भारतात चारपैकी तीन स्मार्टफोनधारकांना ‘नोमोफोबिया’!

२० मे २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


तुम्ही सतत मोबाईलवर स्टेटस चेक करता का? फोन विसरलात तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? प्रवासात तुमच्या फोनचं चार्जिंग संपत आलं तर तुम्हाला टेन्शन येतं का? तुमचा फोन रात्री झोपतानाही तुमच्या हाताशी असतो का? अशा प्रश्नांची उत्तरं हो असतील तर यालाच नोमोफोबिया म्हणतात. आरोग्याची हळहळू वाट लावणारा हा नोमोफोबिया भारतातल्या चारपैकी तीन स्मार्टफोनधारकांना झालाय.

जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनला होता. मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने मोटोरोला कंपनीसाठी हा फोन बनवला होता. हे कुपरकाका अजून ठणठणीत आहेत. त्यामुळे आजघडीला पृथ्वीतलावर असलेली पिढी ही मोबाईल वापरणारी पहिली पिढी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पण गेल्या पन्नास वर्षात या मोबाईलनं माणसाच्या आयुष्यात काही न कळणारे बदल घडवले आहेत. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच इंद्रियांइतकंच आता मोबाईल हे सहावं इंद्रिय आहे, अशी माणसाची आज समजूत झालीय. या मोबाईलच्या माणूस एवढा आहारी गेलाय की, हातात मोबाईल नसला तर आपण अधू आहोत की काय, असं त्याला वाटू लागतं.

मोबाईलच्या अतिवापरामुळे जडलेल्या या आजाराला आता ‘नोमोफोबिया’ म्हणजेच ‘नो मोबाईल फोबिया’ असं नाव दिलं गेलंय. या आजाराचे पेशंट झपाट्याने वाढत असून, भारतात हे प्रमाण खूप मोठं आहे.

नवा सर्वे काय सांगतोय?

भारतातल्या ७२ टक्के लोकांना त्यांच्या मोबाईलची बॅटरी २० टक्क्यांपेक्षा खाली गेली की अस्वस्थ वाटू लागतं. याला ‘लो बॅटरी एंझायटी’ असं म्हणतात. ६५ टक्के लोक हे मोबाईलशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असून, त्यांना सतत आपला फोनला रेंज नसेल तर, बॅटरी संपली तर, हरवला तर अशा पद्धतीचे टेन्शन येत राहते.

अशी नोमोफोबियाची लक्षणं स्मार्टफोन वापरणाऱ्या चारपैकी तीन भारतीयांमधे सर्रास आढळली आहेत. ओप्पो आणि काउंटरपॉइंट या दोन कंपन्यांनी मिळून केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. आज मोबाईल हे गरजेपेक्षाही व्यसन बनत चाललंय. त्यामुळे लोक नातेसंबंधापेक्षाही मोबाईलला अधिक महत्त्व देऊ लागलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सर्वक्षण करण्यात आलं. ज्यात दीड हजाराहून अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

भारतासारख्या खंडप्राय देशात कोणत्याही आकड्यांवर विश्वास ठेवणं अवघड असलं, तरीही मोबाईलचा अतिवापर आपल्याला आज सगळीकडे दिसतोय. त्यामुळे हे आकडे अगदीच चुकीचे नाहीत, हे आपण आपल्या रोजच्या निरीक्षणातूनही सांगू शकतो. या आकड्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत, ते या नोमोफोबियामुळे होणारे परिणाम. या परिणामांची अजून माणसाला फारशी कल्पनाच आलेली नाही.

नोमोफोबिया शोधला कसा?

मोबाईल हा आता मानसिक आरोग्यावर परिणाम करतोय, या अर्थाने इंग्लंडमधे झालेल्या अभ्यासात २००८मधे नोमोफोबिया या आजारासंदर्भात पहिलं संशोधन करण्यात आलं. त्यावेळी इंग्लंडमधेच त्याचं प्रमाण साधारणतः ५३ टक्के आढळलं होतं. पुढे २०१०मधे हे प्रमाण ६६ टक्क्यावर गेलं होतं. आता भारतातले आकडे हे प्रमाण ७५ टक्के असल्याचे सांगतायत.

