मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

०१ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा.

एकदा भीमण्णा मुंबईहून चार दिवस झाले तरी परतले नव्हते. मी ‘तिकडच्या’ घरी गेलो असता आमचा तो बंधू त्यांना शोधण्यास मुंबईला निघाला होता. कधी नव्हे ते ‘त्यां’नी मला, ‘त्याच्याबरोबर गेलास तर बरे होईल. तू थोरला असल्यामुळे ते तुझे ऐकतील!’ असे सांगितले. मीही ताबडतोब नेसत्या कपड्यांनिशी त्याच्याबरोबर निघालो. जाता जाता आईकडून थोडे पैसे घेतले.

तो बंधू मुंबईला बरेचदा भीमण्णांच्या मित्रमंडळींकडे गेलेला असल्यामुळे त्याला सर्व पत्ते माहीत होते. म्हात्रे इंडस्ट्रीच्या म्हात्रेंकडे गेलो. तेथे ते नव्हते. एका दुसऱ्या प्रतिष्ठितांच्या घरी ते सापडले; पण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेथे जाताना वाटेत लोकलमधे आम्ही दोघेच होतो. सर्व वेळ बंधुराजे ‘भीमण्णा’ कसे असेच वागतात आणि घरी पैसेच आणत नाहीत, याचा पाढा वाचत होते. मीच विकत घेतलेल्या दोन बिस्कीट पुड्यांवर भूक भागवून तेथे पोहोचलो. भीमण्णा आम्ही तेथे गेल्यावर आमच्याबरोबर बाहेर पडले; पण अशा वेळी ते कोणाचेच ऐकत नसत. त्यांच्या मनात येईल तेच ते करत. झाले तसेच.

त्यांनी सांगितले म्हणून आम्ही टॅक्सी करून डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या घरी पोहोचलो आणि दारावरची बेल वाजवली. त्या अगोदरच मधे थांबून भीमण्णांनी त्यांना फोन केला होता आणि गाडी पाहिजे असे सांगितले होते. सौ. घाणेकरांनी दार थोडे उघडून कारची किल्ली दिली आणि ‘त्यांना बरे नाही’ असे सांगून दार लावून घेतले. त्यांची चिंता वेगळीच होती. तेही भीमण्णांबरोबर सटकले तर काय घ्या?

आम्ही गाडीत बसलो आणि भीमण्णांनी ‘स्टार्टर’ मारूनही ती चालू होईना. आम्ही ती ढकलून चालू केली आणि उडी मारून आत बसलो. सफाईने गाडी चालवत भीमण्णांनी माटुंग्याच्या एका जुन्या चाळीसमोर गाडी उभी केली. ते वर जाऊ लागताच आम्हीही वर निघालो. एका बंद खोलीचा दरवाजा ठोठावला. एका काळ्यासावळ्या कोकणी बाईने दार उघडले. भीमण्णा तिच्याशी कोकणीतून बोलले आणि तिने गोव्याच्या घरगुती मद्याच्या बाटल्या तारेच्या ट्रे मधून दिल्या. वर प्रेमाने यांना सल्ला दिला, ‘भाऊ, नको रे जास्त घेऊस!’ आम्ही गाडी परत ढकलून आत उडी मारून बसलो आणि सुसाट वेगाने गाडी पळू लागली.

हेही वाचा : ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

बांद्र्यावरून पुढे जाताना भीमण्णांनी गाडी एकदम लेन बदलून डावीकडे घेतली. मी त्यांना विचारले काय झाले? तर मला म्हणाले, ’मागे बघ तो मोठी गाडी घेऊन कसा जोरात येतो आहे! पण त्याला पुढे डिव्हायडर चालू होत आहे, हे माहीत नाही. त्यामुळे तो आपल्या अंगावर येईल.“ झालेही तसेच. त्या वेगात डिव्हायडर दिसताच तो गाडीवाला एकदम डावीकडे सरकला आणि निघून गेला. अशा अवस्थेतही भीमण्णांच्या तीक्ष्ण नजरेत आणि ड्रायव्हिंग कौशल्यात काहीही फरक पडत नसे. या सर्व वेळात त्यांची नजर चुकवून मी त्या सर्व बाटल्या रस्त्यात रिकाम्या केल्या होत्या. पुढील सिग्नलपाशी त्यांच्या ते लक्षात येताच माझ्यावर रागावले आणि ‘यू टर्न’ घेऊन परत आम्ही त्या चाळीकडे गेलो. अशा वेळी त्यांच्या मनाविरुद्ध काहीही चालत नसे.

पहाटे कधीतरी कोणाच्या तरी घरी झोपून उशिरा उठलो; पण यांचे पुण्याला येण्याचे नाव नाही. इकडेतिकडे करत आम्ही दादरला एका नाट्यगृहात दुपारी पोहोचलो. तेथे दुपारचा प्रयोग होता. अरुण सरनाईक यांच्या नाटकाचा गाजलेला प्रयोग होता. आत शिरताना एक गृहस्थ समोर येताच भीमण्णा म्हणाले, ’हे आमचे वैरी. पाहा कसे डोळे वटारून पाहत आहेत!’ तोही गृहस्थ तितक्याच आगाऊपणाने यांच्याकडे पाहत होता. सहसा भीमण्णा अशाप्रकारे कोणाशीच बोलत नसत; पण ‘औरंगजेबी’ स्वभावाच्या त्या माणसाचे यांचे जमले नव्हते. एक अंक संपताच आम्ही भीमण्णांबरोबर ग्रीनरूममधे गेलो. तेथे अरुण सरनाईक भीमण्णांना पाहताच धावत पुढे आले आणि ’काय अण्णा आज आमच्यावर कृपा केलीत का?` असे प्रेमाने म्हणाले. शेजारीच बालनट सचिन उभा होता. तो तेव्हाही भीमण्णांचा ‘फॅन’च होता. त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून भीमण्णा काहीतरी बोलले आणि आम्ही बाहेर पडलो.

अनंत मिनतवाऱया करून शेवटी आम्ही पुण्याला जाण्यासाठी एअरपोर्टवर आलो. त्यांच्या सधन मित्रानेच पैशाची व्यवस्था केली होती. विमान सुटायला अवघी पंधरा मिनिटे बाकी होती. तिकीट काढत असताना किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर पळत आले आणि भीमण्णांना म्हणाले, ’अण्णा, मलाही पुण्याला यायचे आहे; पण तिकीट नाही म्हणत आहेत!` त्यांचीही व्यवस्था झाली आणि आम्ही विमानात स्थानापन्न होईपर्यंत आणखी पंधरा मिनिटे विमान यांच्यासाठी उशिरा थांबवून सोडले गेले.

आत जाताच हे कॉकपिटमधे पायलटकडे गेले. तो त्यांचा खास फॅनच होता. तेथून मला बोलवून कॉकपिट दाखवले आणि पायलटला, ‘येथील एका पार्टचे काय झाले?’ असे भीमण्णांनी विचारताच तो आश्चर्याने उडालाच! कारण नुकताच तो पार्ट मॉडिफाय करून दुसरीकडे बसवला होता. भीमण्णांचे सर्व यंत्रांचे ज्ञान आणि निरीक्षण अगाध असेच होते. तो भीमण्णांबरोबरचा माझा पहिला आणि शेवटचा विमानप्रवास. नंतर विमानप्रवासाचा योग तीस वर्षांनी स्वतंत्र व्यवसाय करून समृद्ध झाल्यावर उदयपूरला जाताना आला.

हेही वाचा : पुस्तक माणसाला कसं घडवतं?

पुण्याला पोहोचल्यावर सरळ घरी न जाता भीमण्णांनी आम्हाला व्यंकटेश माडगूळकरांकडे नेले. तेथे थोड्या गप्पा मारल्या आणि तिकडच्या थोरल्याचे कौतुक करत त्याला एक भावगीत म्हणण्यास सांगितले. ‘कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी!’ हे ते भावगीत त्याने छान म्हटले. मी शांत एका कोपऱयात उभा होतो, पण मीही बऱयापैकी गाऊ शकतो, हे त्यांच्या गावीही नव्हते. मी तोपर्यंत ‘अळणी मीठवाली’चा मुलगा झालेला होतो.

भीमण्णांबरोबर मुंबईत भटकत गेल्या वेळी ते आम्हाला एकदा ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’च्या छोट्या हॉलवर घेऊन गेले. ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकासाठी भीमण्णांनी ‘संगीत’ दिले होते. त्याच्या तालमी चालू होत्या. रामदास कामतांना भीमण्णा ‘कलाश्री’मधली ‘धन धन भाग सुहाग तेरो!’ ही चीज गाऊन दाखवत होते. सर्व चीज मीही कानांत साठविली आणि दुसरे ‘संवाद’ सुरू होताच गॅलरीत येऊन उभा राहिलो. पेटीवाले ठाकूरदासही तेथे उभे होते.

संध्याकाळची वेळ आणि मी सहज ‘मारवा’ म्हणू लागलो. २०-२५ मिनिटे मी माझ्या तंद्रीतच गुंग होऊन गात होतो. मी थांबल्यावर ठाकूरदासांनी प्रेमाने हात दाबला आणि पाठीवर थाप मारून ‘वा क्या बात है!’ असे उद्गार काढले. एवढ्यावर गप्प न बसता आत जाऊन भीमण्णांना त्यांनी ‘राघू मारवा फार छान गात होता.’ हे सांगितले. माझ्याकडे फक्त एक प्रेमाचा कटाक्ष त्यांनी टाकला. मला त्यांनी काय देऊन जन्म दिला आहे, याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.

मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना भीमण्णा आमच्या घरी रात्री अकरा वाजता आले. घरचे सगळे एका लग्नासाठी कर्नाटकातल्या गावी गेलेले. मी एकटाच कॉलेजमुळे मागे राहिलो होतो. ते आले, तेव्हा मी खानावळीतून डबा आणून जेवत होतो. त्यांना पाहताच माझे जेवण मी संपवले आणि हात धुतले. ‘जेवणार का?’ या माझ्या प्रश्नावर ‘मी नुसता झोपणार!’ असे उत्तर देऊन त्यांनी जाकिट आणि नेहरूशर्ट खुंटीला अडकवला आणि ते पलंगावर आडवे झाले.

हेही वाचा : थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

मी लगेच त्यांचे पाय चेपायला सुरुवात केली. ही आमच्या घराण्याची परंपरा होती. फारसे न बोलताही स्पर्शातूनच बरेच काही पोहोचवले जाई. सतत बैठकीवर बसून केव्हाही त्यांचे पाय दुखतच असत. थोड्याच वेळात त्यांनी थांबायची खूण केली आणि मी त्यांचे डोके चेपू लागलो. मला हे करताना एक अनामिक आनंद मिळे. त्यांचे भव्य कपाळ, कुरळे दाट केस यांवरून बोटे फिरताना आपण तेजाच्याच जवळ आहोत, असे वाटून जाई! ‘तरुणपणात तुझे वडील म्हणजे साक्षात मदन होते!’ हे आईचे वाक्यही आठवले. जरा वेळाने ते मला म्हणाले, ’बास झाले. तूही येथेच झोप!’ माझ्या डोळ्यांतले प्रश्नचिन्ह पाहून म्हणाले, ’माझ्याच शेजारी झोप!’ मी त्यांच्या कुशीत आडवा होताच त्यांनी मला हळूच विचारले, ’तुझा आवडता राग कोणता?’ मी ‘मालकंस’ हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले.

केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची आणि त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. मला आपण ‘मालकंसाच्या उगमापाशीच आहोत’ असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे ‘आसावरी तोडी’च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर आणि त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास!

पुस्तकाचे नाव गाणाऱ्याचे पोर
लेखक – राघवेंद्र भीमसेन जोशी
प्रकाशक – शब्द पब्लिकेशन
किंमत – २५० रुपये

हेही वाचा : 

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

(साभार शब्द पब्लिकेशन)