माणसाच्या अस्सलपणाचा शोध हीच माझ्या लिखाणामागची प्रेरणाः प्रज्ञा दया पवार

१० मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


माझ्या कवितेचा आशय हा बव्हंशी चेहरा हरवलेल्या, चेहरा शोधणार्‍या, त्यासाठी झुंजणार्‍या स्त्रीशी जोडलेलाय. तरी मला असं वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते एक अँकरेज असतं असं म्हणता येईल.

मी लिहिती झाले तो काळ मोठा रम्य होता. पण तो अशा अर्थानं की चळवळी जिवंत होत्या, टोकदार होत्या. दलित पँथर्सपासून ते नामांतर लढा, मागोवा-युक्रांद, स्त्रीमुक्‍तीपर्यंतचा. त्याचा परिणाम म्हणजे कविता ही गंभीरपणे घेण्याची बाब आहे हे मी शिकले. कविता आपोआप एका व्यापक विधानाकडे जाऊ लागली. माझा प्रकृतीधर्मही खासगी-सार्वजनिक अशी जी पाचर मारली गेलीय तिच्यातला अंतर्विरोध शोधण्याचाच होता.

पुस्तकांच्या शाळेनं घडवलं

दया पवार नावाच्या लेखक, कवी, कार्यकर्त्याच्या पोटी जन्म घेणं ही गोष्ट माझ्यासाठी कुठल्याही स्थावर जंगम मालमत्तेपेक्षाही एक मौलिक ऐवज ठरला. घरी येणारे लेखक, विचारवंत, कार्यकर्ते, नाट्यसिनेमाशी निगडित असलेले कलावंत, विविध क्षेत्रात काम करणारी अठरापगड माणसं, त्यांच्याशी होणार्‍या दादांच्या गप्पा, चर्चा, वादविवाद यातून माझी समज आकार घेत गेली. शोषणाची जाणीव झाली. पण त्याला लेखणीने भिडता येतं हेही जाणवलं.

घरात पुस्तकांच्याच असलेल्या भिंती! गजानन माधव मुक्‍तिबोध, राजकमल चौधरी, अज्ञेय, इस्मत चुगताई, हरिशंकर परसाई, मंटो, विनोदकुमार शुक्ल, कमलेश्वर, महाश्वेतादेवी, धुमिल, करतुल ऐन हैदर, श्रीकांत वर्मा, विष्णू खरे, साहिर लुधियानवी, जॉ निसार अख्तर, फैज, पाश, अमृता प्रीतम, सुकांत भट्टाचार्य, मायकोव्हस्की, बर्टोल्ट ब्रेख्त, हो चि मिन्ह, ऑक्टेव्हियो पाझ, पाब्लो नेरूदा यांनी माझ्या जाणिवांना व्यापकत्व दिलं.

आत्मभान देणारी दलित कविता

मी ज्या मराठी काव्यपरंपरेत लिहिते त्याच्याशी माझं निश्चितच नातं आहे असं मी मानते. मराठी साहित्याशी होड घेऊ पाहणार्‍या दलित साहित्याने दलित कवितेच्या सशक्‍त प्रवाहाने व्यक्‍तिलक्ष्यी, समूहलक्ष्यी, सौंदर्यलक्ष्यी या विभाजनाला मुळातूनच काही प्रश्न विचारले ते मला महत्त्वाचे वाटले.

विचारप्रधानता आणि भावसंपृक्‍तता यांचा एकात्म संयोग, मी हा नेहमी आम्हीमधे विलीन होणं, सामूहिकतेचं भक्‍कम अधिष्ठान, नवी सामाजिक-सांस्कृतिक अन्वेषणदृष्टी, विचारप्रणालींशी असलेलं अभिन्‍नत्व आणि मानव्य, समता यावर आधारित नातेसंबंधांचं स्वप्न पाहणं आणि त्याचा आग्रह धरणं अशा कितीतरी सुंदर गोष्टी मला दलित कवितेनेच दिल्या.

आज माझी कविता राजकीयतेकडे झुकते त्याचं कारण हेच असावं की तिचा पाया बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ यांचे संस्कार पचवून उभा राहिला. माझ्या कितीतरी कवितांमधून व्यक्‍तिलक्ष्यीत्व आणि समूहलक्ष्यीत्व यांची एकमेकांत फारकत न होणारी विलक्षण सरमिसळ आढळते.

किंबहुना माझ्या बहुतांश कवितेत कवितागत निवेदक मी आहे. पण त्याचा एक अक्ष कायम समूहावरच केंद्रित झालेलाय. माझ्या कवितेला स्त्रीवादी, दलित स्त्रीवादी, दलित बहुजन स्त्रीवादी अशी अनेक बिरूदं लागलेली आहेत आणि ती मला यामुळेच अजिबात त्रासदायक वाटत नाहीत.

मराठी कवितेतले नवे पर्याय

दलित कविता अवतरली त्या काळात बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि शरच्चंद्र मुक्‍तिबोध या तीन मुख्य कवींच्या छायेत तत्कालीन मराठी कविता लिहिली जात होती. मुक्‍तिबोध आधीच्या रोमँटिक परंपरेला शह देऊन सामाजिक बांधिलकीची राजकीय कविता लिहत होते. तर पु. शि. रेगे यांनी रोमँटिक कवितेच्या परंपरेचे सशक्‍तपणे पुनरुज्जीवन केलं.

विंदा करंदीकर आणि विशेषत: नारायण सुर्वेंच्या मार्क्सवादी धारणेने हा आधुनिकतेचा प्रवाह अधिकच बळकट झाला. आणि याच भूमिकेतून मला डॉ. भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, तुळशी परब, प्रकाश जाधव, सतीश काळसेकर, मनोहर ओक, चंद्रकांत पाटील, अरुणचंद्र गवळी महत्त्वाचे वाटतात.

स्त्री कवयित्रींमधे संत कवयित्री जनाबाई, सोयरा ते पुढच्या काळात बहिणाबाई चौधरी आणि ज्यांनी खर्‍या अर्थाने स्त्रियांची कविता आधुनिकतेला नेऊन भिडवली त्या प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, रजनी परुळेकर आणि मलिका अमरशेख यांची कविता मला विशेष महत्त्वाची वाटते.

कविता ही मोठ्या अवकाशाची मागणी 

‘अंत:स्थ’ हा माझा कवितासंग्रह १९९३ मधे प्रसिद्ध झाला. २०१३ मधे ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ हा पाचवा कवितासंग्रह आला. अंत:स्थ प्रकाशित व्हायच्या आधी किमान काही वर्ष मी लिहू लागले असं गृहित धरलं तर जवळजवळ पाव शतकाएवढा दीर्घ काळ मी सातत्याने कविता लिहितेय.

माझ्या कवितांचे आजवर हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्‍नड, उर्दू, पहाडी, गुजराथी, बंगाली, इंग्रजी आणि रशियन भाषेत अनुवाद झालेत. गौरी देशपांडे, अशोक शहाणे यासारख्या दिग्गजांनी माझ्या कविता मराठीतून इंग्रजीत नेल्या आहेत. याच काळात मी गद्यलेखनही केलं. नाटक, कथा, ललित गद्य, आणि थोडंबहुत समीक्षापर लेखन केलं.

कवितेशिवाय मी व्यक्‍त होत असलेल्या इतर साहित्यप्रकारांचा आणि कवितेचा संबंध असला तर तो इतकाच की मी कवितेकडून कथा आणि नाटकाकडे वळले. काही आशयसूत्रं दीर्घ, पल्‍लेदार आणि अधिक मोठ्या अवकाशाची मागणी करणारी आहेत. हे मला कविता लिहिता लिहिता कवितेतूनच उमगलं. आणि मग मी सावकाश इतक्या काळानंतर कथेकडे, नाटकाकडे वळले. असं असलं तरी मूलत: कवी असणं हे मला स्वत:च्या नजरेत सगळ्यात आवडणारं आहे.

माणसाच्या अस्सलपणाचा शोध

जगताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. नेमकी उत्तरं शोधण्यासाठी उत्तरांचे वेगवेगळे पर्याय उभे करत असतो. तसं करताना रूढ, प्रचलित पण मुळातच अपुरे असणारे पर्याय सोडून कोणते नवनवे मार्ग असू शकतात अशी एक प्रक्रिया विचारांच्या आणि कृतीच्या अशा दुहेरी स्तरावर चाललेली असते. तसंच या प्रश्नाचं स्वरूपदेखील गुंतागुंतीचं, अंतर्विरोधात्मक असतं. ते व्यक्‍तिगत तसंच समष्टीशीही अभिन्‍नपणे जोडलेले असतात.

मुळात व्यक्‍तीपण हीच गोष्ट स्वायत्त, सुटी नसते, ती एक रचना असते आणि तिचं रचितपण सामाजिकतेतून साकार झालेलं असतं. उदाहरण म्हणून बाईबाबत हे आपल्याला स्पष्टपणे पाहता येईल. बाई वागते, तिला वागावंसं वाटतं आणि बाई म्हणून तिनं जे वागायला हवं याचा सारखा ताळमेळ घातला जात असतो. समाजाकडून आणि परिणामस्वरूपी तिच्याकडूनही. त्यामुळे माणसाचा अस्सलपणा आणि व्यवस्थेतला रचितपणा यांच्यातील परस्परांसंबंधांचा शोध मी माझ्या सगळ्याच लेखनातून घेत आलेय.

माझ्या कवितेची मूळ प्रेरणा म्हणायचीच झाली तर ती आहे, माणसाच्या अस्सलपणाचा शोध घेणं. माझ्या कवितेचा आशय बव्हंशी चेहरा हरवलेल्या-चेहरा शोधणार्‍या, त्यासाठी झुंजणार्‍या स्त्रीशी जोडलेला असला तरी असं मला वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते.

कविता ही एककृती करणं गरजेचं

स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते एक अँकरेज असतं असं म्हणता येईल. बाईच्या अनुषंगाने येणार्‍या तिच्या जगण्याचा, स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा आणि एकूण मानवी नातेसंबंधाचा उभा-आडवा पट पाहत असताना त्यातली मानुषता मात्र हरवलेली, ठायी ठायी विरुप झालेली दिसते.

या विरुपतेमधे लिंगभेदजन्य विषमतेबरोबरच जातवर्गवास्तव, त्याचबरोबरच जागतिकीकरणातून येणारं कंगालीकरण, बाजारशरणता आणि व्यक्‍तीशिवायची बाकीची सर्व मानवी एकक दुय्यम ठरवत जाणं या बाबी कळीच्या भूमिका बजावत असतात. या भूमिकांचा शोध घेणं, अर्थनिर्णयन करणं आणि त्यांच्याविरोधात हस्तक्षेप करणं हे कवितेचं काम आहे असं मी मानते. या अर्थानं कविता ही एककृती करणं आहे असं मला वाटतं. 

(प्रज्ञा दया पवार यांचं हे मनोगत ग्रंथाली वाचक चळवळीच्या शब्द रुची मासिकाच्या मार्चच्या अंकात छापून आलंय.)
 

(लेखिका ज्येष्ठ कवियित्री आहेत.)