वास्तवाला भिडणारा आंबेडकरी मूल्यांचा सिनेमा

०६ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्‍या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची लोकशाहीवादी ओळख सर्वदूर प्रस्थापित करण्यात प्रचंड मोठा वाटा उचललेला आहे. बाबासाहेबांनी स्तरित, विघटित भारतीय समाजाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवतावादी मूल्यांची देणगी राज्यघटनेच्या माध्यमातून दिली.

वंचित, दलित समाजालाही बुद्धाच्या धम्माशी जोडून याच मानवतावादी मूल्यांची कास धरून भारताच्या प्रगतीत समान वाटा उचलायला सक्षम होण्याची दिक्षा दिली. भारताला खर्‍या अर्थाने लोकशाही मूल्यांशी जोडण्याचं काम केलं. तरीही समाज या जगातल्या सर्वश्रेष्ठ आणि तेजस्वी अशा महापुरुषाची केवळ जातच पाहत राहिला आणि त्यांनी दिलेल्या मानवी मूल्यांच्या देणगीकडे अत्यंत पूर्वग्रहदूषित नजरेनंच पाहू लागला.

आज बर्‍याच अंशी सामाजिक स्तरावर जागृती होऊन बाबासाहेबांच्या कार्याकडे पाहण्याची दृष्टी निवळू लागली असली, तरी काही सामाजिक-राजकीय सुप्त हेतू साधून घेऊ इच्छिणार्‍या घटकांकडून अद्यापही विष कालवून सामाजिक दृष्टिकोन कलुषित करण्याचं काम सुरूच आहे. मनोरंजन क्षेत्रानेही बाबासाहेबांच्या या कामाला बराच काळ दुर्लक्षित ठेवलं.

सिनेमा वास्तवाला भिडू पाहतोय

टीवीवर बाबासाहेबांवर प्रदीर्घ मालिका यायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. महात्मा फुल्यांवरची मालिका बंद पडण्याची वेळ येते, हे या दृष्टिकोनाचंच द्योतक आहे, असं म्हणायला वाव आहे. आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर जो नितांतसुंदर सिनेमा बनवला, त्याच्या मुहूर्ताला क्लॅप देण्यासाठी बाबासाहेब माईसाहेबांसह आवर्जून उपस्थित राहिलेले होते. याची नोंद घ्यायला हवी.

सिनेमाचं क्षेत्र हे अधिकच गुंतवणुकीचं आणि गुंतागुंतीचं क्षेत्र. प्रदीर्घ काळ फॅण्टसीच्या, अतिरंजित प्रेमकथांच्या, मारधाडपटांच्या वळणाने प्रवास केल्यानंतर आता कुठे गेल्या एक-दोन दशकभरात भारतीय सिनेमा काही अंशी वास्तवाच्या जवळ जाऊ पाहतो आहे; वास्तवाला भिडू पाहतो आहे. नव्या पिढीतले नवे तरुण प्रयोगशील निर्माते-दिग्दर्शक भारतीय सिनेसृष्टीत वंचित-शोषितांच्या वेदना मांडू पाहत आहेत.

या समाज घटकांचे प्रश्न अभिजन वर्गासमोर प्रकर्षाने, निर्भीडपणे सादर करत आहेत. त्यांच्या हृदयाला पाझर फोडू पाहताहेत, त्या वेदनांशी त्यांनीही नातं जोडावं, यासाठी प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे सारे प्रयत्न करत असताना अंतिमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक नीतिमूल्यांचाच पुरस्कार ते करताना दिसतात.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आंबेडकरी जाणीव असलेले सिनेमे

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षावर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा इंग्रजी, हिंदी आणि तमिळ असा बहुभाषिक सिनेमा तयार केला. बाबासाहेबांचं जीवनचरित्र इतक्या गुंतागुंतीच्या घटनांनी व्याप्त आहे की, अवघ्या तीन तासांत ते सारं बसवण्यासाठी पटेल यांनी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि एक नितांतसुंदर सिनेमा दिला.

