गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय

१५ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.

मराठवाड्याची माती महाराष्ट्राला आणि देशालाही भरभरून देत असते. २००४ मधे ७७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादला झालं होतं. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतर मराठवाड्याच्या मातीला ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान मिळाला. साहित्यप्रेमी, वाचक, रसिकांच्या उदंड प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात रांगड्या उस्मानाबाद शहरात 'संत गोरोबा काका साहित्य नगरीत' हे संमेलन झालं.

एवढ्या वर्षांची प्रतीक्षा संपल्यानं साहजिकच मराठवाड्यातल्या जनतेला संमेलनाची उत्सुकता होती. साहित्यप्रेमी, प्राध्यापक, तरुण, विद्यार्थ्यांमधे उत्सुकता शिगेला पोचली होती, हे जमलेल्या प्रचंड गर्दीवरून सिद्ध झालं. तीन दिवसात चार-पाच लाख लोकांनी संमेलनाला हजेरी लावला असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय.

राजकीय नेत्यांची व्यासपीठ परंपरा खंडित 

संमेलनाच्या मंचावरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. काही निर्णयांमुळे वादही निर्माण झाले. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांना न बसवता फक्त साहित्यिक, आयोजक यांनाच स्थान देण्यात आलं होतं. राजकीय मंडळी समोर प्रेक्षकांमधे सन्मानपूर्वक बसली होती.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अशा साहित्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनाला हजेरी लावून एक मोठी परंपरा निर्माण झाली होती. गेल्या १५ वर्षात नेते, मुख्यमंत्री उद्घाटन किंवा समारोपाला असत. यावेळी मात्र कोणत्याच नेत्यांना मंचावर स्थान देण्यात आलं नव्हतं.

यंदा उद्घाटन सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि डझनभर आजी-माजी आमदार चार-पाच तास समोर प्रेक्षकांमधे बसून होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटच्या दिवशी संमेलनाला हजेरी लावत प्रेक्षकांमधे बसूनच संमेलनाचा आनंद घेतला.

हेही वाचा : बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!

राजसत्तेच्या हस्तक्षेपाशिवाय प्रगती शक्य नाही

महामंडळानं राजकारण्यांच्या स्टेजवरच्या उपस्थितीबद्दल घेतलेल्या या निर्णयाविषयी बरीच मतंमतांतरं दिसून येतायत. या निर्णयाचं साहित्य विश्वातल्या अनेकांनी स्वागत केलंय. साहित्य संमेलनाविषयी पत्रकार विजय चोरमारे आपल्या ब्लॉगमधे लिहितात, 'गेल्या तीन-चार वर्षांत संमेलनाचा भपका कमी करून ते आवाक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते, त्याच्या पुढचं पाऊल टाकताना उस्मानाबादच्या संमेलनानं राजकीय नेत्यांपासून संमेलनाचं व्यासपीठ दूर ठेवलं. राजकीय नेत्यांचं प्राबल्य वाढलं असतानाच्या काळात हे पाऊल स्वागतार्ह असलं तरी मराठी साहित्य-संस्कृतीच्या या मंचानं सर्वसमावेशक असायला हवं.’

‘कोणत्याही एखाद्या घटकासंदर्भात अस्पृश्यता बाळगणं योग्य ठरत नाही. भाषिक, सांस्कृतिक प्रश्नांसंदर्भातील पाठपुराव्यासाठी राजकीय नेतृत्वाकडंच जावं लागतं आणि त्यासाठी दोन्ही घटकांमधे आवश्यक सुसंवाद असायला हवा. संमेलनाचे राजकीयीकरण झाल्याच्या टीकेची प्रतिक्रिया म्हणून उचललेलं हे पाऊल असलं तरी ते संमेलनाचं धोरण बनू नये, त्यातून साहित्यिकांचा अहंकारच ठळकपणे समोर येईल. आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घडणाऱ्या सकारात्मक बाबी दुर्लक्षित राहतील.'

संमेलनातले सहभागी वक्ते आणि समीक्षक डॉ. गणेश मोहिते यांनी कोलाजशी बोलताना राजकारण्यांच्या उपस्थितीविषयी आपलं मत मांडलंय. ते म्हणतात, 'राजकारण आमच्या व्यवस्थेचा अपरिहार्य भाग आहे. त्या क्षेत्राला अस्पृश्य ठरवून आपण फार काही कमावत नाही. राजसत्तेच्या हस्तक्षेपाशिवाय समाजाची प्रगती, परिवर्तन शक्य नाही. अशा काळात सत्तेत सहभागी सांस्कृतिक जाणीव प्रगल्भ असणारा एखादा नेता प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला तर फार काही बिघडत नाही. फक्त ही संख्या दोन पेक्षा अधिक नसावी.'

सरकारच्या भूमिकेवर साहित्यिकांचा कडाडून हल्ला 

यंदाच्या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना उद्घाटनाला जाऊ नये, अशी धमकी आली. धमकीला फाट्यावर मारत ते संमेलनात सहभागी झाले आणि त्यांनी आपली परखड भूमिका मांडून सरकारला खडे बोल सुनावले. शिवाय आपण घाबरत नसल्याचंही सांगितलं.

संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही आपल्या भाषणातून युनिवर्सिटीतल्या विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले, मॉब लिंचिंग, शेतकरी आत्महत्या आणि निडरपणे बोलणाऱ्या अनेक साहित्यिक, कार्यकर्ते, पत्रकारांच्या हत्या अशा अनेक संवेदनशील विषयांच्या संदर्भात सरकारच्या विरोधात परखड मत व्यक्त केलं.

मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी उद्घाटनाच्या सत्रातील भाषणांचा धागा पकडून दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाखतीत देशात सर्व व्यवस्थित चाललं असून कोणतीही हिटलरशाही नसल्याचं सांगितलं. यावर अनेक साहित्यिकांनी नाराजी आणि आश्चर्यही व्यक्त केली. संमेलनाच्या मांडवात दिवसभर त्यांच्या या वक्तव्याचीच चर्चा रंगली. नंतर त्यांनी आपल्याला वेगळं काही तरी म्हणायचं होतं, असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच!

कौतिकराव ठाले पाटलांमुळं संमेलन यशस्वी झालं

अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था देशभरातल्या मराठी साहित्य संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. हे महामंडळ यंदापासून मराठवाडा साहित्य परिषदेकडे म्हणजेच मसापकडे तीन वर्षांसाठी हस्तांतरित झालंय. त्यामुळं यंदाचं संमेलन मराठवाड्यात होणार हे निश्चित होतं. उस्मानाबादच्या मसाप शाखेला संमेलन आयोजनाचा मान देऊन अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केलं.

उस्मानाबादकरांनी आपली सगळी शक्ती पणाला लावून हे संमेलन आगळं वेगळं आणि यशस्वी करण्याचा चंगच बांधला होता. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड ही त्याचीच एक झलक होती. त्यानंतर वाद उठलाच. त्यामुळं निदान हे संमेलन तरी कोणत्याही वाद-विवादांशिवाय होईल ही अपेक्षाही फोल ठरली. पण अशा कोणत्याही वादाला-आक्षेपांना न जुमानता कौतिकराव ठाले पाटील यांनी दादा गोरे, पदाधिकारी आणि स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांना बरोबर घेऊन संमेलन सर्वार्थाने यशस्वी करून दाखवलं.

ठाले पाटील आणि टीमनं संमेलनातल्या साहित्यिकांचा बडेजाव, अनावश्यक खर्च टाळला. तसंच अनावश्यक मानधनाला फाटा दिला. निमंत्रितांसोबत येणाऱ्या एक-दोन व्यक्तींच्या फुकटच्या पाहुणचाराला अटकाव घातला. तसंच यंदापासून मराठीसाठी झटणाऱ्या लोकांचा, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांचा सत्कारही सुरू केला. या निश्चितच सकारात्मक बाबी म्हणता येतील.

महत्त्वाची गोष्ट अशी की ठाले पाटील यांनी आपला जनसंपर्क आणि साहित्य वर्तुळातलं वजन वापरून उद्योजकांकडून संमेलनासाठी निधी आणला. आयोजकांच्या मार्फत सामान्य जनतेकडून निधी गोळा करून संमेलनाचं अवघड आर्थिक गणित त्यांनी सोडवलं. आपलं खमकं नेतृत्वही दाखवून दिलंय. त्यांच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणातूनही हे प्रकर्षानं जाणवतं. त्यांच्यामुळेच उस्मानाबादसारख्या छोट्या शहरातही संमेलन यशस्वी झालं.

हाऊस फुल्ल गर्दी, अडीच कोटींची खरेदी 

उस्मानाबादचं साहित्य संमेलन रसिक-वाचकांसाठी पर्वणीच ठरलं. रसिक-वाचकांच्या प्रचंड गर्दीनं संमेलनातली ग्रंथप्रदर्शनं हाऊस फुल्ल झाली होती. सामान्य नागरिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, तरुण अशा सर्व स्तरातल्या वाचकांनी ग्रंथदालनात शेवटचे दोन दिवस खच्चून गर्दी केली होती. उस्मानाबादसारखा ग्रामीण आणि दुष्काळी भाग असूनही पुस्तकं खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड सर्वांनाच आश्चर्यकारक होती.

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात महाराष्ट्रातील पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांच्यासाठी ३०० ते ४०० स्टॉल नोंदणीचं उद्दिष्ट निश्चित केलं होतं. पण प्रकाशक संघटनांमधले वाद आणि ग्रामीण भागात पुस्तक विक्री होणार नसल्याचं कारण यामुळे अनेक प्रकाशकांनी संमेलनात सहभाग टाळला. शेवटी २०० स्टॉलची नोंदणी झाली.

स्टॉल्सची संख्या कमी झाली तरी जाणिवा समृद्ध करणारी दर्जेदार पुस्तकं इथं उपलब्ध होती. यात संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, संत गोरोबा अशा संतांवरील पुस्तकं वाचक मागत असल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या इतर व्यक्तिमत्त्वाच्या विषयी पुस्तकांना बरीच मागणी होती.

अण्णा भाऊ साठे, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याही साहित्याला लोक विचारत होते. कथा, कादंबरी, अनुवादित साहित्यही वाचकांच्या पसंतीस उतरत होतं. संमेलनातील तीन दिवसात जवळपास तब्बल दोन ते अडीच कोटींची उलाढाल झाली असल्याचं अनेक प्रकाशक-वितरकांनी सांगितलं.

हेही वाचा : संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

विद्यार्थी-तरुणाईचा भरभरून प्रतिसाद

हल्लीची तरुण पिढी वाचत नाही, अशी ओरड केली जाते. वाचनसंस्कृती संपण्याची भीती व्यक्त केली जाते. हा समज या संमेलनानं आणि युवकांनी खोडून काढला, असंच म्हणावं लागेल. या संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी-तरुण वर्ग पुस्तक खरेदीच्या माध्यमातून साहित्य व्यवहाराशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला. म्हणजेच पुस्तक खरेदीकडे आणि पर्यायानं वाचनाकडे तरुणाईचा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला दिसतो हे अधोरेखित होतंय. हे चित्र मराठवाड्यातल्या शाळा, महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी उभं केलं होतं.

संत साहित्यापासून ते सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, विनोदी, मनोरंजनात्मक पुस्तकं घेण्याकडे तरुण वाचकांचाही कल होता. तर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांनाही त्यांनी विशेष पसंती होती. तरुण वर्ग सोशल मीडियावर जेवढा सक्रीय, त्याप्रमाणात विविध माध्यमातून वाचत प्रक्रियेत असल्याचं जाणवलं. वाचनसंस्कृतीसाठी ही निश्चितच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

गोरोबांनी मळवाट बांधून दिलीय

संत गोरोबा काकांच्या पावन भूमीत भरलेलं हे संमेलन खऱ्या अर्थानं उजळून निघालं. उस्मानाबादकरांनी केलेलं उस्फुर्त स्वागत आणि पाहुणचारानं साहित्यिक-रसिक अक्षरशः भारावून गेले. मराठवाड्याच्या मातीचा दिलदारपणा इथल्या माणसांनी दाखवून दिला. मराठवाड्यातली माणसं कोणताही कार्यक्रम आपल्या घरचा सोहळा म्हणून आनंदानं सहभागी होऊन साजरा करतात. हे या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. याची झलक पुण्या-मुंबईच्याच नव्हे, तर देशभरातून आलेल्या साहित्यिकांनी 'याची देही, याची डोळा' अनुभवली.

तेर गावातली संत गोरोबा काकांची समाधी, तुळजापूरची आई तुळजाभवानीचं दर्शन, नळदुर्ग आणि इतर किल्ले अशा महत्वपूर्ण भेटीही या निमित्तानं साहित्यिकांनी अनुभवल्या. खऱ्या अर्थानं हे संमेलन सर्व बाजुंनी संपन्न आणि कात टाकणारं ठरलं. उस्मानाबादच्या संमेलनाच्या निमित्तानं गोरोबा काकांनीच पुढच्या संमेलनांसाठी एक मळवाट तयार करून ठेवलीय. या वाटेनं चालायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. गोरोबाकाका आणि त्यांच्या विचारांचा वारसा मात्र कायमच पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोचत राहील.

हेही वाचा :

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने