काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

१६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.

भारत सध्या मोठ्या कोंडीत सापडलाय. ही आर्थिक कोंडी आहे. चारी बाजूने नाकेबंदी झालीय. त्यात आजचा दिवस तर भारतासाठी मोठ्या विरोधाभासाचा होता. कारण एकाच दिवशी देशाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम घडवू आणणाऱ्या चार-पाच गोष्टी समोर आल्या. त्याच वेळी एक दिलासा देणारी गोष्टही घडली.

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात भारताच्या अंदाजित विकासदरात घट होण्याचा इशारा दिलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नवऱ्याने आर्थिक मंदीवरून मोदी सरकारला धारेवर धरलंय. द हिंदू पेपरमधे लिहिलेल्या लेखात पराकला प्रभाकर यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढलेत. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोक मोठ्या प्रमाणात सिनेमाल जाताहेत, मग मंदी कुठाय, असा सवाल केला होता. पण चोवीस तास उलटत नाहीत, तोच चौफेर टीका झाल्यावर प्रसाद यांनी आपल्या विधानावरून माघार घेतली.

या सगळ्या नकारात्मकतेतही आर्थिक पातळीवर दिलासा देणारी एक गोष्ट सोमवारी घडली. भारतीय वंशांचे अमेरिकन अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला. बॅनर्जींसोबतच त्यांच्या पार्टनर एस्थेर डुफ्लो तसंच मायकल क्रिमर यांचाही या पुरस्कारार्थींमधे समावेश आहे. साऱ्या नकारात्मक वातावरणावर फुंकर घालावी अशीच ही बातमी होती.

जगभरातली गरिबी हटवण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोनातून केलेल्या अभ्यासासाठी बॅनर्जी यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत अनेक प्रयोग केलेत. त्यांच्या या संशोधनामुळे गेल्या २० वर्षांत खूप बदल घडलाय, असं नोबेल समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना म्हटलं. हा पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेकजण कोण हे बॅनर्जी असा सवाल करताहेत. पण या बॅनर्जींचा गेल्या पाचेक महिन्यांत भारतातल्या राजकीय घडामोडींमधे खूप जवळचा संबंध आलाय.

हेही वाचाः फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

कोण आहेत अभिजित बॅनर्जी?

मुंबईत जन्मलेल्या आणि कोलकात्यात लहानाचं मोठं झालेल्या अभिजीत बॅनर्जी यांचं शिक्षण कोलकाता युनिवर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी आणि हार्वर्ड युनिवर्सिटीत झालं. १९८८ मधे त्यांनी हार्वर्डमधून पीएचडी मिळवली. सध्या ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

२००३ मधे बॅनर्जी आणि सहकाऱ्यांनी अब्दुल लतीफ जामील पॉवर्टी अक्शन लॅब अर्थात जे-पीएएल या सेंटरची स्थापना केली. इथे गरिबी हटवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आणता येईल, यावर संशोधन केलं जातं. भारतातल्या अपंग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिलाय. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झालाय, असं नोबेल समितीने सांगितलं.

बॅनर्जी यांच्यासोबत एस्थेर डुफ्लो यांचंही पुरस्कारार्थींमधे नाव आहे. डुफ्लो या बॅनर्जी यांच्या पार्टनर म्हणजेच साथीदार आहेत. बायको आहे. सगळ्यात कमी वयात अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला संशोधक आहेत. या पुरस्काराची ९ लाख १८ हजार डॉलर्सची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येणार आहे. डुफ्लो यांनी बॅनर्जींसह ‘पुअर इकॉनॉमिक्सः ए रॅडिकल रिथिंकिंग ऑफ द वे टू फाइट ग्लोबल पॉवर्टी’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिला. या पुस्तकाचा १७ भाषांमधे अनुवाद झालाय.

हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

न्याय योजनेचे शिल्पकार

बॅनर्जी यांच्या गरिबीमुक्तीच्या अर्थमंत्राला जगभरातून मागणी असते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हा अर्थमंत्र घेतला होता. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गरीबीवर वार, ७२ हजार अशी घोषणा दिली. लोकांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकणारी न्याय योजना लोकसभेत गेमचेंजर ठरेलं असं काँग्रेसला वाटतं होतं. निवडणुकीत काँग्रेसला फारसं यश मिळालं नसलं तरी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोबेल जाहीर झाल्यावर बॅनर्जी यांचे आभार मानलेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या महत्त्वाकांक्षी न्याय योजनेचे शिल्पकार अभिजीत बॅनर्जी होते, असं गांधी यांनी ट्वीट करून सांगितलं. ‘अभिजीत बॅनर्जी यांचं अर्थशास्त्राचं नोबेल मिळाल्याबद्दल अभिनंदन. गरिबी हटवून भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या न्याय योजनेची संकल्पना त्यांचीच होती. पण आता त्याऐवजी आपल्याकडे मोदीनॉमिक्स आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं होतंय. गरिबीही वाढतेय,’ असं ते म्हणाले.

काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही एका प्रसिद्धीपत्रक काढून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. त्या म्हणाल्या, ‘बॅनर्जी यांनी भारतासह जगभरात लाखो लोकांना गरिबीतून मुक्त होण्यास मदत केलीय. त्यांचा दृष्टीकोन आणि त्यांनी केलेले प्रयोग असामान्य आहेत. बॅनर्जी यांना नोबेल मिळणं, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

काय आहे न्याय योजना?

