वडिलांनी कर्ज काढलं, त्याचं आदितीनं सोनं केलं!

१९ ऑगस्ट २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या आदिती स्वामीने थेट सुवर्ण पदक पटकावलंय. तिचं हे यश कौतुकास्पद, तेवढेच ऐतिहासिक आहे. पण आदिती ही काही घरात खेळाचं वातावरण असलेली खेळाडू नाही. तिनं आणि तिच्या वडिलांनी पै-पै जमवून, कर्ज काढून या खेळासाठी जीवाचं रान केलंय. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचाही मोठा वाटा आहे. आता तिला ऑलिम्पिक जिंकायचंय.

अपार मेहनत, जिद्द आणि एकाग्रता असा त्रिवेणी संगम असला की, मग यश तुमच्या पायाशी लोळण घेते. सातार्‍याच्या सतरा वर्षीय आदिती स्वामीने बर्लिन (जर्मनी) येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत थेट सुवर्णपदकालाच गवसणी घालून हेच सिद्ध केले. तिचे यश हे जेवढे ऐतिहासिक, तेवढेच कौतुकास्पद. एका सामान्य कुटुंबातील मुलगी सुवर्ण आव्हानांचा लीलया वेध घेते तेव्हा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते. 

गेल्या ५ ऑगस्टला कंपाऊंड विभागात मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला धूळ चारून आदितीने अजिंक्यपदावर नाव कोरले तो क्षण तिच्या सोनेरी कामगिरीतील मैलाचा दगड ठरला. याचे कारण म्हणजे या प्रकारातील जेतेपद खिशात टाकणारी ती देशातील सर्वात कमी वयाची चॅम्पियन ठरली आहे.

आदितीची कामगिरी थक्क करणारी

आदितीचे हे यश साडे-माडे-तीन अशा पद्धतीचे नाही.  तिच्या यशाचा आलेख मांडायचा तर आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये या सुवर्णकन्येने तब्बल ८० पदके पटकावली आहेत. त्यातील ४० सुवर्णपदके आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकतेच तिने सातव्या पदकावर नाव कोरले.  यंदाच्या जुलै महिन्यात लिमरिक येथील युवा चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात आदितीने सोनेरी कामगिरी केली. 

या विजयाची खासियत म्हणजे अंतिम फेरीत तिने १५० पैकी १४९ गुणांची कमाई केली. गेल्याच महिन्यात युवा जागतिक स्पर्धेत सुवर्णपद पटकाल्यानंतर आदितीने वरिष्ठ गटात कंपाऊंडच्या वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजीच्या एकाच जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविण्याची ही भारताची पहिलीच वेळ. 

भारतीय महिला संघाने सांघिक सुवर्णपदक मिळवले तर त्यानंतर आदितीने पहिली आणि सर्वात तरुण वैयक्तिक सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला. अर्थात आदितीच्या या यशामागे आहे तिची चिकाटी आणि खडतर मेहनत.

वडलांनी पेरलं, लेकीनं घामानं पिकवलं

सधन कुटुंबात जन्म होणे हा योगायोग असतो. आदितीचे तसे नाही. तिचे वडील गोपीचंद स्वामी हे पेशाने शिक्षक. त्यांना स्वत:ला खेळाची मनापासून आवड आहे. या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा होती. त्यामुळेच आदिती १२ वर्षांची असताना ते तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियमवर घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. 

तिथे मुले विविध खेळांचे प्रशिक्षण घेत होती. आदितीचे लक्ष त्यावेळी गेले ते धनुष्य बाणावर. आदितीचे टक लावून त्याकडे पाहत होती. हा खेळ तिला आवडल्याचे गोपीचंद यांनी लगेच ताडले आणि त्यांनी तिला लगेचच तिथल्या प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. आता रोजची पायपीट नको म्हणून त्यांनी आपला मुक्काम शेरेवाडी गावातून सातारा शहरात हलवला. 

आदिती लहानपणापासूनच तब्येतीने किरकोळ असल्यामुळे तिने शारीरिक मेहनतीच्या खेळांऐवजी तिरंदाजीवर आपले सारे लक्ष केंद्रित केले. या खेळात एकाग्रता महत्त्वाची असते. हा गुण तिच्यात उपजतच असल्यामुळे प्रशिक्षण घेत असतानाच लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा या कलेत ती तरबेज होत गेली. 

हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला आणि याच जोरावर तिने जागतिक पातळीवर चमकण्याचे स्वप्न उरी बाळगले. ते आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी इराकमध्ये तिने आशिया कप स्पर्धेत सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय पदक आपल्या नावावर केले आणि आता मागे वळून पाहायचेनाही असा निश्चय मनाशी पक्का केला.

हिर्‍याला पैलू पाडणारा शिल्पकार

आदितीच्या यशात सर्वात मोठा वाटा तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचा आहे. सातार्‍यातील वाढे फाटा येथे चक्क एका शेतात चालविल्या जाणार्‍या अकादमीत ते आपल्या शिष्यांना तिरंदाजीचे धडे देतात. सध्या ते सातारा पोलिस दलात कार्यरत आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनीही मार्गक्रमणा केली आहे. अगदी एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी वॉर्ड बॉय म्हणूनही कधी काळी काम केले होते. 

ते स्वतः नावाजलेले धनुर्धर आहेत. त्यामुळे या खेळातील अगदी बारीक खाचाखोचा त्यांना अधिक चांगल्याप्रकारे अवगत आहेत. चंद्रकांत भिसे व सुजीत शेडगे हे सावंत यांचे गुरूजन. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले यांनी सावंत यांच्याकडून धनुर्विद्येचे धडे गिरवून घेतले. तसेच राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्याकडूनही त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले.

आता सावंत हे नामांकित तिरंदाजी प्रशिक्षक बनले आहेत. आदितीबद्दल ते भरभरून बोलले. आदिती रोज तीन तास सराव करत असल्यामुळे मला तिची खेळाबद्दल असलेली निष्ठा तीव्रतेने जाणवली. नंतर मी तिला आणखी सरावाचा सल्ला दिला. आता ती सुट्टीच्या दिवशी पाच तासांहून अधिक काळ सराव करू लागली. शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेत तिने कमाल गुणांची कमाई केली होती तो क्षण मी आजसुद्धा काळजात साठवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तिच्या प्रगतीचा झपाटा पाहून भलेभले अवाक झाले. 

लेकीला या खेळाची आणखी माहिती मिळावी यासाठी वडील गोपीचंद यांनी आदितीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती दीपिका कुमारी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्मा या तिरंदाजीतील भारताच्या यशस्वी खेळाडूंचे व्हिडीओ दाखवून तिला प्रोत्साहित केले. आदितीसुद्धा मन लावून या सुवर्णविजेत्यांची कामगिरी पाहत होती. यातूनच तिच्यात आपणही जागतिक पातळीवर यश मिळवले पाहिजे ही उमेद निर्माण झाली.

धनुष्य बाण खरेदीचा प्रश्न

प्रशिक्षक सावंत यांनी पैलू पाडल्यानंतर आदिती नावाचा हिरा झळाळण्यासाठी सज्ज झाला होता. वडील गोपीचंद आणि प्रशिक्षक सावंत हे दोघेही दररोज तिच्या प्रगतीचा आढावा घेत होते. आता पुढील कारकिर्दीसाठी तिला स्वतःचे धनुष्य विकत घ्यावे लागणार होते. ही साधने अमेरिका, दक्षिण कोरिया, जर्मनी यासारख्या देशांतून मागवावी लागतात. त्यावेळी एका चांगल्या व्यावसायिक धनुष्याची किंमत सुमारे अडीच लाख होती आणि त्यासाठी लागणार्‍या बाणांची किंमत होती ५० हजार रुपये. 

गोपीचंद यांना ते परवडणारे नव्हते. त्यांनी त्यासाठी बँकेतून कर्ज काढले. मात्र, जेव्हा आदितीला स्वतःचे धनुष्य मिळाले, तेव्हा कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाली होती. साहजिकच आदितीला प्रशिक्षण केंद्रात जाणे अशक्य बनले. यावर उपाय शोधून काढून तिने घराच्या अंगणातच सराव सुरू केला. कारण, हार हा शब्दच तिला माहीत नव्हता. 

एकही दिवस सुट्टी घेतली नाही

सर्वसाधारणपणे नैसर्गिक वातावरणात वाढलेले ग्रामीण भागातील खेळाडू नागरी भागातील खेळाडूंपेक्षा जास्त तंदुरुस्त असल्याचे दिसून येते. खडतर परिस्थितीचा सामना करत आयुष्य जगत असल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या आदितीमध्ये शिकण्याची आवड आणि जिद्ददेखील ठासून भरली होती.

आज ग्रामीण भागात क्रीडा गुणवत्ता भरभरून असली, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची कमतरता तेवढीच तीव्रतेने जाणवते. सरावासाठी उपलब्ध असलेल्या अत्यल्प सुविधांचा आधार घेतच ग्रामीण भागातील खेळाडू आपली कारकिर्द घडवताना दिसतात. याला आदितीदेखील अपवाद नाही. 

आजही आदिती मार्गदर्शन घेत असलेल्या दृष्टी तिरंदाजी अकादमीत फारशा सुविधा नाहीत. तरीदेखील आदितीने त्याची खंत बाळगली नाही. प्रशिक्षक सावंत सांगतात की, प्रशिक्षण सुरू केल्यानंतर तिने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. एवढेच नव्हे तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा ती सकाळी सण साजरा करून दुपारी प्रशिक्षण घ्यायला अकादमीत उपस्थित राहत होती. तिरंदाजीत हिमालयाएवढे यश मिळवण्याच्या कल्पनेने ती जणू झपाटली होती.

एका पित्याच्या मनला लागलेली बोचणी

टाळेबंदी उठल्यानंतर देशभर विविध स्पर्धांचे आयोजन सुरू झाले. त्यावेळीसुद्धा तिला विविध स्पर्धांत भाग घेता यावा यासाठी वडील गोपीचंद यांना कर्ज घ्यावे लागले. त्यांना जो पगार मिळतो त्यातील बहुतांश भाग या कर्जाचे हफ्ते फेडण्यात जातो. सातारा शहरात आणि जिल्ह्यातही अनेक नामवंत कंपन्या, उद्योग, धनवान मंडळी आहेत. मात्र, त्यापैकी कोणीही आदितीला आर्थिक मदतीचा हात द्यायला पुढे आलेले नाही. 

आम्ही अनेकांचे उंबरठे झिजवले. पण, सगळीकडे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असा विदारक अनुभव आला. आता तर मी हे सगळे बंद करून टाकले आहे, असे सांगताना त्यांचा आवाज कातर झाला होता. राजकीय नेत्यांकडूनही आमच्या पदरी उपेक्षाच पडली, असेही त्यांनी उद्वेगाने सांगितले. 

सध्या आदितीला खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत दहा हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्ती मिळते ही त्यातल्या त्यात जमेची बाब. मात्र, हे पैसेही पुरेसे नाहीत.  धनुर्विद्येसाठी लागणारे साहित्य महागडे असल्यामुळे आजसुद्धा या कुटुंबाला पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. म्हणजेच जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करूनही आदितीच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याला दुर्दैव म्हणावे की व्यवस्थेतील दोष हे ज्याचे त्याने ठरवावे. 

ऑलिंपिकला खेळाडू असेच चमकत नाहीत

ऑलिंपिकमध्ये आपले खेळाडू का चमकत नाहीत, यावर हस्तीदंती प्रासादातील मंडळी उच्चरवाने बोलताना दिसतात. मात्र, खेळाडूंना भासणारी आर्थिक चणचण आणि कुडमुड्या सुविधा यासारख्या भयाण वास्तवाकडे त्यांचे लक्ष जात नाही ही खरोखरच सार्वत्रिक शोकांतिका म्हटली पाहिजे.

आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, हे आदितीलाही माहीत आहे. त्यामुळेच एवढी अचाट कामगिरी करूनदेखील ती आणि तिच्या कुटुंबीयांचे पाय जमिनीवर आहेत. जिद्द आणि सातत्य आणि अफाट मेहनत करण्याची तयारी  असेल तर यशाला गवसणी घालणे मुळीच अशक्य नाही हे आदितीच्या क्रीडा प्रवासावरून ठळकपणे लक्षात येते. 

कल्पना करा की, पदरमोड करून आदितीच्या वडिलांनी तिला सुविधा उपलब्ध करून दिल्या नसत्या आणि प्रवीण सावंत यांच्यासारखा गुरू द्रोणाचार्य तिला लाभला नसता तर देश एका गुणी खेळाडूला नक्कीच मुकला असता. स्पर्धेच्या निमित्ताने सध्या फ्रान्समध्ये असलेल्या सातार्‍याच्या या गुणवंत कन्येने आता ऑलिंपिकमध्ये देशाला पदक मिळवून द्यावे ही अपेक्षा गैरवाजवी ठरू नये.