दिल क्यों पुकारे आरे आरे?

१२ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.

आरे कॉलनीचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. आरे डेअरीमधे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी इथे खास स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवली जात होती. त्यामुळे इथल्या भागात सहलीसाठी, मुक्कामासाठी पर्यटकांनासुद्धा मुभा मिळू लागली तेव्हा हा भाग गजबजून गेला. आजही बरेच जण खास या भागात सहल काढतात. अर्थात सहलीसाठी आरेसारखं आदर्श स्थळ मुंबईत दुसरं सापडणं मुश्कील आहे.

छोटा काश्मीर ते फिल्मसिटी

इथेच छोटा काश्मीर म्हणून प्रसिद्ध पावलेली ऑब्जर्वेशन पॉईंट ही बाग आहे.  नाक्याजवळ दोन छोट्या बागा आहेत. ओपी अर्थात ऑब्जर्वेशन पॉईंटच्या पुढे गेलं की पिकनिक पॉईंट आहे. ओपीच्या समोरच तलावही आहे. तुम्ही एका दिवसात सगळीकडे फिरूच शकत नाही. भरीला आता फिल्मसिटीची भर पडलीय.

गोरेगावच्या स्टेशनवरून पूर्वेला आपण आलो आणि हायवे ओलांडला की लगेचच रस्त्याच्या दोन्ही बाजूला आमराई सुरु होते. इथे असंख्य आंब्याची झाडं आहेत. काही झाडांना मौसमात अगदी खालच्या फांद्यांवरही कैऱ्या लटकत असतात. लहान मुलंसुद्धा सहज कैऱ्या तोडतील इतक्या उंचीवर त्या असतात.

आमराईलगतच रस्त्याच्या दुतर्फा चेकनाक्याला लागून दोन बागा आहेत. शहीद पोलीस तुकाराम ओंबळेचं नाव या उद्यानाला दिलं गेलंय. चेकनाका हा आरे वसाहत लुप्त झाल्याचं दर्शवणारी निशाणी म्हणायला हरकत नाही. पूर्वी इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद व्हायची. नंतर काही काळ टोल नाकाही होता.

बंबखान्याचा बनलाय स्टुडियो

आता आपण ही दोन्ही उद्यानं मागे टाकून सरळसोट आरे दूध केंद्राकडे जायला लागलो की काही अंतरावर उजवीकडे आणखी एक बगीचा लागतो. इथे पूर्वी बंबखाना होता. अग्निशमन दलाचा मोठा पाण्याचा बंब इथे असायचा. गोरेगावातीलच नाही तर आसपास मोठी आग लागल्यास इथून बंब जात असे. पूर्वी अग्निशमन केंद्रांची संख्या आताएवढी नव्हती.

कालांतराने याच भागाचं टीवी सिरिअलची निर्माती एकता कपूरने संक्रमण या स्टुडियोत रुपांतर केलं. इथे आजही अनेक सिरिअलचं शूटिंग होत असते. समोरच नोगा जॅमची फॅक्टरी आहे. आणि एक रेस्टॉरंटही आहे. आपण आणखी पुढे गेलो की लगेचच जाणवतं ते फिल्मी वातावरण. इथला रस्ता, आजूबाजूची झाडी पाहिली की कुठल्या न कुठल्या सिनेमात आपण इथला सीन पाहिल्याचं जाणवायला लागतं.

थोड्या चढावर आधी आरे पोलीस चौकी आहे. पूर्वी इथे कायदा धुडकावणाऱ्या वाहनांना ठेवायची सोय होती. शिवाय पोलिसांचं निवासस्थानही होते. इथून सरळ डोंगरावर चढत जाणारा रस्ता आहे आणि तो आपल्याला ऑब्जर्वेशन पोस्ट म्हणजे छोटा काश्मीरला घेऊन जातो. अक्षरशः पहाडावर ही बाग तयार करण्यात आलीय, हे जाणवतं. इथे कुठली फुलं, फळं, वनस्पती सापडत नाहीत असं नाही. हर तऱ्हेची झाडं, वेली इथे आहेत. 

शोभेची जंगली फुलांची झाडंही व्यवस्थित लावल्याने या बागेला दर्शनी भागातच वेगळी शोभा आलीय. केळींची उंचउंच झाडंसुद्धा आहेत. ताडा-माडाची आहेत, तशी निलगिरी आणि लाजळूचीही आहेत. निसर्गाची खरी कमाल इथे ठायीठायी अनुभवायला येते. ठिकठिकाणी चबुतरे, दगडी शिल्प यामुळे ही बाग वेगळाच आनंद देते. पिण्याच्या पाण्याची सोय इथे आहे आणि अगदी उंचीवर एक झकास पॅवेलियन आहे. या पॅवेलियनमधून पूर्वी संपूर्ण गोरगाव दिसायचं. पश्चिमेकडच्या खाडीचंही दर्शन व्हायचं.

हेही वाचा: आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

इथेच काश्मीर होतं आणि सिमला

अशा या बागेत आल्यावर आपल्याला आपण काश्मीरमधे असल्यासारखं वाटतं. चाणाक्ष सिनेकर्मी या बागेकडे वळले नसते तरच नवल. १९५० च्या आसपास बहुतेक सिनेमा निर्माते, दिग्दर्शक रोमँटिक गाणी आणि प्रसंगासाठी या बागेची निवड करू लागले. इथला माहौल इतका निसर्गरम्य काश्मीर, नैनिताल, दार्जिलिंग, सिमला, मनालीला गेल्याचा फील येतो. ज्यांना तिथे जाऊन शूटिंग करणं परवडत नाही, असे बरेच जण या बागेचाच उपयोग करायचे आणि सिनेमाची कथा काश्मीर, नैनितालमधली असली तरी ती या गोरेगावच्या बागेचाच वापर करून तिथेच घडल्यागत भासवायचे.

१९५१ च्या सुमारास प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय ‘मधुमती’ बनवत होते. त्यांची ही प्रेमकहाणी नैनितालजवळील राणीखेत भागातली. बऱ्याच सीनचं राणीखेतमधे शुटिंग झालं. नंतर त्यांनी या बागेत येऊन काही सीन, गाण्यांचं शुटिंग केलं. तिथल्या धुक्याचा परिणाम दाखवण्यासाठी कृत्रिमरीत्या धूर सोडला जात होता. वैजयंतीमाला आणि दिलीपकुमार यांच्या या सिनेमाने कमालीची लोकप्रियता गाठली. तसंच हे ऑब्जर्वेशन पॉईंटही लोकप्रिय झालं. यानंतर जवळपास सगळेच दिग्दर्शक या बागेत कुठल्या ना कुठल्या सीनच्या शुटिंगसाठी येऊ लागले.

काही गाणी आज आपल्याला सहज आठवतात. शम्मी कपूरचे ‘प्रोफेसर’मधील ‘लाल छडी मैदान खडी’ हे गाणं इथलंच. राजेश खानाचे ‘ये रेशमी जुल्फे’ हे ‘डॉ रस्ते’मधलं आणि ‘दी ट्रेन’मधील ‘शराबी आंखे’ हेही इथलेच. ‘दिवार’मधे शशी कपूर-नीतू सिंग यांची ‘कह दू तुम्हे’ या गाण्यातली छेडाछेडी इथलीच. तर या बागेजवळच्या खुल्या हिरवळीवरचे ‘दिल एक मंदिर’मधलं ‘यहां कोई नही तेज मेरे सिवा’ हे राजेंद्र कुमार-मीना कुमारीचं गाणंही याच भागातलं.

‘चुपके-चुपके’मधे लपून-छपून धर्मेंद्र-शर्मिला इथेच भेटून ‘बागों में कैसे ये फूल खिलते है’ इथेच येऊन गातात. अशा कितीतरी गाण्याचं शुटिंग या ठिकाणी झालंय. तर बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ सिनेमाच्या कथेला कलाटणी देणारा मुख्य प्रसंग याच बागेतल्या पॅवेलियनमधला. 

खरं तर या बागेमुळे गोरेगावला सिनेमा येऊ लागले. पश्चिमेकडे असलेला फिल्मिस्तान स्टुडिओ, पूर्वेचा स्वाती स्टुडिओ यामुळे गोरेगावला तांत्रिक गोष्टींसाठी लागणारी सोय उपलब्ध होतीच. शिवाय या बागेमुळे निसर्गानेसुद्धा त्यांना एक चपखल लोकेशन उपलब्ध करून दिलं होतं.

१९७७ मधे मग खास सिनेमानिर्मितीसाठी सुसज्ज अशी नगरी इथे जवळच उभारली गेली. तीच आता आपण चित्रनगरी, फिल्मसिटी या नावाने ओळखली जाते. इथे प्रत्यक्ष शूटिंगसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या गेल्या. रेकॉर्डिंग रूमपासून, मिनी थिएटरपर्यंत सारं काही इथे एकाच ठिकाणी उभारलं गेलंय. २००१ मधे या चित्रनगरीला सिनेमाचे जन्मदाते दादासाहेब फाळके यांचं नाव दिलं गेलं.

हेही वाचा: आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?

मूर्ती नसलेल्या मंदिराची गोष्ट

२६ सप्टेंबर १९७७ रोजी ही चित्रनगरी सुरु झाली. अमिताभ बच्चनच्या ‘बरसात की एक रात’ या सिनेमातल्या काही सीन्सच शुटिंग सुरवातीला इथेच झाले. प्लास्टर ऑफ पॅरिसचे आकर्षक सेट इथे उभारले जातात. त्यातले काही कायमचे ठेवले गेलेत. जे सिनेमे गाजले, त्या सिनेमाचे नाव इथल्या काही भागांना दिलं गेलं. इथल्या छोट्या तलावात देवदास, चर्चसमोर अमर अकबर अँथनी आणि जोश. देवळासमोर दिवार, मोकळ्या मैदानात वेलकम, हॅप्पी न्यू ईयर या सिनेमाचं शुटिंग झालं.

इथल्या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे यात मूर्ती नाही. सिनेमा किंवा सिरिअलच्या कथेनुसार आवश्यक त्या देवाची मूर्ती इथे तात्पुरती वसवली जाते. अलीकडच्या गाजलेल्या सिरिअलपैकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘यम है हम’, ‘उडान’, ‘सरस्वती चंद्र’, ‘ये रिश्ता क्या कहालता है’, ‘महाकुंभ’ या सिरिअलसाठी तर खरी वाटावी अशी कॉलनीच्या कॉलनी इथे उभारली गेलीय.

‘शोले’ सिनेमातला गाजलेला धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरचा आत्महत्येचा प्रयत्नाचा सीनही इथेच तयार केला गेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरे सफरीच्या वेळीच एखादा स्टार चित्रीकरणासाठी इथे आलेला असेल तर त्याचं दर्शन आपल्याला घडू शकतं.

महाभारतही इथे घडलं होतं

चित्रनगरीचा एवढा पसारा असूनही इतर भागातही शुटिंग चाललेलं आपल्याला बघायला मिळतं. ओपीच्या समोर जो तलाव आहे तोही आता वापरला जातोय. या तलावाचं नशीब तसं अलिकडे उजळलंय. फार पूर्वी तो नैसर्गिक अवस्थेत होता. तलावाच्या आत उतरणं अशक्य असायचं. चिखल, दलदल यांचं साम्राज्य होतं आणि चक्क मगरींचा वावर होता. इथे मगरीला पकडून नॅशनल पार्कच्या तलावात सोडल्याच्या घटना घडल्या होत्या.

टीवीवर महाभारत सिरिअल जोरात होती. ती सिरिअल बी. आर. चोप्रांची. या सिरिअलच्या काळातच या तलावाचं भाग्य पालटलं. हा तलाव स्वच्छ आणि सुरक्षित केला गेला. महाभारतातील शेवटची भीम आणि दुर्योधन यांची झुंज तलावात झालेली असल्याने ही झुंज याच तळ्याकाठी चित्रित केली गेली. तांत्रिक संस्कार करून मग दुर्योधन या तळ्यात लपल्याचंही दाखवलं गेलं.

या तलावानजीकच आता मत्स्यबीज प्रकल्प उभारला गेलाय. माशांच्या प्रजोत्पादनावरचे प्रयोगही इथे चालतात. या शुटिंगनंतर या तलावाला आणखी सुशोभित आणि स्वच्छ केलं गेलं. आता तर तिथे नौकाविहारही चालतो. बाजूला पक्का रस्ता तयार करून तिथे खाण्यापिण्याचे स्टॉलही आहेत.

हेही वाचाः 

गणेशोत्सवात 'पर्यावरण' नाटक देतंय निसर्ग संवर्धनाचे धडे

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा