लग्न पहावं 'अंबानींसारखं' करुन

१९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


इशा अंबानीचं लग्न नुकतंच झालं. मीडिया आणि सोशल मीडियाने ते मनसोक्त रंगवलं. अनेकांनी टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही.

जगातले टॉपचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचं लग्न झालं. अंबानींची इशा आनंद पिरामलशी लग्न करुन इशा आनंद पिरामल झाली. हे सगळं १२ डिसेंबरला घडलं. म्हणजेच या सगळ्याला आता काही दिवस लोटलेत. तरीही या रॉयल लग्नाची चर्चा काही थांबताना दिसत नाही. पण ही चर्चा झाली नसती, तरच नवल. आशियातला सगळ्यात श्रीमंत माणूस. इशा त्यांची मुलगी. तीही एकुलती एक.

अशात कुबेरालाही पाणी भरायला लावण्याची धमक असणारं अंबानी कुटुंब पाण्यासारखा पैसा खर्च करणार, हे अपेक्षित होतंच. आणि त्यांनी 'किती उधळपट्टी केली!' म्हणत, गळा काढणाऱ्यांचाही सुळसुळाट होणार. हेही अपेक्षित होतं. म्हणजेच काय लग्नापूर्वीचा, लग्नाचा आणि लग्नानंतरचाही सोहळा अगदी अपेक्षेप्रमाणेच संपन्न झाला आहे. पण या सोहळ्याने आपल्याला काय दिलं?

डोळे दिपवून टाकणारं ऐश्वर्य

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या निमित्ताने भारतीयांनी डोळे दिपवून टाकणाऱ्या ऐश्वर्याचा अनुभव घेतला. दसरा, दिवाळीत घराच्या दरवाजाला तोरण लावण्यासाठी ६० रुपये किलोने जाऊन गोंडे खरेदी करणाऱ्या सामान्य मुंबईकरांनी, अख्खं २७ मजली घर वेगवेगळ्या फुलांनी सजलेलं बघितलं. आपल्या लग्नात स्थानिक नगरसेवकानं तरी यावं अशी आशा बाळगणाऱ्या सामान्यांनी अख्खं सिनेजगत एका लग्नात अवतरल्याचं बघितलं. एवढंच नाही तर या सगळ्यांनी लग्नात ठेका धरल्याचे विडिओही वायरल झाले.

टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही. 

तशीच वेगळी ऐश्वर्याही

हा केवळ शब्दच्छल नाही. या लग्नाने काचेची बाहुली अशी ओळख असणारी, कोणेएके काळी विश्वसुंदरी ठरलेली ऐश्वर्याही अंबानींच्या या ऐश्वर्य प्रदर्शनाने एका वेगळ्या रुपात दाखवली. या लग्नातल्या वेगवेगळ्या समारंभात ती वेगवेगळ्या भूमिकांत दिसली. कधी संगीत समारंभात एकच डान्स स्टेप करणाऱ्या नवरा अभिषेक बच्चनचं टॅलेंट झाकताना दिसली. तर कधी वरातीतल्या पाहुण्यांना स्नेहाने आणि आग्रहाने जेवण वाढताना दिसली. कुठल्याशा ग्रुप डान्समध्ये तिचा पूर्वाश्रमीचा आशिक सलमानही बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचताना दिसला. हा सगळा करीश्मा ऐश्वर्याचाच होता. रॉय किंवा बच्चनच्या नाही. अंबानींच्या ऐश्वर्याचा!

हे लग्न इतकं महत्वाचं होतं, की इथे हजेरी लावणं हे आपलं आद्यकर्तव्यच आहे, असं मानत दिग्गजांनी याला हजेरी लावली. ज्यांना जमलं, ते आलेच. पण ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नव्हतं, त्यांनीही कुठल्या ना कुठल्या प्रकारे लग्नात शिरकाव केलाच. गानकोकिळा लताबाई तर आपल्या आवाजातूनच या लग्नात उपस्थित राहिल्या. त्यांनी नवदाम्पत्यासाठी खास आपल्या आवाजातील, गायत्री मंत्र रेकॉर्ड करुन पाठवला.

'ए मेरे वतन के लोगे...' ऐकून जसं नेहरु भावूक झाले होते, तसंच हा गायत्री मंत्र ऐकून अंबानी कुटुंबीय भावूक झालं. अर्थात भावना वेगळी होती! मग बच्चनजींनी 'ब्रेक के बाद फीर एक बार शुरु करते है कौन बनेगा करोडपती' म्हटल्यासारखं पॉज झालेलं कन्यादान पुन्हा एकदा सुरु केलं. एखाद्या लग्नात असा आवाजरुपी आहेर येणं माझ्यातरी ऐकिवात नाही.

हवाई चपलेनेही अनुभवला शाही सोहळा

राजनाथ सिंह, स्मृती इराणी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे ते पार हिलरी क्लिंटनपर्यंतचे राजकारणी या लग्नसोहळ्याला हजेरी लावून गेले. मात्र सामान्यांच्या पायातली हवाई चप्पल घालून या शाही लग्न सोहळ्याला पोचलेल्या ममता बॅनर्जी लक्ष्यवेधी ठरल्या. काय तो या एकाच बाईने आपल्या सामान्यपणाचा तोरा या असामान्य लग्न सोहळ्यात मिरवला.

पायातली हवाई चप्पल आणि कॉटनची पांढरी साडी नेसून ममताबाईंनी अंबानींच्या या रंगीत लग्नसोहळ्याला आपल्या सामान्यत्वाचा जणू तीटच लावला. पण त्यांच्या निमित्ताने का होईना, सामान्य माणसाच्या जगण्यातली एक खूण या श्रीमंतांच्या विवाहसोहळ्यात बागडली, याचं उगाचच ओढूनताणून कौतुक वाटतंय.

सोशल मीडियावर चघळण्यासाठी खाद्य

या शाही लग्नसोहळ्याबाबत असंख्य फेसबुक, वॉटस्अप पोस्ट्स लग्नानंतर वायरल झाल्या. काहींनी तर एका पोस्टमध्ये बियॉन्सी या अमेरिकी पॉप स्टारला रात्रभर नाचवण्यावरुन अंबानींचं तोंडभरून कौतुक केलं. आपण किती मूर्ख आहोत, याचं उदाहरणासहीत स्पष्टीकरण देणारी ही पोस्ट.

आता या अंबानींनी पोरीच्या लग्नात बियॉन्सी नामक अमेरिकन पॉप स्टारला नाचवलं. त्यात कसला आलाय गर्व? गर्व करण्याचं कारण काय? तर ती केव्हातरी ‘भारत गरीब देश आहे’, असं म्हणाली होती. पण अंबानींनी तिला भारतात आणून नाचवलं, म्हणून काय ती गरीब झाली? आणि लगेच भारत श्रीमंत?

ती कोट्यवधी रुपये घेऊन नाचली. परदेशी मीडियाने तिला या प्रायवेट कॉन्सर्टमधून मिळालेल्या मानधनाच्या बातम्याही केल्या. बच्चन आणि खान मंडळींसारखी दोस्ती यारीखातर तर ती लग्नात आली नव्हती. आपल्या देशाला गरीब म्हणणारी माणसंच आपल्या देशात येऊन आपण आयुष्यभर करु शकणार नाही, इतकी कमाई एका रात्रीत करुन जातात आणि आपण खोट्या अस्मिता अशा जाहीर फुगवत राहतो. हे सगळंही या लग्नाच्या निमित्ताने घडलंच.

जिओने आपल्या ‘तसल्या’ व्हिडिओंना काही दिवसांपूर्वीच घोडा लावलाय. त्यामुळे वैतागलेल्या आपल्या नेटकरी पोरांनी अंबानींच्या लग्नाच्या विडिओंनाही बैलासकट नांगर लावला. त्यामुळे खूप हशा पिकला. पण काहीच साध्य झालं नाही, ते होत नसतंच.

लग्न खर्चाचा 'अंबानी पॅटर्न’

मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलीचं लग्न आपल्या ऐपतीच्या मानाने साध्या पद्धतीने करुन लग्न खर्चाचा 'अंबानी पॅटर्न'च वधूपित्यांसमोर ठेवला. आता तुम्ही म्हणाल 'साध्या?' तर बघा. अंबानी यांचा पगार गेल्या १० वर्षांपासून दरमहा १५ कोटी इतका आहे. तो ना वाढला, ना कमी झाला. त्यांचा नेटवर्थ २.६ लाख कोटी इतका आहे.

मीडियामध्ये लग्न खर्चाबाबत जी काही चर्चा रंगते आहे, त्यात समोर आलेले आकडे ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत. म्हणजे काय? तर आपल्या लेखी जरी हा खर्च अवाढव्य वगैरे असला, तरीही अंबानींच्या संपत्तीच्या मानाने तो कमीच आहे. 

आता तुम्ही म्हणाल, याचं काय कौतुक? तर आपल्याकडे पोरींच्या लग्नापायी जमीन-जुमलं विकून खोटी, क्षणिक श्रीमंती मिरवणारे खूप पालक आहेत. त्यांची अवस्था बघितली की याचं कौतुकही वाटू शकतंय. पण आपण असं काहीही न करता, खिचडी टीवी सीरीयलमधल्या पोरांच्या चालीत.. 'बडे लोग बडे लोग..' असं म्हणून मोकळं व्हायचं. कारण आकडेमोडीपेक्षाही, बोटं मोडीचा नाद आपल्या लेखी केव्हाही चांगलाच असतो!