सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?

२३ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. त्यात मे पूर्वीची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सैन्य माघार सुरू झाली. त्यानंतर भारताने आणि चीनने काय कमावलं आणि काय गमावलं, याची चर्चा सुरू झालीय. खरंतर चीनने काही निश्चित हेतूनं पूर्व लडाखमधे आक्रमण केलं होतं. पण या आक्रमणाला भारताने आपल्या पद्धतीने उत्तर देऊन ते निष्प्रभ केल्यामुळे आता चीनला माघार घ्यावी लागलीय.

चीनला भारताने दिलेला एक धडा, एवढंच या घटनेबद्दल म्हणता येईल. हा चीनविरुद्ध मोठा विजय आहे, असं मानण्याची भारतात कोणाचीही तयारी नाही. तरीही या आक्रमणानंतर भारत आणि चीनने काय कमावलं आणि काय गमावलं? ते पाहण्याची गरज आहे.

अर्थव्यवस्थेवर पडणार भार

पहिलं भारताने काय गमावलंय ते पाहू. या आक्रमणानंतर भारताला आता उत्तर सीमेवर कायम सैन्य तैनात करावं लागणार आहे. दोन्ही देशातली सीमा जवळपास चार हजार किलोमीटरची आहे. तीही अत्यंत दुर्गम अशा हिमालयात. तिथं कमालीची थंडी असते आणि हिवाळ्यात कोणताही जीव जगू शकणार नाही, अशी स्थितीही असते.

त्यामुळे या संपूर्ण सीमेवर १२ महिने २४ तास सैन्य तैनात करणं हे अत्यंत खर्चिक आणि सैन्याचा कस लावणारं काम आहे. पण ते करण्यावाचून भारताला पर्याय नाही. हा अर्थव्यवस्थेवरचा नवा आणि जादा भार आहे.

या आक्रमणानंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यातलं संरक्षण सहकार्य जास्त वाढलंय. त्यामुळे आता भारताला दोन आघाड्यांवर युद्ध होण्याची शक्यता गृहीत धरावी लागणार आहे. त्या दृष्टीने नियोजनही करावं लागेल. सध्याची माघार ही चीनच्या भावी आक्रमणाची नांदी आहे, असंच भारतीय लष्कर आणि सरकार मानतं. त्यामुळे यापुढच्या काळात चीनला तोंड देऊ शकेल अशी लष्करी यंत्रणा उभी करावी लागणार आहे.

हेही वाचा: भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!

कैलास शिखरावरूनही माघार

या युद्धाने भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापारी संबंधांचाही बळी घेतलाय. त्यामुळे चीनकडून मिळणारी अनेक रसायनं, औषधी कच्चा माल मिळणं बंद झालंय. तसंच काही भारतीय मालाची चीनी बाजारपेठ बंद झालीय. याला पर्याय शोधण्याचं काम भारताला करावं लागेल.

चीनबरोबर झालेल्या सैन्य माघारीच्या समझोत्यानुसार भारताला त्याने काबीज केलेल्या कैलासश्रेणीच्या पर्वतशिखरांवरून आपलं सैन्य खाली आणावं लागणार आहे. ही शिखरं भारतीय हद्दीत असली, तरी ती ताब्यात घेणं चीनलाही शक्य आहे. त्यामुळे भारताला यापुढच्या काळात या शिखरांवर चीन कब्जा करणार नाही, यासाठी उपाययोजना करावी लागेल. पण त्याचवेळी भारताने यात काय कमावले हेही पाहिले पाहिजे.

चीनचं निरुपयोगी कौशल्य

या आक्रमणातून भारताला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे चीनविरुद्ध लढण्याचा आलेला आत्मविश्वास. १९६२ च्या दारुण पराभवाचा कलंक लडाखमधे झालेल्या भारताच्या या सरशीने पुसून टाकलाय. चीन कितीही मोठी लष्करी आणि आर्थिक सत्ता असली, तरी त्याच्या दबावाला बळी पडण्याचं नाकारलं तर तो नमतं घेतो, हे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हेही लडाख घटनेने सिद्ध केलंय. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधील बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय.

चीनची सायबर वॉरची क्षमता, त्याचं कृत्रिम बुद्धितंत्रज्ञानातलं कौशल्य आणि ड्रोनच्या वापरातली त्याची प्रगती या दंतकथा आहेत, हेही यावेळी दिसून आलं. निदान हे कौशल्य चीनकडे असलंच तर ते हिमालयातल्या युद्धासाठी निरुपयोगी आहे, हे मात्र स्पष्ट झालं.

हेही वाचा: चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

भारताच्या चपळाईनं चीन गारद

चीनने त्याच्या सीमा क्षेत्रात मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्यात आणि तो काही दिवसांत काही लाख सैन्य आणि युद्धसामग्री भारताच्या सीमेवर आणू शकतो. पण भारताची तशी कोणतीही तयारी नाही. त्यामुळे चीनच्या लष्करी तयारीची बरोबरी भारत करू शकत नाही, असा समज पद्धतशीरपणे पसरवला गेलाय. भारतीय विश्लेषकही ते या युद्धकाळात हिरिरीने मांडत होते. 

पण गलवान घटनेनंतर भारताने केवळ पंधरा दिवसांत एक लाख सैनिक, त्यांच्यासाठी लागणारी युद्धसामग्री आणि रसदपुरवठा जमवाजमव करून या समजाचा भोपळा फोडला. चीनही भारताच्या या चपळाईने गारद झाला. एकूणचा पूर्व लडाखच्या चिनी आक्रमणाने भारताला त्याच्या चीनविरोधी सुप्तसामर्थ्याची जाणीव करून दिली. ही या युद्धाची मोठी कमाई म्हणावी लागेल.

या आक्रमणाच्या काळात भारताने जो राजकीय कणखरपणा दाखवला तो महत्त्वाचाय. भारत हा आशियात दुय्यम देश आहे. तो आपल्या प्रभावाखाली आहे, हे जगाला दाखवणं हाही या आक्रमणामागचाच चीनचा हेतू होता. तो या राजकीय कणखरपणामुळे फसला आणि चीनची जगात काहीअंशी तरी नाचक्की झाली, हा भारताचा मोठाच फायदा आहे.

चीननं गमावली बाजारपेठ

या आक्रमणानंतर भारताने चीनच्या आर्थिक गुंतवणुकीवर बंदी घातली तसंच चिनी अ‍ॅपवरही बंदी घातली. भारतातल्या बर्‍याच पत्रपंडितांनी या निर्णयाची खिल्ली उडवली. पण या निर्णयाने चीनवर खूप मोठा विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलं. भारतात चिनी अ‍ॅपचे कोट्यवधी ग्राहक आहेत, ते एका क्षणात चीनच्या हातून गेलं.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनीही या अ‍ॅपवर बंदी घातली. याचा मोठाच फटका चीनला बसला. चीनसाठी भारत ही अगदी शेजारची मोठी बाजारपेठ आहे. पण आता ही बाजारपेठ त्याच्यापासून दुरावलीय. ती मिळवण्यासाठी चीनला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हेही वाचा: चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

भारत अमेरिका जवळ आले

आंतरराष्ट्रीय राजकारणात लडाख आक्रमणाचा मोठा फटका चीनला बसलाय. पूर्णपणे अलिप्त असलेल्या आपल्या शेजार्‍याला चीनने आपल्या हाताने अमेरिकेच्या गोटात ढकललंय. अमेरिका गेल्या काही काळापासून आपल्या चीनविरोधी व्यूहरचनेत भारताला सामील करून घेण्यासाठी धडपडत होता.

अमेरिकेचा सतत दबाव असूनही भारत अमेरिकेशी संरक्षण करार करण्याचं टाळत होता. पण चीनच्या या आक्रमणाने भारत आणि अमेरिका हे देश एकदम जवळ आलेत. लगेच त्यांच्यात चीनविरोधी सहकार्यही सुरू झालं.

स्वयंपूर्णतेचं आत्मभान

चीनच्या या आक्रमणाने भारताला आणखी एका गोष्टीची जाणीव झाली ती ही की, देशाच्या संरक्षण गरजेसाठी आता परदेशांवर अवलंबून राहता येणार नाही. चीन ही एक आर्थिक शक्ती आहे आणि ती भारताला संरक्षण साहित्य पुरवणार्‍या देशांवर दबाव टाकू शकते.

विशेषत: रशियन संरक्षण साहित्यावर भारत अवलंबून आहे. रशिया चीनचा मित्र आहे आणि तो चीनच्या दबावाखाली येऊन भारताचा संरक्षण साहित्याचा पुरवठा थांबवू शकतो. त्यामुळे या आक्रमणाच्या काळातच भारताने आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आणि तो लगेच अंमलात आणण्यास सुरवात केली. हे एक मोठं आत्मभानच चीनच्या या आक्रमणामुळे भारताला आलंय.

चीनचं आक्रमण हे धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. ते अचानक झाल्यामुळे सुरवातीला भारतात सगळेच आश्चर्यचकित झाले. पण सरकार आणि लष्कर यांनी त्याला तोंड देण्याचा निर्धार केल्यावर हे संकट एकदम छोटं होऊन गेलं.

यापुढचं संकट आणखी मोठं असू शकतं, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढच्या अशा संकटातून भारताचा एक शक्ती म्हणून उदय व्हावा असं वाटत असेल, तर भारताला आतापासूनच तयारी करायला हवी. ही जाणीवच या आक्रमणातली मोठी कमाई आहे.

हेही वाचा: 

पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?

मोदी शहांना तरुण कार्यकर्त्यांची इतकी भीती का वाटते?

प्रिया रमानी खटला : बाईचा सन्मान जपणारं कोर्टाचं जजमेंट

डॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक

देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय? 

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा लेख पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )