महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

११ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

आयुष्यभर ज्यांनी राजकारण, समाजकारण केलं त्या दीर्घ राजकीय कालखंडाचा मागोवा घेण्यासाठी किमान ही आत्मचरित्रं अभ्यासकांनी वाचली पाहिजेत. ती का वाचली पाहिजे? तर मराठीमधे राजकीय आत्मचरित्रांचा अभ्यास फारसा झालेला नाही. तो अभ्यास झाला पाहिजे, हा या मागचा स्वच्छ उद्देश आहे.

हेही वाचाः मधु मंगेश कर्णिक लोकसभेची निवडणूक लढवणार होते, त्याचा किस्सा

२३ आत्मचरित्रांचा विश्लेषणात्मक अभ्यास

यातील अनेक नेते स्वातंत्र्यसंग्रामात लढले. काहींनी नेतृत्व केलेलं. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या चळवळीतून काही माणसं प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पुढे आलेली. त्यांनी आपल्या जीवनाचा सर्वांगीण मागोवा कशा पद्धतीने घेतलाय, तो तपासण्यासाठी काही महत्त्वाची आत्मचरित्रं या निमित्ताने निवडली आहेत. यशवंतराव चव्हाण ते सुभाष देसाई अशा तेवीस आत्मचरित्रांचा त्यात समावेश केला आहे. काहींच्या आत्मचरित्रातला पूर्णतः अपूर्णता, त्यांचा वैचारिक कल, वैचारिक पार्श्‍वभूमी आणि त्यांना घडवणार्‍या व्यक्तींची पार्श्‍वभूमी यांचा आढावा या निमित्ताने घ्यावा, असं मनातून वाटत होतं आणि तसं घडलंही.

या नेत्यांचा ज्यांना सहवास लाभलाय, त्यांना जवळून पाहिलंय किंवा प्रत्यक्ष सोबत राहून त्यांना जाणून घेतलंय. त्यांचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा समाजाविषयी असलेला दृष्टिकोन असं एक सूत्र या निमित्ताने अभ्यासता आलं. साहजिकच यात कोणाचा थिटेपणा जाणवला, काहींची उंची जाणवली. थिटेपणा आणि उंची यांचा साक्षेपी आढावा अनेक लेखकांनी घेतलाय. त्यांचं सामाजिक, राजकीय कार्य इथे मलिन करण्याचा प्रश्‍नच येत नाही. हा एक अभ्यास, चिकित्सा आणि विश्‍लेषण आहे.

या विश्‍लेषणाच्या अंगाने त्यांच्या मनातला स्थायीभाव आणि राजकारणाचं सम्यक दर्शन घेता यावं हा प्रामाणिक प्रयत्न होता. तसं सम्यक दर्शन संपादकाला या ग्रंथाच्या निमित्ताने झाल्याचं दिसून येतं. संपादक मोतीराम पौळ हे वयाने लहान आणि तरुण आहेत. त्यांच्या वयातली मुलं आज मागं वळून पाहायला तयार नाहीत. पण त्यांना राजकीय आत्मचरित्रांच्या अभ्यासाची इच्छा व्हावी, हे मला अतिशय सुचिन्ह वाटतं.

समाजशास्त्रीय अभ्यासातून वर्तमानाचा शोध

राजकीय प्रवाहात हे नेते अर्थकारण, समाजकारण, शिक्षण व्यवस्थेतून पुढे आले. इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान, त्यांचे परिश्रम हा व्यापक पटच यातून बघायला मिळतो. हा एक समाजशास्त्रीय अभ्यास आहे. हा समाजशास्त्रीय अभ्यास करत असताना भोवतालाबरोबरच वर्तमानाचाही शोध घ्यावा लागतो.

कालचा भूतकाळ आणि आजचा वर्तमानकाळ यांना एकमेकांशी बांधून घेत आपल्याला पुढं पुढं सरकावं लागतं. ते सरकणं म्हणजेच एक साक्षेपी अनुभव असतो. हा अनुभव घेत असताना एक चांगली गोष्ट अशी झाली की, प्रत्यक्ष ज्यांना या मंडळींचा सहवास लाभलेला नाही, पण हा ग्रंथ वाचत असताना ते आपल्याशी बोलतात, चालतात असं वाटायला लागतं.

हेही वाचाः शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?

ऐतिहासिक घटनांचा दस्तऐवज

खरंतर जुन्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये समजून घेण्यामधे आपण उणे पडतो आणि हे उणे पडणं एका अर्थाने समाजशास्त्राची हानी आहे. कारण ही मंडळी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर समाजासाठी झोकून देऊन राजकारणात काम करत आलीत. त्या ऐतिहासिक घटनांचा एक दस्तऐवज निर्माण व्हावा, अशी संपादकांची इच्छा आहे. तशी जाणीव दिवाळी अंकाच्या प्रवासापासून ते या ग्रंथाच्या निर्मितीपर्यंत त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसते.

या ग्रंथातील राजकीय नेत्यांनी विविध क्षेत्रांचा अभ्यास केलाय. तसंच विविध क्षेत्रांत वावरून व्यापक काम केलंय. काहींनी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला तर काहींनी सहकाराची गंगा समाजापर्यंत आणली. काहींनी कृषिक्षेत्रात भरीव योगदान दिलं तर काहींनी मंत्रालयात मंत्री या नात्याने काम केलं. या महाराष्ट्राची स्वप्नं कशी असावीत, ती कोणत्या अंगाने फुलावीत? किंवा या मातीतल्या तळागाळातल्या माणसांच्या उन्नतीचा मार्ग कसा आखला गेला पाहिजे, यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. 

खरंतर मराठी साहित्यात राजकीय आत्मकथनं फार मोठ्या प्रमाणात लिहिली गेली नाहीत. पण ज्यांनी ती लिहिली त्यांचा आत्मशोध घेणं, अंतर्गत असलेले धागे शोधून काढणं, त्या धाग्यांचा या मातीशी, वर्तमानाशी, समाजव्यवस्थेशी, चालीरीती, संस्कृती, भाषाविज्ञानाशी परस्परसंबंध काय होता या सर्व अंगांनी जर आढावा घ्यायचा असेल तर हा ग्रंथ अभ्यासकांनी नक्कीच अभ्यासला पाहिजे.

हेही वाचाः साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

राजकीय व्यवस्थेच्या खाणाखुणा

ही माणसं आत्मसंतुष्ट वृत्तीने काम करणारी नव्हती. ज्याचा परीघ हा आखून घेतलेला असतो तेव्हा त्या व्यक्तीवर आत्मसंतुष्टीची वेळ येते. या नेत्यांचा परीघ, त्यांचा भवताल, त्यांची समाजविज्ञानाची व्याख्या मोठी आहे. त्यांची संस्कृती, परंपरा, अर्थकारणापासून ते कृषी विज्ञानापर्यंतची भूमिका ठळकपणे आणि ठोसपणे येते.

वास्तविक अशा समाजनिष्ठ लोकांचा सहवास पुढच्या पिढीला मिळणार नाही. किमान वाचून तरी त्यांनी गतकाळाचं समाजशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय व्यवस्थेच्या खाणाखुणाही अतिशय मुळाशी जाऊन तपासल्या पाहिजेत. त्या कुठल्या धाग्यांशी, कुठल्या विचारांशी जोडल्या जातात याचाही अभ्यास यानिमित्ताने नक्कीच होतो.

काही माणसांनी आपापल्या क्षेत्रांत घेतलेली झेप ही विलक्षण वाटते. विलक्षण यासाठी की, दळणवळणाचा अभाव होता. प्रसारमाध्यमांचा वेग आणि झपाटा आजच्या काळासारखा नव्हता. तत्कालीन सर्व प्रकारच्या अभावांवर मात करत, अपुर्‍या साधनांच्या बळावर खडतर असा प्रवास करत ही पिढी पुढे आली आणि कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना यांनी संघर्षातून आपलं अस्तित्व निर्माण करून यश मिळवलंय.

हेही वाचाः शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची

खडतर राजकीय प्रवासाचं तंतोतंत वर्णन

निर्मिकाच्या भूमिकेमधे वावरणारी ही सगळी मंडळी कोणकोणत्या समस्यांना तोंड देत पुढं आलेली आहेत याचा यातून बोध होतो. या प्रवासाचं तंतोतंत वर्णन आपल्याला अनेकांच्या आत्मकथनात दिसतं. त्यामुळे या सगळ्या आत्मकथनांचा आस्वाद घेत असताना ज्या ज्या लेखकांनी या राजकीय आत्मकथनावर लेखन केलंय ते केवळ समीक्षेच्या अंगाने नाही तर आस्वादकाच्या अंगाने आहे.

आस्वाद समीक्षा ही क्लिष्ट नसते. त्यामागे समजावून सांगण्याचा, समजावून देण्याचा उद्देश असतो. समजावून देताना आणि समजून घेताना या दोघांचाही हेतू एक असावा लागतो. हाच हेतू संपादक आणि या ग्रंथातल्या लेखकांचा आहे. मुळात हे अतिशय कष्टाचं काम आहे. कुठल्या तरी मोठ्या प्रकाशकांनी करायची गोष्ट आहे. त्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं नाही. पण एका तरुण अभ्यासकाचं मात्र लक्ष गेलं. ते काम तो मनापासून आणि नम्रतेने करत राहिला, याचं मला विशेष कौतुक वाटतं.

व्यक्तिगत राजकीय आत्मकथन वाचत असताना डोळ्यासमोर येते ती पहिली गोष्ट म्हणजे या माणसांचा साधेपणा. ही राजकीय माणसं ज्या ज्या समाजात वावरली तिथे अत्यंत साधेपणाने राहिली. ती सत्ताधारी असली तरी ती त्यांच्यातीलच आहेत, असं त्यांचं वागणं, बोलणं, चालणं आणि एकूणच कृती होती. इथे आपल्याला खेदाने म्हणावं वाटतं की, आजची नेतेमंडळी ही मलबार हिल निवासी झालेले आहेत. 

हेही वाचाः माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी

पुस्तक कुणासाठी?

माणूस निवडून येतो ग्रामीण भागातून आणि निवडून आल्यानंतर दुसर्‍या महिन्यात तो पूर्ण मुंबईकर होतो, ही आज प्रकर्षाने लक्षात येणारी गोष्ट आहे. पण ती राजकीय मंडळी आपल्या माणसांबरोबर राहायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्याबरोबर खायचे, त्यांच्या सुख-दुःखाशी समरस व्हायचे. त्यांचे प्रश्‍न आपल्याला सोडवता येतात का, याचा अंदाज घ्यायचे. त्या वकुबीने त्यांना आश्‍वासन द्यायचे, त्या आश्‍वासनाची पूर्तता होतं की नाही याचा अंदाज घ्यायचे, त्याचा पाठलाग करायचे. आजच्या काळात या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्यामुळे या ‘राजकीय आत्मचरित्रं : स्वरुप आणि समीक्षा’ या ग्रंथाचे महत्त्व अधिक वाटतं.

वाहून जायचं आणि जागरूक राहायचं हे वय असतं. अशा वयामधे एक विशिष्ट विषय घेऊन ग्रंथाची निर्मिती करणं हे अवघड काम आहे. ते संपादकाने त्यांच्या पद्धतीने केलं त्याचं श्रेय त्यांना दिलें पाहिजे. हा ग्रंथ उद्योग किंवा ग्रंथाचा खटाटोप पेलवत नसतानाही पेलवण्याचें सामर्थ्य या तरुण वयातल्या संपादकाने स्वीकारलं, हे अतिशय महत्त्वाचं आहे.

हा ग्रंथ वाचत असताना आपण भावनाग्रस्त होतो का? भावनेच्या आहारी जातो का? पण आपण भावनेच्या आहारी जात नाही आणि भावनाग्रस्तही होत नाही. भावनेच्या आहारी जाणं म्हणजेच भावनाग्रस्त होणं. भावनाग्रस्त न होता तत्कालीन समाजव्यवस्था आणि राजकीय भान समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे ग्रंथ आपण वाचत असतो. वाचकाच्या व्यक्तिमत्त्वाची झेप ग्रंथ संपादकासमोर आहे. त्यामुळे हा ग्रंथ क्लिष्ट होऊ न देता तो संदर्भग्रंथ म्हणून प्रसिद्ध करत आहोत, हा विचार संपादकाने सातत्याने डोक्यात ठेवलेला आहे. विचारवंतांनी वाचण्यापेक्षा सर्वसामान्य वाचक, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी तो वाचावा, हा मुख्य हेतू आहे.

राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा
संपादन: मोतीराम पौळ
प्रकाशन: अक्षरदान प्रकाशन, पुणे
पानं: २७२
किंमत: २७५

हेही वाचाः 

द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्सः स्वप्नांमधून जगण्याचा अर्थ लावायला शिकवणारं पुस्तक

विद्वत्तेविरुद्ध मोदी सरकारने पुकारलेलं युद्ध

अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

(महावीर जोंधळे हे जेष्ठ साहित्यिक, पत्रकार असून दैनिक लोकमत, प्रभातमधे संपादक म्हणून काम केलंय. ग्रंथासाठी संपर्क: मोतीराम पौळ 9637993319)