होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय.
सातपुड्याची पर्वतरांग पुढचा आठवडाभर ढोल, पावा, बासरी, घुंगरूच्या नादाने थिरकणार आहे. इथले भिल्ल, पावरा, तडवी आदिवासी बांधव आपल्या आवडत्या सणाचा आनंद घेणार आहेत. देशभर वेगवेगळ्या नोकरीधंद्याच्या निमित्ताने गेलेली मंडळी आपल्या गावी परत आलेली आहेत. आबालवृद्ध, स्त्री-पुरूष अशी सगळ्यांची पावलं एकाच तालावर रात्रभर थिरकणार आहेत.
एक क्विंटल पेक्षा अधिक वजनाचे ढोल गळ्यात टांगून, कमरेभोवती गुंडाळून न थकता रात्रभर बडवले जाणार आहेत, त्याला थाळीच्या ठेक्याची जोड असणार आहे. कमरेभोवती बांधलेले घुंगरू, अंगाखांद्यावर निसर्गातलीच पानं, फुलं, फळं धाग्यांनी केलेला शृंगार, पशु, पक्षी, प्राण्यांची सोंगं, साथीला बासरीचे मधुर स्वर आणि रात्रभर बेधुंदपणे होणारा नाच, हे नितांत सुंदर संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. त्याचं निमित्त आहे आदिवासी बांधवांचा सगळ्यात मोठा आणि आवडता उत्सव 'होळी'.
हेही वाचाः आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!
आदिवासी हा मुळातच निसर्गपूजक आहे. त्याचे सण, समारंभ, देवी, देवता या निसर्गामधूनच तयार झालेल्या आहेत. निसर्ग देवतांची पूजा करत, ऋतूच्या चक्रानुसार एका वेळेला एकाच सण उत्सवाची पूजा करणारा आदिवासी बांधव निसर्गाशी आजही जोडून आहे. इंदल सारखे सण धान्याची पूजा करतात आणि होळी उत्सव आदिवासी बांधवांसाठी आनंदाची पर्वणीच असतो.
होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. होळीच्या एक महिना आधी गावात होळी फिवर सुरू झालेला असतो. एकाबाजूला सोशल मीडियाच्या आभासी जगात स्वतःला हरवून बसलेल्या या जगात आदिवासी भागातले बांधव मात्र त्यापासून दूर राहत आपल्या धुंदीत आनंद घेत असतो.
सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात पुढे आठवडाभर होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती मात्र जपलेली आहे. होळीच्या निमित्ताने पुन्हा याचा आपल्याला प्रत्यय येतो.
आदिवासी समाज हा मुळातच जंगलाच्या पार्श्वभूमीवर जीवन जगणारा. त्याच्या देवीदेवता, सण, समारंभ, उत्सव, लग्नविधी, उद्योग, व्यवसाय, शेती या सगळ्यांशी असणारं नातं हे अधिकाधिक नैसर्गिक आहे. या सर्वच क्षेत्रात वावरताना निसर्ग सतत आदिवासी बांधवांची साथ करत असतो. इथला होळी सण मात्र या खास वैशिष्ट्याची लख्ख जाणीव करून देणारा आहे.
आदिवासी भागातल्या गावांना येत्या १५ दिवसात वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवली जाते. त्याची महिनाभर आधी पूर्वतयारी असते. होळीच्या आधी परिसरात असलेल्या आठवडे बाजाराला फार महत्त्व असतं. त्या बाजाराला 'भोंगर्या बाजार' किंवा 'गुलाल्या बाजार' असं म्हणतात. या बाजारात होळीसाठी खरेदी केली जाते.
गुलाल्या बाजार का म्हणत असावेत? याची पण एक गमतीशीर गोष्ट आहे. पूर्वी काही आदिवासी भागात विशेषतः मध्य प्रदेशाला लागून असलेल्या प्रदेशाला नेमाड असं म्हणतात. भोंगर्या बाजारात लग्न इच्छुक आदिवासी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात येतात. त्यातल्या एखाद्या तरुणाला कुणी तरुणी पसंत पडली, तर त्याने तिच्या अंगावर गुलाल टाकायचा असतो. याचा अर्थ ती त्याला पसंत पडली. आणि पुढची बोलणी त्यांच्या पालकांनी करायची असते.
मुलीचा शोध घेण्यासाठी गुलालाचा वापर म्हणून हा गुलाल्या बाजार. किती गमतीशीर आहे ना! मुला-मुलींनी एकत्र यायचं, बाजाराच्या निमित्ताने आणि आपल्या आवडीचा जोडीदार शोधायचा, सापडला की त्याच्यावर गुलाल टाकायचा. आता ही प्रथा मात्र फार आढळून येत नाही.
हेही वाचाः मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे
होळी सणाची खास तयारी असते. होळी सणात नाचणारे विशिष्ट रोल घेत असतात. त्यात सगळ्यात मोठा रोल असतो बुध्या. जो बुध्या बनतो त्याने डोक्यावर मोराचं पीस आणि सजवलेली टोपी घातलेली असते त्याला 'पिशी' म्हणतात. मोराच्या पिसापासून तयार केल्यामुळे त्याला पिशी म्हणत असावेत.
बुध्या नाचणाऱ्याने कठोर पथ्य पाळायचं असतं. ही पथ्यं तीन, पाच, सात किंवा नऊ दिवस पाळायची असतात. हे दिवस गावाचा पुजारा ठरवत असतो .या पथ्याला आदिवासी भाषेत 'पालनी' असं म्हणतात. या पथ्यात बुध्या बनवणारा व्यक्ती खाटेवर बसत नाही, खाटेवर झोपत नाही, स्त्रीशी शरीरसंबंध करत नाही, मासिक पाळी असलेल्या स्त्रीच्या हातचं जेवत नाही. हे पथ्य होळीनंतर पुढच्या पाच गावांच्या होळीत तशाच सजलेल्या अवस्थेत राहून नंतर सोडलं जातं.
बुधा फार सुंदर पद्धतीने सजलेला असतो. अंगावर चुन्याचे किंवा पांढऱ्या रंगाचे सुंदर ठिपके ठेवलेले असतात. स्त्रियांचे सर्वच प्रकारचे दागिने घातलेले असतात. गळ्यात मंगळसूत्रही घालतो, हे विशेष वाटतं. स्त्रियांचा पेहराव करतो, कानातले, गळ्यातले हार, हातातले कंगन, बांगड्या, कमरेला कमरपट्टा, तुंबडे या फळांची माळ कमरेला गुंडाळलेली,चांदीचे दागिने सर्व प्रकारचा शृंगार बुध्या करत असतो.
बुध्याची नाचण्याची लयही वेगळी असते. हे सगळे दागिने बुध्या नव्याने विकत घेत असतो. घरातल्या स्त्रीचे वापरले जात नाही. हे ही विशेष आहे. तीन ते पाच होळी बुध्या नाचतो आणि शेवटच्या होळी नंतर त्याची 'पालनी' सुटते. म्हणजे तो या पथ्यापासून मुक्त होतो. शेवटी कोंबडी, बकरे मारून या बंधनातून मुक्त होऊन आपली भूमिका सोडतो.
अजून एक पात्र कालीचं असतं. काली पण पुरुष बनतात. स्त्रियांचा पेहराव करतात. हातात सूप, खराटा घेऊन विशिष्ट लयीत नाचत असतात. काली म्हणजे स्त्रियांचा सोंग घेतलेला पुरुषच.
यासोबत विविध प्राणी, पक्षी, यांची विविध सोंगं घेऊन आदिवासी बांधव बेधुंदपणे नाचत असतो. रात्रभर नाचणारे पाय ढोलाच्या तालावर थिरकत असतात. लहान-मोठी मुलंही या आनंदात त्याच लईच सहभागी होतात. हातात वेगवेगळी शस्त्रं, लाकडाची बनवलेली तलवार, धनुष्यबाण, भालेही सोबत असतात.
अनेक ढोल पथकं सुंदर पद्धतीने ढोल बडवतात. नृत्य पथकं विशिष्ट लयीत नाच करत असतात. अनेक गावांमधे ढोल पथकांची, नृत्य पथकांची स्पर्धाही होते. त्याला गावातलेच आदिवासी बांधव पैसे गोळा करून मोठी बक्षिसंही ठेवतात. अशी स्पर्धा बघायला मिळणं म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
हेही वाचाः किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
होळी सणासाठी जंगलात फिरून उंचच उंच बांबू तोडला जातो. किमान शंभर फूट लांब बांबूची निवड केली जाते. गावाच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत खोल खड्डा खणला जातो. होळीत जाळण्यासाठी लाकडं पूर्ण गाव मिळून गोळा करत असतं. होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या टोकाला 'बुरवणी' असं म्हणतात.
होळी जाळल्यानंतर बांबू खाली पडतो, तेव्हा त्याचं टोक गावचा कारभारी, पुजारी झेलतात. बुरवणीला खाली पडू द्यायचं नसतं. त्या बुरवणीची दुसऱ्या दिवशी गावातून मिरवणूक काढली जाते. होळीची राख पवित्र समजली जाते. ती एकमेकांना आशीर्वाद म्हणून दिली जाते. कपाळाला लावली जाते. होळीच्या निमित्ताने फाग मागण्याची प्रथाही आदिवासी बांधवांमधे आहे.
होळीचा सण आदिवासी संस्कृतीतल्या सामाजिक कार्याचं, सामूहिक जीवनाचं प्रतीक आहे. होळीची पूर्वतयारी, खर्चाचं गणित, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, नियोजनाच्या बैठकी, साधनांची निर्मिती यात सामाजिक सहभाग आणि सामूहिक वाटा असतो. साधारणपणे पंधरा दिवस ते महिनाभर आधीपासून होळीच्या तयारीला सुरवात होते.
गावाचे डाया म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती, कारभारी, पोलीस पाटील, पुजारा यांची यात नेतृत्वाची भूमिका असते. गावातले तरुण तरुणी रोज संध्याकाळी एका ठिकाणी येऊन नाचण्याचा सरावही करतात. ढोल तयार करणं, बांबूपासून कांबळे तयार करणं, विविध शृंगार करणं, उंबराच्या फळांची माळ तयार करणं, लाकडाची तलवार तयार करणं, वर्षभर बाजूला ठेललेली विविध वाद्य तयार करणं, होळीची जागा तयार करणं, त्याचं रिंगण तयार करणं अशी अनेक कामं गावातली तरुणाई सोबत करत असते.
बुध्याची पिशी नावाचा टोप तयार करण्यासाठी रात्रंदिवस एक व्यक्ती पाच दिवसापर्यंत काम करत असते. सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत मोराच्या पिसांची क्लिष्ट अशी गुंफण केली जाते. हा सर्व काळ ही माणसं पैसा कमवणं, सत्ता संपत्ती, राजकारण यापासून दूर राहून आपल्याच आनंद विश्वात रमलेली असतात.
मोबाईलचा स्क्रोलिंग टाईम कधीच बाजूला पडलेला असतो. हा काळ कोणत्याही प्रकारची कामं, मजुरी, पैसा मिळवण्यासाठी वापरला जात नाही. पूर्णत: होळीमधे शरीर मनाने आदिवासी बांधव सामावलेला असतो. पूर्ण गावाचा हा सण असतो. गावात एखादी दुःखद घटना घडली तर छोटी होळी केली जाते. त्याला 'गौरी होळी' असं म्हणतात.
हेही वाचाः जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?
सातपुड्याच्या आदिवासी भागात सात संस्थानं प्रचलित आहेत. त्यात काठी हे प्रमुख संस्थान मानलं जातं. काठीची होळी ही राजवाडी होळी म्हणूनही परिचित आहे. सातपुडा परिसरात तिला विशेष महत्त्व आहे.
राजवाडी होळीच्या दर्शनासाठी राज्यभराच्या विविध ठिकाणातून लोक उत्साहाने येत असतात. इसवी सन १२४६ पासून इथं होळी हा सण उत्साहात साजरा केल्याचं म्हटलं जातं. याशिवाय रायसिंग पुर, नाला, सिंगपूर, गंथा, सागबारा आणि खोजनाई अशी इतर संस्थांची होळी होते.
होळी सजवणंही फारच आकर्षक आहे. होळीच्या सर्व लोकांच्या वाळलेल्या लाकडाच्या फांद्या रचल्या जातात. गावातलं प्रत्येक कुटुंब जंगलातून लाकडं वेचून होळीची सजावट करत असतं. होळीच्या शेंड्याला खोबऱ्याच्या वड्या, भाकरी साखरेचे हार, कडं, आंबा आणि जांभूळ या झाडांचा पाला लावण्यात येतो.
आकर्षक पद्धतीने रचलेल्या या होळीभोवती पारंपरिक वेशातला बुध्या, काली, इतर सोंगं फेर धरून नाचतात. हा नाच पाहण्यासाठी रात्रभर जागे असलेले, बाहेरून आलेले नागरिक डोंगरावर बसून हे दृश्य डोळ्यात साठवत असतात. अशावेळी परिसरातल्या डोंगरदऱ्या, पायवाटेचे रस्ते माणसांच्या गर्दीने अक्षरशः ओथंबून येत असतात. अनेक गावांची नृत्य पथकं, ढोल पथकं खास पद्धतीने सराव करून आपलं नृत्य सादर सादर करत असतात.
रात्रभर नाचून होळी पहाटे पेटवली जाते. होळी पेटवल्यानंतर तिथं कमालीची सामाजिक ऐक्याची भावना असते. प्रत्येक घरात होळीच्या दिवशी जे नैवेद्य असेल त्याचं ताट होळीच्या ठिकाणी आणलं जातं. त्याचं सकाळी एकत्रित मिश्रण केलं जातं. आणि त्याचा प्रसाद केला जातो. त्याला पारण म्हणतात. तो पूर्ण गावात वाटला जातो.
होळीच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येत असतो. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आदिवासी बांधव काम करत असतो. आदिवासींच्या या आनंद पर्वाचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी सातपुड्यात यायला हवं.
हेही वाचाः
चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत
संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार
अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी
मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल
(लेखक शहाद्यातल्या नवगाव गावात प्राथमिक शाळेत शिक्षक असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत)