'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश बनली कारण…

२६ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय.

एखादा खाद्यपदार्थ पहिला कोणी शोधला यावर एकमत होणं, ही अवघड गोष्ट आहे. कारण खरं तर कोणताच पदार्थ हा संपूर्णतः ओरिजनल असा नसतोच. तो कशाच्या तरी आधारे बनलेला असतो किंवा अपघाताने बनलेला असतो. जगभरातील खाद्यसंस्कृतीचा सारा इतिहास हा अशाच गोष्टींनी भरलेला आहे. आज हा विषय काढण्याची गोष्ट म्हणजे, चिकन टिक्का मसाला नक्की कुठे बनला हा चर्चेचा विषय ठरला आहे.

याचं कारण झालंय ते म्हणजे अली अहमद अस्लम या इंग्लडमधे वसलेल्या पंजाबी शेफच्या निधनाचं. साऱ्यांनी त्यांचं वर्णन 'चिकन टिक्का मसाला' या सुपरड्युपर हिट पदार्थाचा निर्माता अशी केलीय. पण, काहींच्या मते हा पदार्थ अनेक वर्ष पंजाबमधे बनतो आहे वगैेरे. पण मग या सगळ्यावर असंही सांगितलं जातंय की टिक्का वेगळा आणि टिक्का मसाला वेगळा. हे सगळं समजून घेणं इंट्रेस्टिंग आहे. कारण माणसांचा इतिहास हा असा एकमेकांमधे मिसळलेल्या विविध संस्कृतींनी बनतो, हेच यातून वारंवार अधोरेखित होतं.

हेही वाचा: आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

असा बनला टिक्का मसाला

ही गोष्ट आहे १९७० च्या सुमारची. स्कॉटलंडमधल्या शीश महल या रेस्टॉरंटमधे एका ग्राहकानं चिकन टिक्का मागवला. पण चिकन टिक्का हा कोरडा असल्यानं याच्यासोबत काही सॉस बनवून मिळेल का? अशी त्यानं विचारणा केली. किचनमधे असलेल्या अली अहमह अस्लम यांनी हा सॉस बनवण्यासाठी तयार असलेल्या टॉमेटो सूपची मदत घेतली आणि त्यात आणखी काही मसाले टाकून एक नवी डिश बनवली, त्याला नाव दिलं चिकन टिक्का मसाला.

त्यांनी बनवलेला हा पदार्थ त्या ग्राहकाला अफलातून आवडला. त्यानं हा पदार्थ मेनूकार्डमधे सामील करायला सांगितलं. तिथून हा पदार्थ शीश महलच्या मेनू कार्डवर तर आलाच. पण नंतर संपूर्ण इंग्लंडमधेच नाही तर युरोपभर प्रसिद्ध झाला. भारतीय करीच्या प्रेमात असलेल्या युरोपियनांना आता चटपटीत चवीचा नवा पदार्थ मिळाला होता.

अली हे मुळचे आजच्या पाकिस्तानमधे गेलेल्या पंजाब प्रांतातले. ते लहान असताना त्यांचं कुटुंब ग्लासगो इथं स्थलांतरित झालं होतं. अली यांनी १९६४ मधे शीश महल रेस्टॉरंट सुरु केलं. भारतीय उपखंडातले पदार्थ ते तिथं विशेष करून बनवत. ग्रेवी बनवताना ते युरोपातल्या लोकांना कशी आवडेल याचा ते सातत्यानं विचार करत. चिकन टिक्का मसालाची ग्रेवी बनवताना त्यांनी हाच विचार केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

चिकन टिक्का आणि चिकन टिक्का मसाला

आता टिक्का हा थोडासा कोरडा आणि टिक्का मसाला हा ग्रेवीवाला आयटम आहे, एवढं आपल्याला कळलं असेलच. पण नक्की टिक्का आणि टिक्का मसाला यात काही फरक आहे का? याचं खरं उत्तर कोणाकडेच नाही. कारण टिक्का आणि टिक्का मसाला हे काही वेगळं नाही, असं काहीचं मत आहे. तर काहींच्या मते टिक्का मसाल्याची ग्रेवी ही वेगळी संकल्पना आहे.

आज भारत आणि पाकिस्तानमधे विभागलेल्या गेलेल्या पंजाब प्रांतात गेली कित्येक दशकं चिकन टिक्का बनवला जातो. टिक्का तयार करताना,  बोनलेस चिकनचं दही आणि विविध मसाल्यांमधे मॅरिनेट करून नंतर ते तंदूरमधे भाजले जातात. नंतर हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ काहीसा कोरडाच असतो, असं काहींचं म्हणणं आहे.

टिक्का मसाला अधिक चटपटीत असल्याने तो चिकन टिक्कासोबत क्रिमी, स्पायसी ग्रेवीमधे पेश केला जातो. त्यात अनेकदा टॉमेटो, नारळाची मलई, काळिमिरी पावड, हळद असे पदार्थ वापरले जातात. आता इथं आम्ही काही रेसिपी सांगत नाही. कारण आपल्याकडे ती ऑथेंटिक रेसिपी वगैरे नाही. पण एकंदरित ही ग्रेवी अली यांनी शीश महालमधे पहिल्यांदा बनवली, असा त्यांचा दावा आहे.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

चिकन टिक्काच्या अशाही दोन कथा

चिकन टिक्का या पदार्थाबद्दल आणखी दोन कथा सांगितल्या जातात. एक कथा आहे, मुगल सम्राट बाबर याच्या काळातल्या. असं म्हणतात की, मुगल सम्राट बाबर आजारी असताना त्याला जेवायला नॉनवेज हवं होतं, पण ते फार त्रास देणार, हाड वगैरे लागणारं नको होतं. मग त्यानं आपल्या पंजाबी खानसाम्याला बोनलेस चिकनची नवी डिश बनवायला सांगितलं. तंदूरच्या प्रेमात असलेल्या त्या खानसाम्यानं जो पदार्थ शोधला तो म्हणजे चिकन टिक्का.

आणखी एक कथा सांगतात ती दिल्लीच्या करीम हॉटेलचे शेफ जईमुद्दीन अहमद यांची. त्यांच्या मते, शेवटचा मुगल बादशाद बहादूर शहाजफर याच्याकडे आचारी असलेल्या माणसानं करीम हॉटेल सुरू केलं. तिथं त्यांनी मोगलांच्या राजदरबारात बनणाऱ्या खास पदार्थ सर्वसामान्य लोकांसाठी बनवण्यास सुरवात केली. चिकन टिक्का हा तिथून सर्वत्र लोकप्रिय झाला.

आता हे पदार्थ चिकन टिक्का होते की चिकन टिक्का मसाला हे काही कुणी स्पष्टपणे सांगत नाही. पण आपल्याला या कथा कळल्या, त्या नोंदवून ठेवायला हव्यात एवढं नक्की. कारण कोणताच पदार्थ हा पहिल्यांदा यांनीच बनवला असं कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण कोणतंही ज्ञान हे आधीच्या पायावरच उभं असतं, हे कालातीत सत्य आहे.

इंग्लंडची नॅशनल डिश वगैरे

आज जगभरातल्या भारतीय रेस्टॉरंटमधे चिकन टिक्का मसाला हा पदार्थ मिळतो. मुळातच भारतीय पदार्थांच्या प्रेमात पडलेल्या इंग्लंडने तर चिकन टिक्का मसाला अत्यंत लोकप्रिय ठरला. इंग्लंडमधे २०१२ला झालेल्या एका सर्वेक्षणानुसार चायनीज स्टिअर फ्राय दुसरा लोकप्रिय पदार्थ हा चिकन टिक्का मसाला होता.

२००१ मधे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव रॉबिन कुक यांनी ब्रिटनच्या बहुसांस्कृतिकतेसंदर्भात बोलताना, चिकन टिक्का मसाला या पदार्थाचा उल्लेख इंग्लंडची नॅशनल डिश असा केला. इंग्लंडने स्वीकारलेल्या जगभरातल्या संस्कृतीचं ते प्रतीक आहे, असंही ते म्हणाले होते. या भाषणानंतर जगभरातल्या माध्यमांमधे चिकन टिक्का मसाला आणि त्याच्या निर्मितीबद्दल अनेक लेख प्रसिद्ध झाले.

आज चिकन टिक्का मसाला हा पदार्थ सगळीकडे मिळत असला, तरी पहिल्यांदा चिकन टिक्का कोणी बनवला हे कुणालाच माहीत नाही. आज माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याला लागलेला मसाला किमान इतिहासाच्या पानावर नोंदवला तरी गेला. पण, जगभर पसरलेल्या कोट्यवधी पदार्थांची निर्मिती ज्या क्षणी झाली, ते क्षण आणि ते निर्माते कधीच कुणाला कळणार नाही. त्यामुळे किमान आपण चिकन टिक्का मसालाच्या निर्मात्याला श्रद्धांजली वाहून, त्या असंख्य स्वयंपाकघरातल्या जादूच्या हातांचं स्मरण करूयात.

हेही वाचा: 

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?