पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

१७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी.

दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम…
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम…
हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो…
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें...
जो अपनी आखों में हैरानियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...
दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...

असंच जिंदा दिल घेऊन जगलेला माणूस म्हणजे जावेद अख्तर. खायला अन्न आणि झोपायला गादी, उशी तर सोडाच पण डोक्यावर साधं छप्परही नव्हतं. फक्त मनातली अस्वस्थता आणि एकटेपणाच्या प्रचंड दुःखासोबत डोळ्यात रंगीबेरंगी स्वप्न घेऊन अस्सलपणे, रसरसशीत जगलेला माणूस म्हणजे जावेद अख्तर. आयुष्यभर हवेसारखं मोकळं आणि समुद्रासारखं वाहत राहण्याच्या प्रयत्नात आपले दोन्ही हात पसरून आयुष्याला मिठीत घेणाऱ्या या मस्त मौला माणसाचा जावेद साहेबांचा ७५ वा बड्डे.

आज सिनेसृष्टीतले मोठे लेखक म्हणून जावेद अख्तर यांचं नाव घेतलं जातं. आयुष्यभर सिनेमाच्या कथा लिहिणाऱ्या माणसाची कथा लिहिण्याचा, सांगण्याचा हा दिवस. ‘तरकश’ या पुस्तकातल्या काही पानांमधे स्वतः जावेदसाहेबांनीच आपल्या जगण्याची गोष्ट उलगडून सांगितलीय. सिनेमातल्या पटकथेसारखी त्यांच्या आयुष्याची ही कथा लिहावी लागेल. काही ओपनिंग सीन्स, दोन तीन क्लायमॅक्स अशीच त्यांची कथा होती.

हेही वाचा : भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण

आपण भरपूर श्रीमंत व्हायचं!

जावेद अख्तरांच्या आयुष्याच्या पटकथेतला पहिला सीन लखनऊ शहरापासून सुरू करावा लागेल. आजी आजोबा, सहा वर्षांचा भाऊ सलमान आणि आठ वर्षाचा लहानगा जावेद अशी पात्रं आहेत. वडील मुंबईला कवी आणि गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तर लखनऊच्याच एका दफनभूमीत आईच्या नावाची एक कब्र आहे.

जावेद आणि त्याचा लहान भाऊ दिवसभर क्रिकेट खेळायचे. खर्चायला म्हणजेच आजच्या भाषेत पॉकेटमनी म्हणून रोज सकाळी अर्धा आणा आणि संध्याकाळी एक आणा मिळायचा. समोरच्या रामजी लाल बनियाच्या दुकानातून रंगीत गोळ्या विकत घेण्यात सकाळचे पैसे खर्च व्हायचे आणि संध्याकाळी भगवती चाटवाल्याच्या खिशात एक आणा जायचा. ऐशच ऐश होती.

संध्याकाळी पंधरा रुपये महिना पगारावर एक मास्तर शिकवणी घ्यायला यायचे. नंतर कधीतरी १७ रुपये महिना फी भरून लखनऊच्या कॉल्बिन ताल्लुरकेदार शाळेत सहावीत त्याचं नाव घातलं गेलं. आपल्यावर महिन्याला एवढे पैसे खर्च होतात हे जावेद यांना रोज ऐकावं लागायचं.

शाळेत सगळी श्रीमंतांची मुलं होती. त्यांच्याकडे घड्याळं, सुंदर सुंदर स्वेटर, फाऊंटन पेन असल्या भन्नाट गोष्टी असायच्या. दररोज शाळेच्या कॅन्टीनमधून ही मुलं आठ आण्याचं चॉकलेट घ्यायची. ते बघितल्यापासून भगवती चाट गोड लागेनासा झाला. एकदा शाळेतला एक मुलगा म्हणाला, ‘माझे बाबा मला शिकायला इंग्लंडला पाठवणार आहेत.’

तेव्हा छोट्या जावेद यांना आजोबांचं रात्रीचं बोलणं आठवलं, ‘गाढवा! मॅट्रिक पास झालास तर पोस्टात मोहरं लावण्याचं काम तरी मिळेल.’ हे असं काही रोजच ऐकायला लागायचं. पण ते ऐकून जावेदने एक निश्चय केला. आपण भरपूर श्रीमंत व्हायचं!

अभ्यासापेक्षा शायरीचं वेड

जावेद १५ वर्षांचे असताना अलीगड शहरात मावशीच्या घरी आले. छोटा भाऊ सलमान आजी आजोबांच्या घरीच राहिला. दोन अनाथ मुलांना संभाळणं कसं शक्य होणार? म्हणून एकाला मावशीकडे पाठवलं.

मावशीच्या घरासमोर नजर जाईल तिथपर्यंत लांबच लांब मैदान होतं. ते मैदान ओलांडलं की जावेदची शाळा लागायची. अभ्यासापेक्षा हिंदी सिनेमातल्या गाण्यांचं, कादंबऱ्या वाचण्याचं आणि शायरीचंच त्यांना फार वेड होतं. मॅट्रिक झाल्यावर जावेद यांनी मावशीचं घर सोडलं. आणि त्यांच्या पटकथेतला नवा सीन सुरू झाला.

हा सीन म्हणजे अगदी क्लायमॅक्सच! भोपाळच्या कॉलेजात एकटा राहणारा, खायला अन्न नाही की खिशात पैसे नाहीत असा जावेद इथं दिसतो. मॅट्रिक झाल्यावर मावशीकडून मुंबईला घेऊन जाण्यासाठी जावेद यांचे बाबा आले. पण बाबांनी निम्म्या रस्त्यातच त्यांची साथ सोडली. आपल्या तरूण मुलाला भोपाळला सोडून बाबा एकटेच मुंबईला निघून गेले. भोपाळच्या सोफिया कॉलेजमधे जावेद बीए करू लागले.

हेही वाचा :   जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

जावेद फार चलाख होते

सब हवाएँ ले गया मेरे समंदर की कोई
और मुझको एक कश्ती बादबानी दे गया

समुद्रावरचं सगळं वारं कुणीतरी काढून नेलंय आणि मला पुढे जाण्यासाठी शिडाची होडी ठेवलीय हे जावेद अख्तर यांना भोपाळला राहत असतानाच वाटत असणार. तरीही त्यांनी त्यांची होडी पुढे नेली. कॉलेजच्या चार वर्षांत त्यांनी कधी फी भरली नाही. कॉलेजवाल्यांनीही मागितली नाही. खाणं, पिणं, राहणं सगळं दोस्तांच्या पैशांवर. नाहीतर उधारीवर. ती उधारीही कधी चुकवली नाही.

नंतर कधीतरी कॉलेजच्या कम्पाउंडमधली एक मोकळी खोली त्यांना मिळाली. कॉलेज संपेपर्यंत त्यांनी तिथं बस्तान बसवलं. एक दिवस जावेद आजारी पडले. जवळ कुणीही नाही. औषधपाणी नाही. अंगात भरपूर ताप आणि त्याहीपेक्षा जास्त पोटात भूक. कॉलेजमधल्या दोन ओळखीच्या मुलांनी त्यांना डब्बा आणून दिला. ती माणसं फार चांगली होती. पण जावेद फार चलाख. ते दोघं गेल्यावर पांघरूणात तोंड घालून आपण रडणार आहोत हे जराही त्यांना दिसू दिलं नाही.

बीएची चार वर्ष अशी गेली. मित्राच्या पैशावर ते राहिले. मुश्ताक सिंग नावाच्या मित्राशी त्यांची विशेष गट्टी होती. बीएच्या चार वर्षांपैकी जवळपास दोन वर्ष जावेद यांचं रहाणं, खाणं, सिगरेट, दारू सगळं मुश्ताक सिंग यांनी केलं. बीए झाल्यावर मग जावेद यांनी भोपाळ सोडलं आणि थेट मुंबई गाठली.

रात्रीची झोप नटराज स्टुडिओत

४ ऑक्टोबर १९६४ ला जावेद अख्तर मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरले. मुंबईला आल्यावर आठवडाभरातच बापानं घरातून हकलून लावलं. त्यावेळी त्यांच्या खिशात २७ रुपये होते. आता मुंबई नावाच्या कोर्टात त्याच्या आयुष्याचा निकाल लागणार होता.

जावेद यांनी पडेल ते काम केलं. कधी छोट्या मोठ्या सिनेमात शंभर रुपये महिना पगारावर डायलॉग लिहून दिले. कुठे असिस्टंटचं काम केलं. कधी कामाचे पैसे मिळाले. अनेकदा मिळाले नाहीत. एकदा जावेद दादरला एका प्रोड्युसरकडे कामाचे पैसे मागायला गेले. एका खूप प्रसिद्ध सिनेमाचे कॉमेडी सीन्स लिहिल्याचे ते पैसे होते. ते सीन्स दुसऱ्या प्रसिद्ध लेखकाच्या नावावर सिनेमात आले.

प्रोड्युसर घरी नव्हता. पैसे तर मिळाले नाहीतच. पण आता परत जायची पंचाईत आली. खिशात मोजकेच पैसे होते. त्यातून बांद्राच्या बसचं तिकीट किंवा जेवण दोन्हींपैकी एकच काहीतरी होणार होतं. खिशात चणे भरून जावेद चालत बांद्र्याला निघाले.

घर नव्हतंच. नटराज स्टुडिओत झाडाखाली, बेंचवर ते रात्रीची झोप घेत असत. ढगातून समुद्रच खाली कोसळतोय अशा मुंबईच्या पावसात काही रात्री जागून काढल्या. अंधेरीच्या पुढे महाकाली गुहा लागते. रहायला जागा नव्हती तेव्हा या गुहेतही काही दिवस काढले.

