आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

१४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


दुसऱ्यांवर प्रेम करावं, असं आपल्याला लहानपणापासून नेहमीच सांगितलं जातं. त्यामुळेच संपूर्ण जगात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, करू शकतो अशा सगळ्यांची आठवण आपल्याला आजच्या प्रेमाच्या दिवशी होत असते. पण स्वतःची आठवण काढायला आपण हमखास विसरतो. या वॅलेंटाईनला एरिक फ्रॉर्म यांच्या 'द आर्ट ऑफ लविंग' पुस्तकासोबत स्वतःवरही प्रेम करायला शिकूया!

शेजाऱ्यांवर प्रेम करा, बंधुभाव जोपासा अशी शिकवण शाळेत, घरात आपल्याला लहानपणापासून मिळत असते. माझ्या भारत देशावरही माझं प्रेम आहे हेदेखील आपण प्रतिज्ञा म्हणताना सांगतो. एवढंच नाही तर झाडं, पशु, पक्षी यांच्यावरही आपण भरभरून प्रेम करत असतो. या सगळ्या सजीव वस्तू तर आपल्या हव्या असतातच. पण घर, शाळा, बाहुल्या, गाड्या, मोबाईल असल्या निर्जीव गोष्टीतही आपला जीव गुंतलेला असतो. या सगळ्यात स्वतःवर प्रेम करायची आपल्याला आठवणसुद्धा राहत नाही.

प्रेमासाठी इतके आसुसलेले आपण स्वतःवर प्रेम करायला कधी शिकणार, असा प्रश्न लेखक एरिक फ्रॉर्म यांनी त्यांच्या द आर्ट ऑफ लविंग या इंग्रजी पुस्तकात विचारलाय. या पुस्तकाचा शरद नावरे यांनी मराठीत अनुवादन केलाय. ‘प्रेमसाधना’ नावाच्या या अनुवादाची दुसरी आवृत्ती शब्द पब्लिकेशननं जानेवारीत काढलीय. वॅलेंटाईन डे निमित्त स्वतःवर प्रेम करायला शिकवणाऱ्या ‘प्रेमसाधना’ मधल्या एका प्रकरणाचा संपादित अंश इथं देत आहोत.

हेही वाचा : लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

स्वप्रेम म्हणजे आत्मरती?

अनंत काणेकरांनी सांगून ठेवलंय, ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास’ हिंदी सिनेमातला हिरोदेखील कंबर लचकावत किंवा बावळट हसू तोंडावर आणत आपल्याला उपदेश करत असतो, ‘अपने लिये जिये तो क्या जिये, ऐ दिल तू जी जमाने के लिये’ वगैरे वगैरे. इतर कोणत्याही गोष्टीवर प्रेम करणं चांगलं, पण स्वतःवर प्रेम करणं मात्र वाईट असं साधारणतः मानलं जातं. समूहजीवनप्रधान समाजरचनांमधून व्यक्तिप्रधान संस्कृतीत प्रवेश करणाऱ्या समाजातल्या प्रत्येकाला त्याच समाजाकडून वेळोवेळी हे बोधामृत पाजलं गेलंय. आपल्याकडे, पौर्वात्य समाजात हे जितकं घडतं किंवा घडलं तितकंच ‘तिकडं’ म्हणजे पाश्चात्त्य जगातही हे घडून गेलंय.

मी जेवढ्या जास्त प्रमाणात स्वतःवर प्रेम करत असेन तेवढं मी इतरांवर कमी प्रेम करणार, कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ पाहणं, स्वार्थी असणं, असं आपण गृहीतच धरून चालतो. सिग्मंड फ्रॉईड म्हणतो, स्वप्रेम म्हणजे आत्मरती. म्हणजेच सुखलुब्ध ऊर्जा स्वतःकडे वळवणं. त्याचं गृहीतच असं होतं की, ही ऊर्जा अर्थात कामप्रेरणाच असते. तिचंच दृश्यरूप म्हणजे प्रेम. कामप्रेरणेचा ओघ इतरांकडे असतो त्या वेळी प्रेम आकाराला येतं आणि ज्या वेळी तो स्वतःकडेच असतो त्या वेळी स्वप्रेम जागृत होतं.

तेव्हा प्रेम आणि स्वप्रेम या गोष्टी परस्परांना छेद देणाऱ्या आहेत. एकीचं प्रमाण वाढलं की दुसरीचं कमी होतं. स्वप्रेम वाईट आणि निःस्वार्थीपणा प्रशंसनीय. सारांश, फ्रॉईड जरी मानसशास्त्रीय भाषेत बोलत असला तरी त्याचा निष्कर्ष काणेकर, हिंदी सिनेमातील हिरो अथवा सर्वमान्य समजुतीपेक्षा वेगळा नाही.

स्वतःवर प्रेम करायचं की शेजाऱ्यावर?

प्रत्यक्ष व्यवहार काय सांगतो? मानसशास्त्रीय पुरावे काय सांगतात? स्वप्रेम आणि इतरांबद्दलचं प्रेम यात मूलभूत अंतर्विरोध आहे, असं पुराव्यांनी शाबीत केलंय का? आणि मुख्य म्हणजे स्वप्रेम आणि स्वार्थीपणा ही एकच गोष्ट असते का? की त्या वेगळ्या आणि परस्परविरोधी गोष्टी आहेत? आधुनिक ‘व्यक्ती’ ही आत्मकेंद्री आणि स्वार्थी आणि संधिसाधू असते खरी. पण ही आत्मकेंद्रितता म्हणजे खरोखरी व्यक्ती म्हणून तिच्याकडे स्वतःच्या म्हणून ज्या बौद्धिक, भावनिक आणि संवेदनक्षमता आहेत, त्याबद्दलची आत्मीयता आहे की दुसरं काही? आपल्या स्वतःच्या आर्थिक, सामाजिक भूमिकेची पडछाया म्हणूनच केवळ ती व्यक्ती वावरत नाही का? त्यापलीकडे व्यक्ती म्हणून तिच्यात काय शिल्लक आहे? स्वार्थी वृत्ती म्हणजे काय? स्वार्थी वृत्ती म्हणजेच स्वप्रेम की स्वप्रेम नसल्याने उद्भवणारा विकार?

या प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरं शोधण्याआधी एक साधा विचार आधी मांडू या. इतर मनुष्यांवर प्रेम करणं हा जर सद्गुण असेल तर मी स्वतःवर प्रेम करणं हादेखील सद्गुणच मानायला हवा. कारण मी स्वतः देखील मनुष्यच आहे. मनुष्यत्वाचा जो तेजोप्रकाश मला इतरांमधे दिसतो तोच माझ्याही अस्तित्वातून फाकतो आहे. मनुष्यपणाची सर्व लक्षणं माझ्यातही मौजूद आहेत.

तेव्हा जर एखादी विचारसरणी मला सांगत असेल की, स्वतःवर प्रेम करणं वाईट, इतरांवरतीच ते करायला हवं, तर त्या विचारसरणीतच काही तरी गफलत असणार. बायबलदेखील ‘शेजाऱ्यावर प्रेम करा’ असं सांगत नाही. मूळ आज्ञा अशी आहे, लव्ह दाय नेबर ऍज दायसेल्फ. स्वतःइतकेच शेजार्यांवर प्रेम कर. स्वतःचं वैशिष्ट्यपूर्णत्व समजून घेऊन स्वतःवर प्रेम करणं ही प्रामाणिकपणा जोपासण्याची पूर्वअट आहे. इतरांबद्दलची कळकळ, जवळीक, भान आणि सन्मान यापासून तिला वेगळी नाही काढता येणार. या अर्थाने माझं स्वतःशी असणारं नातं नितळ आणि प्रेमळ हवं.

हेही वाचा : खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

प्रेम म्हणजे सुखासाठीची धडपड

या विचारांमागच्या मानसशास्त्रीय गृहीतकांकडे आता वळू. इतरांच्या बरोबरीने आपण स्वतःदेखील स्वतःच्या भावना आणि वृत्तींची विषयवस्तू असतो. आपली इतरांबद्दलची आणि स्वतःबद्दलची वृत्ती परस्परविरोधी नसून परस्परान्वयी असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, प्रेम की स्वप्रेम अशी निवड कधीच नसते. प्रेमविषयाच्या संदर्भात प्रेम अविभाज्यच असतं. 

प्रेम म्हणजे त्या व्यक्तीमधील सर्जकतेचा उद्गार असतो. प्रेम म्हणजे काळजी घेणे, समजून घेणे, जबाबदारी आणि सन्मान. ती केवळ एक भाववृत्ती नव्हे. एखाद्यामुळे भारून जाणं नव्हे. प्रेम म्हणजे एखाद्याच्या फुलण्या-उमलण्यासाठी, सुखासाठी करायची धडपड. या धडपडीचा उगम हा व्यक्तीच्या प्रेमक्षमतेत असतो. एखाद्यावर प्रेम करणं याचा अर्थ त्या विशिष्ट व्यक्तीवर आपली प्रेमक्षमता केंद्रित करणं आणि तिला प्रत्यक्षात आणणं.

