होळीच्या बोंबेत स्त्रियांचा अपमान रोखणारा लोकराजा शाहू

०७ मार्च २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.

शिमग्याच्या दिवशी शिवीगाळ होणं ही फारशी लक्ष न देण्याची गोष्ट आहे, असा आपल्याकडे समज आहे. आज ही प्रथा शहरीकरणाच्या ओघात कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात अद्यापही काही ठिकाणी पाहायला मिळते. या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांना उद्देशून शिव्या घालणं, ही घाणेरडी पद्धत अनेक ठिकाणी दिसते. किंबहुना आपल्याकडच्या अनेक शिव्या या आई, बहिणी, पत्नी अशा स्त्रियांना उद्देशूनच आहेत.

या सगळ्या बिभत्सतेला आळा घालण्याचं काम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपतींनी १०२ वर्षांपूर्वी केलं. आज ही प्रथा कमी किंवा नष्ट झाली आहे. तसंच कायद्यानेही या बीभत्सतेला रोखलंय. या सगळ्याच्या मुळाशी शाहू महाराजांनी न्याय खात्यातर्फे काढलेला आदेश आहे. छत्रपतींच्या स्वराज्यात कोणत्याही स्त्रिचा अपमान सहन केला जाणार नाही, ही भूमिका शाहू महाराजांनी जपलीच नाही, तर जगूनही दाखवली.

काय होता तो शाहूंचा आदेश?

करवीर सरकार गॅझेटच्या पहिल्या भागात २१ मार्च १९२१ला प्रसिद्ध झालेल्या न्यायखात्याच्या हुकुमाची नोंद आहे. डॉ. जयसिंग पवार संपादीत 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा'तंही याचा उल्लेख आहे. तो पुढीलप्रमाणे…

शिमग्याचे सणात स्त्रियांना उद्देशून निंद्य व बीभत्स भाषा वापरण्यात येते, ही चाल लाजिरवाणी आहे. हल्लीच्या सामाजिक प्रगतीच्या काळात असा प्रकार चालू देणे इष्ट नाही. करिता सर्व लोकांस कळविण्यात येते की, अशी बीभत्स भाषा वापरण्याची चाल आजिबात बंद करावी. यापुढे कोणीही तसली भाषा वापरायची नाही. तसेच रंगपंचमी दिवशी रंग रस्त्यावर खेळणे हेही मनाई केले आहे.

या हुकूमाविरुद्ध कोणी वर्तणूक केल्यास त्याविरुद्ध कायद्याप्रमाणे काम चालवले जाईल. या हुकुमाचा अमल याच शिमग्याच्या सणापासून होण्याचा आहे, अशी हुजूर आज्ञा झाली आहे.

हुु. आज्ञेवरून, बी.जी.देशपांडे

हेही वाचा: शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

शिगमो आणि शिव्यांचो संबंध काय?

'कोलाज'वर प्रसिद्ध झालेल्या 'होळी रे होळी पुरणाची पोळी, सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी' या लेखात कोकणातल्या शिमग्यात होणाऱ्या शिव्यांबद्दल म्हटलंय की, कोकणात ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात.

मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने, आभळातून पडली टोपी आनी गावात गजाली करणाऱ्याची फुटली गोटी रे...फो...दे सोडो रे सोडो आनी चढलो घोडे फोदे' अशा आरोळ्याही ठोकल्या जातात. होळी पेटवल्यानंतर होळीभवती नाच केला जातो. काही होळीत वाहिलेल्या नारळाचं खोबरं चोरलं जातं. ते असंच किंवा भाजून खाल्लं जातं. त्यावेळी होणाऱ्या झटापटीत शिव्या देणं, ओरडणं, आरोळ्या ठोकणं, बोंबा मारणं आलंच.

शिगम्याला शिव्या कशासाठी देतात? तर परंपरेनुसार ज्या व्यक्तीला शिव्या देत आहेत त्याच्यामागचा क्लेश जावा अशी त्यामागची भावना. खरंतर आपल्या शरीरात रागाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. या उर्जेचा निचरा होणं गरजेचं असतं. तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजेत कोकणातील शिमग्याची शिव्या देण्याची प्रथा, असं केईम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर सांगतात.

सण साजरे करा पण, बीभत्सपणा टाळा

कोकणात शिमगा आणि मुंबईत उत्तर भारताचा प्रभाव असलेली रंग खेळायची होळी धुळवडीच्या दिवशी साजरी होते. फाल्गुनी पौर्णिमेला होळी पेटवून, दुर्गुणांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. त्यातील परंपरा वगैरे ठीक आहे, पण त्यानंतर धुळवड आणि रंगपंचमीच्या निमित्तानं अनेक अनिष्ट गोष्टी मान्य केल्या जातात. त्यात शिवीगाळ करणं, दारू पिऊन रस्त्यातून बोंबा ठोकणं आणि रंग न खेळणाऱ्यांना त्रास देणं वगैरे अनेक गोष्टींचा सहभाग असतो. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो.

होळीच्या निमित्तानं अर्वाच्य भाषेत शिव्या घालणं, स्त्रियांच्या नावाने बोंब मारण्याची काही भागांत परंपरा आहे. इतर वेळी भीती किंवा लाजेखातर राग उघडपणे व्यक्त करता येत नाही. होळी आणि धूळवडीच्या परंपरेच्या नावाखाली ही सवलत मिळते, ही त्यामागची प्रवृत्ती. पण यातून वाद, भांडणे तर होतातच, शिवाय स्त्रियांचा अपमान होतो, हे ओळखून शाहू महाराजांनी हा कायदा केला होता.

शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि परंपरा कवटाळत न बसला आधुनिकता स्वीकारण्याचं पुरोगामित्व या कायद्यातून स्पष्टपणे दिसतं. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमधे आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. त्यांचा हा २१ मार्च १९२१ रोजी निघालेला हुकूम हा शिमग्याचा सण कसा असावा आणि कसा नसावा, याचा आधुनिक विचार आहे, हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा: 

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?