एक अणुतस्कर पाकिस्तानचा देशभक्त झाला त्याची गोष्ट

१६ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली.

पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालं. पाकिस्तानात त्यांची ओळख पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून असली, तरी जग त्यांना अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून ओळखतं. नंतरच्या काळात त्यांनी हे आरोप मान्य केले आणि त्याबद्दल त्यांना स्थानबद्धतेतही राहावं लागलं.

अणुबॉम्बचे खरे जनक

खरं तर पाकिस्तानी अणुबॉम्बची कल्पना मांडण्याचं आणि ती राबवण्याचं श्रेय पाकिस्तानी अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष राहिलेले शास्त्रज्ञ मुनीरखान यांच्याकडे जातं. १९७१च्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो यांनी ‘गवत खाऊ; पण अणुबॉम्ब बनवू,’ अशी घोषणा केल्यावर मुनीरखान यांनीच पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवणं शक्य असल्याचं भुट्टो यांना पटवून दिलं होतं.

आता प्रश्न होता तो अणुबॉम्बसाठी लागणारं युरेनियम समृद्ध करण्यासाठी हवं असलेलं सेंट्रिफ्युज तयार करण्यासाठी तंत्रज्ञान मिळवण्याचा. हे तंत्रज्ञान पाककडे नव्हतं. त्यावेळी अब्दुल कादिरखान हे नेदरलँडमधे अँग्लो-डच-जर्मन इंजिनिअरिंग कंपनी ‘युरेन्को’ या कंपनीत धातुशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते.

भुट्टो यांच्या अणुमहत्त्वाकांक्षेची माहिती मिळताच त्यांनी या कंपनीतून सेंट्रिफ्युजचे आराखडे चोरले आणि थेट भुट्टो यांची भेट घेऊन त्यांना दाखवले आणि आपण अणुबॉम्ब तयार करू शकतो, असं सांगितलं. भुट्टो यांनी मुनीरखान यांना बाजूला ठेवलं आणि अब्दुल कादिरखान यांच्याकडे पाकिस्तानी अणुबॉम्बची सूत्रं सोपवली; पण चोरलेल्या माहितीपलीकडे खान यांच्याकडे काहीही नव्हतं.

हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

कादिरखान यांची चोरटी पावलं

कादिरखान यांनी अणुतंत्रज्ञानाची चोरटी आयात करण्यासाठी इराण, लिबिया आणि उत्तर कोरियाच्या मदतीने एक टोळी स्थापन केली. या टोळीने त्यांच्या हाती तस्करीतून आलेल्या अणुतंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण-घेवाण आणि विक्री सुरू केली.

या टोळीचं नेतृत्व अब्दुल कादिरखान यांच्याकडे होतं. आज पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. उत्तर कोरिया हा अघोषित अण्वस्त्रधारी देश आहे, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांमुळे अडकला आहे, तर लिबियाचा अणुकार्यक्रम पूर्णत्वाला जाण्याआधीच इस्रायलने उद्ध्वस्त करून टाकला आहे.

पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच अब्दुल कादिरखान यांनी काही पेपरना हाताशी धरून आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा प्रस्थापित केली. भुट्टो यांच्या हत्येनंतर त्यांनी पाकचे तेव्हाचे हुकूमशहा जनरल झिया उल हक यांच्याशी संधान बांधलं आणि चोरट्या मार्गाने पाकिस्तानात अणुभट्ट्या बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

अध्यक्षपद घालवणारी अणुतस्करीची चर्चा

१९७८ला पाकने युरेनियम समृद्धीत यश मिळवलं आणि १९८४ पर्यंत त्यांची पहिला अणुस्फोट करण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे १९९८ला भारताने आपली दुसरी अणुचाचणी करताच पाकिस्ताननेही केली आणि आपण अण्वस्त्रधारी असल्याचं घोषित केलं. याचा परिणाम या दोन्ही देशांवर जागतिक निर्बंध लादण्यात झाला.

त्याचा फटका भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक बसला. कारण, यानंतर अब्दुल कादिरखान यांचं अणुतस्करी रॅकेट उघड चर्चिलं जाऊ लागलं आणि अमेरिकेने पाकिस्तानवर खान यांना अटक करण्यासाठी दबाव टाकायला सुरवात केली.

त्यावेळचे पाकिस्तानी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी २००१ला खान यांना कहुटा अणुसंशोधन प्रयोगशाळेच्या अध्यक्षपदावरून काढून अध्यक्षांचं विज्ञान सल्लागार केलं; पण त्यामुळे अमेरिकेचं समाधान न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय अणुशक्ती आयोगाने खान यांच्यावरच्या आरोपांचं एक पत्र मुशर्रफ यांना पाठवलं.

खान यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आलं. २००८ला एका पेपरला दिलेल्या मुलाखतीत खान यांनी सांगितलं की, पाकिस्तानचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय दबावाखाली आला असताना मी सर्व आरोप आपल्या अंगावर घेतलं आणि हा कार्यक्रम वाचवला.

हेही वाचा: फुटीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान आंदोलनांनी अस्वस्थ

राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न

एकंदरच आपण ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ आणि ‘थोर देशभक्त’ ही भूमिका सोडायला अब्दुल कादिखान तयार नव्हते; पण यानंतरच्या काळात खान यांच्याभोवतीचं वलय ओसरत गेलं आणि ते काही काळ विजनवासात गेले; पण आपल्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा उठवण्याचा नंतर त्यांनी प्रयत्न केला. २०१२ला त्यांनी ‘तहरिके पाकिस्तान तहाफुज’ हा राजकीय पक्ष काढून निवडणुका लढवल्या; पण त्यांचे सर्व १११ उमेदवार पराभूत झाले आणि खान यांच्या कारकिर्दीवर पडदा पडला.

त्यानंतरही त्यांनी प्रकाशात राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. नंतर त्यांनी ‘जंग’ या पाकिस्तानी उर्दू दैनिकाला मुलाखत देऊन झुल्फीकार अली भुट्टो यांच्या सांगण्यावरून आपण दोन देशांना अणुतंत्रज्ञान दिलं, असं कबूल केलं; पण या दोन देशांची नावं त्यांनी सांगितली नाहीत. अर्थात, भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला.

दुर्लक्षामुळे अणुतस्कर देशभक्त झाला

दोन वर्षांपूर्वी ‘पाकिस्तान डिफेन्स जर्नल’मधे एम. ए. चौधरी यांनी लिहिलेल्या एका दीर्घ आणि अभ्यासपूर्ण लेखात म्हटलंय की, अब्दुल कादिरखान यांचा उदो उदो झाल्यामुळे मुनीरखान यांनी युरेनियम खनिज काढण्यापासून ते अणुबॉम्ब तयार करण्यापर्यंतचा आराखडा आखून पाक अणुबॉम्बनिर्मितीला जी चालना दिली होती, ती पडद्याआड राहिली आहे.

मुनीरखान हे १९५८ पासून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत काम करत होते. त्यांच्याकडे अणुकार्यक्रमासाठी लागणारं सर्व ज्ञान होतं. त्यांनी प्रथम अयुबखान आणि नंतर भुट्टो यांच्याकडे यासंबंधीचा पूर्ण आराखडा मांडला होता. मुनीर यांनीच नंतर अब्दुल कादिरखान यांना या कार्यक्रमात घेतलं होतं; पण नंतर अब्दुल कादिरखान यांनी या कार्यक्रमाचा ताबा घेतला.

मुनीर हे फक्त पाक अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष राहिले आणि पाक अणुस्फोट झाल्यानंतर एक वर्षाने म्हणजे १९९९ला त्यांचं निधन झालं. मुनीर यांचा मोठा दोष म्हणजे ते १९८६ ते १९८७ असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी अब्दुल कादिरखान स्वत:च्या फायद्यासाठी काही देशांना अणुतंत्रज्ञान विकत होते, त्याकडे दुर्लक्ष केलं. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून हे रोखण्याची त्यांची जबाबदारी होती; पण पाक अणुकार्यक्रमाच्या आड आपण आलो, असा आरोप होईल या भीतीने त्यांनी हे दुर्लक्ष केलं.

पाकिस्तानचा अणुबॉम्ब आकाराला येताना त्याची माहिती अमेरिकेला नव्हती, असं म्हणता येणार नाही; पण त्यावेळी अमेरिकेने आपल्या राजकीय हेतूंमुळे त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी, अब्दुल कादिरखान यांची ‘अणुतस्कर’ ही ओळख जगापुढे आली नाही; नाहीतर तेव्हाच त्यांचं पितळ उघडं पडलं असतं. आज अब्दुल कादिरखान यांच्या नावानं पाकिस्तानात रस्ते आहेत, चौक आहेत, त्यांचे फोटो शाळा, कॉलेजात लावले जातात. एक अणुतस्कर देशभक्त म्हणून ओळखला जातोय.

हेही वाचा: 

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान

क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस

गोताबाया श्रीलंकेचे अध्यक्ष बनलेत, याची चिंता भारताने करावी?

अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक असून लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)