पीटर ब्रुक: जागतिक रंगभूमीचा भीष्माचार्य

१२ जुलै २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


ब्रिटिश अभिनेता आणि दिग्दर्शक पीटर ब्रुक प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’हे नाटक.

पीटर ब्रुक गेले आणि जागतिक रंगभूमीवरच्या भीष्माचार्यानंच या जगातून ‘एक्झिट’ घेतली असं म्हणावं लागेल. ब्रुक यांचा उल्लेख ‘भीष्माचार्य’ असा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी आपली अस्मिता असलेलं ‘महाभारत’ हे जगभरातल्या रसिकांपर्यंत पोचवलं आणि दुसरं कारण म्हणजे भीष्माचार्यांप्रमाणेच एका विशिष्ट तत्त्वनिष्ठेनं ते आपल्या कलेशी शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रामाणिक राहिले.

ब्रिटिश रंगभूमी म्हटलं की, बहुतेकांना तिथला ‘तामझाम’ नजरेसमोर येतो. तिथल्या आलिशान ब्रॉडवे नाटकांची आपल्याला भुरळ पडते. पण ब्रुक यांची रंगभूमीकडे पाहण्याची द‍ृष्टीच पूर्णतः वेगळी होती. एक कोणतीही खुली जागा, त्यावर सादर करणारा एक कलाकार आणि समोर ते पाहणारा एक प्रेक्षक असला की, झालं नाटक. नाटक या माध्यमाची एवढी सोपी व्याख्या त्यांनी केली होती. म्हणूनच आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीमधे ते एका विशिष्ट चौकटीत अडकून न पडता खर्‍या अर्थानं वेगळं काम करू शकले.

निर्वासितांच्या छावणीत ब्रुकची नाटकं

ब्रुक यांचा जन्म लंडनचा. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ते ‘रॉयल शेक्सपिअर’ कंपनीचे दिग्दर्शक बनले. इथं अनेक उत्कृष्ट कलाकृती केल्यानंतरही त्यांचं मन तिथं रमेना. तेव्हा ही कंपनीच नाही, तर ते ब्रिटनमधूनच बाहेर पडले ते जगभराच्या भ्रमंतीसाठी.

१९७०ला ते पॅरिसला गेले. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थिएट्रीकल रिसर्च’ ही नवीन संस्था सुरू करून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगभूमीचा आशय आदानप्रदान करण्याच्या कामाला हात घातला. आपल्या संस्थेचा परीघ मोठा करायचा असेल, तर त्यासाठी जोडलेली लोकही आंतरराष्ट्रीय स्तरावरची असायला हवीत, हे ब्रुक यांनी जोखलं होतं. म्हणूनच जगभरातले अभिनेते, तंत्रज्ञ, संगीतकार आपल्या या संस्थेशी जोडले जातील याची त्यांनी काळजी घेतली.

या संस्थेतर्फे त्यांनी जी काही नाटकं बसवली, त्याचे बहुतांशी प्रयोग हे आपण ज्याला रंगभूमी म्हणतो, अशा ठिकाणी झाले नाहीत. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मुला-मुलींची हॉस्टेल, बंद पडलेले कारखाने, खाणी, व्यायामशाळा. अगदी निर्वासितांच्या छावणीतही ब्रुक यांनी आपल्या नाटकाचे प्रयोग केले. त्यामुळे तथाकथित रंगभूमीपर्यंत आजवर पोचू न शकलेला प्रेक्षकवर्ग त्यांना आपल्या नाट्यकृतीला मिळाला.

नाटक करणारा आणि ते पाहणारा अशा दोघांनाही आपली कृती फसवी आहे, हे ठाऊक असतं. पण दोघांनीही त्या कृतीचा विश्‍वासानं अनुभव घेतला, तर एका सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांना सापडू शकतो. नाटक या माध्यमाची एवढी सोपी व्याख्या केल्यामुळे ब्रुक यांना आपल्या नाट्यकृती सादर करण्यासाठी कोणतीही अडचण किंवा मर्यादा आल्या नाहीत. प्रकाश, शब्द, अभिनय आणि सादरीकरणाच्या जोरावर रंगभूमीवर जे रिकामं अवकाश असतं, ते भरून आणि भारून काढण्याची क्षमता ब्रुक यांच्यात होती. म्हणूनच जगभरातल्या रंगकर्मींना ब्रुक अतिशय भावले.

हेही वाचा: लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

महाभारत जागतिक पटलावर

पीटर ब्रुक यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’ हे नाटक. ब्रुक यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या बर्‍याच साहित्यकृतींना न्याय दिला. पण त्यांना सर्वाधिक ओढ होती ती महर्षी व्यासरचित महाभारताची.

आपल्याकडे ‘महाभारत’ घराघरात पोचलं ते १९८८मधले निर्माते-दिग्दर्शक बी. आर. चोप्रांच्या मालिकेमुळे. पण त्याच्याही तीन वर्षं आधी एका ब्रिटिश दिग्दर्शकानं ही कलाकृती जागतिक पटलावर आणली होती. खरं तर १९७०च्या दशकापासूनच हा विषय ब्रुक यांच्या मनात घोळत होता. पण विएतनाम युद्धानंतर जे काही घडलं, त्यामुळे ते प्रचंड विचलित झाले आणि या महान नाट्यकलाकृतीचा जन्म झाला.

हे नाटक पहिल्यांदा सादर झालं तेव्हा त्याची लांबी नऊ तासांएवढी एवढी प्रदीर्घ होती. यावेळी ब्रुक यांनी त्याचे ‘डाइस गेम’, ‘द एक्झाइल इन दि फॉरेस्ट’ आणि ‘द वॉर’ असे तीन भाग केले होते. हे तीनही भाग सात, आठ, नऊ जुलै १९८५ला सलगरीत्या सादर झाले. या तीन भागांनी ब्रुक यांचं नाव जगभर झालं.

निष्ठा रंगभूमीवरच

या महानाट्याचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रुक यांनी महाभारतामधल्या घटनांचा संदर्भ वर्तमानकाळातल्या घटनांशी जोडला होता. म्हणूनच हे नाटक प्रेक्षकांना अधिक भावलं. ते एखादं पौराणिक नाटक न वाटता आजच्या काळातलं वास्तव पाहिल्याची जाणीव प्रेक्षकांना झाली. हे नाटक खर्‍या अर्थानं वैश्‍विक पातळीवरचं होतं. त्यातला भीम हा कृष्णवर्णीय होता, गांधारी आणि द्रोणाचार्य हे जापनीज होते, दुर्योधन हा इटालियन होता, युधिष्ठिर जर्मनीचा, तर द्रौपदीची भूमिका मल्लिका साराभाई यांनी साकारली होती.

या नाटकाचं यश एवढं मोठं होतं की, पुढं त्याचा सिनेमाही बनला. आठ तासांचा हा सिनेमा भारतातही प्रदर्शित झाला होता. तेव्हा अवघं एक मध्यंतर घेऊन दर्दी प्रेक्षकांनी या महाभारताचा आनंद घेतला होता. चोप्रांचं महाभारत सादर झाल्यानंतर दूरदर्शननं १९९१-९२च्या दरम्यान हा सिनेमा पाच-सहा भागांमधे दाखवला होता. चोप्रांच्या महाभारताची जादू तेव्हा एवढी होती की, प्रेक्षकांना ब्रुक यांची अशी काही कलाकृती छोट्या पडद्यावर येऊन गेली, हे माहीतच झालं नाही.

पीटर ब्रुक हे एक रसायनच वेगळं होतं. प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना ते कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ब्रुक यांनी ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. नाटकांप्रमाणेच त्यांनी काही सिनेमेही केले. किंग लियर ही त्यांची गाजलेली कलाकृती. पण सिने माध्यमात ते फार काळ रमले नाहीत. त्यांनी आपली निष्ठा रंगभूमीसाठीच वाहिलेली  होती.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

महाभारतासाठी ४७ वर्ष

महाभारतामुळे ब्रुक यांना भारताबद्दल विशेष ओढ आणि ममत्व होतं. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस, एनसीपीए’नं काही वर्षांपूर्वी रंगकर्मींसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत ब्रुक यांचे रंगभूमीविषयक अनुभव आणि त्यांचं तत्त्वज्ञान ऐकण्याची संधी अनेकांनी घेतली. त्यामधे विजया मेहता, रत्नाकर मतकरी, रिमा लागू, विजया राजाध्यक्ष, नीना कुळकर्णी, चेतन दातार अशी मंडळी उपस्थित होती.

सर्वसाधारणपणे एखादा दिग्दर्शक एखादी कलाकृती केल्यानंतर तिच्यातून बाहेर पडतो. पण ब्रुक यांचं महाभारतावर एवढं प्रेम होतं की, १९७२ ते २०१९ अशी तब्बल ४७ वर्ष त्यांनी या कलाकृतीसाठी दिली. म्हणूनच कदाचित भारत सरकारनं उशिरा का होईना, त्यांना २०२१मधे ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवीत केलं.

विविध देशांमधे सतत उडणारे खटके आणि संघर्षांमुळे ब्रुक यांच्या महाभारताला आजही प्रेक्षकवर्ग आहे. युद्धामुळे संघर्ष संपणार आहे का? शांती आणि युद्ध यांच्यातला एकच पर्याय आपल्यातली नेते मंडळी किंवा आपण खुद्द जनताही निवडू शकणार आहोत का, असा सवाल त्यांनी अनेकदा उपस्थित केलेला आहे.

रंगमंच संकल्पना राबवली

वाढत्या वयोमानाचा ब्रुक यांच्यावर थोडाही परिणाम झाला नव्हता. २०१७ पर्यंत ते लिहीत होते. त्यांची नाटकं येत होती. अलीकडच्या काळात भारतीय रंगभूमीवर फार काही वेगळं सादर होत नसल्याची ओरड होतेय. नाटकं सादर करण्यासाठी सर्वाधिक आवश्यक असलेल्या रंगमंचांची आपल्याकडे वानवा असल्याचंही म्हटलं जातं. पण ब्रुक यांचं काम जर का आपण बघितलं, तर त्यांनी तथाकथित बंद रंगभूमीच्या चौकटीलाच छेद दिला होता.

खर्‍या अर्थानं त्यांनी खुला रंगमंच ही संकल्पना राबवली होती. त्यामुळे ज्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत आणि आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची जिद्द आहे, त्यांच्यासाठी ब्रुक हे भविष्यातही दिशादर्शक ठरू शकतात. त्याच दिशेनं काम करत कोणीतरी एखादी चांगली कलाकृती सादर केली, तर ती ब्रुक यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली म्हणता येईल.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)