाले, ‘आमच्या ग्रुपचं कुठलं नाव नाही. आम्ही मित्र यावेळी पहिल्यांदाच पाणी वाटतोय. आज किरणचा बड्डे आहे. सेलिब्रेशनचा खर्च टाळून त्यानं हे करायचं ठरवलं.’ त्यांच्यातल्या एकानं सांगितलं. आमच्याशी बोलता बोलता किरणचे मित्र ओंकार शिंदे, सुरज मस्के, प्रणित गायकवाड, अश्विन कांबळे आणि रोहित गायकवाड यांचं आजूबाजूला येजा करणाऱ्या लोकांना पाणीवाटप सुरू होतं.

बड्डे साजरा न करता पाणीवाटप

कुर्ल्यात राहणाऱ्या किरण मस्केचा वाढदिवस ६ डिसेंबरला येतो. पण ‘आज बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेत. त्यामुळे वाढदिवस ७ डिसेंबरला करतो. रात्री सगळे दोस्त गल्लीत गप्पा मारत बसले होतो. तेव्हा पाणी वाटप करायचं ठरलं’, किरण म्हणला.

शेकडो मैल प्रवास करून आलेले लोक भल्या पहाटे आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी मैदानावर मिळेल तिथे झोपलेत. लवकर येणाऱ्यांना मंडपात जागा मिळालीय. पहाटेच्या गर्दीचा अंदाज घेऊन काही लोकांनी दोनेक वाजताच आंघोळीपांघोळी सुरू केल्यात. मंडपाच्या लाकडांना दोऱ्या बांधून लोकांनी कपडे वाळू घातलेत.

सर्वसामान्यांमधे एनर्जी फूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पार्ले जीचे पुडे ठिकठिकाणी वाटले जातायत. जेवण पाणी घेण्यासाठी रात्री दोन-तीन वाजताही लांबचलांब रांगा लागल्यात. मैदानाबाहेरही मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून अन्नदानाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कुणी अंडे वाटतंय, तर कुणी पोहे, खिचडी.

‘फुलेंनी काढली शाळा
बाबासाहेबांनी काढलं कॉलेज
आमचं सगळं साला 
गटबाजीत गेलं नॉलेज’

एका स्टॉलसमोर चार ओळी ऐकू आल्या. आजुबाजुला लोकांची चांगलीच गर्दी होती. वाट काढत समोर जाऊन बघितलं तर स्टॉलसमोरच कविसंमेलन भरलंय. बाबासाहेबांमुळे आपल्या अस्तित्वाला, जगण्याला कसा आकार आला ते प्रत्येक कवी ऐकवतोय. कवींपेक्षा कविसंमेलनाचे सूत्रसंचालक विलास मोरेचं वेगवेगळ्या कविता-किश्श्यांमधून जास्त टाळ्या घेतायत. मोरे एकाची कविता ऐकवतात,

गर्दीत एका आजीचा नातू हरवतो
एकजण म्हणतो, 
आजी काळजी कशाला करतेस, 
प्रकाशकडं गेला असंल नाहीतर रामदासकडं
आजी म्हणते, अरे बाबा,
माझा नातू प्रकाशकडंही जायला नको
आणि रामदासकडंपण नको
उलट त्याला हरवून जाऊ दे
सापडला तर त्यातूनच त्याला आंबेडकर सापडंल.’

शिवाय मोरे मध्येमध्ये धार्मिक प्रबोधनही करत होते. त्यांनी विचारलं, ‘मुस्लिम माणूस असेल, त्याला बघा. त्याच्या कपाळावर काळा डाग दिसतो. सांगा कशामुळं?’ माझ्या बाजूला खाली बसलेल्या हुशार आजी लगेच बोलतात, ‘तो नमाज पडतोय ना, त्याच्यामुळं’ मोरे म्हणतात, ‘हां बरोब्बर! त्याला त्याच्या धर्माचा गर्व असतोय. म्हणून त्यांच्यात एकी असतीय. आपणसुद्धा बौद्ध धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. एकी ठेवली पाहिजे.’ पुरुषांच्या तुलनेत आयाबाया खूप भक्तीभावानं ऐकत असतात. एक तरणाबांड पोरगा सगळ्यांकडून जोरात ‘जय भीम’ म्हणवून घेतोय.

मै भीमका दिवाना हूं...

रात्र आता संपत आलीय. पुस्तकांच्या स्टॉलवरची गर्दी वाढत चाललीय. लहान लहान प्रकाशन संस्थांनाही इथं खूप चांगला प्रतिसाद मिळतो. बाबासाहेबाचं दर्शन घ्यायला येणारी आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन जाणारी ही गर्दी कुठल्याही जत्रे यात्रेतल्या गर्दीपेक्षा वेगळी आहे.

फॅम अर्थात फेसबुक आंबेडकराइट मुवमेंट या तरुणांच्या संघटनेनं मैदानाच्या गेटवरच एक बॅनरवजा बोर्ड लावलाय. त्याच्यावर आपापल्या मनातल्या भावना लोक लिहिताहेत. त्यात कौतुकासोबतच आत्मटीकापण आहे. धनंजय कांबळेनं लिहिलंय, ‘आपलं मत आपली पत. मत विकून पत घालवू नका.’

मैदानावर सगळे स्टेज सजत असतात. कार्यकर्ते तयारीच्या उत्साहात आलेले. उद्या कोण नेता काय बोलणार, २०१९ ला कोण कुठं असणार, याच्या चर्चा लोकांमध्ये हिरीरीनं होत राहतात. दूर कुठंतरी आनंद शिंदेचं गाणं ऐकू येत राहतं, ‘नही मुझको फिकर कोई जाये जिधर, मुझे दुनिया कहे पागल, मै भीमका दिवाना हूं...’