कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावणं हा छळ असेलः अँजेला मर्केल

२७ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय.

चीनपाठोपाठ कोरोना वायरसनं युरोपला आपला विळखा टाकला. युरोपातल्या इतर देशांमधे हे संकट वाढत असताना तुलनेनं जर्मनीतला मृत्युदर मात्र कमी राहिला. आरोग्य सेवांचं आधुनिकीकरण हेसुद्धा त्यामागचं महत्वाचं कारण आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल साथीच्या काळात देशाचं समर्थपणे नेतृत्व करताहेत. कोरोनाचं संकट जर्मनीवर घोंगावू लागलं तेव्हा सुरवातीलाच मर्केलबाईंनी आपल्या देशातले ७० टक्के लोक या साथीच्या विळख्यात सापडू शकतात, असा धोक्याचा इशारा दिला होता.

जगभरातले राष्ट्रप्रमुख सगळं काही नियंत्रणात आहे, असं सांगून माहितीच्या लपवालपवीचा खेळ खेळत असताना मर्केल यांनी स्वतःहून एवढा मोठा धोका बोलून दाखवला. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष जर्मनीकडे वेधलं गेलं होतं. जनतेला कोरोनाचा धोका पटवून देत असतानाच देशाची पुढची वाटचाल कशी असेल हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

टाळ्या, थाळ्यांचा मार्ग न वापरता देशासाठी सरकार काय करणार आहे, याबद्दलचा नियोजनबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखला. सगळ्या प्रयत्नांचा एकत्रित परिणाम म्हणजे जर्मनीतला कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झालाय. या सगळ्या परिस्थितीनंतर गुरुवारी २३ मार्चला मर्केल यांनी जर्मन संसदेसमोर पहिल्यांदाच भाषण दिलं. हे भाषणही खूप महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

कोरोनाची साथ हलक्यात घेऊ नका

मर्केल यांच्या मते, जगभरात कोरोनाच्या साथीचा अजून शेवट झाला नसून आत्ता कुठं सुरवात झालीय. मर्केल यांनी कोरोनाची साथ दीर्घकाळ टिकेल असं म्हणणं हा सूचक इशाराच आहे. तो देत असतानाच मर्केल काही महत्वाच्या गोष्टीही मांडल्या असून त्या जर्मनीच नाहीच तर जगाच्या हिताच्या आहेत. संसदेच्या कामकाजावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करताना कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असं त्यांनी बजावलं.

लॉकडाउनमुळे जर्मनीतल्या राज्यांना आर्थिक आघाड्यांवर कसरत करावी लागतेय. असं असताना तिथली सरकारं लोकांना बऱ्याच गोष्टींमधे सूट देताना दिसताहेत. त्याला मर्केल यांनी विरोध केलाय. 'हा एक लांबचा पल्ला आहे. जो गाठताना आपल्याला आपली ऊर्जा आणि श्वास लवकर थांबवायचा नाहीय' असं म्हणत त्यांनी राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा दिला.

लॉकडाऊनमुळे सध्या जर्मनीत सार्वजनिक ठिकाणी दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. अशावेळी लोकांना नियमांत जास्तीची सूट देऊन मिळालेलं यश पणाला लावायचं नाही. सध्याची कोरोनाची साथ ही सुरवात असल्याचं म्हणत त्यांनी पुढचे धोके काय असतील हे सांगितलंय.

लॉकडाऊन नाही सोशल डिस्टन्सिंग

जर्मनीत गेल्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच राज्य सरकारं लॉकडाऊन शिथिल करतायंत. याआधी मर्केल यांनी १८ मार्चला देशाला संबोधित करताना औपचारिकपणे लॉकडाऊन या शब्दाचा उल्लेख केला नाही. त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला. लोकांच्या लोकशाही हक्कांवर बंदी आणावी लागल्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला होता. लोकांचं स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे हे सांगताना त्यावरची बंधनं तात्पुरती असायला हवीत हेसुद्धा स्पष्ट केलं.

आता हळूहळू तिथल्या शाळा अटीशर्थीं लागू करून सुरू केल्या जाताहेत. दुकानंही चालू केली जातील. काही राज्य सरकारांनी तसे निर्णयही घेतलेत. कोरोनाशी लढण्याकरता लोकांच्या खासगी स्वातंत्र्यावर बंधन घालणं हा आपल्या आजवरच्या निर्णयांमधला सगळ्यात कठीण निर्णय असल्याचं मर्केल आपल्या भाषणात म्हणाल्या. आज लोकांनी नियमांचं पालन आणि वैयक्तिक पातळीवर स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे.

जगभरातल्या अनेक देशांमधे लॉकडाऊन केल्यामुळे लोकशाही अधिकारांच्या अनुषंगानेही बरीच चर्चा होताना दिसतेय. मर्केल यांच्या निर्णयांचं जसं समर्थन केलं जातंय तसा जर्मनीतल्या लिबरल फ्री डेमोक्रॅटिक पार्टी, ग्रीन पार्टी अशा राजकीय पक्षांकडून विरोधही होतोय आणि काही सूचनाही केल्या जातायत.

'अशाप्रकारची साथ हा लोकशाहीवरचा कलंक आहे. नागरी हक्क आणि व्यावसायिकता यांच्यातली सीमारेषा तेव्हाच धूसर होईल जेव्हा लोक प्रतिनिधी त्यांच्या गरजा आणि त्यामागची कारणं पारदर्शी आणि समजण्यालायक बनवतील.' असं मर्केल म्हणतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

डब्ल्यूएचओनेही दिलाय सावधगिरीचा इशारा

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने ३० जानेवारीला कोरोना वायरसचं संकट लक्षात घेऊन जागतिक आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर जगभरातले देश सावध पवित्र्यात आले आणि त्यांनी हा धोका लक्षात घेऊन पावलं टाकायला सुरवात केली. आजच्या घडीला कोरोना वायरसमुळे जगभरात दोन लाखाहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झालाय. तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं २६ लाखाचा आकडा पार केलाय. ही आकडेवारी सातत्याने वाढतेय.

जागतिक आरोग्य संघटनेनंही पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा दिलाय. कोणतीही चूक करू नका, आपल्यासोबत हा वायरस बराच काळ राहणार असल्याचं डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस यांनी स्पष्ट केलंय. अनेक देशांमधे सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचारही सुरू आहे. पण हे करत असताना सावध राहायला हवं. चीनमधून जगभरात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्याच्या घडीला तिथंही या वायरसचा संसर्ग झालेले नवे पेशंट सापडत असल्याचं हळूहळू समोर येतंय. अशा काळात हा इशारा पुढचे धोके समजायला पुरेसा आहे.

हेही वाचा : राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

जर्मनीत सध्या काय चाललंय?

मार्चमधे इंग्लंड, इटली, फ्रांस, आणि स्पेन यासारख्या देशांमधे कोरोना वायरसचं संकट अधिक वाढत होतं. त्याचदरम्यान जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी देशातल्या ७० टक्के लोकसंख्येला कोरोना वायरसचा संसर्ग होऊ शकतो, असं म्हटलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जर्मनीची स्थिती पुढच्या काळात भयानक होईल की काय असं वाटतं होतं. मर्केल यांनी स्वतःलाही क्वारंटाइन केलं. त्यामुळे तर ही भीती अधिक गडद झाली. पण जर्मनीत संसर्ग झालेल्या आणि मृतांच्या आकडेवारीत बरीच तफावत होती.

बीबीसी हिंदीच्या एका रिपोर्टनुसार, जर्मनीत कोरोना वायरसचा संसर्ग झालेलं पहिलं प्रकरण फेब्रुवारीमधे समोर आलं. जर्मनीने जानेवारीच्या सुरवातीलाच कोरोना वायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन टेस्टिंगला प्राधान्य दिलं. सोबतीला टेस्ट किटच्या व्यवस्थाही करण्यात आल्या. केवळ टेस्टिंगच नाही तर संसर्ग झालेल्या आणि संशयित व्यक्तींना योग्य सुविधांनीशी ताबडतोब हॉस्पिटलमधे दाखल करण्यात येत होतं. त्यासाठी आरोग्य यंत्रणा उभी करून योग्य ती खबरदारी घेतली जात होती.

जर्मनीत सध्याच्या घडीला कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. तर मृतांचा आकडा हा साडेपाच हजार आहे. इटली, अमेरिका, फ्रान्स आणि स्पेन सध्या मृतांच्या संख्येत आघाडीवर आहेत. त्या तुलनेत हा आकडा अर्थात मृत्यू दराचं प्रमाण कमी आहे. हे शक्य झालंय ते मर्केल यांनी आरोग्यव्यवस्थेत केलेल्या बदलांमुळे. कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेऊन हा धोका तिथल्या जनतेला त्यांनी समजवून सांगितला. पण त्या तिथंच थांबल्या नाहीत. या संकट काळात आवश्यक असलेल्या सुसज्ज रुग्णालयांच्या सुविधा निर्माण करताना तिथं बेड्स, वेंटिलेटर, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही अत्यावश्यक सुविधा कशा पुरवल्या जातील याकडे लक्ष दिलं.

हेही वाचा : 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री