काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण

२५ मे २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट.

वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं काकडधरा हे एक छोटंसं गाव. ३८५ लोकसंख्या आणि अवघं ८७ उंबऱ्यांचं हे गाव. इथे कोलाम या आदिवासी जमातीचे लोक राहतात. आदिवासी भाषेत गावाला ‘पोड’ म्हणतात. या पोडावर इयत्ता पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी मात्र तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे गावात उच्चशिक्षित लोक कमीच आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय आहे तर बिडीसाठी लागणारी पानं गोळा करून, त्याचे गठ्ठे तयार करणं हा जोडधंदा आहे.

काकडधराला जलसंधारणाचा वारसा

पण या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे २०१७ मधे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यात अव्वल ठरलं. त्यामुळे देशात या गावाची चर्चा झाली. झाडगाव चिंचोली गावचे मोरे यांनी विनोबांच्या भूदान चळवळ सुरु होण्याआधीच या गावातल्या लोकांना १०० एकर जमीन दिल्याची गोष्ट गावातले ज्येष्ठ लोक सांगतात.

१९८७ पासून काकडधरा गावात जलसंधारणाचं काम सुरु आहे. तेव्हापासून इथले गावकरी श्रमदानातून जल संधारणाचं काम करत आलेत. झाडं लावणं, माती बांध तयार करणं, चर खोदणं अशी कामं त्यांनी केली. त्यामुळे श्रमदान आणि त्यातून जलसंधारणाचं महत्व त्यांना चांगलेच ठाऊक होतं. खरं तर हे आताच्या पिढीला वारशाने आलेलं असं ही म्हणता येईल.

हेही वाचा: खरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला?

काकडधरात उन्हाळ्यातही पाणी

अभिनेता आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत काकडधरा गावाने २०१७ मधे भाग घेतला. श्रमदानाचे आणि तिच्या आवश्यकतेचे महत्त्व आधीच माहीत असल्यामुळे या गावाने तन, मन, धन एक करून सहभागी झाले. स्पर्धेतल्या प्रत्येक गुणासाठी कठोर मेहनत घेतली.

मारोती गाडेकर आणि गणेश रामगडे हे शेतकरी म्हणाले कि, ‘पूर्वीपेक्षा पाण्याची साठवणूक वाढली आहे. जमिनीच्या पाणी धारण क्षमतेत वाढली आहे. ते पिकांना फार फायदेशीर ठरत आहे. २०१७ पूर्वी एकरी २ ते ३ क्विंटल कापूस व्हायचा, गेल्या दोन वर्षात सरासरी सगळ्या शेतकऱ्यांना ७ ते ९ क्विंटल कापसाचं उत्पादन होतंय.’

श्रमदानामुळे पाणी आणि माती उपचारामुळे गाव शिवारात चांगलं काम झालं. त्यांची चिकाटी बघून वर्धामधले काही स्वयंसेवकांनी साथ दिली. ३ हजारपेक्षा जास्त लोकांनी या गावात येऊन श्रमदान केलं. गावात शिरतानाच पाणी फाऊंडेशनच्या अंतर्गत एक तळ्याचे खोलीकरण केल्याचं दिसतं. भर उन्हात त्या छोट्याश्या तळ्यात भरपूर पाणी होतं. गावकऱ्यांच्या कामाची पावती तिथेच मिळते. आज पाणी टंचाई नाही, पाणी चांगल्याप्रकारे जमिनीत मुरत असल्यामुळे शेतीला फायदा होतोय.

हेही वाचा: भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं विश्लेषण

श्रमदानातून सोडवली पाण्याची समस्या

२०१७ मधे वॉटर कप स्पर्धेत काकडधराचा राज्यात प्रथम क्रमांक आला. ५० लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालं. राज्यात या गावाच्या कामाची दखल घेतली गेली. कामाचं कौतुक तर आजही होत आहे. अनेक संस्था, गाव, अधिकारी या गावाला आजही भेट देतात.

पण काही वर्षांपूर्वी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. २०१२ आणि २०१३ च्या भीषण पावसात आधी बनवलेले बंधारे तुटूले. २०१३ नंतर शेतीसाठी पाण्याची समस्या गंभीर बनली होती. साधारण डिसेंबर महिन्यातच विहीर, कुप नलिकेचं पाणी आटून जात होतं. गावातले सगळे हात पंप आटायचे. पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर वणवण करावी लागत होती. पाणी फाऊंडेशनच्या कामानंतर मात्र चित्र बदललं.