मोबाईलने आपल्या आयुष्याला किती व्यापून टाकलंय, याची ही भयानक आकडेवारी आहे. त्यात सोशल मीडियामुळे प्रत्येकाला सतत जगात स्वतःला प्रेझेंट करत राहायचंय. प्रत्येकाला आपलं मत मांडायचीत. त्या मतांवर जगानं व्यक्त व्हावं, अशीही त्याची अपेक्षा आहे. आपण सोशल मीडियावर प्रसिद्ध असावं, यासाठी तर अनेकजण वाट्टेल ते करायला तयार आहेत.

या सगळ्याचा परिणाम म्हणजेच मोबाईल चोवीस तास आपल्या सोबत राहू लागलाय. झोपताना तो शेजारी असतोच, पण अनेक जण तो टॉयलेटमधेही घेऊन जातात. एवढंच नाही तर अनेकजण आंघोळ करतानाही आपला फोन बाथरूमच्या कप्प्यात ठेवतात. अगदी दोन-चार मिनिटांच्या फरकानंही काही लोक स्क्रीन अनलॉक करून नोटिफिकेशन चेक करतायत.

मोबाईल हे मनोरंजनाचं साधन

आज समाज म्हणून आपण एक अस्थिर अवस्थेतून जातोय. जागतिक पातळीवर सुरू असलेली अस्थिरता, महागाई, बेकारी, उसवत चाललेले नातेसंबंध, मैत्रीमधे वाढत चाललेला दुरावा या सगळ्याचा भयंकर परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतोय. त्यात कोरोनासारख्या आजारामुळे अनेकांचं आर्थिक, सामाजिक आणि मानसिक नुकसान झालंय.

या सगळ्यातून पळून जाण्याचं साधन म्हणूनही मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलाय. वास्तव जगातल्या प्रश्नांपासून सुटका करण्यासाठी माणूस मोबाईलमधल्या आभासी जगाचा आधार शोधतोय. सोशल मीडिया तासन्तास स्क्रोल करूनही त्याला हाताशी काही लागत नाही. तरीही तो सतत एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर स्वॅप करत राहतोय.

वीडियो, रील पाहण्यात तो आपला सर्वाधिक वेळ घालवतोय. नोमोफोबियासंदर्भातल्या सर्वेक्षणात सापडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ४२ टक्के लोक मोबाईलचा उपयोग संपर्कापेक्षा अधिक फक्त मनोरंजनासाठी करतायत. त्यामुळे बॅटरी संपू नये, ही भीती त्यांना अधिक चिंतेत टाकते.

महिलांपेक्षा अधिक पुरुष नोमोफोबियाग्रस्त

सर्वेक्षणातल्या आकडेवारीनुसार, ८२ टक्के पुरुषांमधे नोमोफोबियाची लक्षणं आढळली. तर ७४ टक्के महिलांना हा मानसिक आजार सतावतोय. त्यामुळे महिलांपेक्षा अधिक पुरुष नोमोफोबियाग्रस्त असल्याचं हे सर्वेक्षण सांगतंय. माणूस जेवढा जास्त घराबाहेर असेल, तेवढा जास्त मोबाईल वापरतो असंही एक निरीक्षण यातून करता येईल.

भारतात साधारणतः अधिक पुरुष घराबाहेर असतात. प्रवासात मनोरंजनासाठी सतत मोबाईलमधे डोकं घालून बसेलेली लोक आपण सतत पाहतोय. त्या तुलनेत महिला घरच्या कामात अधिक व्यग्र असतात. त्यामुळे मोबाईलचा वापर त्यांच्यासाठी तुलनेने कमी असतो. मोकळ्या वेळेत त्या मनोरंजनासाठी आणि गप्पांसाठी मोबाईलचा वापर करतात. 

महिला आणि पुरुष दोघांच्या आकड्यात फरक असला तरी हा फरक फार मोठा नाही. तसंच यात ग्रामीण आणि शहरी असं विभाजन केलेलं नाही. त्यामुळे या आकडेवारीवर फार विश्वास ठेवणं योग्य नाही. पण मोबाईलचा वापर आज सर्वच घटकांमधे वाढला असून, त्यात सोशल मीडिया, वीडियो आणि गेमिंग हे सर्वाधिक अडकवणारे प्लॅटफॉर्म आहेत.

नोमोफोबिया हे स्लो पॉयझन

नोमोफोबिया हा मानसिक आजार वगैरे असल्याचं म्हटलं तरीही त्यातून सामान्य परिस्थितीत जीवाला धोका नाही. पण हे एक प्रकारचं हळूहळू चढत जाणारं विष आहे. एखादी व्यक्ती अनरिचेबल असली की अनेकांच्या घरी कमालीचं तणावाचं वातावरण कसं निर्माण होतं ते आठवून पाहा. आज जेवढी परिस्थिती तणावाची होतेय तेवढी आधी होत नव्हती. 

याचाच अर्थ असा की, आपण या आजारामुळे आपला तणाव वाढवून घेतोय. आज अनेकांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा त्रास आहे. त्या सर्व त्रासांना या नोमोफोबियामुळे आणखी बळ मिळतं. दुसरीकडे मोबाईलमधल्या कंटेटमुळे आणि त्याच्या अतिवापरामुळे चिडचिड वाढतेय. त्याचाही परिणाम शरीरावर होऊ लागलाय.

सतत मोबाईल वापला गेल्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ लागलाय. अनेकांना चष्मा तर लागलाच आहे, पण अनेकांच्या डोळ्यापुढे पांढरी वर्तुळं दिसणं, जळजळ होणं असे आजार होऊ लागलेत. या शारीरिक आजारांप्रमाणेच मोबाईलमुळे नातेसंबंध बिघडत जाण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे एकलकोंडेपणा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा मोबाईल, असं दृष्टचक्र निर्माण झालंय.

नोमोफोबियाचा अतिरेक जीवावरही बेतू शकतो

गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत घडलेली घटना आपल्यातील अनेकांना आठवत असेल. मोबाईलवर गेम खेळायला आईने नकार दिला म्हणून १६ वर्षीय मुलाने लोकलसमोर उडी मारत आत्महत्या केली. ही घटना म्हणजे नोमोफोबियाचा अतिरेक आहे, याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं. एवढंच काय, तर आमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर विडिओ बघितल्याशिवाय जेवतच नाही, अशी तक्रार तर आजकाल बहुसंख्य पालकांची आहे.

लंडनच्या एका विमानात एका कर्मचाऱ्याचा मोबाईल राहिला म्हणून त्यानं उडण्यास सज्ज असलेलं विमान तब्बल दोन तास रखडवलं, अशीही एक बातमी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. ही सगळी लक्षणं नोमोफोबियाची असून, त्यातून वेळेतच बाहेर यायला हवं. आपल्यात नोमोफोबियाची लक्षणं दिसतात, म्हणून घाबरून जाऊ नये. कारण त्यातून बाहेर पडणं शक्य आहे. पण त्याचा अतिरेक टाळणंही तेवढंच गरजेचं आहे.

नोमोफोबियातून बाहेर पडणं शक्य आहे

या आजारातून बाहेर पडणं बोलण्यास सोपं आणि प्रत्यक्षात आणणं अवघड आहे. त्यासाठी मनाचा निर्धार हवा आणि मोबाईलशिवायच्या गोष्टी वाढवायला हव्यात. फोनचा वापर कमीत कमी कसा करता येईल, यासाठी प्रत्येकानं आपपली स्ट्रॅटजी ठरवायला हवी. आता मोबाईलचा वापर किती केला ती सांगणारी ऍपही उपलब्ध आहेत. ती वापरून मोबाईलचा वेळ ठरवून कमी करता येतो.

नोटिफिकेशन बंद करणं, ठरलेल्या वेळेतच स्टेटस बघणं, विशिष्ट काळच सोशल मीडिया वापरणं, झोपताना फोन दूर ठेवणं, झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल न बघणं, नोटिफिकेशन बंद करणं वगैरे अनेक उपाय सर्वांना माहिती असतात. पण ते अंमलात आणण्यासाठी ठाम निश्चय लागतो. तसंच ऑफलाईन कामही लागतं. त्यामुळे माणसांना प्रत्यक्ष भेटणं, खेळणं, व्यायाम करणं अशा गोष्टी वाढवायला हव्यात.

आज भारतात ६० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहे. त्यातल्या १० कोटी लोकांकडे सुपरफास्ट इंटरनेट आहे. या सगळ्यानं आपण आपलं आयुष्य समृद्ध करतोय की त्याची माती करतोय, याचा विचार प्रत्येकानं आपापला करायचाय. कारण, तुम्ही अधिकाधिक मोबाईल वापरल्यानं कंपन्यांचा फायदाच होईल. त्यामुळे मोबाईलवरच्या गोष्टी फुकट नसतात. त्या आपल्या अमूल्य आयुष्याच्या बदल्यात मिळतायत, हे विसरून चालणार नाही.