आपली प्रेमपात्र व्यक्ती ही मूलतः मानवी गुणांचे मूर्तिमंत अवतरण आहे हीच तर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची मूळ श्रद्धा आहे. म्हणून एका व्यक्तीवर केलेलं प्रेम हे समस्त मनुष्यजातीवर केलेलं प्रेम असतं. ‘मी फक्त माझ्या मुलांचा आणि बायकोचा’ असं म्हणून केवळ कुटुंबावर प्रेम करणारा आणि इतरांना आपल्या प्रेमकक्षेत मज्जाव करणारा मनुष्य प्रेम करण्यातली आपली असमर्थताच दाखवून देत असतो.

स्वार्थी माणसाला प्रेमच करता येत नाही

स्वतःबद्दलचं आणि इतरांबद्दलचं प्रेम परस्परान्वयी असतं हे आपण मान्य केलं तर स्वार्थी वृत्तीचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? स्वार्थी माणसाला किंवा आधुनिक समाजातल्या संधिसाधूंना इतरांबद्दल अजिबात पर्वा नसते. या स्वार्थपरायणाला फक्त स्वतःमधे रस असतो. प्रत्येक गोष्ट त्याला केवळ स्वतःसाठी हवी. काही देण्यात त्याला आनंद मिळत नाही. फक्त घेण्यात तेवढा मिळतो. बाहेरच्या जगाकडे तो फक्त आपल्याला कुठून काय उकळता येईल याच दृष्टीने पाहातो. इतरांच्या गरजांचे त्याला भान नसते. त्यांच्यात सचोटी, प्रामाणिकपणा, आत्मसन्मानाबद्दल आदर नसतो. तो फक्त स्वतःपुरते तेवढे पाहातो. त्याला मुळात प्रेमच करता येत नाही. 

स्वार्थी माणसाला स्वतःबद्दल प्रेम असते हे खरे नाही. किंबहुना तो स्वतःचा तिरस्कारच करत असतो. त्याच्या सर्जनशुष्कतेच्या अनेक अंगांपैकी एक अंग स्वतःबद्दलची अप्रीती हे असतं. या सर्जनशुष्कतेमुळे तो रिकामा, ओकाबोका, ओसाड आणि हताश असतो. मुळात दुःखी असल्याने आपण स्वतःच ज्याच्या मार्गातला धोंड बनलो आहोत त्या जीवनापासून मिळेल ते हिसकावून घेण्याच्या नादात तो असतो. तो फारच तीव्रतेने स्वतःचाच विचार करत असल्याचं भासतं; पण आपल्यातल्या खऱ्या स्वशी नातं जोडण्यात आलेल्या अपयशाला झाकण्याचा, ते भरून काढण्याचा तो प्रयत्न असतो.

स्वार्थी वृत्तीचे गमक समजण्यासाठी तिची तुलना इतरांबद्दलच्या मानभावी जिव्हाळ्याशी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ‘अतिप्रेमळ’ आईला मनापासून वाटत असतं की, आपल्याला आपल्या बाळाबद्दल फारच विशेष प्रेम आहे. पण तिच्या सुप्त मनात मात्र आपल्याला ज्याच्यावर प्रेम करावं लागतं त्या बाळाबद्दलचा द्वेष खोलवर दडलेला असतो. ती बाळाबद्दल अतिसंवेदनशील असते ते त्याच्यावर अधिक प्रेम करते म्हणून नव्हे तर त्याच्यावर प्रेम करण्याची क्षमता आपल्यात नाही हे दडवण्यासाठी.

हेही वाचा :  एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?

दुसऱ्याचा अतिविचार हे देखील अनारोग्यच!

स्वार्थपरायणांबद्दलच्या या आपल्या सिद्धांताला निःस्वार्थ नारायणांच्या मनोविश्लेषणातून पुष्टी मिळते. टोकाच्या परार्थी व्यक्ती प्रत्येक खेपेला केवळ दुसऱ्यांचा विचार करताना दिसतात; पण या ‘लक्षणा’च्या जोडीनेच मानसिक अनारोग्याची इतर लक्षणं म्हणजे विषण्णता, थकवा, निरुत्साह, काम करण्यातील आळस वा असमर्थता, प्रेमसंबंधातलं अपयश हीदेखील त्यांना छळत असतात. पराकोटीचा परार्थ मानसिक अनारोग्याचं लक्षण असून ते ध्यानात मात्र येत नाही. या अनारोग्यावरती पांघरूण घालणारा तो स्वभावविशेष अभिमानपूर्वक मिरवला जातो. 

‘स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न करणारा’, ‘केवळ दुसऱ्यांसाठी राबणारा’, ‘निःस्वार्थी’ मनुष्य आपण स्वतःला फारसे महत्त्व देत नसल्याचा अभिमान बाळगतो. आपण एवढे निःस्वार्थी असून दुःखी का आणि आपले इतरांबरोबरचे संबंध असमाधानकारक कशामुळे याचे त्याला नेहमी कोडे पडलेले असते. नीट विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की, अशा व्यक्तीचा परार्थ हा त्याची प्रेमक्षमता बधिर झाल्याचं किंवा आनंदी वृत्ती हरवल्याचं एक लक्षण आहे. इतर लक्षणांहून ते वेगळे नाही. किंबहुना ते सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे. 

जीवनाबद्दलच्या घृणेने त्याचे अंतर्मन नासून गेलंय. आणि निःस्वार्थीपणाच्या बुरख्याआड एक सूक्ष्म पण तीव्र अशी अहंकेंद्रितता त्याच्यात दडली आहे. इतर लक्षणांबरोबरीनेच त्याचा परार्थ हेसुद्धा अनारोग्याचं लक्षण आहे, असं मानलं तरच या अनर्थाचे आणि अनारोग्याचं मूळ असलेल्या असर्जकतेच्या विळख्यातून त्याची सुटका होऊ शकते. आत्मनार्थ त्यजेत विश्वं या गूढ वचनाचा हा अर्थ आहे.

स्वतःसारखंच इतरांवर प्रेम

परार्थ वृत्तीचा परिणाम इतरांवरदेखील घडताना दिसतो. आपल्या समाजात ‘निःस्वार्थी’ मातेचा किंवा पित्याचा अपत्यांवर काय संस्कार होतो? या माता-पित्यांना वाटत असतं की, आपल्या निःस्वार्थ आणि परार्थ वागण्यातून मुलांना प्रेमाचा एक आदर्श दिसेल आणि ती स्वतः प्रेम करायला शिकतील. पण प्रत्यक्षात घडतं वेगळंच. प्रेम लाभलेल्या व्यक्तीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर कधी नसतोच. उलट ती चिंतातुर आणि तणावग्रस्त बनतात. 

आपण आई-वडिलांची अपेक्षापूर्ती करू शकू किंवा नाही, त्यांची नाराजी ओढवून घेऊ किंवा काय, अशा मानसिक दडपणाखाली ती वाढतात. आई किंवा वडिलांच्या व्यक्तिमत्त्वात खोलवर दडलेल्या जीवनाबद्दलच्या घृणेचा त्यांना वास येतो आणि त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्त्वदेखील या घृणेने बरबटून निघते. 

स्वार्थपरायण आणि निःस्वार्थनारायण अशा दोन्ही प्रकारच्या आई-वडिलांचा मुलांवर होणारा संस्कार सारखाच वाईट असतो. उलट निःस्वार्थ्यांचा तर जास्त वाईट. कारण या निःस्वार्थीपणावर टीकादेखील करता येत नाही. आई-वडिलांना दुखवू नये अशा दडपणाखाली वाढणाऱ्या मुलांना चारित्र्य, नीतिमत्ता, सद्गुण अशा नावाखाली जीवनाबद्दलची घृणा तेवढी शिकवली जाते. याउलट स्वतःवर प्रेम करत जगणाऱ्या आईचा किंवा वडिलांचा आपण अभ्यास केला तर ते प्रेम किती नितळपणे मुलांच्याही व्यक्तिमत्त्वात पाझरतं ते आपल्याला दिसून येईल.

एका विचारवंताने म्हटले आहे, आपण स्वतःवर प्रेम करू शकलो तरच इतरांवरही करू शकतो. एखाद्या व्यक्तीवर आपण स्वतःपेक्षा कमी प्रेम करायला लागलो तर आपण स्वतःवरही प्रेम नाही करू शकणार. स्वतःसहित सर्वांवर जेव्हा आपण सारखेच प्रेम करतो तेव्हा सर्वच मनुष्यजातीवर आपण एक व्यक्ती म्हणून प्रेम करतो आणि ही व्यक्ती एकाच वेळी देव आणि मनुष्य दोन्ही कोटींतील असते. जी व्यक्ती स्वतःवर आणि इतरांवर सारखेच प्रेम करते तीच थोर आणि तीच सन्मार्गी.

हेही वाचा : 

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

(साभार शब्द पब्लिकेशन. पुस्तकासाठी संपर्क ९८२०१४७२८४)