श्रमदानातून गावातील सगळ्या हातपंपाना भर उन्हाळ्यात मुबलक पाणी आहे. शेत शिवारातील विहीरीत पाणी साठा आहे. जमिनीची धूप होणं थांबलंय. तसंच शेतात पाणी अडल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे, असे फायदे होत असल्याचं गावकरीच सांगतात.

हेही वाचा: कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

गावतल्या सुधारणेसाठी मदत करणारे

सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन पावडे यांनीसुद्धा गावात श्रमदान केलं. ते आठवड्यातून दोनदा वर्धामधून शहरवासियांना बसने श्रमदानासाठी गावी घेवून येत. डॉ. पावडे यांच्यामते, ‘शहरातल्या लोकांना एकएक थेंब पाण्याचं महत्त्व कळावं, शेतकरी किती कष्ट घेतात, किती काम करतात हे कळावं म्हणून आम्ही तिथे श्रमदानाला जात होतो. त्या दुर्गम गावाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याचा फार आनंद आहे.’

या गावातले एकमात्र उच्च शिक्षित व्यक्ती म्हणजे दौलत घोरणाडे. दौलत ग्रॅज्युएट आहेत. ते सध्या पाणी फाऊंडेशनमधे समन्वयक आणि श्रमशक्ती ग्राम विकास संस्थेचे सचिव आहेत. गावचा विकास होण्यासाठी ते गावातल्या तरुणांना शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा: जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही

गावकऱ्यांचं पाणी फाऊंडेशच्या कामावर बोट

गावातले ज्येष्ठ नागरिक नामदेव हुंडेकार यांच्यामते, ‘पाणी फाऊंडेशनने आम्हाला विचारात घेतलं नाही. गावाला काय हवं यापेक्षा पाणी फाऊंडेशनने आपल्या नियमावलीतलं काम केलं, त्यांचं मॉडेल राबवत, गावाच्या गरजेकडे दुर्लक्ष केलं. अनेक वर्षांपासून सुरु असलेलं माती उपचाराचे काम पाणी फाऊंडेशनने दुरुस्त केलं, मोठं केलं. हे ३० वर्षांचं काम उच्च पातळीवर आल्यावर पाणी फाऊंडेशनमुळे कोलमडलं.’

यावर पाणी फाऊंडेशनचे एक वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात की ‘जुन्या कामांना आम्ही दुरुस्त करतो, स्पर्धेत त्याला गुण आहेत. शिवाय काम सुरु होण्याआधी आणि नंतर जिथे काम केलं आहे त्या जागेचे फोटो आणि अहवाल हा पाणी फाऊंडेशनकडे असतो, तेव्हा आधी केलेलं काम हेच पाणी फाऊंडेशनने केलेलं काम आहे असं म्हणणं निराधार आहे.’

पाणी फाऊंडेशनच्या पुरस्कारानंतर

यशाचा मोठा आलेख असलेल्या या गावाला गटबाजीच्या राजकारणाची किनार आलीय. गटातटाच्या राजकारणाने आता डोकं वर काढलंय. ५० लाख रुपयांच्या नियोजन करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी ठरवण्यावरून आणि त्या पैशातून काम करण्यावरून ग्रामस्थांमधे मतभेद निर्माण झालेत. गावातल्या प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व आणि अधिकार हवे आहेत. एका गटाकडे अधिकार गेले की दुसऱ्या गटाला ते नको आहे. यामुळे गावाचा विकास खोळंबलाय.

गाव गट ग्रामपंचायतीमधे येतं. काकडधरासोबत आणखी ३ गावे, मिळून सालदरा नावाची ग्रामपंचायत तयार होते. काकडधरा या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्यावर इतर ग्रामपंचायती मधील ३ गावांनी या पैशांवर हक्क सांगितला. पैसे ग्राम पंचायतीला मिळत आहे तेव्हा त्याचे वितरण चारही गावांना व्हावे असं त्या गावांचं म्हणणं होतं, तर काकडधरा गावाचा याला विरोध केला.

कारण स्पर्धेत काकडधरा हे एकच गाव होतं. मेहनत त्यांची मग बक्षीसदेखील त्यांना मिळालं. तेव्हा या संपूर्ण रकमेवर फक्त काकडधरा गावाचाच हक्क आहे, असं काकडधरा ग्रामवासींचं म्हणण आहे. गावातील काही लोकांची मिळून एक संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेद्वारे या बक्षीस रकमेचं नियोजन करावं. तेव्हा ‘श्रमशक्ती ग्रामविकास संस्था’ या नावाने एक संस्था नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली.

बक्षीसाच्या रकमेच्या नियोजनात फेल

काकडधरातले ११ गावकरी हे संस्था समितीची कार्यकारिणी चालवतात. पाणी फाऊंडेशनने या संस्थेच्या खात्यात बक्षिसाचा धनादेश जमा केला. आज ५० लाख ही संपूर्ण रक्कमचे नियोजन याच संस्थेच्या मार्फत होतेय.

गावाच्या काही ज्येष्ठ मंडळी म्हणतात की हा पैसा शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईन, गावातील शेतकऱ्यांना जनावरे, काही सरकारी योजना यावर खर्च करावा, पण समितीतील पदाधिकारी आणि गावकरी यांच्यात समन्वय दिसत नाही. संस्था पदाधिकारी म्हणतात की गावात चाऱ्याचा प्रश्न आहे. तेव्हा जनावरे देवून काय होणार? चाऱ्याचा प्रश्न आधी सोडवायला हवा.

प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी प्रत्येकी १० हजार असे ६.५० लाख रुपये समितीने दिले, पिकाचे पैसे आल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी हे पैसे समितीला परत केले. त्यापैकी ८०% रक्कम संस्थेला परत मिळाली. संस्थेने २% व्याज घेतले असं गावकरी म्हणतात. पण संस्था पदाधिकारी मात्र त्याला नकार देतात.

हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

पैशांच्या वादावरुन, गावचा विकास थांबला

बक्षिसाच्या रकमेवरून सुरु झालेल्या वादावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश पावडे म्हणतात की, ‘पाणी फाऊंडेशन काम फार उत्तम करतं. पण बक्षीस आलं की वाद निर्माण होतात. बक्षिसाच्या रकमेतून गावात स्वयंरोजगार निर्माण व्हायला हवा, शेतकरी आणि गावकरी स्वावलंबी व्हावेत. काकडधरा गावात लोकांनी एकजूट होऊन श्रमदान केलं. पण बक्षीस मिळाल्यावर गाव एकीकडे तर संस्था दुसरीकडे अस चित्र निर्माण झालं आहे. त्याने गावाचा विकास थांबला आहे.’

या वादाबद्दल पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन असं सांगितलं की, ‘बक्षिसाची रक्कमही संपूर्णत: काकडधरा गावाची आहे. त्या पैशाचं काय करायचं, कुठल्या लोकोपयोगी कार्यात खर्च करायचे, कसे करायचे हे ठरविण्याचा अधिकार काकडधरा ग्रामवासियांचा आहे. त्यात पाणी फाऊंडेशन हस्तक्षेप करणार नाही. त्यांना काही सहकार्य हवं असेल तर ते आम्ही द्यायला नक्कीच तयार आहोत. गावाने एकमताने निर्णय घ्यावा. पण सगळ्यांचं एक मत होताना दिसत नाही.’

पैसा आला की वाद ही त्याच्यासोबत दबक्या पावलाने येतो असं म्हणतात. गावात वाद सुरु झाला आणि आज २ वर्षानंतरही हे पैसे गावाच्या विकासासाठी खर्च न होता गावाच्या समितीच्या बँक खात्यात पडून आहेत.

कामात ऐकी आणि पैशात?

२०१७ मधेच काकडधरा गावापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावाला वॉटर कप स्पर्धेत तालुका स्तरावरील तिसरं बक्षीस ५ लाख रुपये मिळाले होते. ग्राम पंचायतीने गावाच्या सगळ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन विविध योजनांवर योग्य नियोजन करून गाव विकासात भर टाकली. पैशाने वाद निर्माण न होता नियोजनात मात्र त्या गावाने पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी चर्चा प्रशासन स्तरावर आहे.

काकडधरा गावाने जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग केला. छोटेसं गाव देखील एक होऊन मोठं कार्य उभं करू शकतात याचा आदर्श त्यांनी उभा केला. काकडधरा अनेक गावांचं आदर्श झालं. पण काकाडधरातलं मनसंधारण झालं नाही ही शोकांतिका बाकी आहेच. त्यामुळे गाव ऐकीनं जलसंधारणाच्या कामात जिंकलं पण प्रत्यक्षात हरलं.