बाबासाहेबांवर तसे वेगवेगळ्या भारतीय भाषांमधे १५हून अधिक सिनेमा निर्माण झाल्याची माहिती संदेश हिवाळे यांनी दिली. त्यात माता रमाईंवरच्या काही सिनेमांचाही समावेश आहे. २००८ला ‘जोशी की कांबळे’ असा एक सिनेमा आला होता. त्यात अमेय वाघनं एका अशा आंबेडकरी युवकाची भूमिका साकारली होती, ज्याचे जैविक आईवडील ब्राह्मण असतात. मात्र, तो वाढला आहे एका अनुसूचित जातीच्या कुटुंबात. भारतीय जातीव्यवस्था, आरक्षण अशा विषयांचा वेगळ्या अंगाने स्पर्श करणारा हा सिनेमा होता.

‘शूद्रा : द रायझिंग’ हा एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित सिनेमा २०१२ला आला होता. संजीव जैस्वाल यांच्या या सिनेमात चातुर्वर्ण्याच्या तळातल्या शूद्रवर्णीय घटकांचं जिणं, त्यांचं वरच्या त्रैवर्णीयांकडून होणारं शोषण यांचं चित्रण होतं. शूद्रांच्या शोषणाची जाणीव करून देणारा हा सिनेमा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेला होता. प्रवीण दामले यांनी २०१३ला ‘अ जर्नी ऑफ सम्यक बुद्धा’ हा सिनेमा बाबासाहेबांच्या ‘बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाचा आधार घेऊन तयार केला. तोही बाबासाहेबांना समर्पित करण्यात आला होता.

समकालीन सामाजिक समस्यांना भिडणारे सिनेमा भारतात वेळोवेळी निर्माण झाले. त्यात १९३६ चा अछूत कन्या, १९५४ला आलेला सुजाता, १९७४चा अंकुर, १९९४ला आलेला बँडिट क्वीन, १९८१चा सद्गती, १९८५चा दामुल, २०१२चा आरक्षण, २०१९ला आलेला आर्टिकल-१५ अशा काही निवडक माईलस्टोन सिनेमांचा उल्लेख करता येईल.

भेदभावाला तिलांजली, समतेचा हुंकार

प्रकाश झा यांनी अलीकडच्या काळात चाललेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणावर प्रकाश टाकताना त्याला आरक्षण धोरणाची फोडणी देऊन बनवलेला ‘आरक्षण’ हा टिपिकल व्यावसायिक सिनेमा. पण त्यातले काही संवाद फार महत्त्वाचे आहेत. ‘मेहनत किए बिना फल पाने की तुम लोगों की आदत है।’, ‘आधा क्यूँ? तुम पुरा ही रख लो।’ अशा आरक्षणविरोधी संवादांचा प्रतिवाद करणारे संवादही सिनेमात येतात.

‘हम में से एक को मौका मिला, तो उसने इस देश का संविधान लिख डाला।’, ‘तुम हमे मेहनत क्या सिखाओगे? हम आज भी बैल जोतना नहीं भूलें।’, ‘अगर आप हमारे साथ नहीं, तो आप हमारे खिलाफ है।’ अशा संवादांतून आरक्षण समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचं म्हणणं प्रेक्षकांसमोर येतं. काही बॅलन्स तरीही सूचक संवादही येतात. ‘भारत दो हिस्सों में बटा है।’, ‘परिवर्तन की किमत तो चुकानी पडेगी।’ हे त्यातले काही!

राज्य घटनेतलं कलम-१५ हे जात, धर्म, लिंग, वंश, जन्म, प्रांत अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करण्याबद्दल अर्थातच समानतेबाबत सूचन करणारं आहे. पण वास्तव या कलमापासून किती दूर आहे, हे दाखवणारा अनुभव सिन्हाचा ‘आर्टिकल-१५’ आहे. ‘वो इस किताब की नहीं चलने देते; जिसकी ये शपथ लेते हैं! यही तो लड़ाई है। उस किताब की चलानी पड़ेगी! उसी से चलेगा देश!! फर्क बहुत कर लिया… अब फर्क लाएँगे।’ भेदभावाला तिलांजली देऊन समतेचा हुंकार जणू इथं भरण्यात आला आहे.

हेही वाचा: द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

शतकांचा लॉकडाऊन तोडणारे सिनेमे

मराठीत नागराज मंजुळे यांनी प्रचंड ताकतीने इथलं जातवास्तव अधोरेखित केलंय. ‘पिस्तुल्या’ या लघुपट ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सिनेमात आजही जातिभेदाची दरी समाजात किती रुंद आहे आणि त्यामुळे परिवर्तनाला कशी खीळ बसतेय, हे खूप प्रत्ययकारितेने दाखवलंय. पण आपण लक्षात ठेवतो ते फक्त ‘झिंगाट’ ही झिंग, हा उन्माद नेमका कशाचा आहे, हे लक्षात न घेता!

चैतन्य ताम्हाणे याच्या ‘कोर्ट’चा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जातिभेदामुळे न्यायाच्या बाबतीत होणार्‍या दिरंगाई, हेळसांडीची व्यथा ‘कोर्ट’ दाखवतो. ‘फँड्री’त जब्या जसा व्यवस्थेवर अर्थात निष्क्रिय प्रेक्षकांवर जीव खाऊन दगड भिरकावतो तशीच एक सणसणीत चपराक ‘कोर्ट’ देतो आणि प्रेक्षकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो.

लॉकडाऊननंतर आता सिनेमागृहं उघडत असतानाच शैलेश नरवडे यांचा ‘जयंती’ आलाय. आजच्या काळात प्रस्थापित राजकीय व्यवस्था तरुणाईचं जातिधर्माच्या आधारावर मानसिक शोषण कशा पद्धतीने करते आणि त्यातून युवकांनी सावरून, विचार करण्याची किती गरज आहे, याचं सूचन ‘जयंती’ प्रत्ययकारितेने करतो आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला आंबेडकरवाद

मराठीसह प्रादेशिक भाषांत आता असे प्रयोग तरुण निर्माते-दिग्दर्शक करू लागले आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पा. रंजित यांच्या रूपाने आपल्या नागराजसारखाच ताकदीचा निर्माता-दिग्दर्शक उदयास आला आहे. सामाजिक-राजकीय स्टेटमेंट आक्रमकपणाने करण्यात त्याचे सिनेमे खूपच अग्रेसर आहेत. अट्टाकथी, मद्रास, कबाली, काला आणि सारपट्टा परंबराई यांसारखे सिनेमे आणि त्यातल्या फ्रेम रंजितच्या आंबेडकरवादी दृष्टिकोनाची साक्ष देत राहतात.

आंबेडकरवाद दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठ्या जोमाने विस्तारतोय. पा. रंजिथ, वेत्री मारनसह लेनिन भारती, मारी सेल्वराज, बालाजी शक्तिवेल, राजू मुरुगन हे दिग्दर्शक आपल्या सिनेमामधून वंचितांचा आवाज आपापल्या पद्धतीने, आपापल्या शैलीत बुलंद करताहेत. लेनिन भारती यांचा मेर्कू थोडार्ची मलई, मारी सेल्वराज यांचे परियेरुम पेरुमल, कर्णन आणि टी. जे. ज्ञानवेल यांचा ‘जय भीम’ या सिनेमाचाही इथं उल्लेख करावा लागेल.

मुख्य प्रवाहातल्या दाक्षिणात्य चित्रपटांत वर्गसंघर्ष सर्वसामान्य आहे. मात्र, तो या दिग्दर्शकांनी अधिक टोकदार केलेला आहे. त्या संघर्षाला सूक्ष्म पातळीवर घेऊन जाताना त्यातल्या जातिभेदाचं वास्तव प्रकर्षाने सामोरं आणताहेत. व्यावसायिक सिनेमातून त्यांनी वंचितांच्या संघर्षाला आवाज मिळवून दिला आहे. या सिनेमात जे दलित आजवर केवळ मजूर, कामगार, व्यसनी, गुन्हेगार आणि त्यांचे साथीदार अशाच भूमिकांतून दिसत होते, त्यांच्यातल्याच माणसाला ‘लार्जर’ स्वरूपात सादर करताहेत.

कोणीतरी त्रयस्थ मसिहा शोषित दलितांचा उद्धार करण्यासाठी धावून येत होता, त्याऐवजी आता त्यांच्यातला एक अन्यायाविरुद्ध उभा ठाकतोय हे पाहणं आजच्या आंबेडकरवादी तरुणांसाठी अत्यंत प्रेरक आहे. ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा बाबासाहेबांचा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं हे सिनेमा सांगत राहतात. वंचितांचा हुंकार त्या माध्यमातून रुपेरी पडदा व्यापून उरतो आहे. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्‍या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतो आहे.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)