आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा.
किती गरम येतोय, घाम थांबतच नाही. या उन्हाळ्याचा कंटाळा आलाय. असं आपण प्रत्येकजण जवळपास रोजच म्हणतोय. फक्त एकच गोष्ट अशी ज्यामुळे या उन्हाळ्यातही आनंद होतोय. ती गोष्ट म्हणजे आंबा. मग आपणही या उन्हाचा उकाडा विसरुन आंब्याची मज्जा घेतो. आणि उन्हाळ्यात एकच गरम गोष्ट चालते ते म्हणजे गरम गरम पुरी आणि सोबत थंडगार आमरस. तसंही पुन्हा वर्षभर आंब्याची वाट बघावी लागते.
या अवीट गोडीच्या, रसाळ फळांच्या राजाला बघून आपणही जोशात येऊन आंब्याचा रस, ज्यूस, मिल्कशेक, शिरा असे वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतो. पण कित्येकदा हे पदार्थ फसतात. कामाच्या गडबडीत तेवढा वेळही मिळत नाही. सुट्टीच्या दिवशी करायचं म्हटलं तर आराम होत नाही. त्यामुळे हल्ली आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा जोश ओसरलाय.
यावर उपाय म्हणजे सगळं काही रेडीमेड मिळतं. मग बाहेरुन ब्रॅंडेड कंपनीचं किंवा घरगुती विक्री केंद्रातून आंब्याचे पदार्थ आणले जातात. हल्ली आमरस पुरी खाण्यासाठी विशेष हॉटेलमधे सह कुटुंब जेवायला जातात. तुमचाही प्लॅन ठरलाय का आमरस पुरी खायला जाण्याचा? तर दादरला मस्त आम्र महोत्सव १८ आणि १९ तारखेला असणार आहे.
हेही वाचा : हापूस झगडतोय अस्तित्वासाठी
आमरस पुरी, बटाट्याची भाजी, फोडणीची मिरची आणि पन्ह या थाळीची मज्जा आपल्याला घ्यायला आवडेलच. दादरमधल्या शिवाजी पार्कजवळच्या वनिता समाज हॉलमधे या थाळी मिळणार आहे. याची देगणी रक्कम ३०० रुपये असणार आहे.
सध्या झी मराठी चॅनलवर कानाला खडा हा कार्यक्रम सुरु आहे. त्यातले सुपर कुल अॅंकर आणि अॅक्टर समजय मोने हे स्वत: तुम्हाला आमरस पुरीच्या जेवणासाठी आमंत्रण देत आहेत. खरं तर कार्यक्रम बघत असू तर आपल्याही लक्षात आलंय की यात महाराष्ट्रातले अनेक समाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आल्या होत्या. त्यांचा खडतर प्रवास आपणही ऐकून हळवे झालोय. यांनाच फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचं संजय मोने यांनी ठरवलं.
हेही वाचा : कथाः पिकलेल्या आंब्याची उगवलेली झाडं
मग काय खवय्ये संजय मोने यांच्या डोक्यातून सुपीक आयडीया निघाली, आंबा महोत्सवाची. या साठी सध्या साधारण ५ हजार हापूस आंबे मुंबईत दाखल झालेत. आंबाप्रेमींसाठी हापूर आंब्याचा आमरस आणि पुरी म्हणजे पर्वणीच. मोने म्हणाले की, एकतर मला खायला घालायला खूप आवडतं. दुसरं म्हणजे हल्ली तर कोणाला भेटायचं सोडा, बोलायलाही वेळ मिळत नाही. मेसेज करून ठेवावा लागतो. त्यामुळे इथे आमरस पुरी खायला यावं, बसाव, बोलावं. आणि महत्त्वाचं म्हणजे अनलिमिटेड आमरस पुरी असल्यामुले तुम्ही कितीही खा आणि मस्त गप्पांचे फडही रंगवा.
या महोत्सवातून मिळणारे सर्व पैसे ते सामाजिक संस्थांना देणार आहेत. या सामाजिक संस्था शहरी नाहीत. कारण शहरातल्या संस्थांना अनेक लोक मदत करतात. पण आपलं गावाकडे नेहमीच दुर्लक्ष होतं, असं संजय मोने म्हणाले. तर गाव आणि तालुका स्तरावरील कानाला खडा कार्यक्रमात आलेल्या संस्थांना देण्यात येणार आहेत.
या उपक्रम हाती घेतल्यावर संजय मोने यांना अनेक ठिकाणी लोकांनी मदत केली. त्यांचं गाव रत्नागिरी असल्यामुळे हापूस आंबे लगेच मिळाले. आंबे देणारे आणि ट्रान्सपोर्टद्वारे पाठवणाऱ्यांना जेव्हा समजलं की अशा चांगल्या कामासाठी आंबे नेत आहेत. तेव्हा त्यांनी स्वत:च प्रॉफिट न घेता कमीत कमी पैशांत डिलिवरी दिली. अशाचप्रकारची मदत केटररनेसुद्धा केली. या महोत्सवात ८० वर्षांवरच्या आणि ५ वर्षाखालच्या मुलांना आमरस पुरी थाळीचा स्वाद विनामूल्य घेता येणार आहे.
हेही वाचा : कोण जिंकणार, निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज
हा महोत्सव १८ आणि १९ मे शनिवार आणि रविवारी आहे. वनिता समाज हॉलमधे सकाळी ११.३० ते ३.३० आणि संध्याकाळी ५.३० ते १० या वेळेत आपण आमरस पुरी थाळीचा आनंद घेऊ शकता. यासाठीच्या प्रवेशिका पल्लवी मोडिसीन: ७, हरी निवास, एल. जे. रोड, दादर पश्चिम, पणशीकर समर्थ दुग्धालय: शॉप नं ३, पोपटलाल चाळ, रानडे रोड, दादर पश्चिम, मॅजेस्टिक ग्रंथ दालन: शिवाजी मंदिर, अतुल आयुर्वेदिक: हनुमान रोड, विलेपार्ले पूर्व, रचना: २, अजय शॉपिंग सेंटर, ताकणदास, कटारीया मार्ग, माटुंगा पश्चिम येथे उपलब्ध आहेत.
बुकिंगसाठी संपर्क: अंजली मोडक: ८००७८८७८५१, रंजना काशीकर: ९२२४७०१९३१.
हेही वाचा : मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?