कलाकारानं भुकेवर मात केली

रोटी एक चांद है और हालात बादल
चांद कभी दिखाई देता है, कभी छुप जाता है|

कधी पोटाला अन्न मिळायचं. तर कधी नाही. तरीही जावेद आशावादी होते. कधी ना कधी आपलं चांगलं होणार, आपण मोठे होणार ही भावना त्यांच्या मनात कायम घर करून राहिली. एकदा खूप प्रसिद्ध लेखकानं माझ्या सिनेमासाठी स्क्रिप्ट लिहितोस का, अशी ऑफर जावेदला दिली. त्या बदल्यात भरपूर पैसे मिळणार होते. पण स्क्रिप्टला नाव त्या लेखकाचं येणार होतं. इथंही जावेदच्या पोटातल्या भूकेवर त्याच्यातल्या कलाकारानं मात केली. जावेदनं ती संधी नाकारली.

मुंबईतल्या जगण्याच्या संघर्षातच आयुष्यातली पाच वर्ष उलटली. शेवटी जावेद अख्तर यांना आयुष्यातला पहिला ‘ब्रेक’ म्हणजे पहिली संधी मिळाली. त्यातून अजून काम मिळत गेलं. याच दरम्यान हनी इरानी यांच्याशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं. दोन मुलंही झाली. मग काय!

पुढची सहा वर्ष एकामागून एक सहा सुपरहिट सिनेमे, पुरस्कार, कौतूक सोहळे, पेपरात, मासिकात इंटरव्यू, फोटो, पार्ट्या, भरपूर पैसा, वर्ल्ड टूर चमकण्याचे दिवस आणि झगमगणाऱ्या रात्री. लहानपणी बघितलेलं श्रीमंत होण्याचं जावेदचं स्वप्न पूर्ण झालं. जावेद प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर झाला.

हेही वाचा : पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

म्हणून शायरी लिहायला सुरवात केली

हे स्वप्न पूर्ण झाल्यावरही जावेद यांच्या मनातली अस्वस्थता तशीच राहिली. हे सगळं नसतं तरी चाललं असतं असं वाटू लागलं. कालपर्यंत ज्या गोष्टी आनंद देतील असं वाटत होतं आज त्या मिळाल्यावर त्या खोट्या आणि क्षणिक असल्याचं नवं सत्य हाताला गवसलं. आपण शायरी करू शकतो याची जाणीव त्यांना लहानपणापासून होती. पण कधी लिहिलीच नाही. आयुष्याच्या या स्टेजवर वाटणाऱ्या नाराजीचं एक प्रतिक म्हणून शायरी लिहायला सुरवात केली.

अशा अस्वस्थतेत शबाना आझमी त्यांना भेटल्या. कैफी आझमी यांच्या छायेखाली वाढलेल्या शबानाही तेव्हा स्वतःच्या असण्याकडे निरखून पाहत होत्या. त्यांच्या असण्यानं, त्यांच्याशी बोलण्यानं अनेक चांगले बदल जावेद अख्तर यांच्यात होऊ लागले. त्यांचे सूर जुळले.

हनी इराणी यांच्याशी जावेद अख्तर यांनी घटस्फोट घेतला. पण त्यांच्या मैत्रीत कधीही कडवटपणा आला नाही. उलट 'हनीमुळे आमच्या मुलांना आमच्या दोघांचंही प्रेम मिळालं. माझ्या मनात तिच्याबद्दल नितांत आदर आहे,’ असं जावेद अख्तर आजही कुठलाही आडपडदा न ठेवता कबुल करतात.

कितीतरी कामं पूर्ण करू शकलो नाही

‘आज इतक्या वर्षांनंतर जगण्याकडे बघतो तेव्हा वाटतं की झऱ्याप्रमाणे डोंगरावरून खाली उतरत, खडकांमधून आपला रस्ता काढत अनेक वळणं घेत, वादळाचे भोवरे बनवत, प्रचंड वेगाने वाहणारी, आपलेच किनारे कापणारी ही नदी आता पठारावर येऊन शांत आणि खोल झालीय’ असं जावेद अख्तर म्हणतात.

आज त्यांच्याकडे सगळं काही आहे. पैसा आहे, प्रतिभा आहे. पण १८ जानेवारीचा एक प्रसंग त्यांना सतत आठवत राहतो. पांढऱ्या कपड्यावर लपटलेला त्यांच्या आईचा देह खोलीत ठेवलेला होता. त्यांच्या भावाला आणि त्यांना त्यांची मावशी त्या देहाजवळ घेऊन गेली. त्या दिवशी जावेद यांनी आईला जितकं डोळ्यात साठवता येईल तितकं साठवून घेतलं. त्यांची मावशी म्हणत होती, ‘मी आयुष्यात नक्की काहीतरी करून दाखवेन असं वचन आईला द्या.’ 

त्यावेळी जावेद शांत राहिले. 'मी आयुष्यात काहीच करू शकलो नाही, असं काही नाही. पण जितकं करू शकलो असतो त्यातलं कित्तीतरी काम अजून पूर्ण नाही करू शकलो असं वाटतं. या वाटण्यातून आलेली अस्वस्थता काही केल्या जात नाही,’ जावेद म्हणतात.

हेही वाचा : 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी