कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?

२३ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.

आरोग्य ही माणसासाठी फार महत्त्वाची गोष्ट बनलीय. त्याबाबतीत कुठलीही तडजोड आपण करत नाही. साधरोगाच्या काळात तर विशेष काळजी घेतो. अगदी छोटा आजार आला तरी लगेचच एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून ये असा सल्ला आपल्याला मिळत असतो. पण हा चांगला डॉक्टर म्हणजे नेमकं कोण हे आपल्याला कुणी सांगत नाही.

मग सोयीसुविधा असणाऱ्या, स्वच्छ, पॉश हॉस्पिटलमधल्या स्मार्ट वगैरे दिसणाऱ्या, टापटीप राहणाऱ्या डॉक्टरकडे आपण जातो. किंवा आपल्या ओळखीच्या कुणीतरी सुचवलेल्या डॉक्टरकडे जायचं आपण ठरवतो. अनेकदा हे डॉक्टर भरपूर फी घेतात. एवढे पैसे जाऊनही कधीकधी गुण येतंच नाही. मग ‘चांगल्या डॉक्टर’ चा आपला शोध पुन्हा सुरू होतो.

कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात तर अशा एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर जगाच्या पाठीवर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. आता एखादा अनोळखी पत्ता शोधायचा असेल तर आपण आसपास राहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारत जातो. तसाच, या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरलाही आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील.

हेही वाचा: ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

डॉक्टरकडे डिग्री कोणती आहे?

चांगला डॉक्टर निवडण्यासाठी पहिला प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे त्याकडे डॉक्टरकीची कोणती डिग्री आहे याचा. एखाद्या चांगल्या, मान्यताप्राप्त कॉलेज किंवा युनिवर्सिटीची डिग्री असणं ही चांगला डॉक्टर बनण्याची किमान अट असायला हवी. अनेकदा फार मोठ्या, प्रतिष्ठीत कॉलेजची, युनिवर्सिटीची डिग्री असेल तर डॉक्टर चांगला आहे, असा आपला समज होतो. पण अशा प्रतिष्ठीत संस्थांपेक्षा खास मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या कॉलेजमधे जास्त चांगलं शिक्षण मिळतं. १९५६ च्या इंडियन मेडिकल काऊन्सिल कायद्यानुसार, मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडून अधिकृत केलेल्या कॉलेज आणि युनिवर्सिटीची डिग्री असेल तर डॉक्टरकीची पदवी मिळू शकते. 

भारतातला डॉक्टरकीचा अभ्यासक्रम हा फार किचकट आणि प्रचंड आहे. ४ ते ५ वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी विषयाच्या खूप खोलात जातात. पण हे पुस्तकी ज्ञान मिळालं म्हणजे चांगला डॉक्टर झाला असं होत नाही. यासोबतच व्यावहारिक ज्ञानाचीही गरज असते. म्हणूनच डॉक्टरची डिग्री बघिल्यानंतर त्या डॉक्टरला प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती हेही पहायला हवं.

डॉक्टर शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही डॉक्टर स्वतःचं ज्ञान सतत अपडेट करतोय का, कुठल्या संशोधनात त्याचा सहभाग आहे का किंवा एखाद्या विषयावरचं स्पेशलायझेशन वगैरे आहे का याचीही मदत होऊ शकते.

महत्त्वाचं म्हणजे, डॉक्टरकडे काम करण्याचा लायसन्स आहे की नाही हे तपासता येईल. ही माहिती सहज मिळू शकते. डॉक्टर हॉस्पिटलमधे काम करत असतील तर तिथल्या प्रशासनाकडून ही माहिती मिळवता येऊ शकते. किंवा स्वतः डॉक्टरलाच ही माहिती विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे.

डॉक्टरकी नेमकी कशासाठी करतो?

डिग्री ही फार महत्त्वाची गोष्ट आहेच. ती असल्यावरच त्या डॉक्टरला पुढचे प्रश्न विचारता येतील. पण ही डिग्री मिळवून तो डॉक्टरकी नेमकी कशासाठी करतोय याचाही अंदाज घ्यायला हवाय.

अनेक डॉक्टरांसाठी पेशंट तपासणं हे फक्त पैसे मिळवण्याचं साधन असतं. अनेकांना तर ती समाजसेवा वगैरेही वाटते. आपण काहीतरी ग्रेट करतोय अशी भावना ते ठेवतात. पेशंटना तपासून, त्यांना औषध दिल्यावर डॉक्टरला काही एक पैसे मिळाले पाहिजेत हे खरंच आहे. पण डॉक्टरकी म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन किंवा समाजसेवा असा विचार करणाऱ्या डॉक्टरवर फुली मारलेलीच बरी. अशा डॉक्टरकडून औषधं घेतली तरी ती उपयोगी पडतीलच. पण अशा विचारांच्या डॉक्टरसोबत पेशंटचं नातं कधीच जुळत नाही.

पैसे मिळवण्यासाठी, किंवा नुसतं कर्तव्य म्हणून, मनात कोरडेपणा ठेऊन डॉक्टर काम करत असेल तर तिथे चांगले डॉक्टर पेशंट संबंध तयार होणार नाहीत. अशा डॉक्टरकडे जावं, त्यांना आपल्या मनातलं सगळं खरं सांगावं असं आपल्याला वाटतच नाही. अशाप्रकारे डॉक्टरलाही खरं कळणार नसेल तर त्यांच्याकडून आपले उपचार चांगल्या पद्धतीने होण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा: या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

डॉक्टर सहज उपलब्ध होतो का?

इमरजन्सीच्या वेळी तुमच्यासाठी उपलब्ध होतो तोच तुमचा चांगला डॉक्टर असतो. साध्या गल्ली बोळातले डॉक्टर, हकीम, भोंदू बाबा सहज उपलब्ध असतात. याचा अर्थ ते चांगले असतात असं नाही. पण भरपूर डिग्र्या असलेला डॉक्टर चार चार तास वाट बघायला लावत असेल, वेळ देऊन ती पाळत नसेल तर अशा डॉक्टरवर विश्वास ठेवता येणार नाही.

अनेकदा डॉक्टर सहज उपलब्ध असतातही पण एका पेशंटसाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा वेळ त्यांच्याकडे असतो. पेशंटची मोठी रांग बाहेर वाट पाहत असते. १० मिनिटांत पेशंटचं म्हणणं ऐकून घेणं, त्यावर आपण बोलणं आणि मग औषध देणं हे शक्य होत नाही. त्यामुळे पेशंटचं म्हणणं ऐकून न घेताच डॉक्टर फटकन काही औषध लिहून देतात.

डॉक्टर दररोज १०च पेशंट पाहत असेल तरी चालेल. या हिशोबाने भारताची लोकसंख्यापाहता आपला नंबर महिन्याभराने येईल.पण महिन्याभराने का होईना डॉक्टरने पुरेसा वेळ देऊन आपलं म्हणणं नीट ऐकून घेऊन, आपल्याशी व्यवस्थित बोलून मगच उपचार करायला हवेत.

डॉक्टर तुमच्याशी किती बोलतो?

हे टाळायचं असेल तर डॉक्टरची बोलण्याची भाषा, पद्धत पहावी लागेल. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्टर तुमचं किती ऐकून घेतो ते. तुम्हाला नक्की काय होतं, किंवा त्याने दिलेल्या औषधांचा वेळा का पाळता येत नाहीत, गोळ्या घेऊनही घरच्या काही गोष्टींमुळे तुमच्यात फरक पडत नसेल तर ती गोष्ट कोणती या सगळ्या गोष्टी डॉक्टरनं ऐकून घ्यायला हव्यात. पेशंटला न ओरडता, न चिडता त्यावरचे तोडगे डॉक्टर सांगत असेल किंवा काय करता येईल याची चर्चा करत असेल तर त्या डॉक्टरला चांगलं म्हणता येईल.

आपल्यासमोर बसलेला पेशंट कधीही शाळेत गेलेला असो किंवा इंजिनियर असो, त्याच्या शरीराचं विज्ञान त्याला समजेल अशा भाषेत सांगणारा डॉक्टर बेस्टच म्हणावा. पेशंटला विज्ञान कळणार नाही अशी समजूत असणाऱ्या डॉक्टरांना पेशंटने फक्त माझ्या आज्ञा पाळाव्यात असं वाटत असतं. मी सांगतो त्या गोळ्या घ्यायच्या आणि बरं व्हायचं. बास. पण त्यामागचं सगळं विज्ञान जाणून घेण्याचा पेशंटला हक्क आहे आणि ते समजावून सांगणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे.

डॉक्टरचं वागणंही खूप काही सांगून जातं. आपला डॉक्टर गरीब लोकांशी कसा वागतो, त्यांचा सन्मान ठेवतो का, त्यांच्यावेळेला महत्त्व देतो का हे पहावं लागेल. इतकंच काय, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नर्सेस किंवा वॉर्डबॉयशी तो कसा वागतो यावरूनही आपण योग्य ठिकाणी आलोय की नाही हे कळू शकेल.

हेही वाचा: या पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग

डॉक्टरची आरोग्याची फिलॉसॉफी काय आहे?

तुमच्या डॉक्टरची आरोग्याची फिलॉसॉफी तुमच्याशी जुळणं फार महत्त्वाचं आहे. आरोग्य हे अतिशय जबाबदारीचं क्षेत्र आहे. डॉक्टर ही जबाबदारी घेतो का ते पहावं लागेल. तुमच्यावर चांगले उपचार करणारा डॉक्टर बाहेर स्त्री भ्रूण हत्या करत असेल तर अशा डॉक्टरला आपण नकारच द्यायला हवा.

अविवाहित स्त्रियांचा गर्भपात असो किंवा एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल त्यांचं मत पूर्वग्रहदुषित असेल तर त्या डॉक्टरकडून उपचार करून घेणं टाळलेलं बरं!

डॉक्टरकडे गेल्यावर किती पैसे खर्च होतात?

डॉक्टरची फी जास्त किंवा कमी असणं एवढंच बघणं पुरेसं नाही. पेशंटना तपासून आपलं, आपल्या कुटुंबाचं पोट व्यवस्थित भरू शकेल, मुलांची शिक्षणं करू शकेल इतके पैसे तर डॉक्टरने कमावलेच पाहिजेत. पण अनेक डॉक्टर एका वाक्याच्या सल्ल्यासाठीही हजार रूपये आकारतात.

इतकंच नाही, तर सर्दी झाली असली तरी अमक्याच लॅबमधून भरपूर टेस्ट करायचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर आपण पाहत असतो. महागडी औषधं देणारे, भरपूर टेस्ट करायला सांगणारे किंवा काहीतरी बाहेरून प्रोटिन शेक किंवा टॉनिक वगैरे घ्यायला सांगणारे डॉक्टर चांगले नाहीतच.

आपल्याकडे इतकी साधनसंपत्ती, भारतात इतक्या वेगवेगळ्या पदार्थांपासून इतका चांगला स्वयंपाक केला जातो की त्यातून आपल्या शरीराला गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळतात. शिवाय, त्यासाठी वेगळा खर्चही करावा लागत नाही. त्यामुळेच, कमीतकमी खर्चात त्या त्या भागात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून एखाद्या डॉक्टरला औषध देता आलं तर त्याची पाठ कधीही सोडू नये.

काही वर्षांपूर्वी डॉक्टरबद्दल कोणतीही माहिती मिळवण्याचा एकमेव स्रोत होता लोकांशी बोलणं. डॉक्टरचे पेशंट किंवा ओळखीचे लोक त्यांचं कौतूक करायचे आणि आपण त्यांच्याकडे जायचो. पण आता ही माहिती इंटरनेटवर सहज मिळू शकते. आपल्या आसपासचे चांगले डॉक्टर शोधून देणारे ऍप्सही उपलब्ध आहेत. डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर त्याचे पेशंट त्या ऍपवर डॉक्टरविषयी लिहितात. त्याच्या चांगल्या वाईट बाजू सांगतात. त्या सगळ्याचा विचार केला तर चांगल्या डॉक्टरच्या घराकडे जायचा नकाशा आपल्यासमोर उभा राहील.

हेही वाचा: 

नेपाळमधल्या सत्तासंघर्षामागचं कारण काय?

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?