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनाम्यात देशातल्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदतीचं आश्वासन देत न्याय योजनेची घोषणा केली होती. कुटुंबाचं उत्पन्न दरमहा १२ हजारांहून कमी असलेल्या देशभरातल्या २५ कोटी लोकांना न्याय योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं.

न्यूनतम आय योजना अर्थात न्याय अंतर्गत देशातल्या २० टक्के गरीब कुटुंबांना दरमहा ६ हजार म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची ही योजना होती. काँग्रेसची सत्ता आल्यास लाभार्थ्याला पाच वर्षांत तीन लाख ६० हजार रुपयांची मदत होईल, असं आश्वासन राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन दिलं. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावाही केला.

इथे नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, बॅनर्जी यांनी प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात महिन्याला अडीच हजार रुपये म्हणजेच वर्षाला ३० हजार रुपये जमा करण्याची सूचना केली होती. पण काँग्रेसने अब होगा न्याय म्हणत ही रक्कम वर्षाला ७२ हजारावर नेली. काँग्रेसच्या या आकडेवाढीवर बॅनर्जी यांनी टीकाही केली होती. आकडेवाढीने ही योजना अव्यवहार्य ठरू शकते, असं त्यांचं म्हणणं होतं.

हेही वाचाः मोदी तामिळनाडूला गेल्यावर ट्विटरवर गोबॅकमोदी ट्रेंड का होतो?

दिल्लीतल्या शाळांना दिली चुनौती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट टाकत अभिजीत बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारकडून शिक्षणाच्या क्षेत्रात राबवण्यात येत असलेला उपक्रम हा बॅनर्जी यांच्या प्रयोगावरच आधारीत असल्याचं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल लिहितात, ‘प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा दिवस आहे. अभिजीत बॅनर्जी यांचं मनापासून अभिनंदन. दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेल्या कामाचा हा सर्वोच्च सन्मान आहे.’ ‘त्यांच्या उल्लेखनीय कामाचा दिल्लीच्या सरकारी शाळांमधे शिकणाऱ्या लाखो मुलांना फायदा होतोय. चुनौती या दिल्लीच्या शाळांमधल्या एका महत्त्वाच्या धोरणात्मक बदलामुळे सरकारी शाळांमधल्या शिक्षणात मोठा बदल घडतोय. हे बॅनर्जी यांच्याच एका प्रयोगावर आधारित आहे,’ असं केजरीवाल यांनी पुढे सांगितलं.

सरकारी शाळांचा चेहरा बदलला

दिल्लीतल्या सरकारी शाळांमधे विद्यार्थी गळतीचं प्रमाण खूप आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जात नाही. पण नववीत आल्यावर शिक्षणात कच्चे असणारे अनेक विद्यार्थी नापास होतात आणि अर्ध्यावरच शिक्षणाचा नाद सोडून देतात. नववीमधे शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याचं हे वाढतं प्रमाण ध्यानात घेऊन आप सरकारने चुनौती योजना राबवायला सुरवात केली.

या योजनेंतर्गत नववीच्या वर्गातल्या सर्वांत मागं पडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं. या विद्यार्थ्यांसाठी नियमित तासिकांसोबतच स्वतंत्र वर्ग घेतले जातात. या विशेष वर्गांसाठी मुख्याध्यापकांना गरजेनुसार बाहेरचे शिक्षक नेमण्याचीही मुभा देण्यात आलीय. या योजनेला गेल्या चार वर्षांत चांगली फळं येताना दिसताहेत. सरकारही आपलं यश म्हणून या योजनेचा गाजावाजा करतंय.

हेही वाचाः किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळलीत

भाजप नेत्याकडून टीका

देशासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट असतानाही बॅनर्जी यांचं अभिनंदन करण्यावरूनही सोशल मीडियावर दोन गट पडले. एक सत्ताविरोधी आणि दुसरा सत्तासमर्थक. सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नोबेल पुरस्काराची घोषणा होताच काही मिनिटांमधेच अभिजीत बॅनर्जी यांचं अभिनंदन करणारे ट्विट टाकले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली. हेगडे ट्विट करताना म्हणाले, ‘ज्या व्यक्तीने पप्पूच्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती, त्या व्यक्तीला २०१९ चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत पप्पूला आनंद झाला असेल.’

कौतुकासाठी पंतप्रधानांना लागला उशीर

अभिजीत बॅनर्जी यांनी पुरस्कार जाहीर झाल्यावर मीडियाशी बोलताना भारतीय अर्थव्यवस्था निसरड्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. विकासदराचा ताजा तपशील पाहता अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात तरी पूर्वपदावर येईल याची खात्री वाटत नाही, असा परखड अभिप्रायही दिला. याआधी बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणावरही टीका केली होती.

बॅनर्जी यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची परखड चिकित्सा केलीय. त्यामुळे की काय बॅनर्जी यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचं अभिनंदन करायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना उशीर झाला. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, पंतप्रधानांच्या ट्विटनंतरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बॅनर्जी यांचं अभिनंदन करणारं ट्विट टाकलं. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने बॅनर्जी यांचं अभिनंदन केल्याच्या खाणाखुनाही ट्विटरवर सापडत नाहीत.

अनिवासी भारतीयांच्या कौतुकासाठी नेहमी पुढे असणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी स्वतःची प्रतिमा उभी केलीय. पण अभिजीत बॅनर्जी यांचं कौतुक करताना ते थोडंस मागं असल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचाः 

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट

सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार