मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.
आरे कॉलनीचा १९४९ मधे जन्म झाला. तीन हजाराहून अधिक एकर असा तिचा विस्तार आहे. ही वसाहत वसवण्याचा उद्देश होता गुरंढोरं मुख्य शहरातून जरा बाहेर चारा आणि गवत मुबलक असलेल्या ठिकाणी आणायची. जनावरं, जंगली श्वापदं, पक्षी यांना आश्रय द्यायचा आणि तिसरा उद्देश इथे दूध उत्पादन करून गोरगरिबांना परवडेल अशा दराने त्याची विक्री करायची. आरे कॉलनीत बरीच छोटी छोटी गावं समाविष्ट होती. आरे, गोरेगाव, एक्सर पहाडी, दिंडोशी, मजास, मरोशी, परजापूर पाझपोळ अशी काहींची नावं सांगता येतील.
दूध उत्पादनाच्या हेतूने ही वसाहत वसवली गेली. ४ मार्च १९५१ ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आरे डेअरीचं उद्घाटन झालं. आशियातला हा तेव्हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरला होता. १९७० नंतर इथे अधिक दुग्ध उत्पादन होऊ लागलं. आजही अनेकांना आठवत असेल बाटल्यामधून दूध विविध केंद्रांवर वितरणासाठी यायचं.
या केंद्रावर रोज सकाळी रांगा लागायच्या. यातही होल आणि टोन्ड अशा दोन प्रकारचे दूध वाटले जायचे. एक पत्र्याचं कार्ड त्यासाठी ग्राहकाला दिले जाई. त्यावर नाव आणि इतर तपशील असायचा. यातून मग काही गरजूंना रोजगार मिळाला. हे गरजू काही ग्राहकांना घरपोच दूध आणून द्यायचे. त्यांची कार्डे या गरजुंकडे असायची. बदल्यात त्यांना मोबदला मिळायचा.
या केंद्रावर दिल्या जाणाऱ्या बाटल्याही भक्कम असायच्या. वरचे बूच पातळ पत्र्याचे असायचे. या बुचाचेसुद्धा काहींनी वेगवेगळे वापर केले. काहींनी याचा देवापुढे दिवे लावायला उपयोग केला. काहींनी पिशव्या बनवल्या. पाव लिटरच्या बाटल्याही होत्या. या बाटल्या प्रामुख्याने महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्या जायच्या. आरेच्या बाटल्यांच्या प्लेट घेऊन जाणाऱ्या गाड्या आरेवरून सतत ये-जा करायच्या. मुंबईच्या कानाकोपऱ्यात जायच्या.
हेही वाचा: आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट
दुधाच्या भुकटीपासून तयार होणारं दूध ते बाटलीबंद दूध हा प्रवास बघण्यासाठी पूर्वी आरे कॉलनीला अनेक शाळांच्या सहली यायच्या. तिथले कामगार शांतपणे आपआपले काम करायचे. मुलं मात्र तो सगळा दुधाचा प्रवास बघताना चकित होऊन जायची. आरे कॉलनीचं अप्रूप हळूहळू कमी झालं. दूध उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्या आल्या तेव्हा आरेचं महत्व आणखी कमी झालं.
दुधासाठी बरेच पर्याय खुले झाले आणि पिशवीबंद दुधाच वितरण व्हायला लागल्यावर आरेची केंद्रं धडाधड बंद होत गेली. काही ठिकाणी आजही आरेची केंद्रं उपलब्ध आहेत. पण ती प्रामुख्याने दुधोत्पादित पदार्थ आणि शीतपेये यांच्या विक्रीसाठी चालतात. आरेने एनर्जी हे मधुर शीतपेय बाजारात आणलं. तेही लोकप्रिय झालं. थंडगार स्वादपूर्ण आणि पौष्टिक असल्याने या एनर्जीला चांगला प्रतिसाद मिळला.
आरे तूप, आरे श्रीखंड यालाही चांगली मागणी होती. टीवीवर नुकत्याच मालिका सुरू झाल्या होत्या तेव्हा ‘यह जो है जिंदगी’ या मालिकेतले लोकप्रिय झालेले तीन कलाकार शफी इनामदार, स्वरूप संपत आणि सतीश शहा आरेच्या जाहिरातीत झळकले. शफी आणि स्वरूप एका रेस्टॉरंटमधे वेटर सतीश शहाला ऑर्डर देतात आणि सांगतात सारं काही आम्हाला आरेच्या तुपातलं हवं.
आरेची सर्व उत्पादने चांगली चालत होती. पण नंतर इथल्या दुधाचं उत्पादन कमी प्रमाणात होऊ लागलं आणि दलालांनी या दुधाचे भाव वाढवले. इथलं वार्षिक दूध उत्पादन ९८७ किलो इतकं खाली आलं. या उलट डेन्मार्क ६२७३ किलो, फ्रान्स ५४६२ किलो, इंग्लंड ५९३८ किलो, कॅनडा ७०९८ किलो, अमेरिका ११००० किलो या देशांची आकडेवारी थक्क करणारी आहे.
असं म्हणतात, राजकारण्यांनी जाणूनबुजून आरे दूध उत्पादन घटवलं. इथली जमीन विकासकांना देण्यासाठीच हा डाव असल्याचं बोललं जातं. काय असेल ते असो, आता आरे दुधावर काही मुंबई अवलंबून आहे असं म्हणता येत नाही.
आरेतला दूध प्रकल्प उभारताना १२८७ हेक्टर जमिनीवर १६ हजार गुरंढोरं आणण्यात आली होती. इथे ३३ गोठे आहेत. पक्क्या इमारती बांधून इथे गुराढोरांची सोय केली गेली. आजही आपल्याला इथे पत्र्याचे तबेले आढळतात. हे तबेले गुरांना चार देण्याची, पाण्याची व्यवस्था ठेवून आहेत. शिवाय सांडपाण्याचीही चांगली व्यवस्था आहे. इथे काम करणाऱ्यांच्या रहाण्याचीही चांगली व्यवस्था आहे.
मुळात इथे दूध प्रकल्प न्यूझीलंड सरकारच्या सहकार्याने सुरू झाला. न्यूझीलंड हे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असा देश. डेअरी व्यवसाय हा न्यूझीलंडचा मुख्य उद्योगधंदा, व्यवसायापैकी एक आहे. न्यूझीलंडने डेअरी कोर्सचीही ओळख करून दिली. यासाठी न्यूझीलंडचे शिक्षणाधिकारी, विद्यार्थी यांचा इथे मुक्काम असायचा. यातून त्यांच्या रहाण्यासाठी एक हॉस्टेल बांधलं गेलं. तेच न्यूझीलंड हॉस्टेल.
आरेमधे जीवशास्त्र, वनस्पती शास्त्र याचा अभ्यास करणाऱ्यांना उघडी प्रयोगशाळा सदैव उपलब्ध आहे. अभ्यासासाठी निसर्गानेच पुस्तक उपलब्ध करून ठेवलंय असं म्हटलं तरी चालेल. आरेमधे सुमारे ८०० प्रकारची फुलं आहेत. २८४ प्रकारचे पक्षी आहेत. ५००० प्रकारचे किडे कीटक आहेत. ३६ प्रकारची जनावरे आहेत. यात वाघ-बिबटे आहेत.
५० प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. इथे महाभयंकर कोब्रासुद्धा सहज आढळतो. दीडशे प्रकारची नुसती फुलपाखरं आहेत. एवढी निसर्गसंपदा इथे आपल्याला भेटते. पण इथे माणसांचा वावरही तेवढाच आहे. आता तर आजूबाजूला मोठमोठाले सिमेंटचे टॉवर्स, कॉलनी आणि झोपडपट्ट्या होऊ लागल्यात. एका गणतीत २७ जाती-जमातीची माणसं राहत असल्याचं आढळलंय.
हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग
एका भागात तर तुम्हाला आपण तामिळनाडूमधे असल्यासारखं वाटेल इतके तामिळी राहताना दिसतील. जवळपास साडेचार हजार झोपडपट्ट्या आहेत. आदिवासींचे पाडे आहेत. आरे नॅशनल पार्कशी जोडलं गेलेलं असल्याने इथे बिबट्यांचा वावर सदैव असतो. मेट्रो रेल्वेच्या कारशेडचा प्रकल्प उभारण्याचा घाट शिजतोय. आणि त्याला पर्यावरणवाद्यांनी, स्थानिक नागरिकांनी हरकत घेतली.
त्यानंतर अभ्यासासाठी एक समिती इथे आली. त्यांचे सदस्य इथे भेटीला येण्याच्या काही वेळेपूर्वी एका भागात बिबटे फिरून गेल्याच्या खुणा आढळल्या होत्या. आता बोला. तरीही इथेच प्रकल्प करायचं ठरतंय. बिबटे त्यामुळे पाड्यात, झोपड्यात शिरून लहान मुलं किंवा एकट्या दुकट्याला मारत असल्याच्या घटना इथे वारंवार घडताना दिसतात. खरंतर माणसाने इथल्या त्यांच्या राहण्यावर अतिक्रमण केलंय.
तसं म्हणाल तर सरकारी पातळीवर सात हजार कोटींचा प्रकल्प उभारला जायची घोषणा झालीय. त्याने आरेचा कायापालट होईल असं म्हणतात. या प्रकल्पानुसार इथे अम्युजमेंट पार्क उभारलं जाणार आहे. त्यात मिनी थिएटरपासून वेगवेगळे मनोरंजक खेळही असतील. आणखी एक फिल्म स्टुडिओही असणार आहे. मुवी सिटीपार्कही इथे असेल.
वेगवेगळे प्राणी अभ्यासण्याचीही सोय असेल. भव्य मत्स्यालय असेल. तळघरात म्युझियमही असेल. इथे येणाऱ्या गाड्यांची सोयही लावली जाईल. देशी, विदेशी पर्यटकांना आकर्षित करतानाच पर्यावरण जपण्यावरही भर दिला जाणार आहे. पंचतारांकित हॉटेल्स, रोपवेज, स्केटिंग रिंग्स मॉल्स आणि शॉपिंग हब्स असतील ती वेगळीच.
सर्वात महत्वाचं म्हणजे २५ एकराच्या प्लॉटवर दूध तयार करण्यासंबंधीचा अभ्यासक्रम असलेली संस्था आकार घेणार आहे. यामुळे इथे पर्यटकांचा ओघ वाढणार हे निश्चित आहे. पर्यटन व्यवसाय हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा पैसे देणारा व्यवसाय आहे. तो आणखी बहरू शकतो, असं आरे कारशेडच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
पंडित नेहरू यांनी उत्साहाने आरेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्या हस्ते लावण्यात आलेली झाडं इथे आहेत. हिंदी चिनी भाईभाईचा नारा दिला होता त्याची निशाणी १९६२ च्या आधी इथे असलेल्या आरे मार्केटच्या गेटवरचं चीनी डिझाईन बघून मिळते. आरे वाचवा असा आक्रोश केला जातोय. पण आरेला मारणं कठीणच आहे. आरे अनेकांच्या दिलात वसलंय. आणि हे दिल सदैव साद घालत असतं ‘दिल पुकारे आरे आरे’.
हेही वाचाः
देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!