महाराष्ट्र आणि गाडगेबाबा समजून सांगणारं पुस्तक

१४ जुलै २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.

आपल्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत गाडगेबाबांचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी आणि सत्यशोधक या दोन महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोचलेल्या परंपरा. या दोन्ही परंपरांचा गाडगेबाबांनी समन्वय साधला. आपल्या महाराष्ट्राला नव्या विचारांची दिशा दिली.

गाडगेबाबांची खरी ओळख आपल्याला पुरेशा प्रमाणात झाली नाही. ते आपल्यासाठी केवळ स्वच्छता अभियानाचे पोस्टर मॅन राहिले. त्यागी जीवन जगणारे एक अवलिया किर्तनकार एवढीच त्यांची ओळख बनली. त्यापलीकडे जाऊन एक कृतीशील बहुजनवादी विचारवंत म्हणून त्यांची प्रतिमा आपल्यासमोर आली नाही.

हेही वाचा: वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

पुस्तकाची भाषा वाचकांना भिडणारी

समाजसेवक म्हणून गाडगेबाबा थोर आहेतच; पण समाजसुधारक म्हणून त्यापेक्षाही थोर आहेत. विरक्तीचं दर्शन घडवणारं त्यांचं चरित्र जितकं मनोवेधक आहे तितकं त्यांचं लोककल्याणकारी कार्यही महत्त्वाचं आहे. त्यापुढे जाऊन त्या कार्यामागची वैचारिक भुमिका आजही दिशादर्शक आहे.

गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय.

संतोष अरसोड हे यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर या तालुक्याच्या ठिकाणी राहणारे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. बहुधा पत्रकार असल्यामुळेच पुस्तकाची भाषा एकदम वाचकांच्या मनाला भिडणारी आहे.

समाजसेवेचा आढावाही विस्ताराने

गाडगेबाबांच्या चरित्रातले काही प्रसंग कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. ते प्रसंग जसेच्या तसे वाचकांच्या डोळ्यासमोर या पुस्तकातून उभे केलेले आहेत. बाबांच्या त्यागी वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबाची झालेली फरफट काळजावर दगड ठेवूनच वाचावी लागते.

कर्तव्यकठोर गाडगेबाबांमुळे त्यांच्या आई, बायको आणि मुलांच्या जीवनात आलेलं दुःख शब्दात मावणारं नाही. बाबांच्या कुटुंबाची ही दुर्दशा अजूनही त्यांच्या कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही. बाबांचे नातू निवृत्ती सोनवणे वयाची नव्वदी उलटल्यानंतरही या आपत्तींशी झुंजत आहेत. संतोष अरसोड यांनी 'वारसदार व्यथेचे' या नावाने निवृत्ती सोनवणे यांच्यावर एक प्रकरणही लिहीलंय.

गाडगेबाबांच्या चरित्राबरोबरच त्यांच्या समाजसेवेच्या कार्याविषयीची माहिती विस्ताराने पुस्तकात आलेली आहे. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, औषधोपचार आणि शिक्षण या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गोष्टी गरजूंपर्यंत पोचायला हव्यात यासाठी गाडगेबाबांनी दशसूत्री सांगितली होती. या दशसूत्रीतून स्वतः गाडगेबाबांनी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि औषधोपचार या गोष्टी गरजूंपर्यंत पोचवल्या.

त्यासाठी संस्थात्मक रचना उभी केली. त्या सगळ्या गोष्टींची माहिती पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणातून आपल्याला मिळते. बाबांनी भाविकांच्या सोयीसाठी मंदीर परिसरात घाट, पूल आणि धर्मशाळा उभारल्या. आंधळे, पांगळे, वयोवृद्ध आणि कुष्ठरोगी यांच्यासाठी गाडगेबाबांनी काम केलेलं होतं. या सर्व कामाचा तपशीलवार आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.

हेही वाचा: वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग २)

समाजवादी सत्यशोधक

अनेक अनाथ आणि गोरगरीबांच्या पोरांना गाडगेबाबांनी कसं उभं केलं याविषयी फारशा ज्ञात नसलेल्या गोष्टीही यात आलेल्या आहेत. या सर्व कार्याविषयी बाबांच्या पत्रव्यवहारातून जाणवणारी पारदर्शकताही मांडली आहे. पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टींच्या आकर्षणापासून बाबा कसे अलिप्त राहायचे हे पुस्तकातून स्पष्टपणे दिसतं.

या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक बहुजनवादी विचारवंत म्हणून गाडगेबाबांची प्रतिमा समोर आणणं. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबांना 'समाजवादी सत्यशोधक' म्हटलं होतं. पण नंतरच्या काळात बाबांची सत्यशोधक अथवा वारकरी ही ओळख पुढे आलेली नव्हती.

वंचित घटकांमागे गाडगेबाबांची प्रेरणा

पांडुरंग डिंगरे यांनी म्हटल्याप्रमाणे वारकरी संप्रदायातल्या प्रस्थापित मंडळी त्यांना संप्रदायाबाहेरची समजत. तर दुसरीकडे परिवर्तनवादी विचारांची मंडळी त्यांच्या देवकीनंदन गोपालाच्या गजराला दचकून लांबच राहिली. त्यामुळेच गाडगेबाबांनी वारकरी संप्रदायाच्या आधारे केलेल्या क्रांतीकारी प्रबोधन कार्याकडे दुर्लक्ष झालं.

या पार्श्वभूमीवर जातीव्यवस्था,अस्पृश्यता आणि स्रिदास्य याविरोधात बाबांनी किर्तनातून मांडलेल्या विचाराची आणि प्रत्यक्ष केलेल्या कामाची ओळख संतोष अरसोड यांनी करून दिली आहे. देवाधर्माचा आधार घेऊन लोक प्रबोधन करणारे गाडगेबाबा आणि आज देवाधर्माच्या नावाने चाललेली दलाली यातली विसंगती अचूकपणे पुस्तकात उलगडून दाखवली आहे.

गाडगेबाबांची हुंडाविरोधी भुमिका असो किंवा स्वतःच्या विधवा सुनेचा लावून दिलेला पुनर्विवाह असो यातून त्यांचा क्रांतीदर्शी विचार व्यक्त होतो. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, अस्पृश्य आणि स्रिया या समाजाच्या वंचित घटकातल्या अनेक माणसं गाडगेबाबांच्या प्रेरणेनं कशी उभी राहिली याची यादीच पुस्तकात दिलीय.

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

पुस्तकात बाबांची वैचारिक परंपरा

त्याबरोबरच महात्मा गांधीजी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख आणि तुकडोजी महाराज या महापुरूषांशी गाडगेबाबांच्या असलेल्या वैचारिक आणि व्यवहारिक नात्याची विस्ताराने मांडणी केलेली आहे. पुस्तकातून बाबांची वैचारिक परंपरा दाखवलेली आहे.

गाडगेबाबा तुकोबारायांना गुरू मानत. ते कबीर आणि तुकारामांचे विचार किर्तनातून मांडत. महात्मा फुल्यांचा जिवनादर्श त्यांच्यासमोर होताच. त्याबरोबरच महात्मा गांधींचा आणि गांधीयुगाचा प्रभाव त्यांच्यावर होता.

कबीर, तुकाराम, महात्मा फुले आणि महात्मा गांधी अशी त्यांची वैचारिक परंपरा होती. ती परंपरा त्यांच्या विचारव्यवहारातून दिसते. ही सगळी मांडणी या पुस्तकात आलेली आहे. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर संतोष अरसोड यांच्या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.

पुस्तकाचं नाव- प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा 
लेखक- संतोष अरसोड 
प्रकाशन- मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत- २५०/-

हेही वाचा: 

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!